३ ऑगस्ट १९५४ रोजी भारताच्या अणुऊर्जा विभागाची स्थापना झाली. त्याचे वर्धापन साजरे करण्यासाठी मी “अणुऊर्जा विभागाची स्फूर्तीगाथा” आणि “मला भावलेले भाभा” हे दोन लेख लिहिलेले आहेत. त्यातील हा दुसरा लेख.
मला भावलेले भाभा
- लेखकः नरेंद्र गोळे २०२००८०३
होर्मसजी जहांगीर भाभा[१]
(जन्मः ३० ऑक्टोंबर १९०९, मुंबई,
मृत्यूः २४ जानेवारी १९६६, माऊंट ब्लांक)
शास्त्राभ्यास करे, कलेत विहरे, नेतृत्व देई पुरे
बांधे संघटना, जनांत विचरे, चित्रांत व्यक्ती भरे ।
ठेवी देश पुढे, नवे घडवि जो, शास्त्रज्ञ देशातले
भाभा होर्मसजी, महान जगती, आदर्श ठेवीतसे ॥
- नरेंद्र गोळे २०२००७१५
होमी भाभा ह्यांना आपण सर्वच भारताच्या अणुऊर्जेचे जनक म्हणून ओळखतो.
मात्र ह्याव्यतिरिक्त होमी भाभा एक उत्तम नेते होते. एक उत्तम कलाकार होते. उत्कृष्ट पर्यावरणवादी होते. द्रष्टे होते. देशभक्त होते. ह्याचे काही पुरावेच मी इथे सादर करणार आहे.
होमी भाभा एक उत्तम नेते
भारतातील अवकाशविज्ञानसंशोधनाचे जनक विक्रम साराभाई म्हणाले[२], “ह्या अणुऊर्जा विभागातच नाही तर असंख्य शास्त्रज्ञांत आणि विद्यापीठांतून अणुऊर्जा प्रशालेत येणार्या तरूणांत, जो आत्मविश्वास आणि प्रेरणा भाभा निर्माण करू शकत, ज्या प्रकारे त्यांना निरंतर आधार देत असत, तोच खरा त्यांनी आपल्याकरता मागे ठेवलेला वारसा आहे.”
होमी भाभांनी केंब्रिज विद्यापीठाच्या कैस महाविद्यालयातून १९२७ साली यांत्रिकी अभियंत्रज्ञ पदवी प्राप्त केली होती. व्यावसायिक म्हणून ते प्रशिक्षित अभियंते होते. आंतरराष्ट्रीय स्तरावरील भौतिकशास्त्रज्ञ होते. टाटा मूलभूत संशोधन संस्थेचे संस्थापक संचालक होते. भारतीय आण्विक कार्यक्रमाचे जनक म्हणवले जात असत. ’ऍटोमिक एनर्जी एस्टॅब्लिशमेंट ट्रॉम्बे’चे संस्थापक संचालक होते. ह्या संस्थेसच त्यांचेपश्चात त्यांचे नाव देण्यात आले. ती ’भाभा अणुसंशोधन संस्था, झाली. ह्या दोन संस्था म्हणजे भारतीय अण्वस्त्रविकासाच्या कोनशीलाच आहेत.
होमी भाभा उत्तम कलाकार होते
केंब्रीजमध्ये असतांना होमी भाभांनी काल्ड्रॉन ह्यांच्या ’लाईफ इज अ ड्रीम’, हँडेल ह्यांच्या ’सुस्सान्ह’ आणि मोझार्ट ह्यांच्या ’ईडोमेनो’ ह्या ऑपेरांचे नेपथ्य केले होते[३].
ते तेवढ्याच वकूबाचे चित्रकारही होते. संगीत रसिक होते. कलाप्रेमी होते. कलेला आश्रय देणारे थोर व्यक्ती होते. अभिजात कलांप्रती त्यांना लहानपणापासून प्रेम होते. संगीत आणि संस्कृतीच्या वातावरणात ते वाढले. त्यांच्या कुटुंबाचा पुस्तकसंग्रह वैभवशाली होता. त्यात कला आणि संगीतावरील खूप पुस्तके होती. पाश्चात्य अभिजात संगीताच्या तबकड्यांचाही त्यांचेकडे संग्रहच होता. त्यांना चित्रकला आणि रेखाकलेत रुची व गतीही होती. शाळेत असतांना विख्यात पारशी कलाकार जहांगीर लालकाका ह्यांचेकडे ते चित्रकलेचे धडे गिरवत असत. ’बॉम्बे आर्ट सोसायटीच्या’ अनेक वार्षिकोत्सवांतून त्यांनी कलेकरताची पारितोषिके प्राप्त केली होती.
होमी भाभा उत्तम रेखाचित्रे काढत असत. आम्ही आमच्या उमेदवारीच्या काळात ज्या प्रशिक्षणशाळेच्या वसतीगृहात राहत होतो, त्याच्या चौदाव्या मजल्यावरील उपाहारगृहातील चारही भिंतींवर त्यांच्या रेखाचित्रांच्या चौकटी विद्यमान आहेत. भारतातील उत्तम चित्रकार मक्बूल फिदा हुसेन ह्यांचेही एक उत्तम रेखाचित्र भाभा ह्यांनी काढलेले आहे.
होमी भाभा उत्कृष्ट पर्यावरणवादी[४] होते
भाभांना झाडे आणि फुले ह्यांबाबत एक विशेषच आकर्षण होते. दिखाऊ वॄक्षारोपण समारोहांपासून ते स्वतःला वेगळेच ठेवत असत. टाटा मूलभूत विज्ञान संस्थेची उभारणी होत असतांना, सुमारे २५ प्रचंड असे वड आणि पिंपळाचे वृक्ष कापावे लागणार होते. ते त्यांनी उचलून इतरत्र लावले होते. ह्याच संस्थेत नेपिअन-सी-रोड वरून उचलून आणलेले दोन वृक्षही आहेत. एक आहे ३० फुटी पांढरा चाफा आणि एक आहे ३५ फुटी बुचाचे झाड. असेच एकदा त्यांनी पेडररोडच्या पदपथावर महापालिकेच्या लोकांना पर्जन्यवृक्ष तोडण्याच्या तयारीत असलेले पाहिले. त्यांना फार दुःख झाले. ट्रॉम्बेला परतताच त्यांनी तो वृक्ष तोडण्यापूर्वीच रु.३०/- देऊन विकत घेतला आणि केनिलवर्थ इमारतीच्या आवारात लावला. ट्रॉम्बेमध्ये अशाचप्रकारे त्यांनी वाचवलेले सुमारे १०० वृक्ष आहेत.
मला आठवते. भाभा अणुसंशोधन केंद्रात ’मॉड्युलर लॅबोरेटरी’ नावाची पाऊण किलोमीटर लांबीची लांबलचक इमारत आहे, तिच्या पाठीमागे स्टेट बँकेपाशी पिंपळ आहे, नंतर ओळीनी दहा प्रचंड वटवृक्ष आहेत, शेवटास एक उंबरही आहे. ह्या वटवृक्षातील एक वृक्ष कृष्णवट आहे. असे ऐकून आहे की, हे सारे वृक्ष असेच मरणाच्या दारातून परत आणलेले आहेत. आज त्यांचे वय संस्थेच्या वयाहूनही अधिक आहे आणि त्यांच्या आशीर्वादानेच संस्था विकास साधत आहे. येथील शास्त्रज्ञांच्या, सर्व भारतीयांना अभिमानास्पद वाटेल अशा कामगिरीचे, ते मूक साक्षीदार आहेत.
होमी भाभा द्रष्टे[५] होते
१९४८ साली जेव्हा भारतीय अणुऊर्जा आयोगाची स्थापना झाली आणि भाभा त्या आयोगाचे संस्थापक अध्यक्ष झाले तेव्हा भाभा म्हणाले होते की, “पुढील दोन दशकांत अणुऊर्जा देशातील अर्थव्यवस्थेत आणि उद्योगांत महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहे. औद्योगिकदृष्ट्या आधीच विकसित असलेल्या राष्ट्रांहून भारतास मागे राहायचे नसेल तर अणुऊर्जेचा विकास अधिक ऊर्जस्वलतेने करावा लागेल.”
तसा तो विकास आपण घडवलाही. त्यामुळेच १९७४ व १९९८ च्या अणुचाचण्या यशस्वी करून आपण अण्वस्त्रसज्ज देश होऊ शकलो. ह्याबाबतीत सर्व जगात आपण घेतलेली आघाडी हा त्यांच्या दूरदृष्टीचाच परिपाक आहे. अणुऊर्जा आणि अवकाश संशोधन ह्या दोन्हींतही भारताने आज जी नेत्रदीपक प्रगती केलेली ते त्यांच्या दूरदृष्टीचेच फलित आहे.
होमी भाभा देशभक्त होते
होमी भाभांनी विश्वकिरणांच्या वर्षावांवर मोलाचे संशोधन केले होते. ते ब्रिटनमध्ये राहूही शकले असते. तिथे त्यांना सन्मानही मिळाला असता. मात्र, पुरेसा सन्मान आणि आर्थिक पाठबळ मिळत असेल तर देशातच राहून, इतर सुदैवी देशांत असलेल्या शैक्षणिक संस्थांच्या तुल्यबळ संस्था, आपल्या देशातच उभ्या करणे हे आपले कर्तव्य आहे असे त्यांचे मत होते[६]. टाटा मूलभूत विज्ञान संस्था, ऍटॉमिक एनर्जी एस्टॅब्लिशमेंट ट्रॉम्बे (ए.ई.ई.टी., भाभांच्या अपघाती मृत्यूनंतर ह्याच संस्थेचे नामकरण भाभा अणुसंशोधन केंद्र असे करण्यात आले) आणि त्याची प्रशिक्षण शाळा, ह्या भारताच्या संशोधनक्षेत्रावर चिरकाल राहणारा ठसा उमटविणार्या संस्था त्यांनीच स्थापन केल्या. १९५४ साली पद्मभूषण हा नागरी सन्मान देऊन त्यांच्या ह्या कार्याचा गौरवही करण्यात आला.
अणुऊर्जेच्या क्षेत्रात भारतास भाभांनी आजवर अग्रेसर ठेवले आहे. शिक्षणाकरता परदेशात गेल्यावर, परदेशातच न राहता जाणीवपूर्वक देशात परतून, देशाकरता एवढी देदिप्यमान कामगिरी करणारे होमी भाभा, कोणत्याही मोजपट्टीने निस्सीम देशभक्तच म्हणावे लागतील!
थोर स्फूर्तीदात्याची अनपेक्षित अखेर
१९६६ मध्ये भाभा असे म्हणाले होते की[७], भारत येत्या १८ महिन्यांतच अणुस्फोटके तयार करेल. त्यानंतर सुमारे तीन महिन्यांनी, ते २४ जानेवारी १९६६ रोजी सकाळी ७ वाजून २ मिनिटांनी, आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा अडतीच्या (इंटरनॅशनल ऍटोमिक एनर्जी एजन्सीच्या) शास्त्रीय सल्लागार समितीच्या बैठकीसाठी ऑस्ट्रियातील व्हिएन्ना येथे, एअर इंडियाच्या १०१ क्रमांकाच्या मुंबई ते न्यूयॉर्क उड्डाणातून, कांचनगंगा नावाच्या बोईंग-७०७ विमानाने जात होते. तेव्हा आल्प्स पर्वतातील माँट ब्लांक शिखरानजीक, त्या विमानाचा चालक आणि जिनेव्हा विमानतळ ह्यांच्यात विमानाच्या स्थितीबाबत गैरसमज निर्माण झाला. त्यामुळे अपघात होऊन विमानातील सर्वच्या सर्व ११७ लोक मारले गेले. दुर्दैवाने त्यातच होमी भाभांचा मृत्यू झाला.
आज होमी भाभांना ओळखत नाही असा भारतीय विरळाच असेल. उण्यापुर्या ५७ वर्षाच्या आयुष्यात देशास अण्वस्त्रसज्जतेप्रत नेणार्या अनेक संघटना व व्यक्ती उभ्या करणार्या ह्या द्रष्ट्या नेत्यास सादर प्रणाम.
थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा ।
आपण त्यांच्या समान व्हावे हाच सापडे बोध खरा ॥
[१] होमी जहांगीर भाभा http://nvgole.blogspot.com/2011/10/blog-post_30.html
[२] द व्हिजन अँड द व्हिजनरी https://www.icts. res.in/site[२]s/default/files/The-Vision-and-the-Visionary.pdf
[३] जहांगिर निकल्सन आर्ट फौंडेशनचे संकेतस्थळ http://jnaf.org/artist/homi-bhabha/
[४] होमी भाभा- फादर ऑफ न्यूक्लिअर सायन्स इन इंडिया, आर.पी.कुलकर्णी अँड व्ही.शर्मा, बॉम्बे पॉप्युलर प्रकाशन, १९६९.
[५] सागा ऑफ ऍटोमिक एनर्जी इन इंडिया कॉमेमोरेटिव्ह व्हॉल्यूम्स ह्या संग्रहातील भाभा ह्यांचे उद्धृत. हे संग्रह भाभा अणुसंशोधन केंद्राच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
[६] होर्मसजी जहांगीर भाभा https://anuvad-ranjan.blogspot.com/2012/04/blog-post_13.html
[७] घातपात की अपघात? नीरा मुजूमदार, द प्रिंट, २४ जानेवारी २०१८
https://theprint.in/report/the-theories-india-nuclear-energy-pioneer-homi-bhabha/31233/
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा