२०२२-०२-०५

जाळीमंदी पिकली करवंद

सतेज हिरव्या, उत्तम पोताच्या पानांनी बहरलेल्या काटेरी झुडपांत करवंदे लगडलेली असतात. पहिल्यांदा खोडाच्या कडाकडांनी उमटू लागलेल्या बारीक बारीक फुटव्यांना हिरव्या बिंदूबिंदूंच्या फुटीने विकसित होत जाणारा फुलोरा येतो.  आकार वाढत असतांना फुलोरा क्रमशः तांबुस, निळसर, जांभळा, पांढुरका आणि स्वच्छ पांढरा होत जातो. मग त्यातून कुंदकळ्यांसारख्या नाजूक कळ्या उमलतात. कळ्या फुलतात. त्यांतून शुभ्र पांढरी आल्हाददायक फुले पुष्पगुच्छांच्याच स्वरूपात बहरास येतात. उमलतात. मालवतात. कोमेजतात. गळून पडतात.



त्या जागी मग हिरवी कंच बारीक बारीक फळे धरू लागतात. दिसामासी वाढत जातात. भरत जातात. परिसरातून पुष्टता पावत रंग धरू लागतात. कुसुंबी, किरमिजी, काळसर जांभळी काळी होतात. अखेरीस काळी मैना वयात येते. तरतर्‍हेचे कृमी-कीटक, पशुपक्षी मग करवंदाच्या जाळ्यांतून फिरू लागतात. मधुगंधाने, रसास्वादाने तृप्त होत जातात. वेड्यासारखी अगणित संख्येत जन्म घेणारी, छोट्या छोट्या झुडुपांतील ती मधुर फळे फस्त होत जातात. करवंदीला मात्र घटत्या करवंदांची क्षितीच नसते. ती आणखी आणखी बहरतच जाते.  साप, सरड्यांपासून, बुलबुलादी पक्षी तसेच वाघही जाळ्यांत आश्रय घेतात. माणसेही करवंदाच्या मोहातून मुक्त नसतात. ती तर हिरव्या करवंदाच्या लोणच्या मुरब्ब्यांपासून तर काळ्या मैनेच्या मधुर रसास्वादास सरावलेली असतात. मानवी जीवनातील परिणय करवंदाच्या जाळ्यांतूनच तर परिणत होत नाही का? मग त्यावर गाणीही लिहिली जातात. रंगत येते.

ती सारीच रंगत, त्या झुडुपाच्या सर्व अवस्था, अशाच एका करवंदाच्या जाळीत आढळून आल्या. प्रकाशचित्राच्या तपशीलांत जाऊन पाहा. फुला फळांच्या सर्व अवस्था एकाच चित्रात साकार करण्याचे ह्या झुडपाला साधले आहे असे मला वाटले. तसेच ते तुम्हालाही आढळून येईल.

कविश्रेष्ठ माडगुळकरांनी पुढचे पाऊलचित्रपटातील ह्या गीतात,
करवंदांच्या समृद्धीचे फारच बहारीचे वर्णन केलेले आहे.

भर उन्हांत बसली धरुन सावली गुरं
न्हाइ चिंता त्यांची तिन्ही सांजपातुर
चला दोघं मिळुनी चढू टेकडीवर
चढताचढता धरा हात की वाट नसे रुंद
जाळीमंदी पिकली करवंद

तुम्ही बाळपासून जिवांचं लई मैतर
ही तरुणपणातील बाळपणाची लहर
कुणी बघत नाही तो चला गडे लौकर
आंबटगोडी चाखु वाटते पुरवा की छंद
जाळीमंदी पिकली करवंद

मज लाज वाटते सांगाया ते धनी
घ्या तुमचं तुम्ही जरा तरी समजुनी
अहो, पाळणा उद्याचा हलतो माझ्या मनी
दर्‍या टेकड्या चला धुंडु या होउनी बेबंद
जाळीमंदी पिकली करवंद 

गीतकार: ग.दि.माडगूळकर
संगीतकार: सुधीर फडके 
गायक: माणिक वर्मा    
चित्रपट: पुढचं पाऊल    
अल्बम: गदिमा गीते 

http://www.aathavanitli-gani.com/.../Jalimandi_Pikali...