२०२०-०८-०३

अणुऊर्जा विभागाची स्फूर्तीगाथा

३ ऑगस्ट १९५४ रोजी भारताच्या अणुऊर्जा विभागाची स्थापना झाली. त्याचे वर्धापन साजरे करण्यासाठी मी “अणुऊर्जा विभागाची स्फूर्तीगाथा” आणि “मला भावलेले भाभा” हे दोन लेख लिहिलेले आहेत. त्यातील हा पहिला लेख.

 

अणुऊर्जा विभागाची स्फूर्तीगाथा

संकलनः नरेंद्र गोळे २०२००८०३

 

३ ऑगस्ट १९५४ रोजी भारतीय अणुऊर्जा विभागाची स्थापना झाली. मुख्यालय मुंबईत झाले. शाखा नवी दिल्लीतील सचिवालयात उघडली गेली. हे खाते थेट पंतप्रधानांच्या अधिकारात येते. अणुऊर्जा आयोगाने निर्धारित केलेल्या धोरणांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ह्या खात्यावर सोपवण्यात आली. संसदेने मंजूर केलेल्या अंदाजपत्रकी मर्यादांतर्गतचे भारत सरकारचे सर्व प्रशासकीय आणि आर्थिक अधिकार ह्या विभागाला प्रदान करण्यात आले.


अणुऊर्जा आयोगाचा[१] जन्म १९४८ मध्येच झाला होता मात्र त्या वेळी ते ’विज्ञान आणि तंत्रज्ञान’ विभागात समाविष्ट होते. डॉ. होर्मसजी जहांगीर भाभा, भारतीय अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष झाले. २४ जानेवारी १९६६ रोजी माऊंट ब्लांकवरील दुर्दैवी विमान अपघातात त्यांचा मृत्यू होईपर्यंत त्यांनी ही जबाबदारी सांभाळली. त्यांना भारतीय अणुऊर्जा संशोधनाचे जनक मानले जाते.

 

विश्वकिरणांच्या वर्षावांवर त्यांनी मोलाचे संशोधन केले होते. ते ब्रिटनमध्ये राहूही शकले असते. तिथे त्यांना सन्मानही मिळाला असता. मात्र, पुरेसा सन्मान आणि आर्थिक पाठबळ मिळत असेल तर देशातच राहूनइतर सुदैवी देशांत असलेल्या शैक्षणिक संस्थांच्या तुल्यबळ संस्थाआपल्या देशातच उभ्या करणे हे आपले कर्तव्य आहे असे त्यांचे मत होते[२]. टाटा मूलभूत विज्ञान संस्था, ऍटॉमिक एनर्जी एस्टॅब्लिशमेंट ट्रॉम्बे (ए.ई.ई.टी., भाभांच्या अपघाती मृत्यूनंतर ह्याच संस्थेचे नामकरण भाभा अणुसंशोधन केंद्र असे करण्यात आले) आणि त्याची प्रशिक्षण शाळा, ह्या भारताच्या संशोधनक्षेत्रावर चिरकाल राहणारा ठसा उमटविणार्‍या संस्था त्यांनीच स्थापन केल्या. १९५४ साली पद्मभूषण हा नागरी सन्मान देऊन त्यांच्या ह्या कार्याचा गौरवही करण्यात आला.

 

भाभांच्या अपघातापश्चात मग ही जबाबदारी विक्रम साराभाईंकडे[३] सुपूर्त करण्यात आली. ३०-१२-१९७१ रोजी ते निवर्तले, तोपर्यंत अणुऊर्जा आयोगाच्या अध्यक्षपदाची ही जबाबदारी त्यांनी सांभाळली. मात्र विक्रम साराभाई हे अवकाश शात्रज्ञ होते. त्यांच्या पुढाकाराने आणि नेतृत्वाखालीच भारतीय अवकाश संशोधन संस्था स्थापन झाली. म्हणून त्यांना भारतीय अवकाश संशोधनाचे जनक मानले जाते. भारतीय अवकाश कार्यक्रमापासून विक्रम साराभाईंचे नाव विलग करणे अशक्यच आहे. त्यांनीच भारतास अवकाश संशोधनाच्या जागतिक नकाशावर आणले.

 

त्यांनी इतर क्षेत्रांतही तेवढेच पायाभूत कार्यही केलेले आहे. वस्त्र उद्योगऔषध निर्मितीअणुऊर्जाविजकविद्या आणि इतर अनेक क्षेत्रांत अखेरपर्यंत त्यांनी निरंतर कार्य केलेले आहे. त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर त्यावेळी ते तीन क्षेत्रात आधीच व्यग्र होते. ते म्हणाले, “मी तीन क्षेत्रांतील मूलभूत जबाबदार्‍या सांभाळत आहे. पहिली म्हणजेफिजिकल रिसर्च लॅबोरेटरीचा संचालक म्हणून आणि विश्वकिरण भौतिकीचा प्राध्यापक म्हणून. इथे मी माझे संशोधनही पूर्ण करत आहे आणि पी.एच.डी.च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही करत आहे. दुसरी म्हणजे इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च प्रोग्रॅमचा अध्यक्षतसेच प्रोजेक्ट फॉर द डेव्हलपमेंट ऑफ रॉकेटस अँड स्पेस टेक्नॉलॉजीचा प्रमुख म्हणून. तिसरी म्हणजेविशेषतः रसायने आणि औषधनिर्मितीभोवती केंद्रित असलेल्याआमच्या कुटुंबाच्या व्यापार क्षेत्रातील स्वारस्याच्या लक्षणीय भागाची धोरण निर्मितीसंचालनसंशोधन नियोजन आणि मूल्यांकन.


साराभाईंच्या व्यक्तिमत्वातील सर्वात लक्षणीय पैलू म्हणजे त्यांच्या स्वारस्यांचा विस्तृत पल्ला होय. संकल्पनांचे रूपांतरण संस्थांत घडवण्याची त्यांची शैलीही अपूर्वच होती. आजच्या सशक्त इस्रोचे जनकही तेच आहेत. ते एक सर्जनशील शास्त्रज्ञ होते. यशस्वी आणि दूरदृष्टीचे उद्योजक होते. सर्वोच्च कोटीचे संशोधक होते. थोर संघटक होते. आगळे शिक्षणशास्त्री होते. कलेचे मर्मज्ञ होते. सामाजिक बदलांचे उद्यमी होते. पथदर्शी व्यवस्थापन प्रशिक्षक होते. आणखीही बरेच काही होते. १९७२ साली पद्मविभूषण हा नागरी सन्मान देऊन त्यांच्या ह्या कार्याचा गौरव करण्यात आला.

त्यांच्यापश्चात होमी नसरवानजी सेठना[४] ह्यांनी भारतीय अणुऊर्जा आयोगाची जबाबदारी सांभाळली. १९७२ ते १९८३ अशी एकूण ११ वर्षे ते अणुऊर्जाआयोगाचे अध्यक्ष राहिले. १९५६ ते १९५८ दरम्यान ’सायरस’ ह्या ४० मेगॅवॉट क्षमतेच्या संशोधन अणुभट्टीच्या उभारणी प्रकल्पाचे ते व्यवस्थापक होते. भारतातील पहिल्या प्ल्युटोनियम कारखान्याचे अभिकल्पन आणि उभारणी त्यांच्याच नेतृत्वाखाली करण्यात आली. १९६७ मध्ये जादुगुडा येथील युरेनियम मिलच्या उभारणीवर त्यांनी देखरेख केली. १९७४ मधील शांततामय अणुविस्फोट पोखरण-१ प्रकल्पातील त्यांच्या सहभागास खूप प्रसिद्धी मिळाली. त्यांना १९७५ साली पद्मविभूषण सन्मान देऊन गौरवण्यात आले. 

अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अय्यंगार म्हणतात[५], “सेठना ह्यांनी त्यांच्या पातळीवर  अणुविज्ञानातभारतीय तंत्रज्ञानाची भर घालण्याची हिंमत दाखवली. कोणतीही गोष्ट पहिल्यांदा करण्यास ते घाबरत नसत. स्वावलंबनावर त्यांचा विश्वास होता. त्यांनी कुणाकडूनही पक्षपाताची अपेक्षा ठेवली नाही. ज्या क्षेत्रांत भारतास माहिती आणि तंत्रज्ञान नाकारण्यात आलेले होते त्या क्षेत्रात त्यांनी पुढाकार घेतला. त्यांनी १९६४ सालीच प्ल्युटोनियम तयार केले होते. ते राजकारणी नेत्यांना घाबरत नसत. ते एक थोर भारतीय तंत्रशास्त्री होते आणि आयुष्यभर त्यांनी भारताची सेवा केली. भारतीय अणुऊर्जा कार्यक्रमाच्या अनेक पैलूंचे ते पथप्रदर्शक राहिले. संपूर्ण अणुइंधनचक्रातील आण्विक पदार्थांच्या विकासात आणि उत्पादनात त्यांनी मोलाचे कार्य केले. १९८३ साली सेठना ह्यांना अवकाश प्राप्त झाल्यावर, रामण्णा अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष झाले.

रामण्णांचे[६] सर्वात महत्त्वाचे योगदान म्हणजे प्रचंड मोठ्या संख्येतील प्रशिक्षित वैज्ञानिक मनुष्यबळाची निर्मिती होय. म्हणूनच अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष एम.आर.श्रीनिवासन लिहितात, “अर्ध्या शतकाहून अधिक काळ अणुऊर्जा कार्यक्रमाशी असलेल्या त्यांच्या संबंधादरम्यान रामण्णांनीप्रचंड मोठ्या संख्येतील प्रशिक्षित वैज्ञानिक आणि तांत्रिक मनुष्यबळाची निर्मिती करण्यात हातभार लावला. ह्या मनुष्यबळानेच आण्विक विज्ञान आणि तंत्रज्ञानातील राष्ट्रीय प्रगतीकरता नवीन आणि आव्हानात्मक समस्यांचा सामना केला. हाच त्यांचा खरा वारसा आहे.” ह्याकरता आवश्यक ते मनुष्यबळ प्रशिक्षित करण्यासाठी १९५७ सालीरामण्णांच्या नेतृत्वाखाली बी.ए.आर.सी. ट्रेनिंग स्कूलची स्थापना करण्यात आली होती. डॉ. अनिल काकोडकर आणि त्यानंतरचे अणुऊर्जा आयोगाचे सर्व अध्यक्षही ह्याच स्कूलचे विद्यार्थी आहेत.


१९५७ सालीच भारतातली पहिली अणुसंशोधनभट्टी –अप्सरा- कार्यान्वित करण्यात आली होती. त्याकाळची लोकभावना मात्र अशी असे की, गरीबीपायी खायला अन्न नाही आणि नेहरू चालले आहेत, अणुऊर्जा संशोधन करायला. ही लोकभावनाच आर.के.लक्ष्मण ह्यांच्या एका तत्कालीन व्यंगचित्रात सशक्तपणे व्यक्त झालेली दिसते. हे व्यंगचित्र आणि याआधी दिलेले अणुऊर्जाखात्याच्या स्थापनेबाबतचे नोटीफिकेशनही, अणुऊर्जा विभागाच्याच एका प्रकाशनातून[७] घेतलेले आहे. अणुऊर्जा खात्याची त्यापुढील वाटचाल मात्र भारतास गौरवाप्रत नेणारीच होती.

 

रामण्णांच्या नेतृत्वाखालीच १८-०५-१९७४ रोजी पोखरण-१ चाचणी अणुस्फोट करण्यात आला. बुद्ध हसला. अत्यंत यशस्वीरीत्या भारताने अण्वस्त्रविज्ञान प्राप्त केले. अर्थात त्यामुळे आधीच अण्वस्त्रधारी असलेली राष्ट्रे नाराज झाली. त्यांनी भारतास उच्च तंत्रज्ञान पुरवण्यास नकार दिला. तेही भारतीय शास्त्रज्ञानी संधीत रूपांतरित केले. अनेक उच्च तंत्रे मग भारतातच विकसित करण्यात आली. ह्याही बाबतीत भारत स्वावलंबी झाला. १९७५ साली पद्मविभूषण हा नागरी सन्मान देऊन त्यांच्या ह्या कार्याचा गौरव करण्यात आला.

 

ए.पी.जे. अब्दुल कलाम म्हणतात, डॉ. रामण्णांसारखे उत्तुंग आणि बहुआयामी व्यक्तिमत्वप्रत्येक भूमिकेतून अभियानाच्या उद्दिष्टाप्रत प्रेरित होऊनराष्ट्रीय विकासात सहभागी होण्याकरता सदैवच सज्ज असे. केंद्रीय मंत्री आणि खासदार ह्या त्यांच्या भूमिकांतूनही हेच स्पष्ट होते. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील आम्हा लोकांनाडॉ. रामण्णा हे नेहमीच एक प्रेरणास्त्रोत आणि मार्गदर्शक ठरलेले आहेत.

 

अणुविवेक नावाच्या राजहंस प्रकाशनने १९९५ साली प्रकाशित केलेल्या एका पुस्तकात[८], लेखक दिलीप कुलकर्णी म्हणतात, “अण्वस्त्रे ही विनाशकारी, प्रलयंकारी आहेत हे आपण जाणतो. पण अण्वस्त्रांच्या चाचण्याही तितक्याच घातक आहेत हे आपल्याला ठाऊकच नसते. अणुवीज ही स्वच्छ, स्वस्त आणि सुरक्षित आहे या भूलथापेवर आपण भाबडेपणाने विश्वास ठेवतो!” हे विधान वस्तुस्थितीवर आधारित नाही. भारताकरता अणुऊर्जेचा इतिहास अत्यंत आश्वासक राहिलेला आहे. भारतातल्या शास्त्रज्ञांनी “अणुवीज ही स्वच्छ, स्वस्त आणि सुरक्षित आहे” हे वेळोवारी सप्रमाण सिद्धही केलेले आहे. भाभा अणुसंशोधन केंद्रात कसे काम चालते आणि देशातले बिनीचे शास्त्रज्ञ अपार कष्ट करून देशास जगात सर्वांपुढे कसे ठेवतात हे, मनोविकास प्रकाशनाच्या एका नव्याच पुस्तकात[९] तपशीलाने लिहिले आहे.

 “भारतीय वैज्ञानिक संस्थांमधील एक अव्वल यशस्वी संस्था असलेल्या भाभा अणुसंशोधन केंद्राच्या आत नेमके काय चालते याची उत्सुकता सर्वांच्या मनात असते. त्याचे कथन या यशाचे साक्षीदार असलेले आल्हाद आपटे उत्कृष्टतेबरोबरच अधिकारवाणीने करू शकतात. अणुकार्यक्रमाचा इतिहास सुस्पष्टपणे, संबंधित मानवी कंगोरे, निगडित परिस्थितीचा संदर्भ, आनुषंगिक मनोरंजक व चित्तवेधक गोष्टी यांनी सजवून रंजकपणे प्रस्तुत केला आहे. भाभा अणुसंशोधन केंद्राचे दार किलकिले करून आतील वैज्ञानिक विश्वाचे दर्शन घडवणारा मराठीतील पहिलाच ग्रंथ.” असे त्याचे वर्णन त्यात सांगितलेले आहे. ह्या पुस्तकास डॉ.अनिल काकोडकर ह्यांची प्रस्तावनाही लाभलेली आहे.


अणुऊर्जा विभागाची स्फूर्तीगाथा त्रोटक जरूर वाटेल मात्र ती निश्चित स्वरूपाने प्रेरणादायक आहे. शिवाय त्यातील संदर्भ आणखी विस्तृत अभ्यासास वाव देणारे आहेत. त्यामुळे आपल्या प्रेरणादायक श्रेयसंचितांचा हा ठेवा तुम्हाला आवडेल असा विश्वास वाटतो.

 

संदर्भः


[१] अणुऊर्जा आयोग http://www.aec.gov.in/

[२]  होर्मसजी जहांगीर भाभा https://anuvad-ranjan.blogspot.com/2012/04/blog-post_13.html

[३] विक्रम साराभाई जन्मशताब्दी http://nvgole.blogspot.com/2019/09/blog-post.html

[४] के.एस.पार्थसारथी ह्यांचा ’करंट सायन्स’ जर्नलमधील होमी नसरवानजी सेठना ह्यांचेवरील लेख  

  https://www.currentscience.ac.in/Volumes/100/08/1245.pdf

[५]  सेठना- द मॅन हू डेअर्ड टू ड्रीममीना मेनन व टी.एस.सुब्रमण्यमद हिंदू७ सप्टेंबर २०१०

https://www.thehindu.com/news/national/Sethna-the-man-who-dared-to-dream/article15905378.ece#:~:text=life%20in%20India.%E2%80%9D-,Dr.,the%20entire%20nuclear%20fuel%20cycle.

[६] राजा रामण्णाः भारतातील सर्वात आघाडीचे अणुकेंद्रकीय भौतिकशास्त्रज्ञ https://anuvad-ranjan.blogspot.com/2015/06/blog-post_28.html

[७] सागा ऑफ ऍटॉमिक एनर्जी इन इंडिया, हे प्रकाशन अणुऊर्जा विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर आजही उपलब्ध आहे.

[८] अणुविवेकदिलीप कुलकर्णीराजहंस प्रकाशन१९९५रु.८०/-पृष्ठेः १४३

[९] भारताची अणुगाथाआल्हाद आपटेमनोविकास प्रकाशन२०१७रु.४३०/-पृष्ठेः ३५९.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: