प्रवरेचा परिसर
(प्रवरा नदीच्या उगमापासून तर गोदावरी
संगमापर्यंत घेतलेला प्रवराप्रवाहाचा वेध)
प्रवरा नदीचे खोरे हेमहाराष्ट्रातील सर्वाधिक उंचीवर वसलेले, सर्वाधिक जलसमृद्ध पाणलोटक्षेत्र आहे. प्रवरेवरील भंडारदरा धरण समुद्रसपाटीपासून सुमारे ७५० मीटर उंचीवर आहे. त्याच्या सर्व बाजूंनी उंचच उंच पर्वतशिखरे आहेत. महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसूबाई (१,६४६ मीटर), अलंगगड (१,४०० मीटर), कुलंगगड (१,४७० मीटर), मदनगड (१,४९४ मीटर), रतनगड (१,२९७ मीटर) यांनी वेढलेल्या खोर्यात प्रवरा नदी उगम पावते. या क्षेत्रात सरासरी वार्षिक पाऊसमान ३,२२० मिलिमीटर आहे. या प्रचंड पावसामुळे ते पावसाळ्यात नेहमीच भरभरून वाहत असते.
प्रवरा नदीचा उगम रतनगडावर
रत्नादेवीच्या गुहेत होतो असे मानले जाते.सांधणदरीतून साम्रद गावाकडे बाहेर
पडतांना, पाठीमागे दिसणार्या डोंगररांगेतील उजवीकडे सुस्पष्ट रूपरेषेचा किल्ला
रतनगड आहे. रतनगडाच्या उजवीकडे म्हणजे उत्तरबाजुला असलेला सुळका रतनगडाचा
खुटा म्हणून ओळखला जातो. रतनवाडीतील
अमृतेश्वराच्या मंदिरातून प्रवरा नदी उगम पावते असाही एक समज आहे.
अमृतेश्वर मंदिर हेमाडपंती स्थापत्यशैलीचे पुरातन मंदिर आहे. हे अवश्य पाहावे असे मंदिर रतनवाडी गावात आहे [१]. हे गाव अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात आहे. मंदिराच्या आवाराबाहेरच पुष्करणी नावाने ओळखली जाणारी बारव असून तिचे स्थापत्य चौरस आहे. तीन दिशांनी उतरण्याकरता पायर्या आहेत. भोवतीच्या भिंतीत सालंकृत अशी बारा देवकोष्टकांची रचना केलेली. त्यांच्यावर पुन्हा छोटय़ा कोरीव शिखरांची रचना आहे. या कोष्टकांमध्ये गणेशाची एक मूर्ती सोडल्यास, उर्वरित सर्व ठिकाणी विष्णूचे अवतार आहेत. जसे की शेषशायी, माधव आणि इतर. त्यामुळे स्थानिक लोक या पुष्करणीला विष्णूतीर्थ म्हणतात.
अमृतेश्वर मंदिर (१९°३१’३.६७” उत्तर;
७३°४३’२२.९१” पूर्व) हे इसवीसनाच्या बाराव्या वा तेराव्या शतकात बांधलेले आहे.
लांबी ६१ मीटर असून रुंदी ३६ मीटर आहे. अमृतेश्वर मंदिराच्या पश्चिमद्वारावर
कलात्मक मिथुनशिल्पे कोरलेली आहेत. शिखराच्या कमानींत दोन्हीही बाजूंना घडवलेली
नाजूक नेढी विहंगम सौंदर्य वाढवतात. शिखराच्या मध्यावरील देवळीचे भौमितिक सममित
सौंदर्य तर लपतच नाही.स्थापत्य योजनेत मंडप, अंतराळ आणि
गर्भगृह हे मंदिराच्या पश्चिम दिशेस आहेत. तसेच पूर्व दिशेस दरवाजासमोर
द्वारमंडपही आहे. पश्चिममुखी असलेले हे मंदिर शिवाला समर्पित आहे. मंदिराच्या
गर्भगृहातील शिवलिंग जून ते ऑक्टोंबर हे ४महिने पाण्यात असते. नंतर हळूहळू
पाण्याची पातळी कमी होते. मंदिरातील स्थापित शिवलिंग विलक्षण आहे. खडकाच्या पोकळीत
योनी स्थापित केलेली आहे. त्यावर कलशाच्या आकारात तीन दगड एकमेकांवर ठेवलेले आहेत.
मंदिराच्या पूर्वेकडील म्हणजेच मागील दरवाजाकडे तोंड करून पूर्वेला नंदी स्थापित
आहे. मंडपात सच्छिद्र खिडक्या आहेत. मंदिरावरील शिखर सुस्थितीत असून अत्यंत
सुशोभित आहे. मूळ छताचा भंगलेला भाग नंतरच्या काळात वीरगळ, इतर दगड आणि
स्थापत्यकलेतील घटकांनी भरलेला दिसून येतो. शिखराला चार उभी टोके आहेत. ज्यात
लघुशिखर असून सपाट आमलकाने आच्छादित आहेत. हे मंदिर सिन्नर येथील गोंदेश्वर
मंदिरासारखेच असून स्थापत्याच्या दृष्टीने भूमिज प्रकारात मोडते. भिंती भौमितिक
आकृत्यांनी सुशोभित केलेल्या आहेत. चौकोनी पायांवर स्थापित स्तंभ सुबक कोरलेले
आहेत. त्यावर अष्टकोनी घटक असून त्यावर कीचकहस्त आहेत[२]. मंडपाचे छत घुमटाकार
असून त्यावर ठरावीक अंतर सोडून नर्तक व वादकांच्या तिरप्या प्रतिमा आहेत. मंदिराचे
शिखर भूमिज प्रकारचे असून शिखरावर चारही बाजूंनी एक एक अशा चार वेली आहेत. या
मंदिराला ४ मार्च १९०९ रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक घोषित केलेले आहे.
मंदिराच्या
उत्तर आणि दक्षिणेच्या बाजूंना मंदिराच्या सभामंडपास सुमारे मीटरभर उंचीच्या,
एकसंध दगडात भौमितिक फुल्या कोरलेल्या खिडक्या आहेत. एका खिडकीतून आत पाहिले तर
सभामंडपापलीकडील खिडकीतील फुल्यांतून बाहेरचा प्रकाशही दिसू शकतो एवढ्या त्या
एकरेषीय आहेत. जुळवून घेतलेल्या आहेत. एकसारख्या आहेत. या चित्रात डावीकडे खिडकीची
बाहेरील बाजू दिसत आहे तर उजवीकडील भागात आतील बाजू दिसत आहे.
प्रवरा ही नदी महाराष्ट्रातील अहमदनगर
जिल्ह्यात अकोले तालुक्यातील रतनगडापाशी उगम पावून, जिल्ह्यात सुमारे २०८ किलोमीटर
लांबीचा प्रवास करते. पुढे त्याच जिल्ह्यात प्रवरासंगम गावी ती गोदावरीला जाऊन
मिळते. तिला स्वतःलाही मुळा, आढळा, म्हाळुंगी या उपनद्या आहेत. प्रवरानदीच्या किनाऱ्यावर अकोले, संगमनेर, कोल्हार, नेवासा ही
प्रमुख गावे आहेत. तिच्यावर अकोले येथे भंडारदरा हे मोठे धरण आहे.
|
|
भंडारदरा जागेचा, धरणाच्या दृष्टीने शोध १९०३ मध्ये केला गेला. भंडारदरा हे त्याकाळी भारतातील सर्वात उंच धरण म्हणून ओळखले जात असे. धरणाचे बांधकाम १९१० साली सुरू होऊन, धरणाचे लोकार्पण १९२६ साली झाले. धरणाची उंची ५०७ मीटर आहे तर, रुंदी तळाशी ८२.२९ मीटर आहे. त्यामुळे १५.५४ वर्ग कि.मी. क्षेत्रफळाचा पाणीसाठा निर्माण झाला आणि ५७,००० हेक्टर क्षेत्रफळ ओलिताखाली आले. येथील महत्तम विद्युत उत्पादनक्षमता १० मेगावॅटआहे.धरणाचे पाणी नदीपात्रात सोडले असता ते एके ठिकाणी खडकावरून खळखळ वाहत नदीपात्रात झेपावते. त्यावेळी ते दृश्य एखाद्या भव्य छत्रीसारखे दिसते, म्हणून या धबधब्याला ’छत्रीचा धबधबा’ (अंब्रेला फॉल) असे म्हणतात [३]. छत्रीच्या आकाराचे पाणी नदीपात्रात झेपावते तेव्हा पर्यटक भान हरपून ते दृश्य पाहत असतात. धबधब्यातून उडणारे असंख्य तुषार पर्यटकांना चिंब भिजवून टाकतात. पावसाळ्यात अतिरिक्त पाणी जेव्हा सोडले जाते तेव्हा ते पाणी प्रचंड वेगाने वाहत जाते. ते दृश्य नक्कीच अनेक वर्ष डोळ्यांसमोर तरळत राहते. धरणाच्या भिंतीलगतच एक मोठी बाग तयार करण्यात आलेली आहे. येथून ’छत्रीच्याधबधब्या’चा आनंद घेता येतो. तसेच धरणाच्या सर्व मोर्यांमधून सोडले जाणारे पाणी पाहताना वेळ कसा भर्रकन निघून जातो ते कळतच नाही. धरणाच्या पाणीसाठ्यात वर्षभर बोटिंगची सेवा उपलब्ध आहे. धरणाच्या भव्य व अथांग पाण्यातून नौकानयन करण्याचा आनंद काही औरच असतो.
भंडारदरा धरणाच्या पूर्वेला, अकोले
शहराच्या रस्त्यावर सुमारे १८ किलोमीटर अंतरावर, प्रवरा नदीला उंचावरून उडी घ्यावी
लागते. या ठिकाणाला रंधा धबधबा म्हणून ओळखले जाते.पुढे प्रवरेचे पाणी, संगमनेर,
वाघापूर, जोर्वे असा प्रवास केल्यावर ओझर येथेही
निळवंडे धरणात अडविले जाते. या धरणातून निघणाऱ्या डाव्या व
उजव्या कालव्यातून अनुक्रमे संगमनेर व श्रीरामपूर तालुक्यांतील शेतीला पाणी दिले
जाते. तेथील लोकांची जीवनदायी असलेल्या प्रवरा नदीला अमृतवाहिनी असेही म्हटले
जाते. धरणाला अप्पर प्रवरा धरण म्हणूनही ओळखतात.
भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होणार्याप्रचंड पावसामुळे ते पावसाळ्यात नेहमीच भरून वाहत असे. साठवणासाठी आरक्षित सुयोग्य अशा धरणाअभावी पाण्याचा खूपच अपव्यय होत असे. म्हणून या धरणाची योजना करण्यात आली. १९९९ साली त्याचे बांधकाम सुरू झाले. विविध कारणांनी झालेल्या लोकविरोधामुळे आणि विलंबांमुळे धरणाचे काम केवळ २०११ सालीच पूर्ण होऊ शकले. धरणाची उंची ७३.९१ मीटर असून धरणाच्या भिंतीची लांबी ५८३ मीटर आहे. धरणापाठीमागे रतनगडचा खुटा स्पष्ट दिसत आहे.
रतनगडाच्या पायथ्याशी साम्रद गावानजीक
असलेल्या ’सांधणदरी’ मुळे हल्ली पदभ्रामकांत हा परिसर अत्यंत लोकप्रिय होत आहे.
पर्यटनाचे दृष्टीने झपाट्याने विकसित होत आहे.’सांधणदरी’ म्हणजे अरुंद (काही फूट
ते दहा-वीस मीटर), लांबलचक (काही किलोमीटर), उंचच उंच (उदाहरणार्थ १,६०० फूट) अशा, दिवसाही सूर्यप्रकाश तळापर्यंत पोहोचू न शकणार्या दरीचा विश्वचमत्कार आहे.
ही माहिती मलाही काहीफार पूर्वीपासून नव्हती. रानवाटाचा यू-ट्यूबवरचा व्हिडिओ
पाहून बरीचशी कल्पना आली. काहीतरी खरेच अद्भूत आहे ह्याची जाणीव झाली. भंडारदरा ते
अकोले प्रदेशातील जलसमृद्धीने येथल्या लोकांचे जनजीवन खूपच समृद्ध केलेले आहे.
शेतीच्या बहरलेल्या प्रकाशचित्रांनी याची खात्रीच पटेल.
प्रवरा नदीच्या उण्यापुर्या २०० किलोमीटरच्या ऊर्जस्वल जलप्रवाहाभोवती वर्तमान महाराष्ट्रातील सर्वाधिक वेगाने विकसित होणारे पदभ्रमण, गिर्यारोहण, नौकाविहार इत्यादींकरताचे पर्यटनस्थळ विकासमान आहे. त्याची ही तोंडओळख वाचकास तेथे पर्यटनास प्रवृत्त करेल यात मुळीच संशय नाही.
संदर्भः
[१] श्री अमृतेश्वर
मंदिर, रतनवाडी https://www.discovermh.com/amruteshwar-temple-ratanwadi/
[२] भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण,
औरंगाबाद मण्डल, फेब्रुवारी २०२२
[३]
अकोले माझा https://www.akolemaza.com/







कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा