२०२२-०३-०३

अब्जांश घरांचे द्रष्टेः डॉ. सुरेश हावरे

१ मार्च २०२२ रोजी माझे परममित्र डॉ. सुरेश हावरे यांचा ६६-वा वाढदिवस दिमाखात साजरा झाला. बांधकाम व्यवसायातही प्रामाणिकपणा सांभाळून काम करता येते. देदिप्यमान कामगिरी करता येते. समाजात सचोटी, गुणवत्ता, परिश्रम इत्यादी सद्गुणांना प्रतिष्ठा प्राप्त करवून देता येते. हे त्यांनी आपल्या २५ हून अधिक वर्षांच्या या व्यवसायातील यशस्वी कारकीर्दीने सिद्ध केले आहे. यादरम्यान हजारो कोटी रुपयांचा प्रचंड मोठा व्याप नावारूपास आणला. शेकडो कुशल-अकुशल तरुणांना कायमस्वरूपी रोजगार मिळवून दिला.

डॉ. सुरेश हावरे हे त्यांच्या संघटना आणि प्रशासकीय कौशल्याखातर प्रशंसित असलेले एक प्रेरक व्यावसायिक प्रणेते आहेत. नागपूर विद्यापीठाचे ते रासायनिक अभियंता आहेत. मुंबई येथील भाभाअणुसंशोधनकेंद्रातून त्यांनी अणु-अभियांत्रिकीत पदव्यूत्तर प्रशिक्षण घेतलेले आहे. पुढे त्यांनी मुंबई विद्यापीठातून इतिहास या विषयात एम.ए. पदवीही प्राप्त केलेली आहे. अलीकडेच मुंबई विद्यापीठाने त्यांना परवडण्यासारख्या अब्जांश घरांची निर्मितीया विषयात पी.एच.डी. प्रदान केलेली आहे. पी.एच.डी.चा शोधनिबंध असलेले पुस्तक त्यांनी जगातील १० कोटी बेघर लोकांना समर्पित केले आहे. समर्पणात ते लिहितात. एक दिवस असाही येईल की, तुमचे स्वतःचे घर असेल”. पी.एच.डी.चा शोधनिबंध आणि त्यातले शोध केवळ ग्रंथालयांच्याच उपयोगाचे ठरतात असा अनुभव असतांना; डॉ. सुरेश यांचे हे पुस्तक मात्र लोक विकत घेऊन वाचत आहेत. याचे कारण खूपच अलौकिक आहे. त्यात वर्णिलेले शोध, कधीच उपयोगात आणून त्यांनी त्यापूर्वीच शेकडो अब्जांश घरे बांधून यशस्वीरीत्या विकूनही दाखवलेली आहेत.

गुणवत्ताधारक विद्यार्थी राहिलेल्या आणि नागपूर विद्यापीठातून अभियांत्रिकीत सुवर्णपदक प्राप्त करणार्‍या डॉ. सुरेश हावरे यांनी, भारत सरकारच्या अणुऊर्जाविभागात ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ म्हणून २७ वर्षे सेवा केली. त्यादरम्यान अणु-अभियांत्रिकी विषयात, विख्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांतून त्यांनी ३७ शोधनिबंध प्रकाशित केले आहेत. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था, व्हिएन्ना येथे त्यांनी भारतीय अणुशास्त्रज्ञांच्या एका प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्वही केलेले आहे.

डॉ. हावरे हे गेल्या २५ वर्षांपासून व्यवसायात गुंतलेले असून, ’हावरे ग्रुप ऑफ कंपनीजचे मालक आहेत, तसेच त्या ग्रुपचे नेतृत्वही करत आहेत. त्यांनी अनेक परोपकारी कार्यांची मुहूर्तमेढ रोविली असून, अनेक विख्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यावसायिक पारितोषिकेही प्राप्त केलेली आहेत. डुईंग बिझनेस विदाऊट युअर मनी”, “उद्योग तुमचा पैसा दुसर्‍याचाआणि उद्योग करावा ऐसाया तीन पुस्तकांचे ते लेखक आहेत. भारतातील सर्वात मोठी बंदर असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्टचे ते विश्वस्त राहिलेले आहेत. भारतातील दुसर्‍या क्रमांकाच्या भव्य मंदिरसंकुलाचे -श्री.साईबाबा संस्थान ट्रस्टचे- अध्यक्ष म्हणूनही त्यांनी कार्य केलेले आहे. महाराष्ट्र सरकारने तेव्हा त्यांना राज्यमंत्र्याचा दर्जा दिलेला होता. असे महान उद्योजक माझे परममित्र आहेत, याचा मला सार्थ अभिमान आहे!

अब्जांश घरांचे द्रष्टेः डॉ. सुरेश हावरे

झाले डॉक्टर हावरे, परवडे तैसी घरे घेउनी
नाही केवळ शोध, बांधलि खरी, अब्जांश छोटी घरे ।
ज्यांना नाहि घरे असे जन जगी आहेत कोटी दहा
त्यांनाही सकला मिळोत सदने, ऐसी तयांची स्पृहा ॥१॥ 

होते बिल्डर भ्रष्ट आणि बदनामीने पुरे ग्रासले
प्रामाणीकपणे कुणीहि व्यवसायासी करू ना शके ।
त्यावेळीहि सुरेशजी म्हणत की खोटा न हा उद्यम
आता होउन सिद्ध ते, कळतसे, कर्तृत्वी आहे दम ॥२॥ 

श्रद्धा आणि सबूरहाच मुरला सिद्धांत ज्यांचे मनी
ते संस्थेस बरे, नियुक्त म्हणुनी केले तयां शीर्डित ।
नाना मित्र तसे, अनेक मिळती सेवेस संधी तिथे
सेवेचे पथ दोषमुक्त करता साईहि संतोषले ॥३॥






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: