केरळमधील अल्वाये येथील वाळूत युरेनियम आणि थोरियमची खनिजे मिळतात. ही दोन्हीही मूलद्रव्ये अणुभट्टीकरता उपयोगात आणता येणारी अणुइंधने आहेत. त्यांवर प्रक्रिया करून, त्यांचे शुद्धीकरण करून, समृद्धीकरण (एन्रिचमेंट) करून त्यांपासून आण्विक इंधने तयार केली जातात. अशी इंधने मग अणुभट्टीत वापरता येतात. अणुइंधने सामान्य इंधनांच्या अब्जपट अधिक ऊर्जा देऊ शकतात. खनिज गवेषणापासून तर अणुइंधनांतली ऊर्जा विद्युतऊर्जेत रूपांतरित करण्यापर्यंतच्या प्रक्रियेला अणुइंधनचक्राचा पूर्वार्ध (फ्रंट एंड) म्हणतात.
मात्र वापरलेली अणुइंधने अत्यंत किरणोत्सारी असतात. सजीवांकरता अत्यंत अपायकारक असतात. त्यांतील किरणोत्सार संहत (काँन्सेंट्रेट) करून सुरक्षितरीत्या काचस्वरूपात संघनित केला जातो. तो संघनित किरणोत्सारही त्याची अपायकारकता नाहीशी होईपर्यंत तरी, दीर्घकाळ सांभाळत राहावा लागतो. हे करत असतांना त्यातून अत्यंत मूल्यवान असे प्ल्युटोनियम नावाचे मूलद्रव्यही प्राप्त होत असते. प्ल्युटोनियमचा उपयोग आण्विक स्फोटके तयार करण्यासाठी होऊ शकतो. वापरलेल्या इंधनांतील किरणोत्सार काचेत संघनित करून सांभाळण्यापर्यंत आणि त्यातून निर्माण झालेल्या प्ल्युटोनियम सारख्या पदार्थांवर प्रक्रिया करण्यापर्यंतच्या सर्व प्रक्रियांना मिळून अणुइंधनचक्राचा उत्तरार्ध (बॅक एंड) म्हणतात.
इथवरच्या अणुइंधनचक्रातील सगळ्या प्रक्रिया आपल्या भारत देशाने, स्वबळावर, अत्यंत यशस्वीरीत्या आणि सुरक्षितपणे साध्य केलेल्या आहेत. म्हणूनच आपला देश केवळ अणुऊर्जासंपन्नच नाही तर अण्वस्त्रसज्जही झाला आहे. एवढेच नव्हे तर, त्यातून उद्भवणारा किरणोत्सार अल्पांशात काचबद्ध करून तो सुरक्षित सांभाळण्याचे तंत्रही भारताने अवगत करून घेतलेले आहे. त्यामुळे आण्विक दृष्टीने तो सुरक्षितही झालेला आहे.
अनेकदा देश ही प्रगती करत आहे, हेही आपल्याला माहीत नसते आणि नेमक्या कोणत्या शास्त्रज्ञांचा ह्यात सहभाग होता, ही माहितीही आपल्याला नसते. म्हणून अणुइंधनचक्राचा उत्तरार्ध भारतात विकसित करण्याच्या प्रक्रियेत मोलाचा वाटा उचलणार्या एका अणुशास्त्रज्ञाची आपण ह्या लेखात ओळख करून घेणार आहोत. त्यांचे नाव आहे डॉ. शेखर बसू. त्यांचा जन्म २०-०९-१९५२ रोजी झाला. बालीगंज गव्हर्नमेंट स्कूल, कोलकाता येथून त्यांनी शालेय शिक्षण घेतले. त्यांनी, मुंबई विद्यापीठाच्या वीरमाता जिजाबाई तंत्रसंस्थेतून १९७४ साली यांत्रिकी अभियंत्रज्ञ ही पदवी प्राप्त केली. भाभा अणुसंशोधनकेंद्राच्या प्रशालेच्या १८ व्या तुकडीतून एक वर्षाचा अणुविज्ञान व अभियांत्रिकीतील प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण करून, ते १९७५ साली भाभा अणुसंशोधनकेंद्राच्या अणुभट्टी अभियांत्रिकी विभागात रुजू झाले.
डॉ. शेखर बसू हे अपवादात्मक क्षमतेचे अभियंत्रज्ञ आहेत. १९ जून २०१२ ते २३ फेब्रुवारी २०१६ दरम्यान ते भाभा अणुसंशोधन केंद्राचे संचालक होते. त्यांनी आण्विक विज्ञान व अभियांत्रिकीच्या बहुविध क्षेत्रांत कळीची भूमिका निभावली. भारतास आण्विक क्षेत्रात नेतृत्व प्राप्त करवून देण्यातील त्यांच्या योगदानाचा, ३१-०३-२०१४ रोजी राष्ट्रपती भवनात तत्कालीन राष्ट्रपती प्रणब मुखर्जी ह्यांचे हस्ते पद्मश्री देऊन, सन्मान करण्यात आला. नंतर अणुऊर्जा विभागाच्या मुंबई येथील मुख्यालयात २३ ऑक्टोंबर २०१५ रोजी त्यांनी भारत सरकारचे सचिव आणि भारतीय अणुऊर्जा आयोगाचे अकरावे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला. २०-०९-२०१८ रोजी त्यांना अवकाश प्राप्त झाला. आज ते होमी भाभा अध्यासनावरील अणुऊर्जाविभागाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
सुरूवातीस डॉ. बसू ह्यांनी, तारापूर येथील ’उकळते पाणी अणुभट्टी’ करताच्या अणुइंधन घटकांच्या अभिकल्पनाचा सखोल अभ्यासही केलेला आहे. ही त्यांची कामगिरी अपवादात्मकरीत्या उत्तम होती. नंतर त्यांनी अणुपाणबुडी संयंत्र विकासाची जबाबदारी स्वीकारली. मुळापासून सुरूवात करून कळपक्कम येथे प्रारूप संयंत्र तयार केले.
प्रारूप सागरी आण्विक परिवहन संयंत्राचे प्रकल्प संचालक म्हणून डॉ. बसू ह्यांनी तत्संबंधित सर्व क्रियाकलापांचे यशस्वीरीत्या विकसन केले. हा बहुशास्त्रीय प्रकल्प; मोठ्या संख्येतील अणुभट्टी घटक, वाफप्रणाली, विद्युत आणि उपकरणन प्रणालींचे अभिकल्पन आणि विकास करण्याचा होता. संयंत्रांकरता लागणार्या उपस्कर आणि प्रणालींच्या चाचणी परीक्षणांकरता अनेक चाचणी सुविधा स्थापन करण्यात आल्या. व्यूहरचनात्मक महत्त्वाचे हे संयंत्र कळपक्कम येथे स्थापन करण्यात आले होते आणि आजही ते कार्यरत आहे. वर्तमान संशोधन आणि प्रशिक्षणार्थ सुविधा ह्या संयंत्राभोवती स्थापन करण्यात आलेल्या आहेत. परिवहन संयंत्र घटकांचा विकास आणि विशेष मनुष्यबळाच्या प्रशिक्षणार्थ त्या वापरल्या जात आहेत. आण्विक परिवहन संयंत्राच्या समुद्री आवृतीसंदर्भात, डॉ. बसू आजही शास्त्रज्ञांना मार्गदर्शन करत आहेत.
डॉ. शेखर बसू आण्विक पुनर्चक्रण मंडळाचे प्रमुख होते. त्या अधिकारात, आण्विक पुनर्चक्रण आणि अपशिष्ट व्यवस्थापन संयंत्रांचे अभिकल्पन, विकास, उभारणी आणि संचालनास ते जबाबदार होते. अणुइंधन पुनर्चक्रण आणि आण्विक अपशिष्ट व्यवस्थापन विषयक अनेक कार्यक्रमांना त्यांचे मार्गदर्शन प्राप्त झाले. त्यांनी अनेक पुनर्चक्रण संयंत्रे, अणुइंधन साठवण सुविधा, आण्विक अपशिष्ट सुविधा ह्यांचे अभिकल्पन केलेले असून; ट्रॉम्बे, तारापूर आणि कळपक्कम येथे, त्यांची उभारणीही यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. त्याकरता आवश्यक तो संशोधन आणि विकास कार्यक्रमही त्यांनी राबवला आहे. त्याअंतर्गत संयंत्र-कर्तब-उद्धरणार्थ (अपग्रेड ऑफ प्लांट परफॉर्मन्स) आणि पर्यावरणीय मुद्यांच्या निरसनार्थ; घटक, प्रणाली आणि प्रक्रिया यांचा विकास करण्यात आलेला आहे. तारापूर येथे, उच्चस्तरीय आण्विक अपशिष्टाचे काचभवन (व्हिट्रिफिकेशन) करण्यासाठी वापरलेल्या, तप्त-चीनीमाती-वितळकाचे (ज्यूल हिटेड सिरॅमिक मेल्टर) डॉ. बसू यांनी, दूरचालनाद्वारे निष्कार्यान्वयन (रिमोट डिकमिशनिंग) यशस्वीरीत्या पूर्ण केलेले आहे. ह्या कार्यवाहीने ’निष्कार्यान्वयनाचे अभिकल्पन’ संकल्पनेकरता महत्त्वाची माहिती पुरवलेली आहे.
प्रामुख्याने डॉ. शेखर बसू आणि त्यांच्या सहकार्यांनीच निरनिराळ्या पातळीवरील किरणोत्सारी वायू, द्रव आणि घनरूप अपशिष्टांच्या (रेडिओऍक्टिव्ह गॅशस, लिक्विड अँड सॉलिड वेस्ट) सुरक्षित विल्हेवाटीची व्यूहरचना (सेफ डिस्पोजल स्ट्रॅटेजी) उत्क्रांत केली. आण्विक अपशिष्टांच्या प्रभावी व्यवस्थापनात त्यांचा सहभाग होता. ज्यात अंतीम विल्हेवाटीपूर्वी किरणोत्सारी अपशिष्टांचे पृथक्करण, स्वभावांकन, हाताळणी, उपचार, अवस्थांतरण आणि देखरेख (सेग्रेगेशन, कॅरेक्टरायझेशन, हँडलिंग, ट्रीटमेंट, कंडिशनिंग अँड मॉनिटरिंग) ह्यांचा समावेश होत असतो. निरनिराळ्या प्रकारच्या किरणोत्सारी, आण्विक उच्चस्तरीय द्रव अपशिष्टांच्या सुरक्षित व्यवस्थापनाच्या औद्योगिक कार्यचालनाचा त्यांना भरपूर अनुभव आहे. आण्विक अपशिष्टांच्या सुरक्षित व्यवस्थापनावरच अणुऊर्जेचा सामुदायिक स्वीकार बव्हंशी अवलंबून असतो. डॉ. बसू ह्यांनी, सर्व दाबित जड पाणी अणुभट्ट्यांच्या संपूर्ण चक्र संचालनोत्तर प्रक्रियांसाठी सर्वोत्तम पद्धती विकसित केल्या आहेत. भारतीय समुदायाने म्हणूनच अणुऊर्जेचा स्वीकार केला आहे.
डॉ. बसू ह्यांनी, पहिल्या समाकलित आण्विक पुनर्चक्रण संयंत्राचे अभिकल्पन करून, भारतीय आण्विक पुनर्चक्रण कार्यक्रमास उच्च दर्जाची परिपक्वता प्राप्त करून दिलेली आहे. त्यामुळे भारतीय अणुइंधनचक्राच्या उत्तरार्ध कार्यक्रमास आणि विशेषतः आण्विक अपशिष्ट व्यवस्थापन कार्यक्रमास एक वेगळीच उंची प्राप्त होणार आहे.
आण्विक पदार्थांच्या परिवहनाशी संबंधित मुद्द्यांवरही त्यांनी काम केलेले आहे. डॉ. बसू ह्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नियतकालिकांतून अनेक शोधनिबंध लिहिलेले आहेत. अनेक अविनाशी आणि नाशकारक तंत्रांचा उपयोग करून आण्विक पदार्थांतील उर्वरित अ-समान तणावांच्या मूल्यांकनांवरही डॉ. बसू ह्यांनी काम केलेले आहे. ज्यात भारतही एक सहभागी देश आहे, असा एक आंतरराष्ट्रीय उष्माण्विक प्रायोगिक अणुभट्टी (इंटरनॅशनल थर्मोन्युक्लिअर एक्सपरिमेंटल रिऍक्टर- आ.ई.टी.आर. अशी अणुभट्टी कंकणाकार संदलन अणुभट्टी असते. तिला तोराईडलन्ग कॅमेरा मॅकिना -टोकॅमॅक- बेस्ड फ्युजन रिऍक्टर म्हणतात.) प्रकल्प, सध्या कडार्चे, फ्रान्स येथे स्थापन होत आहे. डॉ. बसू हे त्याच्या उष्णता निष्कासन आणि शीतक जल प्रणालींच्या अभिकल्पन पुनरीक्षण समितीचे अध्यक्ष आहेत. हा प्रकल्प जागतिक समुदायास दीर्घकालीन ऊर्जासुरक्षा पुरवेल अशी अपेक्षा आहे.
प्रकल्प व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष ह्या नात्याने त्यांनी तामिळनाडूत ’भारतीय न्युट्रीनो वेधशाळा’ स्थापन केली आहे. प्रमुख समन्वयक म्हणून, ते त्वरक-चालित-प्रणाली (ऍक्सिलरेटर ड्रिव्हन सिस्टिम) करता, १-अब्ज विजकव्होल्टचा अतिवाहक त्वरक विकसित करणार्या चमूचे नेतृत्व करत आहेत. भाभा अणुसंशोधन केंद्राच्या वायझॅक तळावर, अणु-इंधन-चक्र कार्यतळ (न्युक्लिअर फ्युएल सायकल पार्क) उभा करण्याच्या प्रकल्पासही ते मार्गदर्शन करत आहेत. ह्या प्रकल्पात संशोधन अणुभट्ट्या, इंधन निर्मिती आणि पुनर्चक्रण सुविधांचा समावेश असणार आहे. भारतीय दाबित पाणी अणुभट्टीच्या अभिकल्पनासही त्यांनी सुरूवात केलेली आहे.
इथे हे नमूद करावे लागेल की, भारताचा अणुऊर्जा कार्यक्रम आजवर नैसर्गिक युरेनियम आणि जडपाणी विमंदकाचे (हेवी वॉटर मॉडरेटर) आधारे चालत आलेला आहे. काक्रापार येथे नुकतीच भारताने २३-वी अणुभट्टी कार्यान्वित केली. ह्यांतील बहुसंख्य अणुभट्ट्या ’दाबित-जडपाणी’ अणुभट्ट्या आहेत. अणुपाणबुडीकरता मात्र थोड्या जागेत अभिकल्पन करायचे असते, म्हणून ’दाबित पाणी अणुभट्टी’ वापरली जाते. आता भारत ऊर्जानिर्मितीकरताही ’दाबित पाणी अणुभट्टी’ निर्माण करेल, असाच ह्याचा अर्थ होत आहे.
भाभा अणू संशोधन केंद्राचे संचालक असतांना विशेष पुढाकार घेऊन त्यांनी अणुकृषी, अणुसहाय्यित अन्न टिकवणे (फूड प्रिझर्व्हेशन) आणि अणुवैद्यक ह्या अणुविभागाच्या सामाजिक कार्यक्रमांचा विस्तार केलेला आहे. अणुइंधन समृद्धी आणि व्यूहरचनात्मक कार्यक्रमांच्या विस्तारावरही त्यांनी कार्य केलेले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी स्वावलंबी भारताची घोषणा केलेली आहे. अणुऊर्जा; अण्वस्त्रसज्जता; अणुविज्ञानाच्या साहाय्याने कृषी, अन्नप्रक्रिया आणि वैद्यक; ह्या क्षेत्रांत संपूर्ण स्वदेशी तंत्रसामर्थ्य निर्माण करून, भारत आज स्वावलंबी झालेला आहे. ज्या सगळ्यांमुळे हे सारे संभव झाले, त्यांत डॉ. बसूंचे नावही अग्रेसर आहे. २० सप्टेंबर रोजी येत असलेल्या त्यांच्या जन्मदिनी, भारतातील ह्या आघाडीच्या अणुशास्त्रज्ञास सादर प्रणाम!
संदर्भः
१.
भाभा अणु संशोधन केंद्राच्या संकेतस्थळावरील डॉ. शेखर बासू ह्यांची माहिती http://www.barc.gov.in/leaders/sbasu.html
२.
२०१४०३०४१२ क्रमांकाचे बी.ए.आर.सी.न्यूज लेटर
http://www.barc.gov.in/publications/nl/2014/2014030412.pdf
पूर्वप्रसिद्धीः विद्या प्रसारक मंडळ, ठाणे ह्यांच्या ’दिशा’ मासिकाचा सप्टेंबर-२०२० चा अंक.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा