डॉ. नरिंदरसिंग कपानी
(जन्मः ३१ ऑक्टोंबर १९२६, मोगा, पंजाब, भारत, येथे;
मृत्यूः ४ डिसेंबर २०२०, रेडवूड सिटी, कॅलिफोर्निया, अमेरिका येथे; वयाच्या ९४ व्या वर्षी.)
आज ३१ ऑक्टोंबर २०२४. आज प्रकाशतंतूंचे जनक नरिंदरसिंग कपानी यांचा ९८-वा जन्मदिवस आहे. जे भारतीय, उपजीविकेच्या वा ज्ञानाच्या शोधात भारताबाहेर गेले, त्यांपैकी अनेकांनी खूप लोकोत्तर कामे केली. केवळ तेथील स्थानिकांनाच नव्हे, तर सर्व जगाला अत्यंत समृद्ध करणारे शोध त्यांनी लावले. मानवतेच्या विकासात खूप मोलाची कामगिरी केली. नरिंदरसिंग कपानी हे अशांपैकीच एक आहेत. आपण कुणीही, आजवर त्यांचे नावही, कधी ऐकलेले नसावे, ही अत्यंत खेदाचीच गोष्ट म्हणावी लागेल. सुदैवाने नरिंदरसिंग कपानी यांचे गुणगान गाणारे लोक जगभरात आजही कमी नाहीत. भारताने मात्र त्यांच्या मानवतेप्रतीच्या योगदानाची दखल, काहीशी उशीरानेच घेतली. २००४ साली ’प्रवासी भारतीय सन्मान’ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. ४ डिसेंबर २०२० रोजी वयाच्या ९४ व्या वर्षी ते रेडवूड सिटी, कॅलिफोर्निया येथे अमेरिकेत निवर्तले. भारत सरकारने २०२१ साली मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला.
सर्व जगात आजमितीला भ्रमणध्वनी वापरणाऱ्यांची संख्या भारतातच सर्वाधिक आहे. त्यातील संदेशवहनाचे तंत्रज्ञान प्रकाशतंतूंचे आहे. आपण सारेच जण शाळेत असतांना असे शिकलेलो असतो की, प्रकाश सरळ रेषेत प्रवास करतो. तसे प्रयोगही आपण शाळेत असतांना केलेले असतात. मात्र प्रकाश जर वाकवताच आला नसता तर, हे तंत्रज्ञान आपल्याला उपलब्धच झाले नसते आणि सारे जगच मग किती मागासलेले राहिले असते, याची कल्पना आपण सहजच करू शकतो. ज्या शास्त्रज्ञांनी प्रकाशाला वाकवता येते हे सिद्ध केले, त्याला वाकवण्याचे व्यावहारिक उपाय शोधून काढले, त्यांत नरिंदरसिंग यांचे नाव अग्रभागी आहे. म्हणूनच आज त्यांना ’प्रकाशतंतूंचे जनक’ म्हणून ओळखले जाते. मुळात ते भारतीय आहेत याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे.
वैद्यकशास्त्र, लष्करी उपयोग, आंतरजाल,
संगणक यांपासून तर अगदी कोणत्याही साध्या संदेशवहनाच्या पाठीचा कणाच असलेल्या
प्रकाशतंतू तंत्राचे (फायबर ऑप्टिक्सचे) जनक म्हणून संपूर्ण जगात ज्यांची ओळख आहे,
त्या नरिंदर सिंग कपानी यांना आपलेच भारतीय लोक ओळखतही नाहीत ही शोकांतिका आहे.
त्यांनी प्रकाशतंतू तंत्रावर १०० पेक्षा जास्त शोधनिबंध लिहिले असून, १९६० साली ’अमेरिकन
सायंटिफिक’ मध्ये, प्रकाशातून माहितीच्या देवाणघेवाणीच्या या माध्यमाला 'फायबर
ऑप्टिक्स' म्हणून नावं दिलं. आज प्रत्येक घराघरात फायबर ऑप्टिक्स हा शब्द रोज उच्चारला
जातो. मात्र त्या शब्दाचा जनक, आज आपल्याच लोकांना अज्ञात आहे. चला तर, ही उणीव
आपण आज पुरी करू या. नरिंदरसिंग यांची किमान जुजबी ओळख तरी आजच करून घेऊ या.
’प्रकाशाला
वाकवता येते’
असा विश्वास बाळगणारे शालेय नरिंदर
नरिंदरसिंग कपानी यांचा जन्म ३१ ऑक्टोंबर १९२६, मोगा, पंजाब, भारत, येथे झाला. मात्र त्यांचे बालपण हिमालयाच्या पायथ्याशी डेहराडूनमध्ये गेले [२]. शाळेत असतांना विज्ञानशिक्षक त्यांना सांगत होते की, ’प्रकाश सरळ रेषेत जातो. प्रकाशाला वाकवता येत नाही.’ त्यांना मात्र वाटायचे की, भिंगे, लोलक इत्यादींनी दिशा देत का होईना, पण प्रकाश वळवता अवश्य येईल. पुढे त्यांनी यावरच लक्ष केंद्रित केले आणि सिद्ध केले की, ’प्रकाशाला प्रत्यक्षात वाकवता येते’ [१]. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण आग्रा येथे झाले. त्यानंतर काही काळ ते डेहराडून येथील दारुगोळ्यांच्या कारखान्यात कामही करत असत. मग उच्च शिक्षणाकरता ते ग्रॅज्युएट स्कूल, इंपिरिअल कॉलेज लंडन येथे गेले. तिथे त्यांच्या लक्षात आले की, ’प्रकाशाला वाकवता येते का?’ याचा शोध घेणारे ते एकटेच नव्हते. दशकांपासून लोक याचा शोध घेतच होते. निरनिराळ्या अडचणी येत होत्या. त्यातच दुसरे महायुद्धही झाले होते. या शोधातच गुंतलेल्या हॅरॉल्ड हॉप्किन्स यांनी त्यांना सहाय्यक म्हणून घ्यावे याकरता त्यांनी प्रयत्न केले. हॉप्किन्स तयार झाले. ते सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ होते. नरिंदर प्रात्यक्षिकाची बाजू सांभाळत असत. दोघांनी मिळून १९५४ साली ’नेचर’ या नियतकालिकात ’प्रकाशाला वाकवता येते’ हा आपला शोध प्रकाशित केला. इथेच एका नूतन संचारतंत्राचा जन्म झाला. प्रकाशतंतूंचा शोध लागला होता.
नरिंदरसिंग कपानी यांच्या कन्या किरण
कपानी लिहितात, “माझी आई सतिंदर कौर आणि वडील नरिंदरसिंग, १९५० मध्ये लंडन येथे
भेटले. ती नृत्य आणि इंग्लिश साहित्याचा अभ्यास करत होती तर ते इंपिरिअल कॉलेज ऑफ
सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये भौतिकशास्त्रात पी.एच.डी. तिचे वाक्चातुर्य आणि
सौंदर्य यांमुळे ते थक्कच झाले. त्यांचे कलेतील आणि परस्परांतीलही स्वारस्य वाढतच
गेले. ते भावनिक, कलापूर्ण, सुंदर सावलीनृत्य करत असत. आईला जिवापाड प्रेम मिळाले,
तर वडिलांना सुरक्षितता आणि स्थैर्य. ज्यामुळे, १९५१ साली ते एक क्रांतिकारी
संकल्पना विकसित करू शकले. त्यांच्या पी.एच.डी.च्या शोधनिबंधात त्यांनी दाखवून
दिले की, “प्रकाशाला वाकवता येते”. ज्या माध्यमांतून प्रकाशाला वाकवत, वळवत नेता
येते त्याला त्यांनीच मग ’प्रकाशतंतू (फायबर ऑप्टिक)’ असे संबोधले. या शोधाचीच तर
आज जगावर छाप पडलेली आहे. त्यामुळेच आज त्यांना ’प्रकाशतंतूंचे जनक’ म्हटले जाते. ६
फेब्रुवारी १९५४ रोजी ते लंडन येथे विवाहबद्धही झाले. समुद्रसफरी न सोसणार्या
माझ्या आईला मग ते भव्य प्रवासी जहाजातून न्यूयॉर्कमधील रोचेस्टर येथे घेऊन गेले.
ते रोचेस्टर विद्यापीठात संशोधन करू लागले. माझा भाऊ राजिंदर याचा जन्म इथेच झाला.
एका वर्षानंतर ते तिघे शिकागो विद्यापीठात स्थलांतरित झाले. तिथे माझा जन्म झाला.
वडिलांच्या अपूर्व शोधाने जी बौद्धिक संपदा निर्माण झालेली होती त्यामुळे भांडवली
बाजार खुळावला होता. सिलिकॉन व्हॅलीतील माझ्या वडिलांच्या सहकार्यांनी मग त्यांना
त्याकरता स्वतःचीच कंपनी काढण्यास भरीस घातले. अशा रीतीने त्यांची अत्यंत यशस्वी
ठरलेली पहिली कंपनी जन्माला आली. ऑप्टिक्स टेक्नॉलॉजी इन्कॉर्पोरेटेड,
पालो अल्टो. १९६० साली आम्ही वूडसाईड, कॅलिफोर्निया येथे स्थलांतरित झालो. आजही
आम्ही तिथेच राहतो. [३]”
पालो अल्टो चेंबर ऑफ कॉमर्सच्या सदस्यांसोबत डॉ. कपानी, त्यांच्या ऑप्टिक्स टेक्नॉलॉजी इन्कॉ. चे उद्घाटन करत असता.
प्रकाशतंतू उपस्करांच्या निर्मितीकरता, १९७३ साली त्यांनी कॅप्ट्रॉन नावाची नवी कंपनी काढली. पुढे ती विकलीही. मग १९९९ साली आपल्याच मुलाच्यासह, सौर ऊर्जा दोहनाच्या उद्देशाने ’केटू ऑप्ट्रॉनिक्स’ नावाची आणखी एक कंपनी काढली. दरम्यान त्यांचा शिक्षणाशी असलेला संपर्क तुटलेला नव्हता. १९७७ ते १९८३ दरम्यान ते कॅलिफोर्निया विद्यापीठात सांताक्रुझ येथे शिकवत असत. त्यांनी मग तेथे प्रकाशकीय संशोधन आणि शीख अभ्यासांकरता अनेक निरनिराळी अध्यासने सुरू केली.
डॉ. कपानी आपल्या सांस्कृतिक वारशाचा खूप अभिमान बाळगत असत. त्यांनी शीख कलाकृतींचा जगातील सर्वात मोठा संग्रह गोळा केला होता. त्यांचे घर म्हणजे एक वस्तुसंग्रहालयच झाले होते. त्यात चित्रे होती. हस्तलिखिते होती. वस्त्रे होती. तिकिटे होती. नाणी होती. शस्त्रे होती. अवजारे होती. शिल्पेही होती. २००३ साली त्यांनी उत्तम अशा १०० शीख कलाकृती सॅन फ्रॅन्सिस्को येथील आशियन आर्ट म्युझियमला भेट दिल्या. तिथे सतिंदर कौर कपानी यांच्या नावाने एक कायमस्वरूपी कलादालन उघडण्यात आले. पाश्चात्य जगातील कायमस्वरूपी असे ते पहिलेच शीख कला दालन होते.
धर्मादाय कार्ये करण्याकरता त्यांनी १९६७ सालीच ’शीख फौंडेशन’ची स्थापना केली. शिखांच्या इतिहास, कला आणि संस्कृतीचा अभ्यास करण्याचे उद्दिष्ट त्याकरता निश्चित केलेले होते. २०१७ साली ’शीख फौंडेशन’ची सुवर्णजयंती साजरी झाली. त्यावेळी ते म्हणाले होते की, “इतर आस्था बाळगणार्या, अन्य वंशाच्या आणि अन्य संस्कृतीच्या आपल्या मित्रांना आपल्या शीख वारशाची ओळख होईल हे आपण सुनिश्चित करू. आपण काय आहोत हे आपण समजावून देऊ. शीख विद्वत्ता, तत्त्वज्ञान आणि कला हे सर्व जगाचे आहेत.” आपल्या कमाईचा दहावा हिस्सा आपण इतरांना दान दिला पाहिजे ही मान्यता, ’दसवंध’ म्हणून मानली जाते. त्याबरहुकूम त्यांचे आचरण असे.
संशोधक म्हणून त्यांचे १०० शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. प्रकाशकीय विजकविद्येवर (ऑप्टो इलेक्ट्रॉनिक्स) तसेच उद्योजकतेवर त्यांची चार पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांच्या कार्यालयात सुवर्णमंदिरातील कारसेवेचे एक भव्य चित्र टांगलेले होते. त्यांच्या समोरच्या टेबलावर महाराजा रणजितसिंह यांचा भव्य कांस्यपुतळा ठेवलेला होता. ते म्हणायचे मी किती भाग्यवान आहे. माझ्या पाठीशी गुरुदेव आहेत आणि समोर माझे महाराज.
भारतमातेच्या या आजवर आपल्याला माहीतच नसलेल्या अलौकिक सुपुत्रास त्याच्या या ९८-व्या जन्मदिनी सादर प्रणाम.
संदर्भः
https://www.nytimes.com/2021/01/07/technology/narinder-s-kapany-dead.html
https://www.sikhfoundation.org/dr-narinder-s-kapany-120320/
३. शीख आर्ट फ्रॉम द कपानी कलेक्शन
https://www.sikhfoundation.org/wp-content/uploads/Sikh_Art_from_the_Kapany_Collection_full.pdf
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा