२०२१-०१-०१

डॉ. शांती स्वरूप भटनागर

 
















डॉ. शांती स्वरूप भटनागर
(जन्मः २१-०२-१८९४, मृत्यूः ०१-०१-१९५५)

’विविध क्षेत्रांत विख्यात असलेल्या अनेक प्रमुख व्यक्तींशी माझा नेहमीच संबंध येत असतो. मात्र डॉ. भटनागर हे अनेक गोष्टींचा एक विशेष संयोग होते. गोष्टी साध्य करण्याचा त्यांचा उत्साह आणि ऊर्जा तर प्रचंडच होती. परिणामी त्यांनी साध्य केलेल्या खरोखर लक्षणीय गोष्टींचा ठसा उमटून राहिलेला आहे. वस्तुतः आज राष्ट्रीय प्रयोगशाळांची जी साखळी आपल्याला दिसते आहे, ती डॉ. भटनागर यांच्यावाचून दिसली नसती असे म्हणता येईल.’  - पंडित जवाहरलाल नेहरू

तेलाची शुद्धि केली, अनवरत अशा, योजती कार्यशाळा देशा संशोधनाच्या, उकलत नवही, आणखी कार्य शाखा । वृत्ती अध्यापकाची, उपजत गुणही, थोर कर्तृत्व साजे कार्या संशोधकाच्या, उजळत जगती, शांतिरूपा गुरू ते ॥ - स्त्रग्धरा

नरेंद्र गोळे २०२१०१०१

भारतातील स्वातंत्र्योत्तर विज्ञान आणि तंत्रज्ञानाची पायाभूत संरचना तयार करण्यात तसेच भारताचे ’विज्ञान आणि तंत्रज्ञान धोरण’ ठरवण्यात; डॉ. होमी जहांगीर भाभा, प्रशांतचंद्र महालनोबिस, विक्रम अंबालाल साराभाई आणि इतरांसोबतच, शांती स्वरूप भटनागर यांनी एक लक्षणीय भूमिका बजावलेली आहे. भटनागर हे, ’वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदे (सी.एस.आय.आर.- कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च)’चे संस्थापक संचालक होते. स्वातंत्र्योत्तर भारतातील संशोधनास वाहिलेली ही प्रमुख संस्था ठरली. ते विद्यापीठ अनुदान मंडळाचे अध्यक्षही राहिले होते.

भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाचे ते सचिव होते. तसेच भारत सरकारचे शैक्षणिक सल्लागारही होते. ’शास्त्रीय मनुष्यबळ समितीचा अहवाल-१९४८’ तयार करण्यात त्यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडली. इथे हे नोंदवले पाहिजे की, राष्ट्रीय शास्त्रीय मनुष्यबळाच्या आवश्यकतांच्या, सर्व पैलूंनी केलेल्या, प्रणालीबद्ध मूल्यमापनाचा हा पहिलाच प्रसंग होता. स्वातंत्र्योत्तर भारतातील संशोधनास आवश्यक असलेल्या विज्ञान आणि तंत्रज्ञान यांतील पायाभूत सुविधांच्या नियोजनाकरता हा अहवाल खूपच मोलाचा आणि उपयुक्त ठरला. १९२१ ते १९४० दरम्यान भटनागर विद्यापीठात प्राध्यापक राहिले होते. प्रथम बनारस हिंदी विद्यापीठात आणि नंतर पंजाब विद्यापीठात. अत्यंत प्रेरक शिक्षक म्हणून त्यांची ख्याती होती. ते स्वतःही आपल्या शिक्षकाच्या भूमिकेबाबत अत्यंत सुखी होते.

’पायसांचे (इमल्शनांचे) चुंबकीय आणि भौतिकी रसायनशास्त्र’ या विज्ञान शाखेतील त्यांचे संशोधनात्मक योगदान सर्वदूर मान्यताप्राप्त आहे. त्यांनी उपायोजित रसायनशास्त्रातही लक्षणीय काम केलेले आहे. भारतातील राष्ट्रीय संशोधन विकास महामंडळ (नॅशनल रिसर्च डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन) स्थापन करण्यात त्यांनी कळीची भूमिका निभावलेली आहे. संशोधन आणि विकास यांतील दरी बुजवण्याचे कार्य हे महामंडळ करत असते. देशातील औद्योगिक संशोधन संघटना चळवळ म्हणून सुरू करण्यास तेच कारणीभूत होते. देशात तेलशुद्धीकरण कारखाने सुरू व्हावेत याकरता, तेल कंपन्यांशी वाटाघाटी करण्यासाठी, १९५१ साली त्यांनी एका एकसदस्यीय आयोगाची स्थापना केली. अंतीमतः याचेच पर्यवसान पुढे देशाच्या अनेक भागांत तेल शुद्धीकरण कारखान्यांची स्थापना होण्यात झाले. त्यांनी अनेक व्यक्ती आणि संघटनांना देशातील विज्ञान शिक्षणासाठी मुक्तहस्ते देणग्या देण्यास प्रेरित केले. त्यांना विशेषत्वाने ऊर्दू शायरीत रुची आणि गतीही होती.

सध्या पाकिस्तानात असलेल्या पंजाबातील शापूर जिल्ह्यातील भेरा गावात २१ फेब्रुवारी १८९४ रोजी त्यांचा जन्म झाला. शांती स्वरूप यांनी मॅट्रिकची परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली आणि विद्यापीठाची शिष्यवृत्तीही प्राप्त केली. १९११ मध्ये नव्याने सुरू झालेल्या दयालसिंग महाविद्यालयात ते रुजू झाले. इथे ते महाविद्यालयातील प्रा.पी.ई.रिचर्डस यांच्या पत्नी मिसेस नोरा रिचर्डस यांनी स्थापन केलेल्या सरस्वती स्टेज सोसायटीचे सक्रिय सदस्य झाले. मिसेस रिचर्डस यांच्या प्रोत्साहनाने त्यांनी ’करामती’ नावाची ऊर्दू एकांकिका लिहिली. तिच्या इंग्रजी भाषांतरास सरस्वती स्टेज सोसायटीचे १९१२ च्या सर्वोत्तम नाटकाचे पारितोषिक मिळाले. त्यांच्या पुढील जीवनातही त्यांनी आपली ही साहित्यिक अभिरुची कायम ठेवली. त्यांच्या पत्नीच्या मृत्यूनंतर तिच्या स्मरणार्थ त्यांनी आपला ऊर्दू कवितांचा संग्रह प्रकाशित केला. त्याचे नाव होते ’लाजवंती’.

१९१३ साली त्यांनी पंजाब विद्यापीठाची इंटरमेडिएट परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली आणि बी.एस.सी. साठी फोर्मन ख्रिश्चन कॉलेजात रुजू झाले. त्यावेळी डॉ.जे.सी.आर.ईविंग हे प्राचार्य होते. हेच पुढे सर जेम्स ईविंग झाले. अनेक वर्षे ते पंजाब विद्यापीठाचे कुलगुरूही राहिले. इथे शांती स्वरूप, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र शिकले. त्यांनी भौतिकशास्त्रातील ऑनर्सचा अभ्यासक्रम निवडला. भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेते, ऑर्थर हॉली क्रॉम्प्टन (१८९२-१९६२) यांचेसोबत संशोधन करणारे जे.एम.बेनेड, हे त्यांना भौतिकशास्त्र शिकवत असत. इथे हे नोंदवले पाहिजे की, शांती स्वरूप यांनी त्यांच्या एम.एस.सी. पदवी करताचे, ’पृष्ठीय तणाव (सरफेस टेन्शन)’ विषयातील त्यांचे पहिलेच संशोधन कार्य, बेनेड यांच्या मार्गदर्शनाखालीच केले. पी.कार्टर स्पीर्स त्यांना रसायनशास्त्र शिकवत असत. स्पीर्स हे विद्यापीठात तंत्रशिक्षणाचे जनक मानले जात असत.

श्री. वेलिंगकर, प्रिन्सिपॉल दयाल कॉलेज, जे पुढे सार्वजनिक शिक्षण संचालक (डायरेक्टर ऑफ पब्लिक इन्स्ट्रक्शन) झाले, ते लिहितात, ’शांति स्वरूप हे सुमारे १०० विद्यार्थ्यांच्या वर्गातील सर्वात समर्थ विद्यार्थी होते. वस्तुतः मला तर वाटते की, सर्वच बाबतींत ते सर्वात समर्थ होते. साहित्यिक, वैज्ञानिक, सामाजिक; अशा वर्गातील अभ्यासाच्या प्रत्येक शाखेत आपल्या सर्वोत्कृष्ट वर्तनाने त्यांनी सर्वच अध्यापकांना संपूर्ण समाधान दिले. ते अपवादात्मक सामर्थ्ये असलेले तरूण होते. मला विश्वास वाटतो की, नामांकित युरोपिअन वा अमेरिकन वैज्ञानिक संशोधन केंद्रात त्यांना बुद्धिमत्ता विकासाची संधी मिळाली तर, ते विज्ञानात लक्षणीय कामगिरी करून दाखवतील आणि देशास उच्च प्रतीची सेवाही देऊ शकतील.’

१९१६ साली स्नातक पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी, फोर्मन ख्रिश्चन कॉलेजातच भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र विभागांत प्रात्यक्षिककार (डेमॉन्स्ट्रेटर) म्हणून औपचारिकरीत्या पहिल्या सेवेत रुजू होण्याचा निर्णय घेतला. पुढे ते दयालसिंग कॉलेजात वरिष्ठ प्रात्यक्षिककार झाले. ही सेवा करत असूनही, उच्च शिक्षण घेण्याच्या त्यांच्या प्रयत्नांत मात्र कोणतीच अडचण आली नाही. फोर्मन ख्रिश्चन कॉलेजच्या रसायनशास्त्रातील एम.एस.सी. अभ्यासक्रमाकरता ते रुजू झाले. १९१९ साली त्यांना ही पदवीही प्राप्त झाली.

रुची राम सहाय यांच्या पुढाकाराने, भटनागर यांना दयालसिंग कॉलेज ट्रस्टतर्फे परदेशी अभ्यासाकरता शिष्यवृत्ती देण्यात आली. शिष्यवृत्ती घेऊन ते इंग्लंडमार्गे अमेरिकेस रवाना झाले. त्या काळात, युरोपातून अमेरिकेत परतत असलेल्या अमेरिकन सैनिकांनी सर्व प्रवासी सुविधा व्यापून राहिलेल्या असल्याने, अमेरिकेत जाणार्‍या जहाजात त्यांना प्रवेश मिळणेच अशक्य झाले. ट्रस्टींना हे कळवल्यावर त्यांनी लंडनमध्येच पदव्यूत्तर संशोधन करण्यास अनुमती दिली. भटनागर यांनी, युनिव्हर्सिटी कॉलेज, लंडन येथील प्रोफेसर एफ.जी.डोनान यांना आपल्या संशोधनाची कागदपत्रे सादर केली. लंडन युनिव्हर्सिटीच्या डी.एस.सी. पदवीकरता त्यांनी मार्गदर्शन करण्याचे मान्य केले. १९२१ मध्ये भटनागर यांना ही पदवीही प्राप्त झाली. डोनान यांच्या संशोधनातील सदस्य म्हणून, ते पायसांतील आसंजन आणि संसंजन (अधेशन अँड कोहेशन इन इमल्शन्स) या विषयाचा अभ्यास करत होते. त्यांच्या शोधनिबंधाचे शीर्षक होते, ’तेलातील दोन वा तीन संयुजेचे मेदाम्ल-क्षार आणि त्यांचे तेलाच्या पृष्ठीय ताणावरील प्रभाव (सोल्युबिलिटीज ऑफ बाय अँड ट्राय व्हॅलंट सॉल्टस ऑफ फॅटी ऍसिडस इन ऑईल्स अँड देअर इफेक्टस ऑन सरफेस टेन्शन ऑफ ऑईल्स). लंडनमध्ये कार्यरत असतांना त्यांना दरसाल २५० पौंडांची डी.एस.आय.आर. इंग्लंड यांची फेलोशिपही मिळत असे.

ऑगस्ट १९२१ मध्ये ते भारतात परत आले आणि रसायनशास्त्राचे प्राध्यापक म्हणून बनारस हिंदू विद्यापीठात रुजू झाले. बनारस हिंदू विद्यापीठ १९१६ सालीच पंडित मदन मोहन मालवीय यांनी स्थापन केलेले होते. ते तिथे तीन वर्षे राहिले. तेवढ्या अल्पावधीतच ते, भौतिकी-रसायनशास्त्र संशोधन शाखा स्थापन करू शकले होते. सक्रिय राखू शकले होते. याच काळात त्यांनी विद्यापीठाचे ’कुलगीत’ही लिहिले. विद्यापीठाचे कुलगुरू एन.एच. भगवती म्हणाले होते की, ’तुमच्यापैकी अनेकांना हे माहीतही नसेल की, विख्यात शास्त्रज्ञ असलेले प्रा. भटनागर, विख्यात हिंदी कवीही होते. बनारसमध्ये असतांनाच त्यांनी विद्यापीठाचे ’कुलगीत’ही लिहिले होते. या विद्यापीठात प्रा. भटनागरांकडे आदरानेच पाहिले जाते आणि विद्यापीठ अस्तित्वात असेपर्यंत ही भावना अशीच टिकून राहील.’

नंतर विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागात प्राध्यापक आणि विद्यापीठ रसायनशास्त्र प्रयोगशाळांचे संचालक म्हणून नियुक्ती झाल्याने, ते लाहोरला गेले. पंजाब विद्यापीठ, लाहोर येथे ते १६ वर्षे राहिले. हा काळ त्यांच्या आयुष्यातील सर्वाधिक सक्रिय मौलिक शास्त्रीय संशोधनाचा होता. त्यांच्या अभ्यासाचे प्रमुख विषय कलिल (कोलाईडल) आणि चुंबकीय रसायनशास्त्र हे होते. १९२८ मध्ये के.एन.माथूर यांच्या सोबतीने त्यांनी एका उपकरणाचा शोध लावला. त्याचे नाव भटनागर-माथूर चुंबकीय व्यतिकरण संतुलक (मॅग्नेटिक इंटरफिअरन्स बॅलन्स). चुंबकीय गुणधर्मांचे मापन करण्य़ासाठीचे हे सर्वाधिक संवेदनशील उपकरण होते. १९३१ साली ते ’रॉयल सोसायटी सांध्यमिलन’ प्रसंगी प्रदर्शितही करण्य़ात आलेले होते. मेसर्स ऍडम हिल्गर अँड कंपनी, लंडन यांनी त्याचे विपणन केलेले होते.

त्यांनी उपायोजित आणि औद्योगिक रसायनशास्त्रातही लक्षणीय काम केलेले आहे. भटनागर यांनी हाती घेतलेली पहिली औद्योगिक समस्या, उसाच्या चिपाडांपासून पशुखाद्य तयार करण्याची प्रक्रिया विकसित करणे हीच होती. पंजाबमधील ज्येष्ठ व्यक्तिमत्व असलेले सर गंगा राम यांच्याकरता त्यांनी हे कार्य केले होते. दिल्ली क्लोथ मिल्स; जे.के.मिल्स लिमिटेड, कानपूर; गणेश फ्लोअर मिल्स लि., लयल्लापूर; टाटा ऑईल मिल्स लि., बॉम्बे; स्टील ब्रदर्स अँड कंपनी लि., लंडन इत्यादींच्या औद्योगिक समस्याही त्यांनी हाती घेतलेल्या होत्या. उपायोजित आणि औद्योगिक रसायनशास्त्रातील त्यांचे एक महत्त्वाचे श्रेयसंचित म्हणजे त्यांनी अटॉक ऑईल कंपनी, रावळपिंडी (मेसर्स स्टील ब्रदर्स अँड कंपनी लि., लंडन यांची ही प्रतिनिधी कंपनी होती) यांचेकरता केलेले काम. अटॉक ऑईल कंपनी विंधनकार्य (ड्रिलिंग ऑपरेशन्स) करत असतांना त्यांना एक विचित्रच समस्या समोर आली. विंधनाकरता जो चिखल वापरला जात असे, तो खार्‍या पाण्याच्या संपर्कात येताच घनीभूत होत असे. तो घन पदार्थही पुढे कठीण कठीणच होत जाई. चिखलाच्या अशा घनीभवनामुळे विंधनकार्य अशक्यच झाले.

भटनागर यांच्या लक्षात आले की, ही समस्या कलिल रसायनशास्त्रातील आहे. त्यांनी ती समस्या सोडवण्याकरता एक पद्धती विकसित केली. “विंधन चिखलात भारतीय गोंदाची भर करून ही समस्या व्यवस्थितरीत्या सोडवली गेली. चिखल संधारणात (मड सस्पेन्शन) गोंद घातल्यावर त्याची विष्यन्दता (व्हिस्कॉसिटी) घटते. विद्युत अपघटकाच्या कणसंकलक (ऊर्णक) प्रभावाप्रतीची स्थिरताही वाढते.” भटनागरांनी विकसित केलेल्या पद्धतीवर, मेसर्स स्टील ब्रदर्स एवढे खूश झाले की, त्यांनी भटनागरांना पेट्रोलियमसंबंधी त्यांच्या कोणत्याही संशोधनाकरता रु.१,५०,०००/- देऊ केले. भटनागरांच्याच सांगण्यावरून कंपनीने ही रक्कम विद्यापीठाच्या अखत्यारीत ठेवली. भटनागरांच्या मार्गदर्शनाखाली पेट्रोलियम संशोधन विभाग स्थापन करण्यास, या अनुदानाचा उपयोग झाला. त्यांच्या सहयोगी योजनेखाली मेणांच्या निर्गंधीकरणार्थचे तपास, मातीच्या तेलाच्या ज्योतीची उंची वाढवण्याकरताचे तपास, खाद्य तेलातील तसेच खनिज तेल उद्योगांतील वाया जाणार्‍या पदार्थांच्या वापराकरताचे तपासही कार्यान्वित करण्यात आले. सहयोगी योजनेचे व्यापारी महत्त्व ओळखून कंपनीने अनुदान वाढवले. संशोधनाकरताचा कालावधीही पाच वर्षांपासून दहा वर्षांपर्यंत वाढवून दिला.

भटनागरांनी, त्यांच्या उपायोजित, औद्योगिक रासायनिक संशोधनार्थ मिळालेले आर्थिक लाभ, विद्यापीठातील सुविधा सशक्त करण्यास उपयुक्त होतील; या कारणाने, स्वतःच्या पदरात पाडून घेण्यास सातत्याने नकारच दिला. त्यांच्या या त्यागाकडे दूरपर्यंत लोकलक्ष वेधले गेले.  मेघनाद साहा यांनी १९३४ साली भटनागरांना लिहिले की, ’तुम्ही पूर्वी काम केलेत त्या संस्थेस मिळालेले लाभ तर आहेतच. शिवाय, यामुळे तुम्ही जनसामान्यांच्या नजरेत विद्यापीठीय शिक्षकांचा दर्जा उंचावला आहेत.’

के.एन.माथूर यांचेसोबत मिळून भटनागरांनी ’फिजिकल प्रिन्सिपल्स अँड ऍप्लिकेशन्स ऑफ मॅग्नेटो-केमिस्ट्री’ नावाचे पुस्तकही लिहिले आहे. हे पुस्तक या विषयावरील प्रमाणपुस्तक मानले जाते. प्रफुल्लचंद्र रे लिहितात, “माझे डोळे, ’नेचर’ या नियतकालिकाची पाने उलटतांना, मॅक्मिलन यांच्या जाहिरातीवर खिळले. अखेरीस तुमचे पुस्तक जाहीर झालेले होते. एक समर्थ निर्णायक असलेल्या प्रा. स्टोनर यांच्या, ’करंट सायन्स’ नियतकालिकातील सर्वोत्तम परीक्षणात सूचित झाल्याप्रमाणे हे पुस्तक उच्च दर्जाचे आहे. माझ्या माहितीनुसार परकीय विद्यापीठांनी अनुसरलेले भौतिक विज्ञानांतील एकमेव पाठ्यपुस्तक मेघनाद यांचे आहे. भौतिक विज्ञानांतील हे दुसरे पुस्तक तसाच सन्मान मिळवेल असे दिसते आहे, ही माझ्याकरता आनंददायी गोष्ट आहे. माझे दिवस आता मोजकेच राहिलेले आहेत. त्यात समाधान हे आहे की, तुम्ही रसायनशास्त्रात भारतीय संशोधकांचा सन्मान परदेशांतही उंचावत आहात.”

ब्रिटिश सरकारने १९३४ मध्ये भारतीयांना एक छोटी सवलत देण्याचा निर्णय घेतला. ’औद्योगिक गुप्तवार्ता आणि संशोधन कार्यालय’ निर्माण करण्यास सरकार तयार झाले. ते एप्रिल १९३५ मध्ये भारतीय भांडार विभागांतर्गत कार्यान्वितही झाले. त्याचेपाशी मर्यादित संसाधने उपलब्ध होती. दरसाल एक लक्ष रुपयांचे त्याचे अंदाजपत्रक असे. त्यामुळे त्यास कोणतीही औद्योगिक कार्यवाही करणे शक्य नव्हते. ते मुख्यतः चाचणी आणि गुणवत्ता नियमनाशी संबद्ध राहत असे.

जेव्हा दुसरे महायुद्ध सुरू झाले तेव्हा हे कार्यालय बंद करण्याचा प्रस्ताव आला. व्यापार सदस्य, सर रामस्वामी मुदलियार यांनी हा प्रस्ताव स्वीकारत असतांना असा युक्तिवाद केला की, ’जुने कार्यालय बंद करावे. मात्र काटकसरीचा उपाय म्हणून नव्हे, तर ’बोर्ड ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रिअल रिसर्च (बी.एस.आय.आर.)’ या विस्तृत संसाधनांसहित आणि विस्तृत उद्दिष्टांसहित येणार्‍या नव्या कार्यालयास जागा करून देण्यासाठी. मुदलियार यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश येऊन १ एप्रिल १९४० रोजी दोन वर्षांकरता बी.एस.आय.आर. निर्माण झाले. तोपर्यंत रसायनशास्त्रात लक्षणीय योगदान दिलेल्या भटनागर यांना, त्याचा कार्यभार उचलण्यासाठी पाचारण केले गेले. भटनागर यांना वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन संचालक म्हणून आणि सर मुदलियार यांना अध्यक्ष म्हणून नियुक्त केले गेले. बी.एस.आय.आर.ला वार्षिक पाच लाख रुपयांचे अंदाजपत्रक मंजूर केले गेले आणि व्यापार विभागाकडे त्यास वर्ग करण्यात आले. १९४० अखेरपर्यंत सुमारे ८० संशोधक, बी.एस.आय.आर. मध्ये घेतले गेले होते. त्यातील सुमारे एक चतुर्थांश, थेट नियुक्त होते. बी.एस.आय.आर.च्या स्थापनेनंतर दोन वर्षांतच त्यांनी अनेक प्रयोगशालेय पातळीवरील प्रक्रिया, औद्योगिक वापरार्थ सिद्ध केल्या.

बलुचिस्तान गंधक शुद्धीकरण, वायुविरहित कापड निर्मिती, वनस्पतीज तेलांचा इंधन व वंगण म्हणून विकास, पायरेथ्रम (पायसन आणि दुग्धसारणाचा) इमल्सिफायर अँड क्रीमचा शोध, लष्करी जोडे आणि दारुगोळ्याकरता अप्रत्यास्थ बांधणीसाहित्य (प्लॅस्टिक पॅकिंग), गणवेषांकरताचे रंग, जीवनसत्त्वाची निर्मिती इत्यादीकरताच्या तंत्रांचा त्यांत समवेश होता.

१९४१ च्या सुरूवातीस भटनागर यांनी, ह्या तंत्रनिष्पत्तीचे उपायोजनांत परिवर्तन व्हावे म्हणून, औद्योगिक संशोधन उपयोग समिती (आय.आर.यू.सी) स्थापन करण्यासाठी सरकारचे मन वळवले. समितीच्या शिफारसीवरून, उद्योगातून लाभणार्‍या स्वामित्वाचा एक हिस्सा औद्योगिक संशोधनातील पुनर्निवेषार्थ वेगळा काढण्यास सरकार तयार झाले. मुदलियार यांनी दिलेल्या एका प्रस्तावानुसार ’इंडस्ट्रिअल रिसर्च फंड’ निर्माण केला गेला. देशातील औद्योगिक विकासास त्यामुळे चालना दिली जाणार होती. दिल्लीतील मध्यवर्ती सभेकडून दरसाल दहा लाख रुपयांची तरतूदही याकरता मंजूर करण्यात आली.

मुदलियार आणि भटनागर यांच्या प्रयत्नांतून ’वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (कौन्सिल फॉर सायंटिफिक अँड इंडस्ट्रिअल रिसर्च-सी.एस.आय.आर.) ही एक स्वायत्त संस्था उभी राहिली. सरकारने निर्मिलेल्या संशोधन निधीचे नियंत्रण ती करणार होती. २८ सप्टेंबर १९४२ रोजी ती कार्यान्वित झाली. सी.एस.आय.आर. या नियंत्रक संस्थेस, सल्लागार म्हणून बी.एस.आय.आर. आणि आय.आर.यू.सी. यांची नियुक्ती करण्यात आली. १९४३ मध्ये भटनागर यांनी दिलेल्या प्रस्तावानुसार, पाच राष्ट्रीय प्रयोगशाळा स्थापन करण्याच्या प्रस्तावास सी.एस.आय.आर. च्या प्रशासकीय मंडळाने मंजुरी दिली. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, राष्ट्रीय भौतिकी प्रयोगशाळा, इंधन संशोधन स्थानक, तसेच ’ग्लास अँड सिरॅमिक रिसर्च इन्स्टिट्यूट’ यांचा त्यांत समावेश होता. १९४४ मध्ये या प्रयोगशाळांच्या निर्मितीकरता  सी.एस.आय.आर.ला एक कोटी रुपयांचे अनुदान मिळाले. टाटा इंडस्ट्रिअल हाऊसनेही याकरता वीस लाख रुपयांची देणगी दिली.

भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ’वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (कौन्सिल फॉर सायंटिफिक अँड इंडस्ट्रिअल रिसर्च-सी.एस.आय.आर.) पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे अखत्यारीत ठेवली गेली. ते स्वतः, देशात विज्ञानाचा विकास व्हावा यासाठी खूप उत्साही होते, १९५४ अखेर, बारा राष्ट्रीय प्रयोगशाळा स्थापन झाल्या आणि आणखी डझनभर नियोजन अवस्थेत होत्या.

१९३६ मध्ये ब्रिटिश सरकारने, शुद्ध आणि उपायोजित रसायनशास्त्रांतील भटनागरांच्या सर्वोत्तम योगदानांच्या गौरवार्थ, त्यांना ’ऑर्डर ऑफ ब्रिटिश एम्पायर (ओ.बी.ई.)’ खिताब दिला. १९४१ मध्ये त्यांना, त्यांच्या युद्धकालीन प्रयासांच्या मान्यतेखातर ’सर’ खिताब देण्यात आला. १९४३ साली ’सोसायटी ऑफ केमिकल इंडस्ट्री, लंडन’ या संस्थेने भटनागर यांना सन्माननीय सदस्य निवडले आणि पुढे उपाध्यक्षही केले. १९४३ साली ’रॉयल सोसायटी ऑफ लंडन’ मध्ये ते फेलो म्हणून निवडले गेले. भारतीय रसायनशास्त्र संघटनेचे ते अध्यक्ष होते. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस ऑफ इंडिया आणि इंडियन नॅशनल काँग्रेसचेही ते अध्यक्ष होते. भारत सरकारने १९५४ साली त्यांच्या कार्याच्या गौरवार्थ त्यांना पद्मविभूषण सन्मान दिला. १९९४ साली त्यांचे प्रकाशचित्र असलेले डाकतिकिटही जारी करण्यात आले. १ जानेवारी १९५५ रोजी त्यांचा मृत्यू झाला.

भारताच्या स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर लगेचच्या काळात, आपल्या अलौकिक बुद्धिमत्तेने भारतातील वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधनास गतीमान करणार्‍या, या स्वभावाने शिक्षक असलेल्या, आधुनिक महर्षीस हा मानाचा मुजरा! त्यांच्या कर्तृत्वाचे आम्हाला कधीही विस्मरण होऊ नये आणि त्यांच्या नीतिमत्तेने आम्हाला कायमच प्रेरित करत असावे हीच प्रार्थना!!

संदर्भः

१.     शांति स्वरूप भटनागर यांचा अल्प परिचय 
https://vigyanprasar.gov.in/bhatnagar-shanti-swarup/.
२. लाजवंती, शांति स्वरूप भटनागर, प्रकाशनकाल-१९४६, पृष्ठे-२१४ 
https://www.rekhta.org/ebooks/lajwanti-shanti-swaroop-bhatnagar-ebooks
३. श्री. नरेंद्र गोळे यांच्या चर्यापुस्तक भिंतीवरील नवा लेख.
.

पूर्वप्रसिद्धीः विद्याप्रसारक मंडळ, ठाणे यांच्या दिशा मासिकाचा जानेवारी-२०२१ चा अंक.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: