२०२१-०३-११

सेवा द्यावी कशि न कळते, योगिही होत थक्क !

मी माझ्या ६३ वर्षे वयापैकी ३१ वर्षे सरकारी सेवा करत राहिलो. माझ्या समजुतीनुसार सेवाधर्म यथातथ्य पाळला. तरीही सेवेत असतांना कसे वागावे हा प्रश्न मला कायमच गोंधळात टाकत असे. मला वाटे की, देशभरात सुमारे एक कोटी लोक सरकारी सेवेत आहेत. त्यांना नाही ते प्रश्न पडत! मग मलाच का बरं असले प्रश्न पडत असावेत.

मी सेवेत रुजू झालो तेव्हा माझे वय जेमतेम तेवीस वर्षाचे होते. म्हणायला मी अबोलच होतो. त्यामुळे माझ्यावर ’मुखदुर्बळ’ असा शिक्का बसला नसता तर ते नवलच होते. किंबहुना मी त्या शिक्क्यासोबतच तर इथे रुजू झालेलो होतो. मात्र सरकारचा परिचय वाढत गेला तसतशी मला वाचा फुटली. अनुभवाचे बोल मी इतरांना सांगू लागलो. सुरूवातीला मला इंग्रजी भाषाही बोलणे अवघडच होते. मात्र पारिभाषिक शब्दांवरची हुकूमत मला ठायी ठायी आधार देत असे. व्यक्तिगत संगणनाची तेव्हा (१९८३) तर पहाटही झालेली नव्हती. त्या काळात मी सरकारकरता पहिला ’वर्ड प्रोसेसर’ विकत घेतला. मग तो वापरायचा कसा ते सगळ्या समकालीन वैज्ञानिक अधिकार्‍यांना समजावून देण्याकरता तर माझे भाषणच ठेवले गेले. त्यावेळी इतरांना जे मुळात माहीतच नव्हते, ते माझ्याकडूनच नव्याने कळत असल्याने, मी सांगत असे ते सर्व ऐकत असत. तेव्हा तर, क्वचित वरिष्ठ अधिकार्‍यांना मी ’फार बोलतो’ असेही वाटले असेल. ’मुखदुर्बळ’ पासून सुरूवात करून ’फार बोलतो’ (तेही इंग्रजीत हां) पर्यंतचा माझा प्रवास मला स्वतःलाच चकित करणारा होता.

साहेबांच्या मागे मागे करावे असा माझा स्वभावच नव्हता. त्यामुळे याला बहुधा काही कळतच नसावे असा समज कनिष्ठ कर्मचार्‍यांत दृढ झाला. माझ्यासोबतचे बहुसंख्य धडाडीचे अधिकारी यथावकाश इतर ठिकाणी सुरू होणार्‍या नवनव्या प्रकल्पात वर्ग झाले. मग माझ्यासारखे जे उरले होते तेच कार्यालयीन कार्यभार सांभाळू लागले. साहेबही जेव्हा कार्यालयात येत तेव्हा त्यांनाही मला घेऊनच फिरावे लागे, आणि मलाही दुसरा पर्यायच नव्हता. त्यामुळे जे निर्णय साहेबांकरता तुंबून असत तेही अनेकदा मलाच निकाली काढावे लागत. लोकांना वाटे की, याला कसं काय बुवा हा निर्णय करता आला. फारच की हो धीट झालाय! ’अज्ञ’ बालक पदापासून ’धीट’ अधिकार्‍यापर्यंत झालेला माझा प्रवास मलाच चकित करणारा होता.

आमच्या कार्यालयात कार्यकर्तृत्वावर आधारित परदेशी अभ्यासदौर्‍याची, सभा संमेलनांतून प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली जात असे. अनेक अधिकारी आपापल्या साहेब लोकांना खूश करून ती मिळवतही असत. असे अधिकारी ’पुढाकार घेणारे’ म्हणून ख्यातीप्राप्त होत. अर्थात मी अशांच्यात मोडणारा नव्हतोच. त्यामुळे मला अशी संधीही फारशी लाभली नाही. आम्ही असे लोक ’बुजरे’ सदरात मोडत असू. ’बुजरे’ सदरातून ’पुढाकार घेणारे’ सदरात मात्र माझा प्रवास फारसा झाला नाही.

अशा परिस्थितीत सरकारमध्ये नेमके वागावे कसे? हा प्रश्न मला नेहमीच सतावत राहिला. अगदी अलीकडे राजा भर्तृहरीच्या नीतिशतकातील श्लोकांचा अनुवाद करत असतांना मला या प्रश्नाबाबत मी एकटाच काही बुचकळ्यात पडलेलो नाही असा अमूल्य शोध लागला. राजा भर्तृहरी तर पुरातन काळापासून ’वागावे कसे’ या प्रश्नांचीच उत्तरे देत राहिलेला आहे. त्याने काय बरे उत्तर दिले या प्रश्नाचे? असा मला भुंगा लागला. तो श्लोकही गवसला आणि त्याचे उत्तरही. मात्र त्यामुळे तर मी अक्षरशः चकितच झालो.

बघू या तर तो मूळ श्लोक, त्याचा मी केलेला मराठी अनुवाद आणि वामन पंडितांनी केलेला मराठी अनुवादही. तात्पर्य असे की, ’सेवा द्यावी कशि न कळते, योगिही होत थक्क!’ आणि हे माझे म्हणणे नाही बरं का, स्वतः राजा भर्तृहरी सांगत आहेत.

ना बोले तो मुखदुर्बळ हो, बोलका बोलभांड
पाठीपाठी करत असता धीट, दूरस्थ अज्ञ ।
जो सोसे तो भिरु ठरतसे, सोसं ना तो मुजोर
सेवा द्यावी कशि न कळते, योगिही होत थक्क ॥ - मंदाक्रांता 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२१०३११

मूळ संस्कृत श्लोकः

मौनान्मूकः प्रवचनपटुर्वातुलो जल्पको वा
धृष्टः पार्श्वे वसति च सदा दूरतश्चाप्रगल्भः ।
क्षान्त्या भीरुर्यदि न सहते प्रायशो नाभिजातः
सेवाधर्मः परमगहनो योगिनामप्यगम्यः ॥ - मंदाक्रांता 

नीतिशतक-५८, राजा भर्तृहरी, इसवीसनपूर्व-५५४ वर्षे

मौने मूक दिसे वदे तरि महावाचाल पार्श्वी फिरे
तेव्हा धीट तसा विवेकच नसे जैं चालतां अंतरे ।
क्षांतीने तरि भ्याड शांति न धरी तैं गावडा यापरी
सेवाधर्म असा अगाध कथिला हा जाण योगीश्वरी ॥ - शार्दूलविक्रीडित    

मराठी अनुवादः वामन नरहरी शेष (वामन पंडित) इ.स.१६३६ ते १६९५.

सरळ मराठी अर्थः सेवक अबोल असेल तर मुखदुर्बळ, बोलका असेल तर बडबड्या, जवळ जवळ करत असेल तर उद्धट, दूरच राहत असेल तर अजाण, सहनशील असेल तर भित्रा आणि पुढाकाराने वागेल तर मुजोर अशी संभावना मालक करतात. त्यामुळे सेवा नेमकी कशी करावी हे योग्यांनाही कळत नाही!

आता ज्या प्रश्नांवर योगी लोकही पुरातन काळापासून थक्क होत आलेले आहेत, तिथे माझ्यासारख्याने बुचकळ्यात पडणे, हे काही नवलाचे नाहीच मुळी!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: