२०२१-०७-२७

उदय

डॉ. अब्दुल कलाम यांचा आज स्मृतीदिन आहे. त्यांच्या स्वतःकरता नोंदीया आत्मचरित्रातील आठव्या प्रकरणाचा मराठी अनुवाद “उदय [१]”.

(जन्मः १५ ऑक्टोंबर १९३१, रामेश्वरम्‌, मृत्यूः २७ जुलै २०१५, शिलाँग)

शुचिष्मंत निस्वार्थ नेतृत्व यावे; कला, उद्यमे, वैभवांनी फुलावे ।
नवे ज्ञान, साहित्य, तत्त्वा भिडावे; उभ्या भारती लोककल्याण व्हावे ॥ -  ग. दि. माडगूळकर 

१९९९ साली सुदैवाने गदिमांची ही इच्छा फलद्रुप झाली. अटल बिहारी वाजपेयींच्या रूपात देशाला शुचिष्मंत, निस्वार्थ नेतृत्व लाभले. त्यांच्याच पुढाकाराने देशाला डॉ. अब्दुल कलाम यांच्यासारखा राष्ट्रपती मिळाला. नवे ज्ञान, साहित्य, तत्त्व इत्यादींच्या संगमाने उभ्या भारतात लोककल्याण होतांना दिसू लागले. मात्र त्यादरम्यान प्रत्यक्षात ज्या घडामोडी घडून आल्या त्यांबाबत मोलाची माहिती, स्वतः डॉ. अब्दुल कलाम यांनीच लिहिलेल्या या आठवणींत आढळून येते.

उदय 

’सबलीकरण अंतरातूनच होत असते. ईश्वराखेरीज, कुणीही ते देऊ शकत नाही.’ [२]

३० जून २००१ रोजी मी प्रमुख स्वामीजींना दिल्लीत भेटलो. बोचासनवासी श्री. अक्षर पुरूषोत्तम स्वामिनारायण संस्थेचे (बी.ए.पी.एस.) ते प्रमुख आहेत. तेव्हाच मी प्रमुख स्वामीजींच्या सौम्य, भारदस्त दर्शनाने भारावलो. माझे विचार त्यांना सांगावेत असे मला प्राकर्षाने वाटू लागले. मी प्रमुख स्वामीजींना सांगितले की, १८५७ पूर्वी देशाला स्वतंत्रतेची स्वप्ने पडत असत. नव्वद वर्षेपर्यंत दीर्घकाळ हा संघर्ष सुरू राहिला. या काळात संपूर्ण भारतीय समाज, जीवनाच्या सर्व क्षेत्रांतील लोक, गरीब आणि श्रीमंत, युवा आणि प्रौढ, उच्च वर्गीय आणि सामान्य, शिक्षित तसेच अशिक्षित, सगळे या उद्दिष्टाकरता एकत्र आलेले होते. उद्दिष्ट एकमेव आणि केंद्रिकृत होते. सगळ्यांना हे समजून चुकले होते की भारत स्वतंत्र झाला पाहिजे.

मी प्रमुख स्वामीजींना; अणुऊर्जा, अवकाश संशोधन आणि संरक्षण संशोधन या भारताच्या तीन महान वैज्ञानिक क्षेत्रांतील, माझ्या चाळीस वर्षांतील कामांबद्दलही अवगत केले. मी त्यांना म्हणालो की, स्वतंत्र झाल्यापासूनच्या पन्नास वर्षांपश्चातही भारतात कुठलीही नवीन संकल्पना निर्माण झाली नाही हे पाहून मला खेद होतो. भारत अजूनही अविकसित देशच राहिलेला होता. तो आर्थिकदृष्ट्या सशक्त नव्हता. सामाजिकदृष्ट्या तो एकसंध नव्हता आणि या सर्व काळात सुस्थिरही नव्हता. खरोखरीच, देशाच्या सुरक्षिततेसमोर गंभीर स्वरूपाचे धोके होते. देशाची ऊर्जा-कमतरता असहनीय होती. तेल आणि क्रांतिक तंत्रज्ञानाच्या आयातीबाबत, पांगळे करणार्‍या अवलंबित्वाने देश गांजलेला होता.

मग मी विषयभागाच्या गाभ्यापर्यंत पोहोचलो. अगदी न कचरता मी हे म्हणालो की, सरकारकडून पुरेसा पाठिंबा मिळणे किंवा पुरेसे आर्थिक पाठबळ मिळणे एवढेच पुरेसे नाही. देश विकसित करण्यास आवश्यक ते लोक मिळवणेच दुरापास्त होत आहे. विकसित भारताचे महान स्वप्न साकार करण्यासाठी तीन प्रकारच्या लोकांची आवश्यकता आहे. गुणवान लोक, गुणवान नेते आणि गुणवान अधिकारी. हे लोक कसे मिळवता येतील?

स्वामिजींनी थोडक्यात एक उत्स्फूर्त उत्तर दिले, ’लोकांचा ईश्वरावर विश्वास असायला हवा. आज्ञाधारकता असायला हवी. सर्व परिस्थितींत त्यांनी ईश्वरेच्छेचा आदर करायला हवा. दैववश गोष्टींना आपल्यापैकी कुणीही नाकारू शकत नाही, बदलू शकत नाही किंवा विरोधही करू शकत नाही. ते सर्व देवावरच सोडून दिले पाहिजे.’ एक तासाहून अधिक काळ चाललेल्या त्यानंतरच्या चर्चेत, स्वामिजींनी याच विचारांचा विस्तार केला.

आता मला हे स्पष्ट होऊ लागलेले होते की, शैक्षणिक आणि वैज्ञानिक प्रशिक्षणाखेरीज, आध्यात्मिक प्रशिक्षणही शाळांतून दिले गेले पाहिजे. सुरूवातीपासूनच, मुलांना मूल्ये शिकविली गेली पाहिजेत. तेव्हाच ते गुणवान प्रौढ होऊ शकतील. ’लोकांच्या अंतरात काय आहे ते, ईश्वर तोपर्यंत बदलू शकत नाही, जोपर्यंत ते स्वतःच त्यांच्या अंतरंगात परिवर्तन करत नाहीत.’ स्वामिजी म्हणाले.

प्रमुख स्वामिजींनी मला पहिल्या भेटीपासूनच प्रेरित केले होते. मग मी त्यांच्याशी संपर्क ठेवणे सुरू केले. असंख्यांकरता ते जसे आहेत तसे, ते मग माझ्याकरताही आध्यात्मिक गुरू, मित्र आणि मार्गदर्शक झाले.

’दैवी निकड जाणवणे हीच आध्यात्मिक जागृतीची सुरूवात असते कारण त्यामुळे ईश्वरास वास्तवात आणण्याची इच्छा निर्माण होते’ [३]

३० सप्टेंबर २००१ रोजी मी चक्रपंखाने (हेलिकॉप्टरने), झारखंड राज्य विज्ञान आणि तंत्रज्ञान परिषदेच्या सभेकरता, रांची ते बोकारो जात होतो. हवेत भयंकर विचलन होत होते. चालक म्हणाला की चक्रपंखीच्या फिरत्या आसातच (रोटर) काहीतरी भयंकर बिघाड झालेला आहे. संध्याकाळी ०४:३० च्या सुमारास, बोकारोत उतरण्याच्या काही क्षण आधीच चालनायंत्र (इंजिन) बंद पडले. सुमारे १०० मीटर उंचीवरून, चक्रपंख जमिनीकडे झेपावले. आश्चर्यकारकरीत्या, आत बसलेले आम्ही सर्व बचावलो. हे सांगायलाच नको की, आम्ही सर्व, भीतीने हादरलो होतो.

त्या रात्री मला एक सुस्पष्टसे स्वप्न पडले. मैलोगणिक पसरलेल्या, पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात चमचमणार्‍या चंदेरी वाळूच्या एका वाळवंटात मी होतो. पाच माणसे माझ्याभोवती कडे करून उभी होती. ज्या ऐतिहासिक व्यक्तींचा मी स्तुतीपाठक होतो तीच होती ती माणसे. सम्राट अशोक, खलिफ उमर, अल्बर्ट आईन्स्टाईन आणि महात्मा गांधी. एक एक करून ते पुढे आले आणि मला सल्ला देऊ लागले.

दुसरे दिवशी सकाळी, मी वर्तमानपत्रांत वाचले की, युवा नेते माधवराव जिवाजीराव शिंदिया आणि पत्रकारांची एक चमू यांना घेऊन जाणारे एक विमान, उत्तरप्रदेशातील मैनपुरीच्या बाहेरच्या बाजूला कोसळले. आत असलेले सर्वच जण मृत्यू पावले होते. मला खूप दुःख झाले आणि मग माझ्या कण्यातून एक शिरशिरी उठली. बोकारोत, चक्रपंखाची शक्ती जर काही सेकंद आधीच नष्ट झाली असती तर काय झाले असते? या अपघातातून मी वाचण्यात आणि स्वप्नातील दैवी संदेशात काही संबंध असेल का?

दिल्लीत परतल्यावर मी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींना भेटलो आणि त्यांना विनंती केली की मला सरकारी सेवेतून मुक्त करावे. मी म्हणालो, ’महोदय, मी सूर्याभोवती सत्तर फेरे पूर्ण केलेले आहेत, मी आता रजा घ्यावी काय?’ पंतप्रधान वाजपेयींनी मला मंत्रीपद देऊ केले. मी नम्रपणे त्यास नकार दिला. त्यानंतर काही क्षण शांततेत गेल्यावर, आणि काही अस्फूट शब्द हवेत तरंगू लागल्यावर, पंतप्रधान म्हणाले, ’जैसी आपकी मर्जी (तुमची जशी इच्छा असेल, तसेच होवो.)’

नोव्हेंबर २००१ मध्ये, मी पूर्वी जिथे शिक्षण घेतलेले होते त्या, चेन्नईतील अन्ना युनिव्हर्सिटीत तंत्रज्ञान आणि सामाजिक परिवर्तन विषयाचा प्राध्यापक म्हणून रूजू झालो. मी शिक्षण आणि संशोधन कार्यांत गुंतलो, जे मी नेहमीच करू चाहत होतो. मात्र माझ्या अधिकृत पदांच्या व्यापामुळे मला शिकवता येणे शक्य होत नव्हते. तोपर्यंत हे मला कळून चुकले होते की, आध्यात्मिकरीत्या प्रज्ज्वलित, कुशल आणि कष्टाळू युवक मी निर्माण करावे असेच विधिलिखीत होते. हे काही केवळ वर्गातील शिकवणीने संभवत नव्हते. त्याहून खूप अधिक असे काहीतरी करायला हवे होते.

मला माहीत होते की मी देशातील युवकांप्रत पोहोचले पाहिजे. याचा अर्थ असा होता की मला देशभर प्रवास करून थेट त्यांच्याशी बोलावे लागेल. लवकरच मला असे लक्षात आले की, भारतीय हुशार विद्यार्थ्यांच्या मनांतील ऊर्जा केवळ प्रज्ज्वलित होण्याच्या प्रतीक्षेत आहे. ११ एप्रिल २००२ रोजी मला आनंदालय हायस्कूल, आणंद, गुजरात येथे एका कार्यक्रमाकरता बोलावण्यात आलेले होते. आदल्या दिवशी संध्याकाळी जेव्हा मी अहमदाबादला पोहोचलो, तेव्हा तिथे संचारबंदी सुरू होती. मी पोलीस संरक्षणात जमीनमार्गे आणंदला गेलो. दुसरे दिवशी शाळेत माझ्या व्याख्यानानंतरच्या अनौपचारिक गप्पांत एका मुलाने मला विचारले: ’शत्रू कोण आहे?’ माझ्याकडे चटकन देण्यासारखे काही उत्तर नव्हते. म्हणून मी तो प्रश्न तिथे उपस्थित असलेल्या मुलांकडे सुपूर्त केला. काही वेळाने एका मुलीने उत्तर दिले, ’महोदय, आपला शत्रू गरीबी आहे’. तिच्या उत्तरातील स्पष्टतेने मी शहारलो. काळ्याकुट्ट ढगांना कापत झळकणार्‍या सूर्याप्रमाणे ते उत्तर दीप्तीमान होते.

अंतरात खोलवर मात्र, मला माहीत होते की आध्यात्मिक दारिद्र्य हे भौतिक दारिद्र्याहूनही जास्त आहे. आत्म्याबाबचे अज्ञान हाच आपला खरा शत्रू आहे.

या वेळी माझी अशी अपेक्षा होती की मी माझी उर्वरित वर्षे भारतीय मुलांशी थेट संवाद साधत व्यतीत करेन. मला वाटे की तरूणांच्या मनांना शिक्षणाप्रतीच्या तसेच, अधिक आध्यात्मिक अस्तित्वाच्या ओढीने प्रज्ज्वलित करणे हे माझे कर्तव्य आहे. जे कर्तव्य माझ्या शिक्षकांनी माझ्याकरता पार पाडलेले होते. तसे होणार नव्हते. अन्ना युनिव्हर्सिटीत परतल्यावर १० जून २००२ रोजी मला कुलगुरूंच्या कार्यालयातून एक तातडीचा संदेश प्राप्त झाला. पंतप्रधानांच्या कार्यालयातून माझी चौकशी होत होती. मला पंतप्रधानांशी बोलण्याकरता, थेट कुलगुरूंच्या दूरध्वनीपाशी उपस्थित राहण्यास सांगण्यात आले.

काही काळापासून माझा कुणाही सरकारी कर्मचार्‍याशी काही संपर्क नसल्याने मी गोंधळून गेलो. जेव्हा मी कुलगुरूंच्या कार्यालयात जाऊन पोहोचलो तेव्हा, पंतप्रधान कर्यालयाशी संपर्क प्रस्थापित झाला आणि काही मिनिटांतच पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी बोलू लागले. ते म्हणाले, ’कलाम साहेब, देशाला राष्ट्रपती म्हणून तुमची आवश्यकता आहे.’ मी पंतप्रधानांना धन्यवाद दिले आणि माझ्या कुटुंबियांशी बोलण्याकरता एक तास वेळ मागून घेतला. त्यानंतर मी त्यांना उत्तर देणार होतो. वाजपेयी म्हणाले, ’तसे करा, पण मला मात्र तुमचा फक्त होकार हवा आहे, नकार नाही.’

’गोष्टींचे स्वरूप म्हणजे धर्म’ [४]

मी माझा राष्ट्रपतीपदाकरताच्या उमेदवारीचा अर्ज १८ जून २००२ रोजी संसदेत दाखल केला. मला जेव्हा विचारण्यात आलेले होते की अर्ज दाखल करण्यासाठीचा शुभ मुहूर्त कोणता, तेव्हा मी म्हणालो होतो की, जग अवकाशशास्त्राच्या आधारे चालत असते, ज्योतिषशास्त्राच्या आधारे नाही. मी देशातील सर्वोच्च पदावर जाणार होतो, पण ज्या वर्तनाने मला माझ्या सर्व कार्यकाळात तारले होते, त्याच पद्धतीने मी आताही जगणार होतो. मी शास्त्रज्ञच राहणार होतो.

माझ्या धार्मिकतेबद्दलचा मुद्दा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान उपस्थित होणे अपरिहार्यच होते. माझ्याशी, पूर्व-राष्ट्रपती असलेल्या झाकीर हुसेन आणि फक्रुद्दिन अली अहमद यांची तुलना तर फेटाळूनच लावली गेली. मी शब्दाच्या सामान्य अर्थाने मुस्लिम समजला जात नव्हतो. वीणावादन, भगवद्गीता वाचन, रामेश्वरम मध्ये जन्मलेला मुस्लिम हे सारेच अवास्तव वाटणारे होते.

नेहमीच्या मतपेटीच्या (व्होटबँक) भारतीय राजकारणाला माझ्या उमेदवारीने आव्हान दिलेले होते. बहुधा ते एवढे आश्चर्यकारक नसावे. अखेरीस भारत हा अनेकविध अनेकतांचा समाज आहे. काही समालोचकांनी लगेचच याचीही नोंद केली की, भारताच्या समृद्ध प्राचीन संस्कृती आणि धार्मिक परंपरांतील माझे स्वारस्य, मुस्लिमांतही मुळीच असामान्य नव्हते. एका पत्रकाराने लिहिलेः

’भारतीय मुस्लिम इतर भारतीयाप्रमाणेच सर्वतोपरी, त्याच्या गावाची, जिल्ह्याची, राज्याची निर्मिती असतो. कलामही त्याच निरंतर परंपरेचे पाईक आहेत. मात्र जागतिक आणि आपल्याही माध्यमांच्या, मुस्लिमांचे एकरंगी चित्र रंगवण्याच्या लाडक्या हौसेपायी, आपल्यालाच त्या परंपरेबाबत विसर पडला आहे. कलामांच्या हिंदू रचनांबाबतच्या परिचिततेबाबत असे म्हणता येईल की, चेन्नईतील न्यायमूर्ती इस्माईल कंब रामायणावरील आघाडीचे जाणते नव्हते काय? आणि कलामांनाही आपल्या रामभक्तीच्या दाखल्याकरता दशरथपुत्र रामास समर्पित असलेल्या अब्दुल रहिम खान-ए-खानांच्या संस्कृत ओळींचा आधारच घ्यावा लागतो’ [५].

जे आवश्यक आहे त्याने सुरूवात करा, जे शक्य होईल ते करा, आणि अचानक तुम्ही अशक्यप्राय गोष्ट साध्य करता आहात असे दिसेल’ [६]. जर आपण सारेच जण एखाद्याकडे करुणेने आणि समजूतदारीने पाहू लागलो, तर जातीय दंगे कधी घडू शकतील अशी कल्पनाही करणे असंभव होईल.

राष्ट्रपतीपदाचे पहिले काही महिने सार्वजनिक कार्यक्रम आणि सभांची वावटळ सुरूच राहिली. गुजरातमधील दोन घटना किमान व्यक्तीगत कारणांकरता माझ्या स्मृतीत आहेत.

मी नेहमीच माझा वाढदिवस साजरा करणे टाळत आलेलो आहे. आता तर मी लोकनेता होतो, त्यामुळे हे आणखीनच अवघड झालेले होते. त्यावर राजधानीपासून दूर असणे हा उपाय मला सापडला होता. अरुणाचल प्रदेशातील तवांगमधील केंद्रिय पर्यटन मंत्रालयाने मला बुद्ध महोत्सव समारोहाकरता १५ ऑक्टोंबर २००२ रोजी बोलावलेले होते. मी उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला. गॅल्डेन नामग्याल ल्हात्से या पवित्र बुद्ध मठाबद्दल मीही बरेच ऐकलेले होते. आशियातील महायान पंथाच्या लामांचा तो सर्वात मोठा मठ होता. तवांग-च्यू खोर्‍यावर नजर ठेवून असलेल्या टेकडीच्या बाहेर डोकावणार्‍या टोकावर, समुद्रसपाटीपासून ११,००० फुटांच्या उंचीवर, तो स्थित आहे. मी भारतीय वायुदलाच्या चक्रपंखातून तेथे पोहोचलो. सर्वोच्च शिखरांवरून उडत असतांना, प्राणवायूचा मुखवटा घातलेला होता.

वैभवशाली रंगांनी सजलेल्या मंदिरात मी प्रार्थना केली आणि रिंपोचे (लामांच्या प्रमुखाकरताचे स्थानिक भाषेतील नाव) यांना भेटलो.

मी रिंपोचेंना विचारले, ’भारतीय जनतेसाठी मी काय संदेश इथून घेऊन जावा?’
’हिंसाचार सोडा’, रिंपोचेंनी उत्तर दिले.
’मी ते कसे करू शकेन?’
’तुमचा अहंकार हवेत उडवून टाकला तर ते शक्य आहे. अहंभावच स्वार्थाचा गाभा असतो. त्यातूनच सर्व हिंसाचार उद्भवतो.’
’पण हे कसे साध्य करता येईल? आपण आपला अहंकार कसा नियंत्रित करू शकतो?’
’ ’मी’ आणि ’माझे’ यांना विसरायला शिका. ’ 

या साध्या, सरस आणि स्वल्प उत्तराने मी थक्क झालो. रिंपोचे यांच्या तेजस्वी शब्दांत, मला सर्व मानवी संबंधांतील अडचणींचे मूळ दिसून आले.

रमादानचा पवित्र महिना ५ नोव्हेंबर २००२ रोजी सुरू झाला. दिल्लीतील प्रथेनुसार, सर्व प्रख्यात लोक -राष्ट्रपती, पंतप्रधान, राजकारणी नेते, राजदूत आणि व्यावसायिक- इफ्तार पार्ट्या करतात. त्यांत सूर्यास्तानंतर जेव्हा मुस्लिम रमादानचे उपवास सोडतात तेव्हा संध्याकाळचे जेवण असते. सर्वधर्माचे लोक त्यात सामील होतात. अनेकांनी तर दिवसभरही भरपूर खाल्लेले असते. उपस्थितांच्या यादीची वृत्ते दिली जातात. एवढेच नव्हे तर अनुपस्थितांची नावेही बातम्या घडवतात. अनेक वर्षांपासून इफ्तार पार्ट्या, राजकीय कट-कारस्थानांच्या विश्लेषकांकरता; नवे सिद्धांत प्रसवणार्या, नव्या आघाड्यांची भाकीते करणार्या, अशा प्रकारच्या घटना झालेल्या आहेत. तरीही असे म्हणता येईल की, या पार्ट्यांत अन्नपदार्थही बहुधा, शोधल्यास सापडू शकतात.

नव्या राष्ट्रपतींकडून भव्य इफ्तार पार्टी अपेक्षित होती. विशेषतः देशात अनेक लोक भुकेले राहत असतांना, मी पार्टी द्यावी हे मला मात्र मुळीच पटलेले नव्हते. सचिव पी.एम.नायर यांना मी विचारले, आधीच चांगले पोट भरलेल्यांना जेवायला देण्याकरता मी कशाला पार्टी देऊ? मी त्यांना हे शोधून काढायला सांगितले की इफ्तार पार्टीकरता खर्च किती येऊ शकतो. अंदाजे २२ लाख रुपये खर्च येत होता. मी पी.एम.नायर यांना ती रक्कम काही अनाथालयांना अन्न, कपडे आणि ब्लँकेटसच्या स्वरूपात दान देण्यास सांगितले. अशा अनाथालयांची निवड राष्ट्रभवनातील एक चमू करेल. यात माझा काहीच सहभाग असणार नाही. अपवाद फक्त माझ्या देणगीच्या थोड्याशा रकमेची त्यात भर घालण्याचा असेल.

त्या रात्री मला माझ्या वडिलांचा आवाज माझ्या डोक्यात ऐकू आला, ’तुमच्या धर्माच्या आधी तुमच्या चैनी ठेवणे; परलोकातील स्वारस्यांच्या आधी इहलोकातील स्वारस्ये राखणे आणि कर्त्याच्या आधी त्याची निर्मिती ठेवणे यातच तुमचा नाश अनुस्यूत असतो. हा सल्ला व्यवहारात आणा आणि त्यानेच तुम्हाला हवे ते सारे साध्य होईल.’

हे जग हे खरेतर पारलौकिक शेती आहे. मशागत हृदयातच करायला हवी. बीज म्हणजे ईश्वरावरील श्रद्धा असावी आणि तिचे निर्वहन सत्कर्मांनी व्हावे. जर तुमचे अंतरंग कोमल असेल, करूणामय असेल आणि दयावान असेल तर, तुम्हाला चांगली फळे मिळतील, पण जर ते कठोर असेल आणि क्षमाशील नसेल तर, पीकही दुःखाविना फारसे अधिक काही असणार नाही.

संदर्भ

[१]   स्वतःकरता नोंदी या डॉ. अब्दुल कलाम यांच्या आत्मचरित्रातील प्रकरणे पुढीलप्रमाणे आहेत. १. माडबन, २. सापशिडी, ३. आशेचे धारिष्ट्य, ४. कंटाळवाणी वाटचाल, ५. कोशापासून फुलपाखरापर्यंत, ६. ईश्वरी उपकरण, ७. विकसित भारताची संकल्पना, ८. उदय, ९. अष्टपैलू व्यक्तिमत्व, १०. विश्वाचे आंगण, ११. कनवाळू तत्त्वज्ञ, १२. श्रेष्ठता. हे पुस्तक विज्ञान भारतीने २०१६ साली मूळ इंग्रजीत आणि त्यानंतर मराठीतही प्रकाशित केले. त्या मराठी अनुवादाचे काम श्री. नरेंद्र गोळे यांनीही केलेले आहे.

[२]   ए.पी.जे.अब्दुल कलाम, टर्निंग पॉईंटस, हार्पर कॉलिन्स, २०१२, पृ.२७.

[३]   मेहेर बाबा (१८९४-१९६९) हे भारतीय आध्यात्मिक जाणकार होते. १९२५ पासून तहहयात मेहेर बाबांनी मौन पाळले. डॉ. कलामांना मेहेर बाबांनी केलेले विश्वाचे वर्णन आवडत असे. खर्‍या अर्थाने जो एकमेव आविष्कार अस्तित्वात आहे त्या देवाची कल्पना म्हणजे हे विश्व आहे. प्रत्येक आत्माही स्वतःचे व्यक्तिगत दैवी वास्तव साकारण्याच्या कल्पनेतून पार होत असणारा ईश्वरच आहे.

[४]   आचार्य महाप्रज्ञ (१९२०-२०१०), जैन श्वेतांबर तेरापंथाचे दहावे प्रमुख, डॉ.कलामांना म्हणाले, ’वत्थु सहवो धम्मोअर्थात गोष्टींचे स्वरूप म्हणजे धर्म’. कायदाच एखाद्यास त्याच्या स्वभावाप्रत नेतो, बांधतो आणि मूळ स्वरूपात परतवत असतो. तो एखाद्यातील अनुस्यूत देवपण वास्तवात आणण्यास समर्थ करतो. कंटाळवाण्या अस्तित्वाच्या दुःखापासून स्वतःस अलग करण्यास आणि सर्वात सुदैवी पदास पोहोचण्यात मदत करतो.

[५]   सईद नक्वी, द इंडियन एक्सप्रेस, २१ जून २००२.

[६]   सेंट फ्रान्सिस ऑफ अस्सिसी, बाराव्या शतकातील इटालियन रोमन कॅथॉलिक फ्रिअर आणि प्रिचर.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: