काटकसर, पुनर्वापर, आणि पुनर्चक्रण हा भारतीय राहणीचा परंपरागत साचाच राहिलेला आहे. हे मूल्य आपल्याला काही नव्याने शिकावे, शिकवावे लागणार नाही. मात्र जागतिक पार्श्वभूमीवर, विशेषतः ’वापरा आणि फेकून द्या’ ह्या अमेरिकन नितीमत्तेवर चालणार्यांना; ह्या मूल्याचा नव्यानेच शोध लागल्यामुळे ते आपल्याला ’काटकसर करा (रिड्यूस), पुनर्वापर करा (रियूज) आणि पुनर्चक्रण करा (रिसायकल)’ चे तत्त्वज्ञान समजावू लागलेले आहेत.
झाड वठले तर त्याचे बुंधे, फांद्या इत्यादींच्या वापराने आपली घरे तयार होत असत. घर जुने होऊन मोडकळीस आले तर, त्याच्या लाकूड फाट्यांपासून शेतीचे औत, नांगर, बैठकीचे सामान इत्यादी तयार होत असे. तेही मोडत तेव्हा त्याची घडवंची, तिवई, खाटा, बाजा इत्यादी लहान सहान सामानांत त्यांची आपोआपच वाटणी होऊन जात असे. त्यांचा अस्त होताच विटी-दांडू, भोवरे, लहान-सहान काष्ठमूर्ती, रिंगणी इत्यादी बारक्या खेळण्यांचा; त्यांच्या लाकडावर हक्क पोहोचत असे. तीही मोडून निरूपयोगी होताच त्यांचा होळीत निकाल लागत असे.आपली वस्त्रे मुळातच लुगडी, लुंग्या, साड्या, धोतरे, उपरणी, फेटे, पागोटी, पंचे अशा प्रकारची बहु-उपयोगी सरळसोट प्रावरणे असत. कमरेचे सोडून डोक्याला बांधता येई. डोईचे सोडून आंघोळीकरता पंचा म्हणून वापरता येई. दिवसा उन्हापासून संरक्षण करणारे वस्त्रच, रात्री उशास सहजच घेता येई. उगाच का गांधीजींनी कमरेस एक आणि अंगावर एक, अशा दोन वस्त्रांतच स्वतःला झाकून, अस्सल भारतीय पेहेरावाचे जन्मभर प्रतिनिधित्व पत्करले. बहु-उपयोगी वस्त्रांमुळे काटकसर आपोआपच साधली जात असते. पुनर्वापराला अनंत पर्याय असतात आणि पुनर्चक्रणाचे मार्ग शोधतच तर आपली संस्कृती संपन्न झाली आहे. उदाहरणार्थः धोतर फाटले की तुकडे करून पंचे. पंचे फाटले की त्याची हातपुसणी. हातपुसणी जीर्ण होताच त्यांची पायपुसणी. अशा पुनर्वापरांचे संस्कार आपल्यावर लहानपणापासून होतच असतात.
ते काहीही असो. मात्र, काटकसर, पुनर्वापर आणि पुनर्चक्रण ह्यामुळे आपले राहणीमान समृद्ध होत जाते. अल्पसंतुष्ट होत जाते. स्वावलंबी होत जाते. ह्यात मुळीच संशय नाही. ह्यालाच ते लोक मग ’ग्रीन’ म्हणतात. ’पर्यावरणस्नेही’ म्हणतात. हजारो वर्षांपासून आपण मात्र तसेच तर आहोत की!
दगडी कोळसा, जंगली लाकूड, लाकडी कोळसा, मातीचे तेल, नैसर्गिक वायू इत्यादी ऊर्जेचे परंपरागत स्त्रोत जेव्हा वाढत्या लोकसंख्येच्या गरजांना अपुरे पडू लागणार असे स्पष्ट दिसू लागले, तेव्हा अखिल मानवजात जागी झाली. सौरऊर्जा, समीरऊर्जा, लहरऊर्जा, सूर्यप्रकाश इत्यादींपासून वीजनिर्मितीचे मग वेध लागू लागले. त्यातही जलविद्युत, सौरविद्युत इत्यादी पुनर्नवीनीक्षम स्त्रोतांवर लक्ष केंद्रित होऊ लागले. गायीच्या शेणात गवत, पालापाचोळा, काडीकचरा मिसळून तयार होणार्या गोवर्या; पापड, कुरडया, पापड्या, सुकवलेल्या भाज्या, आंब्या-फणसांची साठी, अन्नधान्ये इत्यादींतून ऊर्जाबचतीचे असंख्य उपाय आपल्या जनजीवनात घट्ट बांधणार्या आपल्या संस्कृतीचे; अशा परिस्थितीत मला अधिकच कौतूक वाटू लागले. पुनर्नवीकरण हे मूल्य आपल्यासाठी नवे नाही. ते सहज पुरवणारी सौर ऊर्जा आपल्याकडे विपूल आहे. जगभर आज पुनर्नवीकरणाचा बोलबाला होत आहे. म्हणून मग आपल्या संस्कृतीस जगाचे नेतृत्व करण्याची संधी अनायासेच चालून आलेली आहे. परंपरागत प्रथांतून आपण जे शिकलो त्याला जागतिक बाजारपेठेत वाढते मूल्य प्राप्त होतांना दिसत आहे. आपणही काळाची ही पावले ओळखून आपल्या पद्धतींचे जागतिकीकरण कसे करता येईल, त्यापासून आपल्याला कसे लाभान्वित होता येईल ह्याचा सतत शोध घेत राहिले पाहिजे.
सौर शुष्कक (ड्रायर) वापरून आंबे-फणसांची साठी, बोरांचे बोरकूट, आमचूरपूड इत्यादी व्यवसायांना ह्यापूर्वीच सुरूवात झालेली आहे. शेणाच्या गोवर्यांचे नवे अवतार घेऊन, डॉ.प्रियदर्शिनी कर्वे ह्यांनी ’अप्रोप्रिएट रूरल टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट (आर्ती)’ची स्थापना केली आहे [१]. ग्रामीण भागांसाठी धूरविहीन चूल शोधून लोकप्रिय केली आहे.
पाणी अडवा, पाणी जिरवा; जलयुक्त शिवार; शेततळी; पाणलोटक्षेत्र विकास; जलपुनर्भरणपद्धतींचा विकास; इत्यादी योजनांद्वारे आपण जलपुनर्भरणाचे काम चांगलेच मनावर घेतलेले आहे. नैसर्गिक जलचक्राद्वारे आपल्यास दरसाल नव्याने उपलब्ध होणार्या पाणी साठ्यास, समुद्रात जाण्यापासून रोखता आले, तर त्यातील केवळ काही टक्के पाणीसुद्धा आपल्यासाठी पुरे पडणार आहे. सर्व योजनांच्या पर्यवसायी परिणामांमुळे, भूमीगत जलपातळीत लक्षणीय वाढ होईल, तोच सुदिन ठरणार आहे. लवकरच आपण त्या उद्दिष्टाप्रत पोहोचणे आवश्यक आहे, हे सर्वजनांना अंतरातून पटावे ह्याकरताच ह्या माहितीचा प्रसार होणे गरजेचे आहे.
उष्णता सहजी उपलब्ध असते. वीज मात्र उष्णतेपासून अत्यंत खर्चिक उपायांनी तयार केली जाते. १००% उष्णता वापरावी तेव्हा जेमतेम केवळ ३०% वीज हाती लागत असते. तेव्हा विजेपासून उष्णता मिळवण्याचे सर्व प्रकार जसे की; इस्त्री, पाण्याचे विद्युततापक (गीझर), सुकलेल्या पूडी निर्माण करण्यासाठी वापरले जाणारे शुष्कक इत्यादीं ऐवजी; उष्णतेवर चालणारी इस्त्री, सौर जल-तापक, सौरशुष्कक ह्यांचा वापर केल्यास ७०% उष्णतेची बचत होऊन, एकूण ऊर्जा मागणीतच ७०% घट घडवून आणता येते. स्वयंपाकाचा वायू, नैसर्गिक वायू इत्यादी खर्चिक इंधनांऐवजी; जैववायूसंयंत्रे (बायोगॅस प्लँटस), सौर पक्वक (कुकर) इत्यादींचा वापर केल्यास स्वस्त, किंबहुना जवळपास मोफतच हे साधले जाऊ शकते. नैसर्गिक वायूचा उपयोग मग स्वयंचलित वाहनांसाठी करता येऊन; पेट्रोल, डिझेल आदी खर्चिक इंधनांच्या आयातीचा देशावरील भार हलका होऊ शकतो.
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाने विजेचा भार सुसह्य करण्याकरता भार-नियमन करण्याचे धोरण पत्करले. नियमन करत असतांना ज्या भागास वीजपुरवठा बंद केला जात असे त्या भागातील लोक मग उभयदिक्कारक (इन्व्हर्टर) वापरू लागले. उभयदिक्कारकाची कार्यक्षमता केवळ ५०% च्या आसपासच असते. म्हणजे नियमन-काळातील तुमची मागणी जर ’क्ष’ असेल तर, वीज-पुरवठा-काळातील मागणी मग ’२क्ष’ होते. त्यामुळे वीजपुरवठा पूर्ववत झाल्यावर उभयदिक्कारकाच्या विजेरीच्या पुनर्भरणाचे काम सुरू होते. तेव्हा प्रत्यक्षातील मागणीच्या दुप्पट वीज वापरली जाते. अशा रीतीने मग एकूण मागणीतच दुप्पटीची वाढ नोंदवली जाते. केवळ सगळेच काही उभयदिक्कारक वापरत नाहीत म्हणूनच एकूण मागणी दुप्पट होत नाही. ह्याऐवजी मागेल त्याला, मागेल तेव्हा, मागेल तेवढी वीज पुरवण्याचे धोरण पत्करले; तर मागणीची नोंद कमी होऊन, आहे त्याच वीजनिर्मितीत समाधान होणे संभव होते. ह्यास पूरक म्हणून मंडळाने मग खासगीरीत्या सर्व प्रकारच्या पुनर्नवीनीक्षम वीजनिर्मितीस प्रोत्साहन देऊन, निर्माण होणारी वीज विकत घेण्याचे धोरण ठेवावे. जी भांडवली गुंतवणूक शासनास भारी पडते, तीच भांडवली गुंतवणूक खासगीत करू शकणारे लोकही आहेत, ज्यांच्या योगाने पुनर्नवीनीकरणाचे नवे पर्व मग उदयास येईल.
सृष्टीवरील चराचरांची अद्ययावत माहिती आपल्याला असेल तर आपण तिचा पुरेपूर वापर आपल्या फायद्याकरता करून घेऊ शकतो. ह्याचे अगदी चमकदार उदाहरण पाकव्याप्त काश्मिरातील शल्यक्रियात्मक हल्ल्यांचे (सर्जिकल स्ट्राईक्सचे) आहे. भारताचे अवकाशात भूस्थिर असलेले उपग्रह जमिनीवरील आपल्या उपखंडातील ०.६५ मीटर आकारमानाच्या कुठल्याही वस्तूचे १ मिनिटभराचे चलचित्र काढू शकतात, तत्काळ आपल्याला ते पुरवू शकतात, त्याला रात्रही आड येत नाही आणि ढगही अडथळा करू शकत नाहीत [२]. त्यामुळे आपल्या सैनिकांना शत्रुच्या सर्व हालचालींची खडान् खडा माहिती, क्षणोक्षणी मिळत राहू शकते. माहितीच्या ह्या पुनर्नवीकरण क्षमतेचा धारदार प्रयोग पाकव्याप्त काश्मिरातील शल्यक्रियात्मक हल्ल्यांत केला गेला. तो किती नेमक्या प्रभावाने अंमलात आला तेही आपण सगळ्यांनी अनुभवलेच आहे.
पण पुनर्नवीकरणाच्या सृष्टीच्या सामर्थ्याची तर आपण केवळ कल्पनाच करू शकतो. केशवसुतांच्या एका विख्यात कवितेत; त्याच त्या आविष्कारांतून नवीन प्रसन्नता निर्माण करता येण्याच्या सृष्टीच्या अपार सामर्थ्याचे सुंदर वर्णन केले आहे. त्या कवितेचे नाव आहे ’अढळ सौंदर्य’!
अढळ सौन्दर्य (जाति-दिंडी) [३]
तोच उदयाला येत असे
सूर्य, अहो क्षितिजावर त्याच नव्हे काय?
तेच त्याचे कर न का
कुंकुमानें, वदन पूर्वेचें भरति संभ्रमानें ? १
तेच तरु हे तैशाच
पुष्पभारें, लवुनि गेले दिसतात पहा सारे !
त्याच वल्ली तैसेंच
पुष्पहास्य, हसुनि आजहि वेधिती या मनास ! २
कालचे जे कीं तेच आज
पक्षी, कालच्या हो ज्या त्याच आज वृक्षीं
बसुनि गाती कालचीं
तींच गानें, गमे प्रात: प्रार्थना करिति तेणें ! ३
काल जो का आनन्द मला
झाला, तोच आजहि होतसे मन्मनाला;
कालचा जो मी तोच हा
असें का? अशी सहजच उद्भवे मनीं शंका. ४
अशी सहजच उद्भवे मनीं
शंका, काय समजुनि समजलें तुम्हांला का ?
असे अनुभव कीं – रिझवि एकदां जें, पुन्हा बहुधा नच रिझों त्याच चोजें. ५
पुन्हां बहुधा नच
रिझों त्याच चोजें, कसें मगं हें वेधिलें चित्त माझें –
आज फिरुनी या
सूर्यतरुखगांनीं, आपुलीया नवकान्ति-पुष्प गानीं? ६
म्हणुनि कथितों नि:शंक मी तुम्हातें, असे सुन्दरता अढळ जरी कोठें
तरी करी ती सृष्टींत
मात्र वास, पहा, मोहिल सर्वदा ती तुम्हांस. ७
केशवसुत १८८६, 'यथामूल आवृत्ती', १९६७, पृ. ११
म्हणूनच, सृष्टीच्या पुनर्नवीकरणाच्या अपार सामर्थ्याचा आपणही अंगिकार करावा आणि रोजच्याच जीवनात, रोजच्याच घटनांतून, अंतर-स्फूर्तीचे सदैव पुनर्नवीकरण करत रहावे हेच उत्तम! हाच आजच्या युगाचा मौलिक संदेश आहे.
संदर्भः
१.
ऊर्जेच्या शोधात, आत्मचरित्र-डॉ.प्रियदर्शिनी
कर्वे, राजहंस प्रकाशन, २००७, मूल्य रू.१६०/- फक्त, पृष्ठसंख्या-१७०.
२.
इस्रो'ने भारतीय सैनिक आणि युद्धयंत्रणेच्या पाठीशी उभी केली एक
विलक्षण ताकद
(ISRO in service of the Indian soldier,
Indian war machine)
http://economictimes.indiatimes.com/…/articles…/54638711.cms
३.
अढळ सौन्दर्य, केशवसुत,
http://keshavsut.com/kesha/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=14&Itemid=95

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा