२०२०-१०-२५

मेकॉले जिंकला आहे!

आज मेकॉलेचा २२० वा जन्मदिवस आहे.

मेकॉले जिंकला आहे!

नरेंद्र गोळे २०२०१०२५

थॉमस बॅबिंग्टन मेकॉले
(जन्मः २५ ऑक्टोंबर १८००, मृत्यूः २८ डिसेंबर १८५९) 

आपला देश ब्रिटिशांच्या गुलामगिरीत खितपत पडलेला असतांना, इसवीसन १८३२ ते १८३३ दरम्यान, तत्कालीन लॉर्ड ग्रे ह्या ब्रिटिश इंडियाच्या प्रशासकास, सेक्रेटरी ऑफ द बोर्ड ऑफ कंट्रोल ह्या नात्याने, भारतीय शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल सुचविणारा मेकॉले हाच होता. असे बदल केल्यास ब्रिटिश संस्कृती, भारतीय संस्कृतीस कायम स्वरूपी गुलाम बनवू शकेल, अशी त्याची धारणा होती. त्याच्या सूचनांवर अंमल होऊन, त्यास देदिप्यमान यशही लाभले. आपण सारेच आज इंग्रजी भाषा, लिपी, आचार, विचार, संस्कृतीच्या सिकंजांत जे जखडलेले आहोत, ही त्याचीच जीत आहे. मग कबूल करायला का घाबरावे?

मेकॉले जिंकला आहे!

ब्रिटिश सरकारला भारतीय संस्कृतीचा कणा मोडण्याचे उपाय सांगणारा मेकॉले म्हणाला होताः

English education would train up a class of persons, Indian in blood and color, but English in tastes, in opinions, in morals and in intellect.

-        Thomas Babington Macaulay

म्हणजे

इंग्रजी शिक्षण एका अशा वर्गाला प्रशिक्षित करेलज्याचे रक्त आणि रंग तर भारतीय असेलमात्र ज्याची रुचीमतेनैतिकता आणि बुद्धिमत्ता इंग्लिश असेल. - थॉमस बॅबिंग्टन मेकॉले

त्यालाही कल्पना नसेल एवढे अपूर्व यश त्याच्या दूरदृष्टीच्या नियोजनाला मिळालेले आहे. आपल्याच उदयमान पिढीची आवड-निवड, अश्रद्ध विचारसरणी, वर्तनातील बेदरकारी आणि बुद्धिमत्तेतील निर्ममता आज अस्तमान पिढीची घोर चिंता बनून राहिलेली आहे. मग कबूल करायला का घाबरावे?

मेकॉले जिंकला आहे!

त्याच्या अपेक्षेनुसार किंबहुना नियोजनानुसार, आपली उदयमान पिढी इंग्रजीत विचार करते आहे, इंग्रजीत बोलते आहे, लिहितांना उत्तम प्रकारे केवळ इंग्रजीतच अभिव्यक्त होऊ शकते आहे. ते असे का वागतात, असे त्यांना कोणी विचारू शकत नाही, ते स्वतः तसा विचारही मनात आणत नाहीत आणि त्यांची मुले तर, मनात तसा विचार आणूही शकणार नाही आहेत. कारण त्यांच्यापर्यंत ते सामर्थ्य पोहोचणारच नाही आहे. गावाकडली उदयमान पिढीही, इंग्रजी येत नसले तरी, बहुतांशी शब्द आवर्जून इंग्रजीच बोलते आहे. त्यात अभिमान बाळगते आहे. उरापोटी कष्ट घेऊन मुलांना इंग्रजी माध्यमातून शिकवते आहे. ह्याबाबत किंचितही संशय असेल तर चर्यापुस्तकावरची नावे पाहा ९०% हून अधिक रोमनमध्ये लिहिलेली दिसतील, उदयमान लेखकांच्या ’पोस्टी’ (कारण त्या मुळात ’नोंदी’ नसतातच) पाहा, त्या ९०% हून अधिक, इंग्रजीत प्रसवतांना दिसतील. इत्यादी. इत्यादी. मग कबूल करायला का घाबरावे?

मेकॉले जिंकला आहे!

मराठी विज्ञान परिषद, हिंदी विज्ञान परिषद, भारत सरकार इत्यादीकांनी वैश्विक अंकपद्धती म्हणून रोमन अंकांचा स्वीकार केला आहे. आपल्या भारत देशाने विश्वाला संख्या मोजण्याचे शिकवले. दशमान पद्धती दिली. शून्य दिले. एक ते दहा आकड्यांना अक्षरसंकेत दिले. ती देवनागरी अक्षरे, ते अंक, आपण स्वतःच सोडून दिलेले आहेत. मराठी माध्यमातून गणित शिकणार्‍या प्राथमिक शाळेतील मराठी विद्यार्थ्यांना आपलेच शासन रोमन आकडे वापरण्याची सक्ती करत आहे. इतरत्र देवनागरी आकडे वापरणारी मुले, शाळेत रोमन आकडे लिहू लागल्यावर बुचकळ्यात पडून गणिते चुकू लागली आहेत. आंध्र प्रदेश सरकारने तेलुगू माध्यमातील शिक्षण बंद करून इंग्रजी माध्यमच अनिवार्य केलेले आहे. ब्रिटिशांची ही गुलामगिरी आपण का करतच राहिलो आहोत, हे शासनकर्त्यांनाही कळेना झाले आहे. त्यांची तशी इच्छा आहे का विचारून पाहा! ते तत्काळ त्याविरोधी मत व्यक्त करतील. देवनागरी, मराठीची महती गातील. मग हे सारे का बरे होते आहे? कबूल करायला का घाबरावे?

मेकॉले जिंकला आहे!

थॅन्क्यू, सॉरी, एक्सक्यूज, पंप, इलेक्ट्रॉनिक्स, डाटा, मोबाईल, टॉप-अप, रिचार्ज, सर्व्हिस प्रोव्हायडर ह्या शब्दांकरता; धन्यवाद, क्षमस्व, क्षेपक, विजकविद्या, विदा, भ्रमणभाष, भर करणे, पुनर्भरण, सेवादाता इत्यादी शब्द पूर्वीपासूनच आपल्या मायमराठीत विद्यमान आहेत. हे उदयमान पिढीच्या गावीही नाही, एवढेच नव्हे तर अस्तमान पिढीही आपल्याच शब्दांकडे परक्यांसारखे पाहत आहे. आपली उदयमान पिढी हे वाचणारच नाही आहे, अस्तमान पिढीही केवळ धुमसतच राहणार आहे. मग कबूल करायला का घाबरावे?

मेकॉले जिंकला आहे!

भारतीय संस्कृती म्हणजे काय? तर परधर्म सहिष्णुता. परकर्म सहिष्णुता. परमर्म सहिष्णुता आणि परवर्म सहिष्णुता. ह्यांपैकी एक तरी सहिष्णुता आज आपल्यात टिकून आहे का ह्याचा प्रत्येक भारतीयाने विचार करावा अशीच परिस्थिती आहे. सारीच सहिष्णुता लयास जातांना दिसत आहे. मग कबूल करायला का घाबरावे?

मेकॉले जिंकला आहे!

सत्यमेव जयते ब्रीद असलेल्या भारतात सत्याची आस सोडून, सत्यालाच त्रास देणार्‍यांची संख्या वाढत आहे. तमसो मा ज्योतिर्गमय म्हणून प्रत्येक घरात असंख्य ज्योती चेतवून दिवाळीत भर अमावस्येचा अंधार नाहीसा करणार्‍या आपल्या संस्कृतीत, एम.एस.ई.बी. (मंडे टू संडे इलेक्ट्रिसिटी बंद) जन्मलेल्या असून शेतीच्या कृषीपंपांच्या तोंडचे पाणीच त्यांनी पळवून लावलेले आहे. मग कबूल करायला का घाबरावे?

मेकॉले जिंकला आहे!

हा लेख वाचल्यावर “इज इट फेवरेबल ऑर ट्रॉलिंग?” अशी कुजबूज मनात सुरू होणारे कमी नसणार आहेत! त्यांनी आपापल्या मनातील ’ड्रिम इंडिया’ च्या संकल्पना, सनातन धर्माच्या

सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः ।
सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद्दुःखभाग्भवेत्‌ ॥ - अनुष्टुप्‌

म्हणजे

सुखात सर्व राहोत निरोगी सर्व राहु दे ।
खुशाल सर्व राहोत दुःखी कुणी असू नये ॥ - अनुष्टुप्‌ 

ह्या परंपरागत, प्राचीन संकल्पनेशी ताडून पाहाव्यात! आपला इथवरचा प्रवास काही आपल्या स्वनिर्धारित गुरूकुल शिक्षणप्रणालीचे पर्यवसान नाही, तर परकीयांनी लादलेल्या परक्या शिक्षणप्रणालीची, त्यांना हवी असलेली फळे आहेत. ह्या वास्तवाची जाणीवही आपल्याला उरलेली नाही आणि सुधाराची वाट तर अदृष्टच राहिली आहे. मग कबूल करायला का घाबरावे?

मेकॉले जिंकला आहे!

खरेच का हो आपल्याला मेकॉले जिंकायला हवा होता? आपल्याला ते पक्षकर आहे का? त्याच्या स्वप्नातले शिक्षण, आपण आजही घेत राहण्याची, आपल्यावर कुणी सक्ती तर करत नाही ना? आपण चिरंतन जपलेली आपल्या पूर्वजांची, आपल्या वाडवडिलांची आणि आपलीही अमूल्य स्वप्ने साकार करण्याप्रती, आपली काही कर्तव्ये आहेत की नाही? वर्तमान वाटचाल आपले भवितव्य उज्ज्वल घडवेल का?

कविवर्य सुरेश भट म्हणतातः

ही न मंजूर वाटचाल मला । दे भविष्या तुझी मशाल मला ॥

मान्यवर, तुम्ही काय म्हणता?

जोवर आपली उदयमान पिढी मनापासून हे कबूल करणार नाही की, मेकॉले जिंकला आहे. तो जिंकणे आपल्याला नको आहे. पराभवाचे हे शल्य मुळासकट उपसून टाकायला ती जेव्हा प्राणपणाने पुढे येईल, तेव्हाच ह्या परिस्थितीत सुधार होऊ शकेल. अन्यथा आपण आंधळे, दळतच राहू आणि परकीय कुत्रे पीठ खातच राहतील! मग कबूल करायला का घाबरावे?

मेकॉले जिंकला आहे!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: