२०२०-०८-०६

पहिल्या अण्वस्त्रविध्वंसाचा पंचाहत्तरावा स्मृतीदिन

पहिल्या अण्वस्त्रविध्वंसाचा पंचाहत्तरावा स्मृतीदिन

नरेंद्र गोळे २०२००८०६

 

आज ६ ऑगस्ट २०२०. बरोब्बर पंचाहत्तर वर्षांपूर्वी सकाळी सव्वानऊ वाजता अमेरिकेने जपानमधील हिरोशिमावर अणुस्फोटकाचा हल्ला केला. नंतर ९ ऑगस्ट १९४५ रोजी असाच हल्ला अमेरिकेने नागासाकी ह्या जपानी शहरावर चढवला. ह्या घटनांनी जगाचा इतिहास, भूगोलाचे पर्यावरण आणि मानवाची विकासाकडे पाहण्याची दृष्टी आमूलाग्र बदलली. मानवी इतिहासात ह्यापूर्वी अशा घटना कधीही घडलेल्या नव्हत्या. गेल्या पंचाहत्तर वर्षांतही त्यांची मग पुनरावृत्ती झाली नाही. १ सप्टेंबर १९३९ रोजी जर्मनीने पोलंडवर आक्रमण करून पोलंड ताब्यात घेतल्यावर दुसरे महायुद्ध सुरू झाले होते. हिरोशिमा व नागासाकीवरील ह्या हल्ल्यांनंतर जपानने बिनशर्त शरणागती पत्करली. त्यामुळे मग दुसरे महायुद्ध अवचितच आणि आश्चर्यकारकरीत्या संपुष्टात आले. दुसर्‍या महायुद्धात तीस देशातील सुमारे दहा कोटी लोक गुंतलेले होते. त्यातील सुमारे आठ कोटी लोक त्यात मृत्युमुखी पडले. ह्यातील बहुसंख्य लोक; हत्याकांडे, वंशविच्छेद, डावपेचात्मक स्फोटकफेक, उपासमार इत्यादीमुळे ठार झालेले निरपराध नागरिक होते.

 

भारताने १८ मे १९७४ आणि ११ मे १९९८ रोजी शांततेकरता अणुचाचण्या केल्या. ह्या चाचण्यांनंतर पाश्चात्य जगताने भारतावर अनेकप्रकारचे निर्यातनिर्बंध घातले. कारण, अणुचाचण्यांनी विध्वंस आणि पर्यावरण प्रदूषण होते असे सांगण्यात आले. अनेक दशके भारताने हा जाच सोसला. मात्र अमेरिकेने पहिला अणुस्फोट जपानमध्ये हिरोशिमा येथे ६ ऑगस्ट १९४५ रोजी घडवला होता, तेव्हा किती भयंकर नरसंहार झाला होता, विध्वंस झाला होता आणि प्रदूषण झाले होते ते सर्व जगाला ज्ञातच आहे. दुसर्‍या महायुद्धात अणुस्फोटकांचा उपयोग पहिल्यांदाच विध्वंसाकरता करण्यात आला. आजवरचा विध्वंसाकरता झालेला अण्वस्त्रांचा तो एकमेव दाखला आहे. मात्र त्याच्या नियोजनात केवळ काही मोजक्या लोकांचा सहभाग होता आणि त्यांनीच लाखोंची जीवितहानी करणारा विध्वंस नेमका कसा घडवून आणावा ह्याचे काटेकोर नियोजन केले होते. ते त्यात प्रमाणाबाहेर यशस्वी झाले. कसे? त्याचीच ही कहाणी आहे.

 

६ ऑगस्ट १९४५ रोजी अमेरिकेने जपानमधील हिरोशिमावर अणुस्फोटकाचा जो हल्ला केला, त्याचेच तपशील मी एका पुस्तकातून आज ह्या लेखात गोळा केले आहेत. संदर्भः नाऊ इट कॅन बी टोल्ड. लेखकः जनरल लेस्ली ग्रुव्हज, प्रकाशनकालः १९५५. हे लेस्ली ग्रुव्हज ’मॅनहटन इंजिनिअरिंग डिस्ट्रिक्ट (एम.इ.डी.)’ ह्या प्रकल्पाचे प्रमुख होते. मॅनहटन अभियांत्रिकी जिल्हा, हे पहिला अणुस्फोटक तयार करणार्‍या अमेरिकेतील प्रकल्पाचे नाव होते. त्यावेळी तो जगातला सर्वात मोठा प्रकल्प होता. आजपर्यंत तो जगातला सर्वात मोठा प्रकल्पच होता. आता आपला ’आधार’ प्रकल्प जगातला सर्वात मोठा प्रकल्प ठरला आहे. ग्रुव्हज आपल्या आत्मवृत्तात ही कहाणी लिहू चाहत होते. मात्र अमेरिकन सरकारने ही सर्व माहिती गोपनीय ठरवून लिहिण्यास मनाई केली. पुढे १९५५ साली त्या माहितीचे वर्गीकरण बदलण्यात आले. मग ग्रुव्हज आपले आत्मवृत्त लिहू शकले. त्यांनी त्याचे नाव ठेवले, ’आता हे सांगता येईल (नाऊ इट कॅन बी टोल्ड.)’ पुढील मजकूर त्याच आत्मवृत्ताच्या मराठी अनुवादातील एक भाग आहे.

 

हिरोशिमा

 

१ ऑगस्ट तारीख आली आणि गेली. जपानवरील हवामान अनुकूल नव्हते. लेमे ह्यांना अशा हवामानात मोहीम हाती घ्यावी असे वाटले नाही. सहा उड्डाण-पथकांना (क्रू), त्यांना अनुसराव्या लागणार्‍या पद्धतींबाबत विशेष सूचना देण्यात आल्या. ४ ऑगस्टला दिलेल्या अल्पशा सूचनांत पार्सन्स ह्यांनी विस्फोटापश्चात ते कुठल्या परिणामांची अपेक्षा करू शकतात ते स्पष्ट केले. आतापर्यंत त्यांपैकी बहुतेकांना हे माहीत झालेले होते की, ते एका विशिष्ट प्रकारच्या स्फोटकास हाताळणार आहेत. पण विस्फोटाची शक्ती वीस हजार टी.एन.टी.च्या समकक्ष असेल हे पार्सन्स ह्यांचे निवेदन आश्चर्यचकित करणारे ठरले.

 

प्रतीक्षेच्या काळात विशेष हवाई-समुद्री-सुटका योजना निश्चित करण्यात आल्या. त्यांनी ह्यावर भर दिला की, हल्ल्याच्या चार तास पूर्वीपासून तर हल्ल्यापश्चात सहा तासांपर्यंत लक्ष्यस्थानापासून पन्नास मैलांच्या परिसरात इतर कोणत्याही विमानोड्डाणास अनुमती दिली जाणार नाही. अगदी सुटका कार्यवाहीकरताही ही मर्यादा हटवली जाणार नाही. विशेष हवाई-समुद्री-सुटका सुविधा भूदल आणि नौदलाने, विमाने व पाणबुड्यांद्वारे पुरवावयाच्या होत्या. आवश्यक त्या मर्यादांसहितही ह्या कार्यवाहीतील सुटकाछत्र सरासरी सुटका कार्यवाहीच्या मानाने चांगले असणार होते.

 

अर्नॉल्ड आणि लेमे ह्यांच्यासोबतच्या माझ्या चर्चांतून आणि फर्रेल ह्यांना मी दिलेल्या सूचनांतून, मी हे स्पष्ट केलेले होते की, ह्या पहिल्या उड्डाणात, ते यशस्वी होवो वा न होवो, आम्हाला त्यानंतर पार्सन्स ह्यांच्याशी बोलता येणे गरजेचे होते, विशेषतः उड्डाण अयशस्वी ठरले असते तर. नेमके काय झाले ते आम्हाला कळणे अतिशय महत्त्वाचे होते. मी अशीही भर घातली की, ह्या निकषाव्यतिरिक्त, इतर कुठल्याही उड्डाणातील पथकातील व्यक्तींपेक्षा ह्या विमानाच्या पथकातील व्यक्तींचे प्राण मोलाचे होते.

 

आमची मोहीम धोक्यात आणू शकेल अशा, जपानी सुरक्षा कृतींचे लक्ष विचलित राहावे म्हणून, आमच्या मोहिमेसोबतच जपानवरील इतर हवाई हल्ले सुरूच राहणार होते. हिरोशिमा प्रमुख लक्ष्य असणार होते. कोकुरा आर्सेनेल आणि कोकुरा ही दुसर्‍या पायरीची लक्ष्ये असणार होती आणि नागासाकी तिसर्‍या पायरीचे लक्ष्य असणार होते. हिरोशिमातील नेमाचे ठिकाण जपानी आर्मी हेडक्वार्टरच्या नजीक असणार होते.

 

हिरोशिमा हे अत्यंत महत्त्वाचे लष्करी लक्ष्य होते. आर्मी हेडक्वार्टर एका किल्ल्यात वसलेले होते. सुमारे २,५०० सैनिक किल्ल्याच्या शिबंदीत होते. हे एक बंदर होते ज्यामधून होन्शू ते क्युशू भागात सर्व पुरवठा व दूरसंचार केला जात असे. क्योटो वगळता हे अजूनही अमेरिकन हवाई हल्ल्यांतून वाचलेले सर्वात मोठे शहर होते. त्याची लोकसंख्या ३,००,००० असल्याचे मानले जात होते. ते युद्ध उद्योगांचे तर मोहोळच होते. मध्यम आकाराच्या संयंत्रातून आणि लहान दुकानांतून तसेच प्रत्येक घरांतूनही हेच उद्योग केले जात असत.

 

आम्ही एकूण सात विमाने वापरणार होतो. टिनिअनहून उडाल्यावर स्फोटकवाहक विमानात काही यांत्रिक बिघाड झाला तर हाती कुमक असावी ह्यासाठी, एक विमान आय्वो जिमाला कुमक म्हणून पाठवण्यात येणार होते. तीन विमाने पुढे जाणार होती. प्रत्येकी एका लक्ष्य क्षेत्रावर एक एक. ज्यामुळे स्थानिक हवामान समजून, ते स्फोटकफेकी विमानास कळवले जाणार होते. स्फोटकफेकी विमानांसोबत, सामान्यतः लक्ष्यक्षेत्रावर दोन निरीक्षक विमाने जाणार होती. त्यांपैकी एकात विशेष मोजमापाची आणि नोंद करणारी उपकरणे असणार होती. उपकरणांत अशाही एका उपकरणाचा समावेश होता, जे लक्ष्यानजीक टाकण्यात येणार होते आणि जे रेडिओद्वारे निरीक्षणे पाठवणार होते.

 

मदत म्हणून रडारचा उपयोग केला जाणार होता. पण प्रत्यक्ष स्फोटकफेक पाहूनच केली जाणार होती. हे अशक्य भासले तर, स्फोटक परत आणले जाणार होते. बहुधा आय्वो जिमाला. कारण विमानाचे इंधन कदाचित टिनिअनला परतण्यास पुरेसे शिल्लक राहिले नसते. इतर हवाई तळांवर उतरावे लागणे आम्हा पसंत नव्हते. कारण उतरतांना अपघात झाल्यास, जमिनीवर आम्हाला अशी माणसे हवी होती ज्यांना अशा परिस्थितीत घ्यावयाच्या विशेष काळजीची कल्पना असेल.

 

ह्या व्यवस्था गुंतागुंतीच्या होत्या. पण ५०९-व्या गटासारख्या काळजीपूर्वक संघटित आणि प्रशिक्षित गटास अवघड नव्हत्या. थर्ड फोटो रिकन्नईसन्स स्क्वाड्रन कडून हल्ल्याची प्रकाशचित्रे काढण्याची तरतूदही केलेली होती आणि दोन फोटो क्रूजना त्यांच्या कर्तव्यांबाबत ५०९-व्या गटाच्या गुप्तवार्तांकन अधिकार्‍यांकडून तपशीलही सांगितले गेले होते.

 

पाच तारखेला सकाळी, अशी चिन्हे दिसू लागली की दुसरे दिवशी हवामान चांगले होईल. स्फोटकाची जुळणी आणि तपासणी पूर्ण करण्यासाठी, उड्डाणापूर्वी आम्हाला चोवीस तासांची पूर्वसूचना आवश्यक असल्याने, लेमे ह्यांनी मोहिम बहुधा ६ ऑगस्ट रोजी हाती घेतली जाईल ह्याची पुष्टी केली. जुळणीनंतर लगेचच ’लिटिल बॉय’ त्याच्या ढकलगाडीवर (ट्रेलर वर) चढवण्यात आला. पूर्णतः झाकला जावा ह्याकरता, कॅनव्हासमध्ये गुंडाळण्यात आलेला होता. भारण खळग्याकडे (लोडींग पिट) हलवण्यात आला. तिथून बी-२९ विमानात चढवण्यात आला. अंतीम चाचण्या घेण्यात आल्या आणि स्फोटक पाच तारखेच्या संध्याकाळीच उड्डाणाकरता तयार झाले.

 

उड्डाण भरण्याच्या क्षणापर्यंत विमान आणि त्यातील स्फोटक निरंतर सुरक्षा रक्षकांच्या आणि निरनिराळ्या कळीच्या तांत्रिक गटांच्या प्रतिनिधींच्या सर्वेक्षणात राहिले. मध्यरात्री अंतीम सूचना (ब्रिफिंग) दिल्या गेल्या. मग उड्डाणपूर्व नास्ता आला. धार्मिक सेवा रुजू झाल्या आणि स्फोटक आकाशात झेपावले. ’इनोला गे’ –मोहिमेस वाहून नेणार्‍या बी-२९- चे वैमानिक कर्नल तिब्बेत्स होते. मेजर थॉमस फरेबी स्फोटकफेके होते. कॅप्टन पार्सन्स शस्त्रास्त्र हाताळणारे होते आणि लेफ्टनंट मॉरीस जेप्सन विजकीय चाचणी अधिकारी होते. अनेक तांत्रिक तपशील अनुस्यूत असल्याने, जबाबदार्‍यांत संभवत असलेला गोंधळ होऊ नये म्हणून असे तपशील निश्चित करण्यात आलेले होते. ह्याकरताच नॉर्स्टॅड ह्यांनी चीफ ऑफ स्टाफ ह्या नात्याने कमांडिंग जनरल एक्स.एक्स.आय. स्फोटक हाताळणी आदेशक ह्यांस २९ मे १९४५ रोजी लिहिले होते कीः

 

“प्रत्यक्ष स्फोटकवाहक बी-२९ विमानात दोन विशेषज्ञ लष्करी अधिकारी असणे वांछनीय आहे. ज्येष्ठ अधिकारी विशेषज्ञांना; स्फोटकाचे अभिकल्पन विकास आणि डावपेचात्मक वैशिष्ट्ये ह्यांचेशी परिचित करून, डावपेचात्मक नियोजनापासून विचलित होण्याची आणीबाणी निर्माण झाल्यास त्याप्रसंगी अंतीम निर्णय घेण्यास पात्र केले जावे.”

 

फर्रेल ह्यांच्या संमतीने पार्सन्स ह्यांनी असे ठरवले होते की, स्फोटकाची अंतीम जुळणी उड्डाण भरल्यानंतर करावी. टिनिअन येथेच होऊ शकणार्‍या अपघातापासूनचा धोका कमी करण्याचा उद्देश त्यांचा होता. मी पूर्वी असे म्हटले होते की, असे करणे शहाणपणाचे ठरणार नाही, अनावश्यक आहे, विमानातल्या अवघडलेल्या अवस्थेत ते करणे अत्यंत कठीणही ठरेल म्हणून त्यास माझा विरोध आहे. ह्या योजनेची माहिती मला अखेरपर्यंत दिली गेली नव्हती. दिली गेली तेव्हा, हस्तक्षेप करण्याचे दृष्टीने वेळ निघून गेलेली होती. हिरोशिमा विरुद्धच्या मोहिमेची प्रगती त्या उड्डाणादरम्यान पार्सन्स ह्यांनी ठेवलेल्या नोंदींत चांगल्या प्रकारे वर्णिलेली आहे.

 

६ ऑगस्ट १९४५

 

०२४५[१]               उड्डाण भरले

०३००                बंदुकीचे अंतीम भरणे सुरू केले

०३१५                भरणे पूर्ण केले

०६०५               आय्वोपासून एंपायरकरता रवाना

०७३०                लाल दट्टे (प्लग्ज) आत[२] सारले

०७४१                चढायला सुरूवात केली. हवामानाचा अंदाज मिळाला. पहिल्या आणि तिसर्‍या

पायरीच्या लक्ष्यांवर हवामान चांगले होते. पण दुसर्‍या पायरीच्या लक्ष्यावर

चांगले नव्हते.

०८३८                ३२,७०० फूट उंचीवर विमान स्थिरावले.

०८४७                विजकीय वितळतारा तपासल्या आणि व्यवस्थित आढळून आल्या.

०९०४                पश्चिमेकडे रोख केला.

०९०९                लक्ष्य हिरोशिमा दृष्टीपथात आले.

०९१५ १/२         स्फोटक टाकले

 

मुळात निर्धारित केलेली वेळ ०९१५ वाजताची होती. त्यामुळे सतराशे मैलांच्या, साडेसहा तासांत पूर्ण केलेल्या उड्डाणात कर्नल तिब्बेत्स लक्ष्यावर केवळ अर्धे मिनिट उशीराने पोहोचलेले होते.

 

ह्या कार्यवाहीच्या तपशीलात, २० व्या हवाई दलाच्या हुकूमात असे नमूद होते की, स्फोटक टाकल्यानंतर विमानाने १५०° वळून विस्फोटस्थळापासून कमाल दूर पोहोचण्याकरता झेप घ्यावी. आमचे अभ्यास असे सुचवतात की, असे वळण विमान आणि उड्डाण पथकाला अनावश्यक धोका न पत्करता घेता येऊ शकेल.

 

३१,५०० फूट उंचीवरून स्फोटक खाली टाकल्यानंतर लगेचच विमान वळून दूर जाण्यास झेपावले. स्फोटक खाली टाकल्यानंतर पन्नास सेकंदांनी, वळण घेत असतांना प्रकाश चमकला, विमानाला हादरे बसले. दोन हादरे बसले. पहिला धक्का थेट होता. दुसरा धक्का जमिनीवरून परावर्तित होऊन आलेला होता. त्या वेळेपर्यंत विस्फोटस्थळापासून विमान पन्नास मैल दूर जाऊन पोहोचलेले होते. पार्सन्स ह्यांच्या नोंदी सुरूच होत्याः

 

चमक आणि मग दोन हादरे विमानापर्यंत पोहोचले. प्रचंड ढग उठला.

 

१०००                अजूनही ढग दिसतच होता. तो सुमारे ४०,००० फूट उंचीचा असावा.

१००३                फायटर रिपोर्टेड

१०४१                हिरोशिमापासून ३६३ मैलांवर ढग दिसेनासा झाला. विमान २६,००० फूट उंचीवर होते.

 

हल्ला करणार्‍या आणि दोन निरीक्षक विमानांतील उड्डाणपथके (क्रू) ह्यांनी असा अहवाल दिला की, स्फोटक टाकल्यानंतर पाच मिनिटांनी सुमारे तीन मैल व्यासाचा एक काळा करडा ढग हिरोशिमाच्या मध्यावर तरंगतांना दिसला. त्याच्या मध्यातून पांढर्‍या धुराचा एक स्तंभ ३५,००० फुटांपर्यंत उंच उठला. ढगाचा वरचा भागही लक्षणीयरीत्या फुगला.

 

हल्ल्यानंतर चार तासांनी, प्रकाशचित्रक टेहळणी विमानांना (फोटो रिकन्नाईसन्स प्लेन्स) असे आढळून आले की, बव्हंशी हिरोशिमा शहर अजूनही धुराच्या ढगाने झाकोळलेलेच होते. ढगांच्या कडांवर जाळही दिसून येत होता. दुर्दैवाने ह्या विमानांतून मला काहीच अहवाल मिळाला नाही. फक्त एवढेच कळले की ते प्रकाशचित्रे घेऊ शकले नाहीत. दुसर्‍या दिवशी घेतलेल्या प्रकाशचित्रांत ६०% शहर उध्वस्त झालेले दिसून आले. हिरोशिमा येथे उध्वस्त झालेले क्षेत्र सुमारे १.७ वर्ग मैल इतके होते. ते जमिनीवरील विस्फोटस्थळापासून एक मैलांपर्यंत विस्तारलेले होते. जपानी अधिकरणांनी केलेला प्राणहानीचा अंदाज ७०,००० होता, तर हरवलेल्या वा जखमी झालेल्या व्यक्तींची संख्या ६८,००० इतकी होती.

 

हिरोशिमा स्फोटकफेकीत साध्य झालेले सर्वात महत्त्वाचे श्रेय म्हणजे त्यातून झालेली प्रचंड भौतिक हानी हे नव्हते. ५०% हून अधिक इमारती पूर्णतः उध्वस्त झालेल्या होत्या, पंचवीस हजार जपानी सैनिक मारले गेले वा जखमी झालेले होते, इतरही हजारो लोक मारले गेले होते किंवा जखमी झाले होते. तरी आम्हाला हवा असलेला आणि सर्वात महत्त्वाचा परिणाम हा झाला होता की, जपानी नेत्यांना त्यांची हताश परिस्थिती लक्षात आलेली होती. जेव्हा नागासाकीवरील स्फोटकफेकीने ह्या वस्तुस्थितीवर शिक्कामोर्तब केले तेव्हा, त्यांची खात्री पटली की, त्यांनी ताबडतोब शरणागती पत्करली पाहिजे.

 

रविवार दिनांक ४ ऑगस्ट रोजी फर्रेल ह्यांनी मला तारेने कळवले होते की, आमच्या कार्यवाहीकरता अनुकूल असे हवामानाचे भाकीत आहे, ते तसेच राहिले तर विमाने रविवारीच, अदमासे दुपारी उड्डाण करतील. (ह्या संपूर्ण वॉशिंग्टनमधील घटनांच्या वर्णनांत, वॉशिंग्टनच्या वेळा आणि तारखा वापरण्यात आलेल्या आहेत.) जनरल मार्शल ह्यांना कळवण्यात आले. तसेच स्टीमसन ह्यांनाही हॅरिसन ह्यांच्या मार्फत कळवण्यात आले.

 

रविवारी मी माझ्या कार्यालयात जरा लवकरच गेलो आणि एक तार आलेली पाहिली. त्यात उड्डाण अजूनही त्याच दिवशी होणार असल्याचे म्हटले होते. मी तिथेच थांबलो. उड्डाणाचा किंवा त्यास विलंब होत असल्याचा अहवाल मिळण्याच्या प्रतीक्षेत. दुपारी दीड दोन वाजेपर्यंत, टिनिअनमधील परिस्थितीबाबत काहीतरी माहिती मिळेल अशी मला पूर्ण आशा होती. त्या वेळेपर्यंत मी माझे इतर काम संपवलेले होते. मला लक्षात आले की आता वाट बघत बसण्याखेरीज करता येण्यासारखे काहीच नव्हते. अनेक अधिकारी कामावर उपस्थित होते. केवळ प्रतीक्षेत. मागे वळून पाहता मला हे कळत नाही की, मी लवकरच टेलेटाईपवर फर्रेल ह्यांची चौकशी का केली नाही. कदाचित त्यामुळे अविश्वास व्यक्त झाला असता आणि हा अपवाद वगळला तर असे मी आयुष्यात कधीही केलेले नव्हते.

 

अंतीमतः उत्तेजित होऊन काही उपयोग नाही हे उमजून मी तो नाद सोडून दिला. मग मी असा निर्णय घेतला की, तासभर मी टेनीस खेळायला गेलो तर आमच्या कार्यालयातील सगळ्यांकरताच ते बरे राहील. मला नियमितपणे ह्या प्रकल्पाच्या निरनिराळ्या अवस्थांच्या कार्यवाहीत मदत करणार्‍या ड्युटी ऑफीसर मेजर डेर्री ह्यांना मी माझ्यापर्यंत अविलंब कसे पोहोचता येईल हे सांगितले आणि बाहेर पडलो. मी मैदानात असतांना फोनजवळ बसून राहण्याकरता मी माझ्यासोबत आणखी एका अधिकार्‍यास बरोबर घेतले होते. आमचे पहिले पृथक्करण संयंत्र कार्यान्वित झाले तेव्हापासून,  माझ्याप्रत पोहोचणे अवघड असेल अशा प्रसंगी मी असेच करत असे. ह्यामुळे आवश्यक असेल तेव्हा मी उपलब्ध होत असे एवढेच नव्हे तर, कुणी माझ्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न तर करत नसावा ह्या निरंतर चिंतेतून माझी मुक्तता होत असे. हा अधिकारी दर पंधरा मिनिटांनी माझ्या कार्यालयात फोन करून, काही बातमी आहे का हे विचारून घेत असे. एखाददोन तासांनी आम्ही परतलो. तोपर्यंतही टिनिअनमधून काहीच माहिती मिळालेली नव्हती.

 

पाच वाजण्याच्या सुमारास डेर्री ह्यांनी मला सांगितले की, मला जनरल मार्शल ह्यांचा आताच एक फोन आला होता. लीसबर्गला त्यांच्या घरी एक सप्ताह राहून ते नुकतेच परतले होते. कार्यवाहीबाबत माहिती त्यांना जाणून घ्यायची होती. डेर्री ह्यांनी त्यांना सांगितले होते की, अजून काहीच समजलेले नाही, मात्र मी उपलब्ध आहे आणि मला ते फोन करू शकतात. जनरल मार्शल ह्यांचे उत्तर, माझ्यासोबतच्या त्यांच्या आजवरच्या संबंधांतील, विचारपूर्वक कृती करण्याच्या त्यांच्या वृत्तीचे नमुनेदार उदाहरण होते. ते म्हणाले, “तुम्ही जनरल ग्रुव्हज ह्यांना त्रास देऊ नका. त्यांच्याकडे अनावश्यक चौकशांना उत्तरे देण्याखेरीज विचार करण्यायोग्य इतर बरेच आहे”.

 

माहितीचे असे अपुरेपण अनपेक्षित असल्याने मी माझ्या पत्नी व मुलीसोबत आणि जॉर्ज हॅरिसन ह्यांचेसोबत आर्मी-नेव्ही क्लबमध्ये रात्रीचे जेवण ठरवले होते. मी असा विचार केलेला होता की, उड्डाणाचा अहवाल आणि हल्ल्याचा विमानातून येणारा अहवाल, जो संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास येण्याची अपेक्षा मी करत होतो, ह्यांच्या दरम्यान मी हे करू शकेन. त्यांना भेटल्यावर मी हॅरिसन ह्यांना सांगितले की अजूनही काही बातमी नाही. नंतर जनरल हँडी जवळ आले आणि मला विचारू लागले की, काही बातमी आहे का. मला पुन्हा नाहीच सांगावे लागले. मग आम्ही जेवू लागलो, तेव्हा मला फोनवर बोलावण्यात आले. त्यावेळी संध्याकाळचे सुमारे पावणेसात वाजले होते. मी गेलो तेव्हा हॅरिसन आणि हँडी ह्यांनी जेवण थांबवलेले मी बघितले. माझ्या परत येण्याकडेच त्यांचे डोळे लागलेले होते असे माझ्या लक्षात आले. डेर्री ह्यांनी पहिला अहवाल दिला की, विमान वेळेवरच उडाले होते. हा अहवाल सुमारे सहा तास उशीराने मिळत होता. पण तरीही काहीसे मोकळे वाटले. मी परतल्यावर, मी हँडी ह्यांना आणि मग हॅरिसन ह्यांना हे सांगितले.

 

काही मिनिटांनंतर मी कार्यालयात परतलो. माझ्या कुटुंबियांनी मला तिथे सोडले, तेव्हा मी त्यांना सांगितले की मला कदाचित तिथेच रात्रभर राहावे लागू शकेल. युद्धादरम्यान मी असे पहिल्यांदाच करत होतो, तरी त्यावर काही प्रश्नोत्तरे झाली नाहीत. लष्करातील त्यांच्या आयुष्याने त्यांना व्यवस्थित वळण लावलेले होते.

 

माझ्या सूचनांनुसार डेर्री ह्यांनी जनरल मार्शल ह्यांना, सेक्रेटरी ऑफ द जनरल स्टाफ कर्नल मॅकार्थी ह्यांचेमार्फत विमानाच्या उड्डाणाबाबत सत्वर कळवून टाकलेले होते. मी खूपच अस्वस्थ झालेलो होतो आणि आमच्या संपर्कयोजनेत पडलेला खंड पाहून संकोचूनही गेलेलो होतो. म्हणून मी माझे जुने मित्र असलेल्या मेजर जनरल एच.सी. इंगल्स, चीफ सिग्नल ऑफिसर ह्यांना फोन केला आणि ह्या बाबतीत जरा लक्ष घालण्यास सांगितले. त्यांनी असे उत्तर दिले की, त्यांना आधीच जनरल मार्शल ह्यांचेकडून ते समजलेले आहे आणि माझ्याकडून खुंटा बळकट करण्याची गरज नाही. त्यांना प्रकरण काय आहे हेच माहीत नव्हते. मात्र अज्ञात अडथळा दूर करण्याचा ते हरसंभव प्रयास करत होते. तरीही हल्ल्याचा संदेश आलेला नव्हता.

 

माझ्या कार्यालयातील ज्यांना सर्वसामान्य परिस्थितीची जाणीव होती ते, गरज पडल्यास उपलब्ध राहावे म्हणून आणि घटना काय घडत आहेत ह्याबाबतच्या नैसर्गिक उत्सुकतेपोटी संध्याकाळी गोळा झाले. ह्यात सर्वच जण काही समाविष्ट नव्हते. शांतपणे अभ्यासणे गरजेचे असलेली कागदपत्रे मी संध्याकाळी हातावेगळी केली. कार्यालयातील वाढता तणाव कमी करण्यासाठी, मी माझा टाय सोडवला, कॉलर खुली केली, बाह्या चढवल्या. असे करणे माझ्या स्वभावात नव्हते. तरीही अनौपचारिक भासावे म्हणून मी हेतुतः वातावरण मोकळे केले. कल्पनेहूनही सावकाशपणे तासावर तास गेले. तरीही काही बातमी नव्हती. हल्ला झाल्याचा संदेश येण्याची वेळ टळूनही तीन चार तास उलटून गेले होते.

 

आमच्या चौकशा योग्य स्थळी पोहोचत आहेत की नाहीत ह्याची मला खात्री नव्हती. पण असे दिसत होते की, अत्यंत महत्त्वाच्या क्षणी घडून येतात तसाच एक गोंधळ घडून आलेला होता. त्यामुळे हा त्रास उद्भवला होता. माझ्याकरताचा संदेश नेहमी वायूदलाच्या सर्वोच्च गोपनीयता वाहिनीतून टिनिअनहून गुआममार्गे वॉशिंग्टनला येत असे. ह्या प्रसंगी संदेशाने टिनिअन सोडले आणि मग तो कशाने तरी लष्करी वाहिनीवर टाकला गेला. मनिलाला गेला आणि तिथून मग वॉशिंग्टनला आला. का? ते मला कधीच समजले नाही.

 

११:१५ वाजण्याच्या सुमारास मला मॅक्कार्थींकडून एक फोन आला. ते म्हणाले की, जनरल मार्शल ह्यांनी त्यांना हे शोधून काढायला सांगितले आहे की, आपल्याकडे  प्रत्यक्ष हल्ल्याबाबत काही बातमी आहे का. मी उत्तरलो, “नाही आमच्याकडे काहीही बातमी आलेली नाही.” ते म्हणाले की, जनरल जनरल मार्शल ह्यांनी त्यांना असे सांगून ठेवले आहे की, यानंतर जर काही बातमी आली तरी, मॅक्कार्थींनी त्यांना त्याच वेळी फोन करू नये. सकाळी सांगावे.

 

पंधरा मिनिटांनंतर हल्ल्याचा संदेश आला. पार्सन्स ह्यांनी (अर्थातच, एक वेळच्या विशेष संकेतात संकेतित) अहवाल दिला कीः

 

परिणाम स्पष्ट. सर्वच बाबतींत यशस्वी. दृश्य प्रभाव न्यू मेक्सिको चाचण्यांहून अधिक. स्फोटकफेकीनंतर विमानात सर्व काही ठीक.

 

त्याच वेळी विमानातून पुढील संदेशही प्राप्त झाला.

 

हिरोशिमातील लक्ष्यावर दृश्यमानतेच्या आधारे हल्ला केला. ०५२३१५ झेड[३]. वर एक दशांश ढग. लढाऊ विमाने (फायटर्स) नाहीत. विमानविरोधी मारा (फ्लाक) नाही.

 

हे संदेश संकेतांतून सोडवताच, मी मॅक्कार्थींना फोन केला. त्यांनी मला विचारले की जनरल मार्शल ह्यांच्या सूचनांचा विचार करता त्यांनी काय केले पाहिजे असे मला वाटत आहे. मी म्हणालो की ती त्यांची समस्या आहे. पण मी त्या जागी असतो तर, निश्चितपणे मी जनरल मार्शल ह्यांना लगेचच फोन केला असता. त्यांना एकच अभिप्राय मिळाला, “मला फोन केल्याखातर मनःपूर्वक धन्यवाद”.

 

ह्या बातम्यांमुळे स्वाभाविकतः आपली माणसे खूपच उत्तेजित होती, मात्र मी माझ्या कार्यालयात विश्रांतीसाठी गेलो आणि सकाळी जनरल मार्शल ह्यांना दाखवण्याकरताचा स्फोटकफेकीबाबतचा कच्चा अहवाल लिहून काढला. विमान टिनिअनला परत आल्यानंतर अपेक्षित असलेला विस्तृत अहवाल मिळाल्यानंतर, अधिक विस्तृत अहवाल त्यावरूनच तयार करण्याचे मी ठरवले. कच्चा अहवाल पूर्ण होताच मी कार्यालयात आणून ठेवलेल्या पलंगावर झोपी गेलो. त्यापूर्वी मी ड्युटी ऑफिसर ह्यांना असे सांगून ठेवले की, पुढील संदेश मिळताच मला कळवा. सकाळी ४:३० वाजण्याच्या सुमारास त्यांनी मला उठवले. फर्रेल ह्यांच्याकडून प्राप्त झालेला अपेक्षित अहवाल दिला. विमान टिनिअनला आल्यानंतर तो पाठवलेला होता. तो होता पुढीलप्रमाणेः

 

०६०५०० झेड[४] वाजता टिनिअनला परत आल्यानंतर पार्सन्स, विमान पथके आणि निरीक्षकांनी दिलेली अतिरिक्त माहिती. चौकशीत विमान पथके आणि निरीक्षकांनी दिलेली माहिती गोळा होईपर्यंत अहवालास विलंब झाला. चौकशीस स्पात्झ, गाईल्स, ट्विनिंग आणि डेव्हीस उपस्थित होते.

 

लढाऊ विमाने वा विमानविरोधी मारा नव्हता, एक दशांश मेघछत्र होते आणि थेट लक्ष्यावर मोठे खुले छिद्र होते ह्याची पुष्टी झाली. उच्चगती प्रकाशचित्रकाचे अहवाल उत्तम नोंदले गेले आहेत. फिती अजूनही प्रक्रियित नसल्या तरी, इतर निरीक्षक विमानातही चांगल्या नोंदी अपेक्षित आहेत. हल्ल्याची प्रकाशचित्रे गोळा करणारे टेहळणी विमान अजून परतलेले नाही.

 

आवाजः दखलपात्र आवाज निरीक्षिला गेला नाही.

चमकः प्रखर सूर्यप्रकाशामुळे, न्यू मेक्सिको चाचणीइतकी डोळे दिपवणारी चमक जाणवली नाही.

 

प्रथम एक अग्निगोल होता. काही सेकंदांतच तो जांभळ्या धूर आणि वलयाकार वर उसळणार्‍या ज्वालांत परिवर्तित झाला. विमान वळण्यास सिद्ध झाले त्याच वेळी चमक निरीक्षिली गेली. सर्व ह्यावर सहमत आहेत की, दिप्ती प्रखर होती आणि पांढरा ढग न्यू मेक्सिको चाचणीत उठला त्याहून जलद उसळला. काही मिनिटांतच तो तीस हजार फुटांपर्यंत उंच उठला. एक तृतियांश जादा व्यासाचा होता.

 

ढग सर्वोच्च पातळीवर भूछत्रागत फुलला. स्तंभापासून विलग झाला आणि स्तंभ पुन्हा फुलला. ढग सर्वाधिक प्रक्षुब्ध होता. तो निदान चाळीस हजार फुटांपर्यंत तरी उसळला असावा. ह्या सर्वोच्च पातळीवर तो पसरला. तीनशे त्रेसष्ठ समुद्री मैलांवरील, पंचवीस हजार फुट उंचीवर असलेल्या लढाऊ विमानांतून तो निरीक्षिला गेला. निरीक्षण पृथ्वीच्या वक्रतेने नाही, दृष्यमानतेने सीमित झाले.

 

धमाकाः लढाऊ विमानांत निस्संदिग्धपणे दोन धक्के जाणवले. निकटच्या विमानविरोधी मार्‍यागत तीव्रता होती. गोदीच्या बाहेरील भागाची टोके वगळता संपूर्ण शहर गडद काळसर धुळीच्या थराने झाकोळले होते. हा थरही वर उठलेल्या ढगाच्या स्तंभात मिसळून गेला होता. तो अत्यंत प्रक्षुब्ध होता. धुळीतून उठणार्‍या ज्वाला चमकत होत्या. ह्या धुळीच्या थराचा व्यास किमान तीन मैलांचा असेल. एका निरीक्षकाने सांगितले की, खोर्‍यातून उठून शहराकडे येणार्‍या धुळीच्या स्तंभाने संपूर्ण शहर भग्न केल्यागत दिसत होते. धुळीमुळे संरचनात्मक हानीचे दृश्य निरीक्षण करता आले नाही.

 

पार्सन्स व इतर निरीक्षकांना वाटले की, हा हल्ला न्यू मेक्सिकोतील चाचणीच्या मानाने प्रचंड आणि भयकारी होता. त्याचे परिणाम जपान्यांना प्रचंड मोठ्या उल्कापातासारखेच भासू शकतात.

 

संदेश संकेतांतून बाहेर काढल्यावर मी तो विस्तारला आणि माझा पूर्वीचा अहवाल सुधारून घेतला, त्याचे टंकलेखन सुरू असतांना, माझा गणवेष बदलून घेतला. सकाळी सुमारे ०६:१५ वाजता मी जॉर्ज हॅरिसन ह्यांना त्यांच्या हॉटेलवरून बोलावले आणि सांगितले की, मी जनरल मार्शल ह्यांच्या कार्यालयात जात आहे आणि सात वाजण्यापूर्वीच मी तेथे पोहोचेन. जनरल ह्यांच्या आगमनाची तीच नियमीत वेळ होती.

 

जनरल आले तेव्हा मी वाटच पाहत होतो. लगेचच मी दोन पानी लिखित अहवाल सादर केला. एखाद दुसर्‍या मिनिटातच जनरल अर्नॉल्ड आणि हॅरिसन हेही आले. नंतर थोडी चर्चा झाली. त्यानंतर जनरल मार्शल ह्यांनी फोनवरून सेक्रेटरी ऑफ वॉर ह्यांना फोन केला होता. मिस्टर स्टीमसन त्यावेळी लाँग आयलँडवरील त्यांचे घरी होते. युरोपातून नुकतेच परतलेले असल्याने थकलेले होते. एक वा दोन दिवसांच्या विश्रांतीकरता घरी गेलेले होते. ज्या फोन सर्किटवर आम्ही बोललो ते सुरक्षेकरता विशेषत्वाने अभिकल्पित होते. वस्तुस्थिती समजून घेतल्यावर, त्यांनी सर्व संबंधितांना ते पोहोचवण्याकरता माझे हार्दिक अभिनंदन केले.

 

जनरल मार्शल ह्यांनी अशी भावना व्यक्त केली की, आमच्या यशाचा मोठा गाजावाजा होण्यापासून जपले पाहिजे. कारण निस्संशयपणे त्यात मोठ्या संख्येतील जपान्यांना प्राण गमवावे लागलेले होते. मी उत्तर दिले की, त्या जीवितहानीबद्दल मला तसे वाटत नाही, जसे बटान डेथ मार्च केलेल्यांबद्दल वाटते. जेव्हा आम्ही सभा दालनात जमलो तेव्हा अर्नॉल्ड ह्यांनी माझ्या पाठीवर थाप दिली आणि म्हणाले की, “तुम्ही बोललात ह्याचा मला आनंद वाटतो. मलाही तसेच वाटले.” मी नेहमीच असा विचार केला की, विशेषतः उच्चपदस्थ आणि मोठी जबाबदारी सांभाळणार्‍या प्रत्येक अनुभवी अधिकार्‍याची वास्तविक भावना अशीच असणार. त्यात जनरल मार्शलही आलेच.

 

आम्हा सर्वांना तसेच लाँग आयलँडवरील सेक्रेटरींनाही हे स्पष्ट झालेले होते की, अणुऊर्जेच्या विकासातून युद्ध संपवण्याची आमची आशा आता वास्तवात येऊ पाहत होती.

 

जनरल मार्शल म्हणाले की, त्या दिवशी सकाळी मी नदीच्या वॉशिंग्टनकडील बाजूस असलेल्या माझ्या कार्यालयात परतण्याऐवजी पेंटागॉनमध्येच राहिलेले त्यांना आवडेल. ते म्हणाले की, अशा काही गोष्टी उद्भवू शकतात ज्यांच्याकरता त्यांना माझी आवश्यकता भासेल. त्यांनी अशीही भर घातली की, “सेक्रेटरी ऑफ वॉर दूर आहेत. तुम्ही इथे असेपर्यंत त्यांचे कार्यालय तुम्हीच का सांभाळत नाही?”. हे सर्वाधिक सोयीस्कर होते, कारण ते जनरल मार्शल ह्यांच्या कार्यालयालगतच होते.

 

त्यावेळी माझ्यासमोरील प्रमुख समस्या, सकाळी ११:०० वाजता केले जावयाचे अध्यक्षीय निवेदन (प्रेसिडेन्शिअल रिलीज) तयार करण्याची होती. अमेरिकन विमाने स्फोटकफेक करून तळावर परतण्यापूर्वीच परिणाम घोषित करण्याची जपान्यांची प्रथा होती. जपानी सरकार व लोकांवर सर्वाधिक संभाव्य आघात सुनिश्चित करण्यासाठी, आमच्या स्फोटकाबाबतची घोषणा वॉशिंग्टनमधून सत्वर केली जावी अशी आमची इच्छा होती.

 

मुद्रित माध्यमांकरता दिले जावयाचे निवेदन आणि इतर अनेक आवश्यक दस्त तयार करण्यात मदत व्हावी म्हणून, आम्ही मागे वसंतातच न्यूयॉर्क टाईम्सकरता विज्ञान वार्ताहर म्हणून काम करणार्‍या विल्यम एल. लॉरेन्स ह्यांची सेवा सुनिश्चित करून घेतली होती. प्रकल्पातच सशक्त वृत्तपत्रीय पार्श्वभूमी असलेल्या अनेक समर्थ व्यक्ती होत्या, तरी त्यांना आधीच पुरेसे काम हातात होते. त्यामुळे आम्हाला असे वाटले की, कुठल्याही परिस्थितीत एखादी बाहेरची वृत्तपत्रीय व्यक्ती आणल्यास ती अधिक वस्तुनिष्ठ राहू शकेल. आमचा पहिला विचार प्रसिद्धिपूर्वतपास (सेन्सॉर) कार्यालयातील जॅक लॉकहार्ट ह्यांना आणण्याचा होता. लॉकहार्ट ह्यांना असे वाटले की, त्यांच्या वर्तमान कामातून त्यांना मोकळीक मिळणे शक्य होणार नाही. म्हणून त्यांनी सुचवले की, वैज्ञानिक वार्तांकनाची चांगली पार्श्वभूमी असलेल्या कुणाला तरी ह्याकरता मिळवावे. ह्या कामाकरता सर्वात उत्तम व्यक्ती म्हणून त्यांनी लॉरेन्स ह्यांचीच शिफारस केली होती.

 

आम्हाला लॉरेन्स ह्यांच्याबद्दल आधीच बरीचशी माहिती होती. १९४० मध्ये सॅटर्डे इव्हिनिंग पोस्ट मध्ये प्रकाशित झालेल्या अणुऊर्जेच्या संभावनेवरील त्यांच्या लेखांनी आमच्यांत लक्षणीय स्वारस्य जागवले होते. वस्तुतः १९४३ च्या सुरूवातीस आम्हीच पोस्टला सांगितले होते की, ह्या विशिष्ट जुन्या अंकाकरता मागणी नोंदवली गेल्यास आम्हाला कळवावे आणि आमच्याकडून सूचना मिळाल्याखेरीज तो पाठवण्यात विलंब करावा. प्रत्यक्षात, अशी कुठलीच मागणी कधीही आली नाही.

 

वैज्ञानिक लेखक म्हणून लॉरेन्स ह्यांची उत्तम ख्याती होती. शिवाय काळजीपूर्वक विचार करून आणि त्यांच्या पार्श्वभूमीबाबत जाणता येईल ते सर्व जाणून घेतल्यावरच मी न्यूयॉर्क टाईम्सचे व्यवस्थापकीय संपादक एड्विन एल. जेम्स ह्यांची भेट निश्चित केलेली होती. आमच्या संवादांत आवश्यकता पडल्यास त्याकरता, मी त्यांना लॉरेन्स ह्यांना उपलब्ध करून देण्याची विनंती केली.

 

ठरलेल्या दुपारी मी जेम्स ह्यांच्या कार्यालयात गेलो, सोबत माझ्या कार्यालयातील मेजर डब्ल्यू.ए.कॉन्सोडाईन हे अनुभवी वकीलही होते. ते गुप्तवार्तांकन, प्रतिगुप्तवार्तांकनाबाबतचे व्यवहार सांभाळत असत. अनेक वर्षे ते व्यावसायिक पत्रकारही होते. प्रकल्पाचे स्वरूप जाहीर न करता, मी म्हणालो की, हे अत्यंत महत्त्वाचे आहे की, आम्हाला काही महिन्यांकरता एक वृत्तपत्रीय लेखक हवा आहे. आम्हाला लॉरेन्स हवे आहेत आणि ते आमच्याकडे कार्यरत असतांना त्यांनी केलेल्या कामाप्रित्यर्थ टाईम्सला कोणत्याही प्रकारचे हक्क मिळणार नाहीत. कॉन्सोडाईन ह्यांनी अशीही भर घातली की, त्यांचे नाव तुम्ही शीर्षकाखाली घालू शकाल मात्र त्यांचे तेच लेख सर्वच वृत्तमाध्यमांना दिले जातील. त्या लेखाचे श्रेय मात्र त्यांचे वा टाईम्सचे असणार नाही. आम्ही जेम्स ह्यांना त्यांचे लॉरेन्स ह्यांच्याबद्दलचे परखड मत विचारले. लॉरेन्स ह्यांची पार्श्वभूमी तपासल्यानंतर आमचे जे मत झाले होते त्याचीच ह्यामुळे पुष्टी झाली. स्वतः लॉरेन्स ह्यांच्यासोबत काही मिनिटे बोलल्यावर, आमची आजवरची सर्वाधिक खात्री झाली की, आम्हाला हवी असलेली व्यक्ती हीच आहे.

 

व्यवस्थेची चर्चा करतांना सुरक्षेच्या कारणासाठी हे आवश्यक आणि त्यांच्या मालकांच्या दृष्टीने सोपेही ठरले की, लॉरेन्स ह्यांनी न्यूयॉर्क टाईम्सच्याच वेतनपत्रावर राहावे, मात्र तो खर्च मॅनहटन अभियांत्रिकी जिल्ह्याने उचलावा. मी जेम्स ह्यांना अशी विनंती केली की त्यांनी होता होईस्तोवर लॉरेन्स ह्यांचे हे काम गुप्तच राखावे, मात्र मी त्यांना कधीही हे विचारले नाही की, टाईम्समधील इतर कोणास ते नेमके कुठे आहेत आणि काय करत आहेत ह्याची माहिती आहे. जेम्स ह्यांनी लॉरेन्स हे विशेष कर्तव्यावर कार्यरत असल्याचे प्रसृत केले. नंतर १ ऑगस्टच्या आसपास त्यांनी न्यूयॉर्क टाईम्समध्ये एक लेख टाकला. त्यावर लंडनच्या वाररेषेची तारीख होती आणि लॉरेन्स ह्यांचे नाव होते. शंका दूर सारण्यासाठी हे उपकारकच होते. आमच्या अपेक्षेनुसार त्यामुळे त्यांच्या पत्नीची भयोत्सुकताही कमी झाली. त्यांच्या पत्नीला असे प्रश्न पडत असत की, ते कुठे आहेत आणि काय करत आहेत ह्याबाबत ते काहीच का सांगू शकत नाही आहेत.

 

आमच्या सर्वसाधारण कामाचे सर्वंकष पुनरीक्षण करून प्रकल्पातील लॉरेन्स ह्यांचे काम सुरू झाले. वॉशिंग्टनमध्ये कार्यक्रमाशी ओळख झाल्यानंतर त्यांनी ओक रीज, हॅनफर्ड आणि लॉस अलामॉसला भेटी दिल्या. लॉस अलामॉसमधील त्यांच्या उपस्थितीने अनेक वैज्ञानिकांत खळबळ माजली. कारण ते त्यांना वृत्तपत्रातील पत्रकार म्हणून ओळखत होते आणि अंतीमतः त्यांच्या येथील कर्तव्याबाबत माहिती समजेपर्यंत, लॉरेन्स ह्यांनी कशा प्रकारे ह्या प्रकल्पात प्रवेश मिळवला असावा ह्या विचाराने ते अस्वस्थ होते. सामान्यतः त्यांचे काम निवेदनांच्या कच्च्या संहिता शक्य तितक्या लवकर लिहिण्याचे होते.

 

अलामागार्डो येथील विस्फोटाचे ते प्रत्यक्ष साक्षीदार होते आणि त्यानंतर थोड्याच काळात त्यांना टिनिअनला पाठवण्यात आलेले होते. मात्र हिरोशिमावरील स्फोटकफेकीच्या वेळी निरीक्षण विमानात समाविष्ट होण्याचे दृष्टीने ते खूपच उशिराने येऊन पोहोचलेले होते. तरीही ते उड्डाणांची तयारी पाहू शकलेले होते. ज्यावेळी नागासाकी मोहिम सुरू झाली, त्यावेळी ते स्फोटकफेक्या विमानासोबतच्या  उपकरणन विमानात निरीक्षक होते. ह्या प्रसंगी त्यांनी ठेवणीतले पत्रकार म्हणून काम केले. त्यांचा अहवाल पाठवला जाण्यापूर्वी सुरक्षेच्या कारणास्तव तपासला जाई एवढीच काय ती त्यावरील मर्यादा होती. ह्या लेखांमुळेच त्यांना त्या वर्षीचे, सर्वोत्तम वृत्तकथेकरताचे पुलित्झर पारितोषिक मिळालेले होते. त्यांना मिळालेले हे पारितोषिक उचितच होते.

 

अलामागार्डो चाचणीपूर्वी, लॉरेन्स ह्यांनी इंटेरिम कमिटीचे[५] मार्गदर्शनाखाली व्हाईट हाऊसचे मुद्रित माध्यमांकरताचे निवेदनही तयार करण्यात आम्हाला मदत केलेली होती. त्या निवेदनास सेक्रेटरी स्टीमसन आणि प्रेसिडेंट दोघांनीही मंजुरी दिलेली होती. निवेदन खूप लांबलचक होते. अणुविस्फोटांची प्रचंड विध्वंसक शक्ती त्यात अधोरेखित केलेली होती. अलामागार्डो चाचणीनंतर त्यात किरकोळ बदल करण्यात आलेले होते.

 

व्हाईट हाऊसच्या मुद्रित माध्यमांकरताच्या निवेदनाव्यतिरिक्त, त्यानंतर लगेचच जारी करण्यात यावयाचे एक निवेदन सेक्रेटरी ऑफ वॉर ह्यांचेकरताही तयार करण्यात आलेले होते. प्रकल्पाच्या इतर काही तपशीलांबाबतची निवेदनेही, देशातील कळीच्या ठिकाणांवर तयारच होती. अर्थातच ती सर्वात कडक नियंत्रणात ठेवलेली होती. ह्या विस्तृत वितरणामागचा उद्देश, ज्या ज्या ठिकाणी आमचे काम होत होते त्या ठिकाणांवर त्यांचे विमोचन शक्य व्हावे हाच होता.

 

दुर्दैवाने, ६ ऑगस्टच्या सकाळपर्यंत आम्हाला हिरोशिमाच्या हानीचा कुठलाच अहवाल प्राप्त झालेला नव्हता. आमच्यापाशी केवळ पार्सन्स ह्यांचा स्फोटकाच्या दिसलेल्या शक्तीबाबतचा एक अंदाज होता. निरीक्षक विमानांतील उपकरणांतून प्राप्त झालेल्या माहितीहून तो वेगळा नसावा असे अनुमान होते. त्याशिवाय फर्रेल ह्यांनी दिलेला विमान पथकांच्या चौकशीचा सारांश होता. विस्फोटाच्या बलाविषयी आणि उंचीबाबत आम्हाला बरीच खात्री होती. मात्र तेवढेच होते. मागे वळून पाहता आज हे सारे सोपे वाटते, मात्र त्यावेळी ते तसे नव्हते. मला हे सर्वात महत्त्वाचे वाटले की, घोषणा व्हावी. लक्ष्याच्या प्रचंड हानीतील प्रभावीपणा घोषणेत असेल असे पूर्वानुमान होते. अशा सूचना होत्या की, घोषणेस विलंब करावा. अशाही सूचना होत्या की, घोषणा सौम्य करावी. अशा सूचनाही होत्या की, मी फर्रेल ह्यांच्याकडून टिनिअनवर आणखी माहिती घ्यावी. असंख्य सूचना होत्या. ह्या सूचना काही जनरल मार्शल ह्यांच्याकडून आलेल्या नव्हत्या. सेक्रेटरी ऑफ वॉर ह्यांच्या कार्यालयातील निरनिराळ्या लोकांकडून त्या आलेल्या होत्या.

 

ज्यांच्या चाणाक्षपणाबाबत मला सर्वोच्च आदर आहे असे मिस्टर रॉबर्ट ए. लॉवेट्ट ह्यांनी आमचा दावा सौम्य करण्याची सूचना केलेली होती. त्याकरता त्यांनी एक अत्यंत पटण्यासारखे विधान केलेले होते. वायूदलाने (त्यावेळी ते वायूदलाकरता असिस्टंट सेक्रेटरी ऑफ वॉर होते) बर्लीनच्या संपूर्ण विध्वंसाचा दावा वारंवार केलेला होता. त्यांनी अशी भर घातली की, “पुनरावृत्ती तिसर्‍यांदा केल्यानंतर फार अवघडल्यासारखे होते”.

 

मिस्टर लॉवेट्ट ह्यांच्या अनुभवाची कोणतीही पुनरावृत्ती टाळण्यासाठी, मी वॉशिंग्टन येथून गुआममधील लेमे ह्यांच्याशी फोनवर आणि टिनिअन येथील फर्रेल ह्यांच्याशी रेडिओ टेलेफोनवर परिस्थितीविषयी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र मला लवकरच समजले की, लेमे ह्यांच्याशी संपर्क होईपर्यंत, निवेदनात फेरफार करण्याचे दृष्टीने खूपच उशीर होऊन गेलेला असेल.

 

मला त्यावेळी हे लक्षात आले की, जर काही बदल करायचे असतील तर ते जलदीने करायला हवे होते. मला त्यांबाबत पुष्टी मिळण्यापूर्वीच करायला हवे होते. पाने पुन्हा चक्रमुद्रित करून परिपूर्ण केलेली घोषणा व्हाईट हाऊसला द्यायला हवी होती. ह्याकरता किमान एक तास तरी लागणार होता. मी अंतीमतः पहिल्या परिच्छेदात एक किरकोळ बदल केला. ज्यामुळे ह्या वृत्ताच्या जपानवरील आघातात फारशी कमी येणार नव्हती आणि ज्यामुळे जर स्फोटकाचा अपेक्षित विध्वंसक परिणाम साधला गेलेला नसेल, तर आमच्याकरता एक पळवाटही शिल्लक राहणार होती. माझी मुख्य चिंता अव्वाच्यासव्वा दावा होऊ नये ही होती, ज्यामुळे घोषणेचा जपानवरील आघात अशक्त झाला असता. दरम्यानच्या काळात टेलेकॉनवर फर्रेल ह्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी मी हर प्रयास वळवत होतो.

 

वॉशिंग्टनः संबंधित अधिकार्‍याने टेलेटाईपवर यावे आणि आम्हाला त्याचे नाव विदित करावे. आमच्यापाशी अत्यंत निकडीचा संदेश आहे, ज्यास सेक्रेटरी ऑफ वॉर ह्यांचेकडून सर्वोच्च प्राधान्य प्राप्त झालेले आहे....

 

तुमचे अधिकारी आलेले आहेत काय?

 

सूचना-१: टिनिअनसोबत संपर्काची व्यवस्था ताबडतोब सिद्ध करा आणि तयार राहा.

सूचना-२: सेक्रेटरी ऑफ वॉर ह्यांचेशी चर्चा करण्यासाठी जनरल मॅक्कार्थी ह्यांना ताबडतोब टेलेटाईपवर आणा. ते बेटावर नसतील तर अनुक्रमे, जनरल गाईल्स किंवा जनरल ट्विनिंग किंवा जनरल स्पात्झ ह्यांना टेलेटाईपवर आणा. अत्यंत निकडीचे. कृपया पोच द्या.

सूचना-३: कोण अधिकारी येत आहेत आणि त्यांना तिथे पोहोचण्यास किती वेळ लागेल ते आम्हाला ताबडतोब कळवा.

 

गुआमः कृपया मिनिटभर थांबा. आम्ही हे स्वीकारू शकतो की नाही ते तपासतो आहोत.

वॉशिंग्टनः ह्या सर्किटला आता सर्वोच्च प्राधान्य आहे इतर कोणतेही संदेशवहन स्वीकारले जाणार नाही. अपवाद केवळ सेक्रेटरी ऑफ वॉर ह्यांच्या हुकूमाचा असेल.

गुआमः ठीक आहे.

 

वॉशिंग्टनः

सूचना-४: टिनिअनबाबत ब्रिगेडिअर जनरल टी.एफ.फर्रेल ह्यांच्याशी संपर्क साधा आणि त्यांना टेलेटाईपपाशी येण्यास आणि उपलब्ध राहण्यास सांगा. सेक्रेटरी ऑफ वॉर ह्यांच्या विनंतीवरून.

 

कार्यवाही दरम्यान फर्रेल अनेक तास जागेच होते. प्रथम स्फोटकाच्या जुळणीकरता, विमानाच्या रवानगीकरता सुमारे चोवीस तास आणि नंतर विमानोड्डाणाच्या संपूर्ण काळात तसेच ते परतल्यावरही अनेक तास पर्यंत ते जागेच होते. जेव्हा अंतीमतः ते विश्रांतीकरता गेले, ते ठिकाण बेटाच्या दुसर्‍या टोकाला होते. संपर्क केंद्रापासून दूर. त्यांच्यापर्यंत सहजी पोहोचणे अवघड होते. एवढे प्रचंड थकलेले असूनही, आणि वैद्यकीय अधिकार्‍याने त्यांना झोपेकरता गोळ्या दिलेल्या असूनही, जेव्हा आम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकलो तेव्हा, फर्रेल समयास अशा प्रकारे उभे राहिले की, सर्वात तरूण माणसालाही हेवा वाटेल.

 

अंतीमतः दहा वाजण्याच्या सुमारास मला एक चांगली बातमी मिळाली.

“जनरल लेमे आता उपस्थित आहेत.”

वॉशिंग्टनमध्ये उपस्थित                                                                      गुआममध्ये उपस्थित

जनरल लेस्ली ग्रुव्हज                                                                          जनरल कर्टीस लेमे

 

ग्रुव्हजः इथे ताबडतोब वृत्तसंस्थांकरता घोषणा करणे महत्त्वाचे आहे. आज सकाळी मला फर्रेल ह्यांच्याकडून जो संदेश मिळाला, त्यातील विमानांतून मिळालेल्या माहितीची काही पुष्टी झाली का? तुम्हाला तो संदेश मिळाला आहे काय?

 

लेमेः मला फर्रेल ह्यांचा संदेश माहीत नाही[६].

ग्रुव्हजः आपण अनुमान करू शकतो काय?

 

लेमेः के-२० प्रकाशचित्रकाने हल्लाकारक विमानाच्या टेल गनर पोझिशनमधून काढलेले प्रकाशचित्रच केवळ आपल्यास उपलब्ध आहे, जे विमान पथकांच्या अहवालांची पुष्टी करू शकते. सुमारे तीन मैल व्यासाचे लक्ष्यक्षेत्र काळसर धुळीसारख्या धुराने झाकोळलेले आहे. केंद्रात निमुळता होत जाणारा हा धूर पांढर्‍या धुराच्या आळंबीचे स्वरूप धरत आहे. तो सुमारे २७,००० फुटांपर्यंत उंच उठला आहे. हे चित्र हल्ल्यानंतर अदमासे तीन मिनिटांनी काढलेले आहे. त्यात लक्ष्य धुराने पूर्णतः झाकोळलेले दिसते. दाट पांढर्‍या धुराचा स्तंभ सुमारे ३०,००० फुटांपर्यंत उंच चढलेला आहे. काहीसा कमी संहतीचा धूर ४०,००० फुटांपर्यंत उंच चढलेला आहे. चार तासांनंतर आलेले एफ-१३ अजूनही धुराचा स्तंभ तिथेच असल्याचा अहवाल देते. अप्रत्यक्ष प्रकाशचित्रे आहेत. मात्र त्यातून तपशीलाची अपेक्षा करू नका. ह्या प्रकाशचित्रांबाबतचा अहवाल दोन तासातच मिळणार आहे. तुम्हाला हीच माहिती हवी होती का?

 

ग्रुव्हजः सामान्यतः हो. लक्ष्यावरती एफ-१३ च्या भेटीच्या परिणामांबाबत काही अंदाज आहे का? क्षेत्र आणि हानीचा अदमास की धुरामुळे त्यांना काही अदमास घेणे शक्यच झालेले नाही? ढगांची परिस्थिती प्रकाशचित्रणास समाधानकारक आहे का?

 

लेमेः नाही. कोणतेही प्रकाशचित्र काहीही दाखवू शकणार नाही. प्रकाशचित्रे अप्रत्यक्षाचीच आहेत. कारण त्यांना लक्ष्यावर ढगातून वा धुरातून न उडण्याच्या सूचना दिलेल्या होत्या. एफ-१३ ने स्फोटकफेकीनंतर चार तासांनीही स्तंभ अजूनही तिथेच असल्याचा अहवाल दिलेला आहे.

 

ग्रुव्हजः धुराच्या स्तंभाच्या दृष्टीने प्रकाशचित्रे केव्हा काढण्यात येतील ह्याबाबत फर्रेल ह्यांना काही कल्पना आहे का? लक्ष्यक्षेत्रालगतच्या भागावरून हा स्तंभ तासा दोन तासात नाहीसा होईल असा मी विचार करायला हवा होता.

 

लेमेः स्फोटकफेकीनंतर चार तासांनी एफ-१३ क्रूने गोदीच्या भागात ढगांच्या कडांवर अनेक आगी लागलेल्या पाहिल्या. धुराच्या ढगाच्या गडदतेमुळे त्यांचे परिमाण निर्धारित करता आले नाही.

 

ग्रुव्हजः तुम्ही फर्रेल ह्यांना रिले सेटपवरून हे विचारू शकाल का की, अमेरिकेतल्या लोकांकरता विनाविलंब माहिती विमोचित न करण्यास काही कारण आहे का?

 

लेमेः जनरल फर्रेल ह्यांना, हिरोशिमा हल्ल्याबाबतची माहिती अमेरिकेतल्या लोकांकरता विनाविलंब विमोचित न करण्यास काहीच कारण दिसत नाही. ते ही माहिती लगेचच विमोचित करावी अशी जोरदार शिफारस करतात.

 

ग्रुव्हजः कृपया तुम्ही माझ्याकडूनचे अभिनंदन आणि प्रशंसा तिथल्या माझ्या आणि तुमच्या सर्व लोकांपर्यंत पोहोचवाल का? व्यक्तीशः तुम्हाला माझ्या हार्दिक शुभेच्छा!

 

ते शहर उध्वस्त झालेले होते, ह्याची पुष्टी जरी ही माहिती करत नव्हती, तरी ह्या माझ्या अनुमानास ती छेदही देत नव्हती. निवेदन करण्याचा माझा मूळ निर्णय बदलावा ह्याकरता मला कुठलेच कारण दिसत नव्हते. त्यामुळे जरी अजूनही वेळ उपलब्ध होता तरी, ते थांबवण्याकरता मी कोणतीच पावले उचलली नाहीत.

 

मागे वळून पाहता, मला वाटते की, मी जनरल मार्शल ह्यांच्यासोबत किंवा निदान अर्नॉल्ड अथवा हल ह्यांच्याशी त्यांच्या सल्ल्याकरता, चर्चा करायला हवी होती. त्यावेळी मात्र, माझ्या जबाबदारीवर मी निर्णय का घेऊ नये ह्याकरता मला कोणतेच कारण दिसले नाही. हे खरे आहे की, निवेदनास प्रेसिडेंट ट्रुमन ह्यांनी आधीच मंजुरी दिलेली होती, पण असे समजणेच वाजवी ठरेल की, आम्हाला हानीची निश्चित स्वरूपाची माहिती मिळेल ह्या गृहितकावरच हे केले गेले होते.

 

व्हाईट हाऊसमध्ये त्या सकाळी सगळेच काहीसे मरगळलेले होते. वृत्तमाध्यमांना अशी माहिती देण्यात आलेली होती की, प्रेसिडेंट अकरा वाजता एक महत्त्वाची घोषणा करणार आहेत. व्हाईट हाऊसच्या वार्ताहरांना अशा प्रकारच्या सूचनांची सवय होती. ह्या विशिष्ट सूचनेनेही फारसे स्वारस्य जागे केले नाही. अनेकांनी स्वतः जाण्याची तसदी घेतली नाही. मदतनीसांना पाठवले. मात्र जेव्हा प्रेसिडेंटच्या प्रेस सेक्रेटरींनी उभे राहून पहिली काही वाक्ये वाचली तेव्हा सर्वच बदलले. “वीस हजार टन टी.एन.टी.” हे शब्द त्यांच्या तोंडातून बाहेर येताच निवेदनाकरता वार्ताहरांची प्रचंड गर्दी उसळली. बाहेर पडतांनाच्या खोलीत टेबलावर निवेदने ठेवलेली होती. नंतर फोनांवर गर्दी उसळली आणि नंतर त्यांच्या त्यांच्या कार्यालयांतून.

 

इतर प्रत्येकाप्रमाणेच वृत्तपत्रीय जगही चकीत झालेले होते. शैक्षणिक सुट्ट्यांच्या काळात हे वृत्त आल्याने अनेक वैज्ञानिक वार्ताहर दूरच होते. त्यांना ताबडतोब बोलावून घेण्यात आले. घटनेच्या आघाताचे जसजसे पूर्ण आकलन होत गेले तसतसे, बहुतेक वृत्तपत्रांनी आमचे निवेदन पूर्णपणे छापले. सरकारी निवेदने एवढी सर्वसामान्य झालेली आहेत की, असे पूर्णपणे छापणे क्वचितच केले जाते. ज्या काही वेळेस असे केले जाते त्यातीलच ही वेळ होती.

 

 



[१] टिनिअनची वेळ (५ ऑगस्ट, ११४५ वाजता, वॉशिंग्टनची वेळ).

[२] हे दट्टे स्फोटकास सज्ज करत असत, ज्यामुळे मुक्त होताच तो पेटत असे.

[३] ग्रीनविच वेळ (वॉशिंग्टन वेळेनुसार संध्याकाळी ६:१५).

[४] ग्रीनविच वेळ

[५] इंटेरिम कमिटीत प्रेसिडेंट ट्रुमन ह्यांनी, सेक्रेटरी स्टीमसन ह्यांनी १९४५ च्या वसंतात केलेल्या शिफारशीवरून, नियुक्त केलेले नऊ नागरिक होते. त्यांनी आवश्यक त्या युद्धोत्तर कायद्यांचा मसुदा तयार करायचा होता. व्हाईट हाऊसचे मुद्रित वृत्त-माध्यमांकरताचे निवेदनही तयार करायचे होते, आणि सामान्यतः अमेरिकेच्या भविष्यातील अणुऊर्जेच्या हाताळणीकरता उचलावयाची पावलेही सुचवायची होती.

[६]  लेमे ह्यांची सवयच होती. ते कोणतीही तीव्र प्रतिक्रिया देत नसत. ते तशी देऊही शकत होते. वॉशिंग्टनला पाठवण्यात आलेल्या माहितीबाबत त्यांना अंधारात ठेवल्याखातर ते तीव्र प्रतिक्रिया देऊही शकत होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: