२०२०-०९-२८

’अनुवाद रंजन’ ची दीड लाख वाचने

२००४ सालच्या ऑक्टोंबरमध्ये मनोगत-डॉट-कॉम संकेतस्थळावर, मी महाजालावरील युनिकोड अक्षरसाच्यातील पहिली, गीताईची प्रत लिहिली. http://www.manogat.com/node/367. नंतरच्या दोन वर्षांत तिथे एका नव्याच पर्वाला सुरूवात झाली. सदस्य आपापसात मनोरंजक खेळ खेळू लागले. त्यात एक होता हिंदी गाण्यांचे त्याच चालींत गाता येतील असे मराठी अनुवाद तयार करण्याचा. सारा खेळ आपापसातच चालत असल्याने आस्वाद, विनिमय सुरळित चालत असे. ’प्रवासी (प्रणव सदाशिव काळे)’ हे तर हिंदी गीतांचा संस्कृत अनुवादही करत असत. पुढे तिथले प्रशासक श्री. महेश वेलणकर ह्यांनी मनोगत-डॉट-कॉम संकेतस्थळावर, जगातील पहिली मराठी, देवनागरीतील ’शुद्धलेखनचिकित्सा (स्पेलचेक)’ निर्माण केली. लिखाणातील शुद्धतेने मजकूर अधिकाधिक आस्वाद्य होत गेले. त्याशिवाय त्यांनी एक अशी सोय निर्माण करून दिली की, दर गुरूवारी असा एक अनुवाद, मूळ हिंदी गाणे न देताच प्रकाशित करायचा. पुढच्या गुरूवारी मग अनुवादक स्वतःच, तो अनुवाद कोणत्या गीताचा आहे ते सांगत असे. दरम्यान आठवडाभर इतर वाचक तो अनुवाद मुळात कोणत्या गीताचा असावा ते हुडकत राहत. अशाप्रकारे अगणित हिंदी गीतांचा मराठी अनुवाद, अनेक सदस्यांनी केला. सुमारे दीड वर्षे हा खेळ सुरू राहिला.

मग अनुवादाचा आस्वाद न घेता, हे काय लगेचच ओळखू येत आहे. मुळीच कोडे वाटत नाही. अशाप्रकारच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. साहिर लुधियानवीच्या शब्दरूप ताजमहालाला आपल्या दरिद्री शब्दकळेच्या विटा जोडू नका असे अनाहुत सल्लेही मिळू लागले. त्या सगळ्यांना अनुवादाच्या आस्वादास प्रवृत्त करण्यासाठी मग मी ’पद्यानुवादांचा रसास्वाद http://www.manogat.com/node/14134’ हा लेख लिहिला. मात्र एकदा सदस्यांनी निंदाव्यंजक सूर धरला की, आस्वादाची भावना मागे पडते. तसेच झाले. अनुवादकांनाही त्या वादंगांत स्वारस्य उरले नाही. मात्र अनुवाद करण्याचा जो छंद जडलेला होता तो तर तसाच राहिला. सोबतीला. मग मी नवाच पर्याय निवडला. मी ’अनुवाद रंजन’ ह्या माझ्या अनुदिनीवरच हे अनुवाद ठेवू लागलो. जगातील कुणीही ते पाहू शके. कुणालाही प्रतिक्रियाही देता येत असत. अर्थात प्रतिक्रियेतही लोक मग आपापल्या जाहिराती करू लागले, विभद्र मजकूर लोटू लागले, तेव्हा ती सोयही बंद करावी लागली. मात्र अनुवाद सुरूच राहिले. कोण वाचेल तुमचे अनुवाद. शब्दाला शब्द घालून असे का कुठे अनुवाद होतात? अशी खिल्लीही उडवली गेली.

मात्र विक्रमार्काने आपला हट्ट सोडला नाही. तसाच मीही अनुवादांचा छंद काही सोडला नाही. कुणी वाचत होते, की नव्हते, कळण्याचा काही मार्गच नव्हता. सुरूवातीस मला कुणी वाचावे अशी अपेक्षाही नव्हती. मात्र लोक वाचतच होते. जगभरातील अनेकांना ते आवडतही होते. प्रतिक्रियांचे अनुमतीकरता पूर्वपरिक्षण सुरू केल्यावर, त्याही मोजक्याच येत असत. तरीही अनुवाद लोकांना आवडत आहे ह्याचे निदान होत होते. म्हणून मीही लिहिता राहिलो. आज ’अनुवाद रंजन’ ह्या अनुदिनीची दीड लाखावर वाचने झालेली आहेत. ह्या सर्व वाचकांचे मनःपूर्वक आभार! असेच वाचत राहा. अनुवादांवर प्रेम करत राहा. ही आग्रहाची विनंती!!

एकदा तर गंमतच झाली. बसमधून घरी परतत असतांना आमच्या कार्यालयातील एक महिला मला विचारू लागली, तुम्ही एवढे अनुवाद करत असता, मला एक अनुवाद करून द्याल का? मला कळेना की, ह्या बाईंना कुठला अनुवाद हवा झाला. त्यांच्या मुलीला शाळेत ’नैसर्गिक आपत्ती’वर निबंध लिहायला सांगितला होता. त्यांनी नेटवर शोधले. विकिपेडियावरील ’नॅचरल डिझास्टर’ लेख त्यांना आवडलाही. पण मग तो मराठीत कसा आणणार? म्हणून त्यांना माझी मदत हवी झाली होती. ह्या अनुवादाचे काही मोल मिळू शकेल अशीही स्थिती नव्हती. तरीही मी रात्री जागून तो अनुवाद केला. अनुदिनीवरही टाकला आणि त्या बाईंना दुसर्‍याच दिवशी मुद्रित करूनही दिला. त्या अर्थातच आश्चर्यचकित झाल्या. मला धन्यवाद दिले. पुढे असंख्य लोकांच्या मुलांना त्याचा उपयोग झाला, असे त्यांनी आवर्जून सांगितले. कोणी तिथेही पक्षकर प्रतिक्रिया लिहिल्या. कुणी प्रत्यक्ष भेटून सांगितले. ई-मेलवरही कळवले. फोन माहीत होते त्यांनी फोनही केले. मग मला असा शोध लागला की, समाजाला पदोपदी अनुवादांची गरज भासते. अनुवादकही हवेच असतात. मात्र त्यांनी निःशुक्ल काम करावे एवढीच त्यांची माफक अपेक्षा असे.

विशेषतः धारेच्या टोकावरील नवनवीन तंत्रज्ञानांकरता मराठीत शब्दांचीच वानवा आहे. अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या संकेतस्थळावर कॅन्सरवरील अत्यंत नव्या इंग्रजी शास्त्रीय  शब्दांचा शब्दकोश आहे. त्यात सुमारे १०,००० शब्द आहेत. त्यांचा मराठीत कुणीही अनुवाद केलेला नाही. आयुर्वेदात शब्द आहेत. मात्र ते शास्त्रीय ग्रंथांच्या पसार्‍यांत हरवले आहेत. आयुर्वेदाचार्य असंख्य आहेत. मात्र ते गरजवंतास मराठी शब्द पुरवू शकत नाहीत. मला जॅसकॅप नावाच्या एका गैरसरकारी संस्थेकडून एक विचारणा आली. लहान मुलाला कॅन्सर झालेला होता. एक चाळीस पानी पुस्तिका मराठीत अनुवाद करून हवी होती. कारण मुलाचे मायबाप मराठी होते. त्यांना इंग्रजी कळत नव्हते. अर्थातच मोफत आणि अत्यंत तातडीनेही. त्यांच्या माहितीतले अनुवादक सहा महिने लागतील सांगत होते. मायबापांना मजकूर कळून उपचार सुरू व्हायचे, तर अनुवाद लगेचच हवा होता. मी तो पाच-सहा दिवसांतच पूर्ण केला. मुलाचे उपचार सुरू झाले. हल्ली ७०% कर्करोग उपचारांनी पूर्णपणे बरे होतात. ही माहिती मिळून, उपचार सुरू झाले, ही मला फारच मोलाची गोष्ट वाटली. पुढे मी त्यांच्याकरता तसल्याच अनेक पुस्तिकांचा मराठीत अनुवाद केला. ते सारेच अनुवाद आजही, ’अनुवाद रंजन’वर उपलब्ध आहेत.

मध्यंतरी मला कुणीतरी विचारले ’सायबरनेटिक्स’ म्हणजे काय? मलाही नेमकेपणाने सांगता येईना. पाश्चात्यांना आज कळलेल्या ह्या संकल्पनेवर आपल्या संस्कृतीने फार पूर्वीच प्रगल्भ साहित्यरचना केलेली आहे, असे मग मला आढळून आले. सायबरनेटिक्स म्हणजे सूत्रशास्त्र. शास्त्रीय माहिती सूत्ररूपाने लिहिण्याचे शास्त्र. सारी भारतीय ब्रम्हविद्याच सूत्ररूपाने बद्ध केलेली आहे. गीता ६९७ अनुष्टुप्‍ छंदांतील श्लोकांत. पातंजल योगसूत्रे १९५ सूत्रांत. इत्यादी इत्यादी. मग मी ऑक्सफर्ड डिक्शनरीजवरील आणखी एका लेखाचा मराठी अनुवाद केला ’सूत्रशास्त्राचा उगम https://anuvad-ranjan.blogspot.com/2017/05/blog-post_23.html’. तो तिथे आजही विराजमान आहे.

आजवर भारतभरात सर्वदूर खूप विख्यात असलेले, सर्व भाषांतून समश्लोकी अनुवाद झालेले, आंतरजालावर दृक्‌-श्राव्य माध्यमांतून विविध प्रकारे उत्तमरीत्या सादर झालेले एक स्तोत्र आहे. ते आहे आपल्या सर्वात लोकप्रिय देवाचे, महादेवाचे. रावणरचित शिवतांडव स्तोत्र. मला तर ह्या स्तोत्राची भुरळच पडली होती. अगदी मोहिनीच म्हणाना. मग तरूण जॉर्ज वॉशिंग्टनने घराच्या बागेतील उमद्या वृक्षावर कुर्‍हाड चालवावी, त्या हुरूपाने, मला त्याचा अनुवाद करावासा वाटू लागला. समश्लोकी अनुवादाचा तो पहिलाच प्रयास होता. एक एक कडवे झाले की मी मायबोली, मिसळपाववर ते टाकत असे. तिथे असंख्य जाणकार असतात. त्यांनीच मला सांगितले की, ते पंचचामर छंदात आहे. मग मी पंचचामर छंद म्हणजे काय ते शोधून काढले. त्यात समश्लोकी अनुवाद केला. मायबोलीवरच तो मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने प्रकाशितही झाला http://www.maayboli.com/node/39386. त्याची अधोभारण-क्षम श्राव्य आवृत्तीही काढण्यात आली. मग माझ्या प्रतिभेला नवेच क्षेत्र खुले झाले. समश्लोकी अनुवादाचे. राजा भर्तृहरीची तीन शतके तर खूपच विख्यात आहेत. श्रुंगार शतक, वैराग्यशतक आणि नीतिशतक. मला तर चवथेही मिळाले विज्ञानशतक. आता त्यातील श्लोकांचे मराठी समश्लोकी अनुवाद करण्याचे काम सुरूच आहे. केवळ हौसेखातर.

 

माझीच बायको, मुलगा मला नेहमी विचारत असत की, तुम्ही असले बोजड मराठी शब्द वापरता, कोण कशाला असले अनुवाद वाचेल? मी म्हणत असे की, तुम्हाला ’एँजिओप्लास्टी’ सारखे इंग्रजी शब्द अवघड आणि बोजड वाटत नाहीत. पण हृदयधमनी रुंदीकरणासारखे ओळखीचे सोपे शब्द बोजड वाटत आहेत. हा मॅकॉलेचा विजय आहे. मीही जिंकेन एक दिवस. अमृतातेही पैजा जिंकणारी मराठी, देवनागरी, आपली मायबोली, कुठे कमी पडते आहे असे मला वाटतच नसे. पुढे ब्रिगेडिअर हेमंत महाजन लिखित ’आव्हान जम्मू काश्मीरमधील छुप्या युद्धाचे’ ह्या पुस्तकाला मराठी अनुवादाकरताचा पुरस्कार मिळाला. तोही १८९४ साली न्यायमूर्ती रानड्यांनी स्थापन केलेल्या ’डेक्कन व्हर्नाक्युलर ट्रान्सलेशन सोसायटी’ कडून. सांगायचे काय की, ह्या पुस्तकाचा मराठी अनुवाद मीच तर केलेला होता. मग मला रीतसर बोलावणे आले. १२-१२-२०१६ रोजी पुण्यात झालेल्या एका दिमाखदार सोहळ्यात मला तो पुरस्कार प्रदानही करण्यात आला. ह्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते बाबासाहेब पुरंदरे.

मग हाही आक्षेप आला की, मोफत करताय म्हणून. तुम्हाला कोणी पैसे देईल का, अनुवाद करण्यासाठी. तर हो. मग तेही घडून आले. कामे आपणहून चालून आली. मोबदला थेट खात्यात जमा झाला. लाखो रुपये कमाई झाली. हजारोंनी आयकर मी भारत सरकारला दिला. भारत सरकार, महाराष्ट्र सरकार इत्यादींची अनुवादाची कामे मी केली. मात्र त्यांचा दर अनुक्रमे शब्दाला पंचाहत्तर पैसे, एक रुपया असा असतो. पुढे तर मी त्यांचीच कामे खासगी संस्थांकडून घेऊन केली. तेव्हा मात्र मी शब्दाला सव्वा रुपया दर घेतलेला आहे. स्वतःखातर, लोकांखातर, पैशाखातर, मनोरंजनाखातर असे सर्वच प्रकारचे अनुवाद मी केले. किती बरे केले असतील एकूण? आजवर मी ए-४ आकाराच्या हजारो इंग्रजी पानांचा मराठीत अनुवाद केलेला आहे, देवनागरी टंकणासहित! म्हणूनच आता मला टीकेचे भय वाटत नाही.

माझ्यावर टीका करणारे, मला नावे ठेवणारे, सूचना करणारे, मार्गदर्शन करणारे हे सारे माझे गुरूच आहेत. त्यांना मनःपूर्वक सादर प्रणाम! पण कौतूक तर ह्याचेच आहे की, आज त्या सार्‍यांना, लाखो वाचक लाभले आहेत.

तात्पर्य काय! तर लोकहो, सारेच लोक अनुवाद करू शकत नाहीत. जे करू शकतात तेही बहुतांशी पैशांकरता करतात. इतर भाषांत रस-रंजनाचा अनमोल ठेवा आजही विद्यमान आहे. तो तुमच्यापर्यंत आपोआप पोहोचेल ही शक्यता शून्यासारखीच आहे. मग जे हौसेखातर अनुवाद करू पाहत आहेत त्यांना नाउमेद का करा? लोकांनी एकदा आणि नेहमीकरता हे मान्यच करावे की, लोकांना अनुवाद हवे असतात. ते करणारे वाढावेत. त्यांची गुणवत्ता वाढावी. महाराष्ट्रात मराठीत, देवनागरीत, तुम्ही अनुवाद का करता? असे प्रश्नच उद्भवू नयेत. मराठी अनुवादांना, अनुवादकांना महाराष्ट्राच्या शासनानेच प्रोत्साहन द्यावे. खरे तर अनुवादाची शाळाच काढावी. मी तिथे आनंदाने शिकेन. शिकवेन.

आजमितीला हिंदी, मराठीसारख्या स्वदेशी भाषांच्या माध्यमांतून आधुनिक विषयांसह साधे पदवीधरही होणे दुरापास्त आहे. ही अवस्था जर संपुष्टात आणायची असेल; आज हा ’माहिती तंत्रज्ञान’ विषय घेऊन मराठी माध्यमातून ’विद्यावाचस्पती’ झाला; उद्या तो ’अणुऊर्जा शास्त्र’ विषय घेऊन मराठी माध्यमातून ’आचार्य’ झाला; अशा बातम्यांची स्वप्ने जर तुम्हाला लोभस वाटत असतील; तर लोकहो, आजच आपल्याला शेकडो गुणवंत अनुवादकांच्या फौजा हव्या आहेत. म्हणून अनुवादांवर, अनुवादकांवर प्रेम करा. त्यांना प्रोत्साहन द्या. उद्याला आपल्याच मायबोलीस सुखाचे, समृद्धीचे दिवस येतील. जगभरातील असंख्य भाषांतील रसरंजनाचे अमूल्य साठे आस्वादण्याकरता मग आपल्याला त्या त्या भाषा शिकाव्याच लागणार नाहीत.

’अनुवाद रंजन’ची दीड लाख वाचने होण्यापाठच्या हाका सावधतेने ऐका! काळाची गरज ओळखा आणि अनुवादात किमान रस घ्या, हेच ह्या निमित्ताने सांगायचे आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: