आज माझ्या “नरेंद्र गोळे https://nvgole.blogspot.com/” या अनुदिनीची वाचनसंख्या अडीच लाखांच्या पार झालेली आहे.
इथे मी लिहित असलेले अनुभव जगभरातले लोक वाचत आहेत याचा तो पुरावाच आहे. मग प्रश्न हा उभा राहतो की, कोणते अनुभव? तर भाभा अणुसंशोधनकेंद्रात मी अर्जलेले अनुभव.
१ सप्टेंबर १९७९ रोजी मी भाभा अणुसंशोधन केंद्राच्या ट्रेनिंग स्कूलच्या २३ व्या तुकडीतील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा प्रशिक्षणार्थी वैज्ञानिक अधिकारी म्हणून, ट्रॉम्बे येथील अणुशक्तीनगरातील ट्रेनिंग स्कूल होस्टेलच्या दहाव्या मजल्यावरील ’डी’ क्रमांकाच्या खोलीत दाखल झालो. तेव्हा माझे वय केवळ २२ वर्षांचे होते. योगायोगाची गोष्ट हीही होती की, आमच्या ट्रेनिंग स्कूलचे वयही तितकेच होते. वर्षभर मी आता तिथेच राहणार होतो. तेव्हापासूनच्या गेल्या चाळीस वर्षात मला जे जे अनुभव मिळाले त्यांनी मी खूप समृद्ध झालो. तेव्हाचा मी आणि आताचा मी ह्यात जमीन अस्मानाचे अंतर आहे. त्या रुजू होण्याची आठवण उजागर करण्याकरता, मी मला आठवते आहे तसे माझ्या त्या वेळच्या दिनचर्येचे काही तपशील लिहून काढत आहे. मनोरंजक वाटतील अशी आशा आहे.
होस्टेलची इमारत त्या
काळातील अद्ययावत असली तरी, तेव्हा अटॅच्ड टॉयलेटची प्रथा अजून आलेली नव्हती. एका
मजल्यावरील दहा खोल्यांकरता, कॉरिडॉरच्या सेंट्रल
ऍव्हेन्यूच्या बाजूला सामुदायिक टॉयलेट असे. मात्र तिथे कमोड होते. कमोडचा माझा
अनुभवही तो पहिलाच होता. खोलीत केवळ एक टेबल, एक खुर्ची, एक पलंग, एक कपाट आणि एक सिलींग फॅन असे.
सकाळी साडेपाचला उठून
प्रातर्विधी आटोपणे. मग खिडकीतून सर्वकाळ दिसत असलेल्या फुटबॉलच्या मैदानाभोवती
तासभर धावणे. सात वाजता परतून तयार होणे. साडेआठला नास्ता. पावणे नऊला बसेस दारात
उभ्या राहत. बरोबर नऊ वाजता भारतातील सारे भावी अणुशास्त्रज्ञ प्रशिक्षणार्थ सिद्ध
होऊन त्या दोन बसेसमध्ये स्थानापन्न होत. त्यात अनेक मुलीही होत्या. नऊच्या आतच
ट्रेनिंग स्कूलच्या दारात सगळे पटापट उतरतांना दिसत.
संध्याकाळी पाच वाजता त्याच बसेस मग परत होस्टेलला आणून सोडत असत. स्कूल हे अणुसंशोधन केंद्राच्या दक्षिण टोकाला होते, तर होस्टेल उत्तर दरवाजाबाहेर. त्यामुळे हा सगळा प्रवास अणुसंशोधन केंद्रातूनच आरपार असा होत असे. साडेपाचला ’थापा’च्या (छे! ती काही थापाची टपरी नव्हती. होस्टेलचे ते अधिकृत कँटीन होते. अत्यंत प्रशस्त आणि पंचतारांकित हॉटेललाही लाजवेल असे.) कँटीनमध्ये नास्ता मिळे. दर सोमवारी, परीक्षा झाल्यानंतर, संध्याकाळी वेस्टर्न स्टाईल डिनर असे. ब्रेड, बटर, जेली, जाम, कस्टर्ड आणि जेवणानंतर चहा, कॉफी इत्यादींची ओळखच आम्हाला नव्हती. त्यामुळे त्याचेही अपरूप असे.
मग मोकळे होण्याला थोडासा अवसर मिळे. कुणी खेळायला जात. कुणी फिरायला. गप्पाटप्पा होत. मात्र प्रत्येकालाच अभ्यास करायचा असे. दर सोमवारी कुठल्या ना कुठल्या विषयाची परीक्षा होत असे. निरनिराळे बावीस विषय आम्ही वर्षभर शिकणार होतो. रिऍक्टर केमिस्ट्री, न्युक्लिअर फिजिक्स, पॉवर प्लँट इंजिनिअरिंग, हिट ट्रान्फर, फ्ल्युईड मेकॅनिक्स, इन्स्ट्रुमेंटेशन ही काही नावे वानगीदाखल दिलेली आहेत. त्यामुळे टिवल्या-बावल्या करायला वेळच सापडत नसे. जिथे शिकणे अवघड वाटत होते, त्या ट्रेनिंग स्कूलमध्येच मी पुढील दहा वर्षांच्या आत शिकवू लागणार होतो, हे गुपित मात्र तेव्हा कुणालाच माहीत नव्हते.
मोहनकृष्ण, सुब्रमण्यम यांसारखे मातब्बर शिक्षक आपापले विषय शिकवण्यात अत्यंत निष्णात होते. सराईतपणे, पुस्तकही हाती न धरता मोठमोठाली डेरिव्हेशन्स खडूने फळ्यावर ज्या वेगाने उतरत असत, ती वहीत उतरवून घेतांना हात पार दुखून जात असत. संध्याकाळीच ती आत्मसात करून घ्यावी लागत. टंगळ मंगळ केली तर अभ्यासाची संधी पुन्हा मिळत नसे. बसमधून परततांनाही प्रॅक्टिकल्समध्ये पाहिलेल्या गायगर-मुल्लर काऊंटरची किंवा हीट ट्रान्स्फर कोईफिशंटचीच चर्चा होत असे.
तेव्हा मोबाईल नव्हते. फोनही सहजी उपलब्ध नसत. परक्या गावात फोन करायचा तर पोस्ट ऑफिसात जाऊन ट्रंक कॉल बुक करावा लागे. तेही अणुशक्तीनगरात थोडे दूरच होते. ती अनेक तासांची प्रक्रिया होती. आज पाठवलेले पत्र घरी पोहोचायला किमान आठ दिवस लागत. मग उत्तर येई तेव्हा पंधरवडा उलटून गेलेला असे. रोज संध्याकाळी परतल्यावर सगळ्यांची धाव पत्रपेटीच्या फलकाकडे असे. ज्यांची पत्रे आलेली असत ते खूष होऊन उत्तर लिहिण्याच्या मार्गी लागत. ज्यांची आलेली नसत, ते त्याच संधीचा उपयोग अतिरिक्त अभ्यासाकरता करून घेत. होस्टेलच्या पाठीमागे जी टेकडी आहे ना, ती प्रत्यक्षात खूप दूर आहे. काही किलोमीटर तरी असेल. मात्र आमच्यापाशी तेवढा वेळच नसे. त्यामुळे वर्षभर तिथे राहूनही, मी त्या टेकडीवर अजूनही गेलेलो नाही.
भारतभराचे सुमारे सव्वाशे विद्यार्थी आमचे सहाध्यायी होते. आम्ही मोकळेपणाने परस्परांशी बोलू लागायलाच अनेक आठवडे लागले. त्यात मराठीही मुले आहेत हे कळले. अत्यंत मोडक्या तोडक्या हिंदी आणि इंग्रजीत संभाषणे होत असत. अनोळखी विषय, अनोळखी मित्रांकडून, अनोळखी भाषांत समजावून घेतले जात असत. एकदा तर मजाच झाली. मला जेवणात कांदा हवा होता. मल्याळी वेटरला कसे काय कळेल कांदा म्हटले तर? असे वाटून मी त्याला ’प्याज’ मागू लागलो. नागपूरचा ’प्याज’ मुंबईच्या हिंदी भाषेत अजून दाखलच झालेला नाही. मग काहीच उजेड पडत नाही म्हटल्यावर मी विचार केला की ह्याला इंग्रजी कळत असावे. मी म्हणालो ’ओनियन’ चाहिये! छे! तरीही चेहर्यावर किंचितही ओळखीचे भाव नव्हते. अखेरीस रंजीस येऊन मुझे ये चाहिये म्हणून मी ’कापलेला कांदा’च हाती घेतला. अरे तो फिर कांदा बोलो ना! आता मात्र मी थक्क झालो होतो. इथे जसे कांद्याला कांदा म्हणतात, तसेच दह्यालाही दहीच म्हणतात.
अनुभवांची समृद्धी केवळ तांत्रिक अनुभवांची नव्हती. व्यावहारिक अनुभवांनीही मी समृद्ध होत गेलो. काय काय शिकलो, कसा कसा शिकलो तेही यथावकाश लिहेनच. मात्र आयुष्याने मला जे जे धडे शिकवले ते ते मी अत्यंत गांभीर्याने शिकून घेत राहिलो. शिरोधार्य मानून.
मुळात
“चाळीस वर्षांची अनुभवसंपन्नता” हा लेख मी १ सप्टेंबर २०१९ रोजी मी चर्यापुस्तिकेवर
(फेसबुकवर) लिहिला. त्याला तिथे उदंड प्रतिसादही मिळाला. त्यातील मोजके प्रतिसादही इथे नोंदवून ठेवत आहे.
रणदीप बिसनेः आदरणीय
सर, आपले
व्यक्तिमत्वच आभाळाएवढे उंच आहे. ही उंची गाठायला काय काय पराकाष्ठा करावी लागली हे
जाणून घेणे माझ्यासारख्या शिष्याला सदैव कुतुहलाचा विषय आहे. मी सदैवचा तुमच्या प्रत्यक्ष
पोस्टचे आत्मियतेने वाचन चिंतन करता असतो. पण
आज तर मला जे मिळत आहे जे मी कदाचित भविष्यात जाणून घ्यायला प्रत्यक्ष भेटलोच असतो. सर पुढच्या पोस्टची वाट आतुरतेने
बघत आहे.
Girish Kulkarni: नमस्कार, माझ्याही आठवणींना उजाळा मिळाला. मी १९७३ चा. १७-व्या बॅचचा. 'वृंदावन' मधला. त्यानंतर RCnD, South site मधे. धन्यवाद!
नरेंद्र गोळेः 'वृंदावन' च्या तुलनेत आम्ही खूपच शाही इतमामाने राहिलो म्हणावे लागेल! अनुभवाच्या दृष्टीने मात्र तुम्ही लोक खूपच सुदैवी होतात. सगळ्या ख्यातनाम शास्त्रज्ञांचा प्रत्यक्ष सहवास तुम्हाला लाभला होता.
Dinesh Kudache: भाभा अणुसंशोधन केंद्राबद्दल अधिकाधिक जाणुन घ्यायला आवडेल. पुढील लेखाची वाट पाहतोय सर.
Anand Ponkshe: Excellent Narendra Dom. If you have any doc on nuclear power plant engg please send to me on anponkshe1947@gmail.com . Regards.
नरेंद्र गोळेः You had an outsiders view all through!
Anand Ghare: मी ट्रेनिंग स्कूलमध्ये प्रवेश केला तेंव्हा म्हणजे १९६६ मध्ये आमचे निवासस्थान बांद्ऱ्याच्या बँडस्टँडवरील लष्कराने युद्धकाळात उभारलेल्या निसानहट्स बरॅक्स हे होते. पत्र्याच्या भिंती आणि छप्पर असलेल्या एकेक अर्धगोलाकार झोपडीत सहा विद्यार्थ्यांचे पलंग जेमतेम कोंबून ठेवलेले. अप्रतिम आसमंत आणि अतिशय खत्रुड खोली. त्यामुळे आम्ही दिवसभर शक्यतोवर बाहेरच असायचो. आमचे क्लासेस मरीन लाइन्सवरीस हरचंदराय मँशनमध्ये चालायचे. त्यामुळे आयुष्यात त्यापूर्वी कधी न पाहिलेले हिंदी इंग्रजी सिनेमे पाहून घेतले. भारताच्या जवळजवळ सर्व राज्यांमधून आलेले ट्रेनीज मित्र झाले होते. पहिल्यांदाच आपल्या कमाईचे हक्काचे चार पैसे हातात येत होते. वो भी क्या दिन थे?
Shriniwas Paranjpe: Anand Ghare बॅन्ड स्टॅन्ड बॅरॅक्स मधली आमची, 12-वी, शेवटची बॅच (१९६८). घारेजींनी छान वर्णन केलय जागेच. आमचे. वर्ग मात्र बी ए आर सी त लागायचे. दर आठवड्याला परीक्षा म्हणजे अभ्यास आलाच पण बरोबर खेळ (टे.टे., कॅरम, बुद्धीबळ) चालायचे आणि हो बसचा लांबचा प्रवास मजा होती.
Shriniwas Paranjpe: गेल्या वर्षी आमची बी ए आर सी त पदर्पण झाल्याची सुवर्ण जयंती साजरी झाली.
नरेंद्र गोळेः Shriniwas Paranjpe म्हणजे आपण आमच्या परिवारातील दुर्मिळात दुर्मिळ व्यक्ती आहात! सर, आपले इथे स्वागत असो.
Shriniwas Paranjpe: नरेंद्र गोळे धन्यवाद. घरी येण्याचा आनंदच आहे. पण हे दुर्मिळात दुर्मिळ हे कोणच्या विशिष्ठ कारणास्तव!!
नरेंद्र गोळेः सक्रियतेने मराठी समाजमाध्यमांवर लिहिणारे, अणुऊर्जाखात्यातील कारकीर्दीची सुवर्णजयंती साजरी केलेले लोक दुर्मिळच असायचे ना सर! त्या अर्थाने. मात्र आज आपल्या समाजात उत्तम प्रबोधनही आपल्यापैकी लोकच करू शकतात असा मला विश्वास आहे. आपणही करावे ही विनंती.
Shriniwas Paranjpe: नरेंद्र गोळे गोष्ट खरी आहे. समाज प्रबोधनाची नितांत आवश्यकता, काळाची गरज झालीय. होतील तितके प्रयत्न चालू आहेत. प्रत्यक्षात चर्चा व्हाव्या.
नरेंद्र गोळेः सर, आपल्या काळातील वैज्ञानिक परिवारातील कार्यसंस्कृतीबद्दलही समाजात खूप जिज्ञासा आहे. आपण स्वतः सिद्धहस्त लेखक आहात. आपण आपल्या कामाविषयी प्रेरणादायी लेखन करावे अशी आपणास विनंती आहे!
Anand Ghare: ऑफिसमधल्या कामाबद्दल घरीसुद्धा चकारशब्द बोलायचे नाही अशी आपली संस्कृती होती. त्यामुळे तिथे चालत असलेल्या कामाविषयी काही उघडपणे लिहिणे कठीणच आहे. प्रेरणादायक लिहिण्याचे कामसुद्धा कसला उल्लेख न करता मोघमच करावे लागेल.
Shriniwas Paranjpe: Anand Ghare आपण म्हणता ते खरं आहे घारेजी. ते पाळले गेले हे पण सत्य आहे. प्रयोगातून आलेले निष्कर्ष वैज्ञानिक मासिकात (journals) पाठविले जायचे ते पण वरिष्ठांच्या परवानगीने.
Narendra Gangakhedkar: मी 1968- 69 ला तेथे होतो. Band Stand ला काही महिने व नंतर ह्या नव्या वसतिगृहात. फार मजेशीर दिवस. मुंबईत पहिल्यांदाच आलो आणि नवे जग बघितले. ते ही सुंदर.
नरेंद्र गोळेः सर, आपणही अणुऊर्जाखात्यात होतात की काय? आपलेही इथे स्वागत असो.
Narendra Gangakhedkar: नरेंद्र गोळे I did one year course in Radiological Physics at the Department of Radiation Protection . Later on appointed as Scientific Officer . But did not join. I joined UDCT for doing Ph.D. We were in the same hostel of training school trainees.
नरेंद्र गोळेः Well Sir, that means you were exposed to the radiation essentials and so you are a part of our family.
Narendra Gangakhedkar: नरेंद्र गोळे This course was use of Radioisotopes in Industry, Agriculture, Medicine and Research. After completion of the course we were getting jobs as a Physicist in Cancer Hospitals. Directorate of Radiation Protection (DRP) was responsible for radiation control in India. DRP was IAEA representative of India. It was Unique course. I was selected in DRP.
नरेंद्र गोळेः It still continues to be.
Narendra Gangakhedkar: नरेंद्र गोळे Now the Department name is changed - Health Physics or something like that ... It was long back .
Anand Dixit: I fondly recall my training school days with hostel at Band stand Bandra and school at Harchandrai house at Marine lines. This was a great way to start a professional life. We could not see Dr. Bhabha and that is bit sad for us. Anyway now DAE has grown to a great stature and we are proud of this fact.
नरेंद्र गोळेः Anyway now DAE has grown to a great stature and we are proud of this fact. >>>>>> True!
Vishal Vijay Kulkarni: अतिशय प्रवाही आणि सुरेख लेखन. तुमच्या जादुई पोतड़ीतुन अजुन अश्या अस्सल चिजा बाहेर येवू द्यात काका. आतुरतेने वाट पाहतोय.
Anand Ghare: ट्रेनिंग स्कूलमधल्या वास्तव्याची चर्चा करताकरता मूळ लेखाबद्दल लिहायचे राहून गेले. सुंदर लेख, विशेषतः शेवटचा परिच्छेद. शिकण्याची आवड असणे आणि तिला जोपासत राहणे फार महत्त्वाचे आहे.तुम्हाला ते चांगले जमले आहे.
Ashok Kulkarni: Greate
Ravi Torane: awadle
Dattatraya Joshi: स्मृतिंना उजळवणारे अप्रतीम लिखाण. चलचित्र पुन्हा पहिलेसे वाटले. धन्यवाद साहेब.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा