२०१६-०४-३०

वियद्गंगा वृत्त

वियद्गंगा वृत्त

वियत्‌+गंगा म्हणजे लोप पावत असलेली गंगा. ह्या नावाचे एक वृत्त आहे. ते लोकप्रिय आहे. ही माहिती मला कालपर्यंत नव्हती. मग जे कळले ते असे आहे.

उपक्रम डॉट ऑर्ग ह्या संकेतस्थळावरील एका लेखात [१], चित्तरंजन सुरेश भट ह्यांनीभवानीशंकर पंडित यांची 'धबधबा' नावाची ही कविता ही वियद्गंगावृत्तात लिहिलेली असल्याचे निस्संदिग्धपणे सांगितले होते. त्या सूत्राच्या अखेरीस दिगम्भा ह्यांनी प्रदीप कुलकर्णींच्या मनोगत डॉट कॉम वरील एका लेखात  ’वियद्गंगावृत्ताची माहिती दिलेली असल्याचे सांगितले [२]. त्याच सूत्रात अशोक पाटील ह्यांनी 'धबधबा' ही कविता "आठवणीतल्या कविता" या पुस्तकाच्या क्रमांक ४ च्या संचात [३] दिलेली असल्याचे सांगून तिथे प्रस्तुतही केली. ती मूळ कविता अशी आहेः

धबधबा [गज्जल]

किती उंचावरूने तूं । उडी ही टाकिसी खालीं ॥

जणों व्योमांतुनी येसी । प्रपाता! जासि पातालीं ॥ १ ॥

कड्यांना लंघुनी मागें । चिपांना लोटिसी रागे ॥

शिरीं कोलांटुनी वेगे । शिळेचा फोडिसी मौली! ॥ २ ॥

नगाचा ऊर फोडोनी । पुढे येसी उफाळोनी ॥

उडे पाणी फवारोनी । दरीच्या सर्द भोंताली ॥ ३ ॥

तुषारांचे हिरेमोत्यें । जणों तू फेंकिसी हाते ॥

खुशीचे दान कोणाते । मिळे ऐसे कधी काळी? ॥ ४ ॥

कुणी तांदूळ् वा कांडे । रुप्याचे भंगती हांडे ॥

मण्यांचा की भुगा सांडे । कुणाच्या लूट ही भाली? ॥ ५ ॥

घळीमाझारिं घोटाले । वरी येऊनिं फेंसाळे ॥

कुठे खाचांत् रेंगाळे । करी पाणी अशी केली ॥ ६ ॥

उभी ताठ्यांत् जी झाडे । तयांची मोडिसी हाडें ॥

कुशीं गेसी लव्हाळ्यांना । तयांचा तूं जणो वाली! ॥ ७ ॥

विजेचा जन्मदाता तूं । प्रकाशाचा निशीं हेतू ॥

तुला हा मानवी जंतू । म्हणोनी फार सांभाळी! ॥ ८ ॥

नोंदः संपादक मंडळाने या कवितेवर केलेल्या टिप्पणीत वृत्तांसंदर्भात मात्र कसलाही उल्लेख नाही. फक्त उदय-वाचन-२ मध्ये ही कविता 'हिरेमोती' शीर्षकाने आली होती असे म्हटले आहे.
प्रदीप कुलकर्णीं वृत्ताचे लक्षणगीत पुढीलप्रमाणे देतातः

तुला घे चांदणे...अंधार राहू दे मला माझा 
तुला घे फूल...हा अंगार राहू दे मला माझा 

U - -   - U -    -  -,  U - -   - U -    -  -
यमाचा राधिका गा गा, यमाचा राधिका गा गा

ह्याच वृत्तात बांधलेले जगी हा खास वेड्यांचा, पसारा माजला साराहे नाट्यपद नमुनेदार आहे.

जगी हा खास वेड्यांचा [४]

जगी हा खास वेड्यांचा, पसारा माजला सारा ।
गमे या भ्रांत संसारी, ध्रुवाचा 'वेडहा तारा ॥ धृ ॥

कुणाला वेड कनकाचे, कुणाला कामिनीकांचे ।
भ्रमाने राजसत्तेच्या, कुणाचे चित्त ते नाचे ॥ १ ॥

कुणाला देव बहकावीकुणाला देश चळ लावी ।
कुणाची नजर धर्माच्या, निशेने धुंदली भारी ॥ २ ॥

अशा या विविध रंगाच्या, पिशांच्या लहरबहरींनी ।
दुरंगी दीन दुनियेची, जवानी रंगली सारी ॥ ३ ॥


गीतः वीर वामनराव जोशी, संगीतः वझेबुवा, स्वरः मा. दीनानाथ
नाटकः रणदुंदुभी, चालः नियामत सखे आई है

तुझ्या पंखावरूनी या मला तू दूर नेशील का’ [६] हे चित्रपटगीतही ह्याच वृत्तात आहे. म्हणजे त्याचे धृवपद. हे गीत असे आहेः

तुझ्या पंखावरूनि या मला तू दूर नेशिल का? 
तुझ्या गे भावसुमनांचा मला तू गंध देशिल का? ॥ धृ ॥

गंध नवाधुंद करीहवेत हा गारवा ।
साथ तुझी, त्यात अशी, मला मिळे राजिवा ।
प्रीतीच्या, स्वप्‍नी सदा, अशीच येशील का? ॥ १ ॥

आज नवे, गीत हवे, सांगे मनोभावना ।
आज दिसे, विश्व कसे, नवे नवे लोचना! ।
नित्य असा, सांग सदा, माझाच होशिल का? ॥ २ ॥

गीतः गंगाधर महाम्बरे, संगीतः एन. दत्ता, गायिकाः उषा मंगेशकर, रविंद्र साठे [७]
चित्रपटः प्रीत तुझी माझी, सालः १९७५, भूमिकाः रमेश देव, सीमा देव

कवी यशवंत ह्यांची यशश्री पायची दासीही कविताही ह्याच वृत्तात आहे. ही कविताही आठवणीतील कवितांत दिलेली आहे. यशवंत ह्यांच्या इतर अनेक कविताही महाजालावर सहज उपलब्ध आहेत. [८]

तुझ्या हाती सुवर्णाचे मिळावे मोल मातीला ।
हिर्‍यांचे तेज ही जैसे मिळावे गारगोटीला ॥
दिसावी पावलांखाली खड्यांना तारकाकांती ।
ग्रहांचे साह्य त्या शूरा यशश्री पायची दासी ॥ धृ ॥

घनाचे गाव घालावे गळावा घाम अंगीचा ।
यशोदेवी तयांसाठी करी घे हार पुष्पांचा ॥
विषारी तीक्ष्ण काट्याची तुझ्या स्पर्शे फुले व्हावी ॥
ग्रहांचे साह्य त्या शूरा यशश्री पायची दासी ॥ १ ॥

स्वसामर्थ्ये, स्वचारित्र्ये, तुवा हे दाविता राया ।
तरी ये निंदकांच्याही मुखी वाणी अहो या या ॥
मनीषा ही जरी ठेवी मनी या खूणगाठीशी ।
ग्रहांचे साह्य त्या शूरा यशश्री पायची दासी ॥ २ ॥

ग्रहांनी कुंडलीच्या त्या, फिरावे कोष्टकांमाजी ।
परी यत्नांसी जो राजी, ठरे तो सर्वदा गाजी 
स्मरोनी आत्मकर्तव्या, प्रयत्नांची करे राशी ।
ग्रहांचे साह्य त्या शूरा, यशश्री पायची दासी ॥ ३ ॥
खरा तो एकची धर्मजगाला प्रेम अर्पावेही साने गुरूजींची विख्यात कविताही वियद्गंगा वृत्तातच आहे. [९]


खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे

जगी जे हीन अतिपतितजगी जे दीन पददलित ।
तया जाऊन उठवावेजगाला प्रेम अर्पावे ॥ धृ ॥

जयांना ना कुणी जगती, सदा ते अंतरी रडती ।
तया जाऊन सुखवावेजगाला प्रेम अर्पावे ॥ १ ॥

समस्तां धीर तो द्यावासुखाचा शब्द बोलावा ।
अनाथा साह्य ते द्यावेजगाला प्रेम अर्पावे ॥ २ ॥

सदा जे आर्त अतिविकलजयांना गांजती सकल ।
तया जाऊन हसवावेजगाला प्रेम अर्पावे ॥ ३ ॥

कुणा ना व्यर्थ शिणवावेकुणा ना व्यर्थ हिणवावे ।
समस्तां बंधु मानावेजगाला प्रेम अर्पावे ॥ ४ ॥

प्रभूची लेकरे सारी, तयाला सर्वही प्यारी ।
कुणा ना तुच्छ लेखावेजगाला प्रेम अर्पावे ॥ ५ ॥

असे जे आपणापाशी, असे जे वित्त वा विद्या ।
सदा ते देतची जावेजगाला प्रेम अर्पावे ॥ ६ ॥

भरावा मोद विश्वात, असावे सौख्य जगतात ।
सदा हे ध्येय पूजावेजगाला प्रेम अर्पावे ॥ ७ ॥

असे हे सार धर्माचे, असे हे सार सत्याचे ।
परार्थी प्राणही द्यावेजगाला प्रेम अर्पावे ॥ ८ ॥

जयाला धर्म तो प्याराजयाला देव तो प्यारा ।
तयाने प्रेममय व्हावेजगाला प्रेम अर्पावे ॥ ९ ॥


आणखी एक उदाहरण आहे कुणाला प्रेम मागावे ?ह्या कवितेचे [१०].

गीतः स.अ.शुक्ल, स्वरः मा.बसवराज

कुणाला प्रेम मागावे? जिवाचे दु:ख सांगावे?
मृगजळी का तरंगावे? कुणाला गात रंजावे? ॥ धृ ॥

तूच ना प्रीतिचा पेला, दिला पण पालथा केला?
तळमळे जीव तान्हेला, कुणासाठी जगी जगावे? ॥ १ ॥

तुझ्या शृंगारलीला या, बिचारी मोहिनी माया ।
किती आशेवरी वाया-, खुळ्या जिवास टांगावे? ॥ २ ॥

साथीचा साज विस्कटला, सूरांचा मेळ मग कुठला ।
दिलाचा दिलरूबा फुटला, कसे गाणे अता गावे? ॥ ३ ॥

कविवर्य भा.रा.तांबे ह्यांची कळा ज्या लागल्या जीवाही कविताही ह्याच वृत्तातली आहे [११].

कळा ज्या लागल्या जीवामला की ईश्वरा ठाव्या! ।
कुणाला काय हो त्यांचेकुणाला काय सांगाव्या? ॥ धृ ॥

उरीं या हात ठेवोनी उरींचा शूल का जाई? 
समुद्री चौंकडे पाणीपिण्याला थेंबही नाही ॥ १ ॥

जनांच्या कोरड्या गप्पाअसे सारे जगद्बंधू! ।
हमामा गर्जनेचा होन नेत्रीं एकही बिंदू ॥ २ ॥

नदीला पूर हा लोटेन सेतू ना कुठे नावा ।
भुतांची झुंज ही मागेधडाडे चौंकडे दावा ॥ ३ ॥

नदी लंघोनि जे गेले तयांची हाक ये कानीं ।
इथे हे ओढती मागे मला बांधोनि पाशांनी ॥ ४ ॥

कशी साहू पुढे मागे जिवाला ओढ जी लागे? 
तटातट्‌ काळजाचे हे तुटाया लागती धागे ॥ ५ ॥

पुढे जाऊवळू मागेकरू मी काय रे देवा? 
खडे मारी कुणीकोणी हसेकोणी करी हेवा! ॥ ६ ॥

गीतः भा.रा.तांबे, संगीतः वसंत प्रभू, स्वरः लता मंगेशकर, रागः देसकार
(स्वराविष्कार-विश्वनाथ बागूल)

अर्थात्‍ ह्या सर्व कविता, गाणी; प्रायः एकाच वृत्तात रचलेल्या असल्याने परस्परांच्या चालींत गाता येणार. तसा प्रयत्न करणे नेहमीच आनंददायी ठरते. त्यामुळे अर्थांच्या आस्वादाला चालींचे नवे परिमाण लाभते.

संदर्भः
१.     हे वृत्त काय आहे? - अरविंद कोल्हटकरhttp://mr.upakram.org/node/3480
२.     वृत्तांबाबत थोडेसे - प्रदीप कुलकर्णी http://www.manogat.com/node/13552
३.     धबधबा, भवानीशंकर पंडित, ’आठवणीतल्या कवितासंच क्रमांक ४
४.     जगी हा खास वेड्यांचा गाण्याचे शब्द http://www.aathavanitli-gani.com/Song/Jagi_Ha_Khas_Vedyancha
५.     ’जगी हा खास वेड्यांचा’ नाटकः रणदुंदुभी
६.     तुझ्या पंखावरूनी, या गाण्याचे शब्द http://www.aathavanitli-gani.com/Song/Tujhya_Pankhavaruni_Ya
७.     तुझ्या पंखावरूनी, या गाण्याची अधोभारणक्षम श्राव्य आवृत्ती http://mr-jatt.com/download-tals/tujhya-pankha-varuni-usha-mangeshkar.html
८.     बालभारती मराठी कविता http://balbharatikavita.blogspot.in/2010/04/blog-post.html
९.     खरा तो एकची धर्म http://www.aathavanitli-gani.com/Song/Khara_To_Ekachi_Dharma
१०.  कुणाला प्रेम मागावे? http://www.aathavanitli-gani.com/Song/Kunala_Prem_Magave

११.  कळा ज्या लागल्या जीवा http://www.aathavanitli-gani.com/song/kala_jyaa_lagalya_jeeva


२ टिप्पण्या:

mannab म्हणाले...

आपण सादर करत आहात ती एकेक वृत्ते आणि त्यावरून रचलेल्या कविता- गीते यांची ही नोंद वाचून मन भरून येते. आपल्या या व्यासंगाला (भरभरून) दाद देत आहे. असेच लिहीत राहा.
मंगेश नाबर

ऊर्जस्वल म्हणाले...

धन्यवाद नाबर साहेब,

आसमंतात रसिक आहेतच ह्या विश्वासाने लिहित आहे.

तुम्ही वाचलेत. हाही त्याचाच पुरावा आहे.

आवर्जून अभिप्राय दिल्याखातर मनःपूर्वक धन्यवाद!