२०१६-०१-२१

कवी माधव ज्यूलियन यांचा आज जन्मदिन

कवी माधव ज्यूलियन अर्थात डॉ.माधव त्र्यंबक पटवर्धन यांचा आज जन्मदिन
(जन्म : २१ जानेवारी १८९४)

देवप्रिया हे मराठी भाषेत फार मोठ्या प्रमाणात वापरले गेलेले वृत्त आहे. हे नावही श्री. माधव ज्युलियन यांनी दिलेले आहे. या अक्षरगणवृत्ताचे मात्रांच्या हिशोबात ७-७-७-५ असे उपभाग आहेत.

लक्षणगीतः
राधिका ताराप गा गा, राधिका ताराप गा
गा ल गा गा, गा ल गा गा, गा ल गा गा, गा ल गा

देवप्रियाचे उदाहरण: काही लोकप्रिय गीते
१.      
शुक्रतारा मंदवारा चांदणे पाण्यातुनी http://www.aathavanitli-gani.com/Song/Shukratara_Mand_Vara
२.    
त्या फुलांच्या गंधकोशी  http://manik-moti.blogspot.in/2010/04/blog-post_19.html
३.    
चांदणे शिंपीत जाशी चालता तू चंचले  https://www.youtube.com/watch?v=eFbJAXnhxVM

मात्र, ’देवप्रिया’ वृत्ताचे सर्वात देदिप्यमान उदाहरण म्हणजे त्यांची ’भ्रांत तुम्हां कां पडे?’ ही कविता. राष्ट्रभक्तांना आजही तेवढेच सशक्त मार्गदर्शन करणारी ही कविता एका उत्तम चालीत गाताही येते. “आपकी नजरों ने समझा, प्यार के काविल मुझे” ह्या चालीत गाऊन पाहा. कवितेतला शब्द आणि शब्द जागा होईल. त्याकरताच ही संपूर्ण कविता इथे उद्धृत करत आहे.


भ्रांत तुम्हां कां पडे?

हिंदपुत्रांनो,स्वतांला लेखिता कां बापडे? भ्रांत तुम्हां कां पडे?
वाघिणीचें दूध प्यालां, वाघबच्चे फाकडे. भ्रांत तुम्हां कां पडे? धृ

हिंदभू वीरप्रसू जी वैभवाला पावली, कां आता खालावली?
धन्यता द्याया कुशीला अंग झाडा, व्हा खडे. भ्रांत तुम्हां कां पडे?

पूर्वजांची थोरवी लाभे पुन्हा बोलून कां? झिंगुनी डोलूं नका;
लक्ष द्या चोहींकडे, द्या कालवैशिष्टयाकडे ! भ्रांत तुम्हां कां पडे?

जीर्ण त्या कैवल्यकुंडी घाण देखा माजली, डुंबता कां त्या जली?
ओज पूर्वीचे न तेथे, तीर्थ ते आता सडे. भ्रांत तुम्हां कां पडे?

ज्ञानगंगा वाहते पूर्वेकडे, घाला उड्या, अंतरी मारा बुड्या;
संपली पूर्वाग्रहांची रात्र, झाले तांबडे. भ्रांत तुम्हां कां पडे?

मोकळी ही खा हवा, चैतन्य अंगी खेळवा, आत्मशुद्धी मेळवा,
मुंडिती जे फक्त डोके तेच गोटे कोरडे! भ्रांत तुम्हां कां पडे?

श्रेष्ठता जन्मेच का ये? जातिदर्पाला त्यजा, हिंदुतेला भजा,
नेमका का भेद भासे? साम्य सारे का दडे? भ्रांत तुम्हां कां पडे?

ब्राम्हणत्वाची बढाई लाज ही वेदास हो! षड्रिपूंचे दास हो !
लोकसेवा, सत्यशुद्धी ही कराया व्हा सडे. भ्रांत तुम्हां कां पडे?

कर्मयोगी एक व्हा रे, नायकी वा पायकी, दावुनी घ्या लायकी;
खानदानीतील नादाना, करी घे फावडे. भ्रांत तुम्हां कां पडे?

जो करी कर्तव्य, घामेजूनि खाई भाकरी, धन्य त्याची चाकरी !
कर्मजा सिद्धी! न गीतावाक्य हे खोटे पडे. भ्रांत तुम्हां कां पडे?

लेखणी बंदूक घ्या वा तागडी वा नांगर, हिंदवी व्हा चाकर;
एक रक्ताचेच आहो साक्ष देई आतडे. भ्रांत तुम्हां कां पडे? १०

एकनाथाची कशी आम्हास होई विस्मृती, जो दया मानी स्मृती.
जो कडे घे अंत्यजाचे पोर तान्हे शंबडे! भ्रांत तुम्हां कां पडे? ११
संकराची बंडखोरी उभारा या ध्वजा! उन्न्ति स्वातंत्र्यजा!
राजकी वा गावकी - सारी झुगारा जोखडे! भ्रांत तुम्हां कां पडे? १२

भारताच्या राउळी बत्तीस कोटी देवता जागत्या, या पावता
मुक्तिसंगे स्वर्ग लाभे- कोण पाही वाकडे? भ्रांत तुम्हां कां पडे? १३

पोट जाळायास देव्हारे पुजारी माजवी, ईश्वराला लाजवी
चूड घ्या अन्‌ चेतवा हे रूढ धर्माचे मढे! भ्रांत तुम्हां कां पडे? १४

काय भिक्षेची प्रतिष्ठा? चैन चाले आयती, मुख्य दीक्षा काय ती?
कष्टती ते खस्त होती, पोळ साई-जोगडे. भ्रांत तुम्हां कां पडे? १५

’बुत्‌ शिकन्‌’ व्हा! ’बुत्फरोशी’ कासया बालाग्रही? भक्त व्हा सत्याग्रही!
मानिती वेड्यास साधु स्वार्थसाधू भाबडे. भ्रांत तुम्हां कां पडे? १६

आचरा शांतिक्षमा, निंदोत ते जे निंदती, संयमीला न क्षिती.
वैरबाधा खास दिव्य प्रेममंत्राने झडे. भ्रांत तुम्हां कां पडे? १७

ही अहिंसा प्रेमनीती वाटता नामर्दुमी क्षात्रता दावा तुम्ही,
सोडवा क्षेत्री लढूनी राज्यसत्तेचे लढे. भ्रांत तुम्हां कां पडे? १८

दृष्टि राष्ट्राची हवी स्वार्थातही जी नेहमी, उन्नतीची घे हमी;
जो अहिंदी त्याजला ठेवा दुरी, चारा खडे. भ्रांत तुम्हां कां पडे? १९

बंधुला हाणावयाला पत्करुनी दास्यही, शत्रु आणावा गृही
दोष हा राष्ट्रघ्न अद्यापिही देशाला नडे. भ्रांत तुम्हां कां पडे?         २०

तो असो जैचंद वा राघो भरारी वा कुणी, तो स्वराज्याचा खुनी!
हाकुनी धिक्कारुनी द्या त्यास सैतानाकडे! भ्रांत तुम्हां कां पडे? २१

बंधुलाही गांजुनी जो शत्रुगेही मोकली मूळ साक्षात तो कली!
ना गणा त्याची प्रतिष्ठा, ते विषारी रोपडे! भ्रांत तुम्हां कां पडे? २२

इच्छिता स्वातंत्र्य, द्या स्वातंत्र्य हे अन्यांसही, का न कोणा आस ही?
का गुलामांचे तुम्हा सुल्तान होणे आवडे? भ्रांत तुम्हां कां पडे? २३

’जो बचेंगे तो लढेंगे’! शूर दत्ताजी वदे, स्वामिकार्यी जीव दे,
शौर्य हे दावाल का कल्ले मिशांचे आकडे? भ्रांत तुम्हां कां पडे? २४

काळ राष्ट्रांच्या चढाओढींत लोटी खामखा, अंध ऐशाराम का?
स्वर्ग जिंका वा मही! ऐका रणीचे चौघडे. भ्रांत तुम्हां कां पडे? २५

कायदा पाळा गतीचा, काळ मागे लागला, थांबला तो संपला!
धावत्याला शक्ति येई आणि रस्ता सापडे. भ्रांत तुम्हां कां पडे? २६

जा गिरीच्या पैल जा! समृद्धि नांदे वैभवे तेथ सौंदर्यासवे;
मोकळीकीच्या मुदे उत्कर्ष तेथे बागडे! भ्रांत तुम्हां कां पडे? २७

हिंदपुत्रांनो, हिताचे ते तुम्ही हाती धरा, एरव्ही माफी करा.
शब्द माझे बोबडे अन्‌ ज्ञान माझे तोकडे, चित्त माझे भाबडे. २८

संदर्भः
१.
काव्यरचनेची लोकप्रिय वृत्ते- ०२ http://nvgole.blogspot.in/2015/10/blog-post.html#links
२.
“भ्रांत तुम्हां कां पडे?”, माधव ज्युलिअन, आठवणीतल्या कविता भाग-३, पृष्ठ-१०२ ते १०५.

1 टिप्पणी:

Unknown म्हणाले...

कोणती ही टिप्पणी नाही!हे वाचून मात्र खंत वाटते मराठी भाषा आपली माय हिला आपण वाऱ्यावर सोडली आहे. सन्माननीय डॉ. माधव ज्यूलियनांच्या इतक्या सुदर तात्विक कवितेस,श्री.नरेन्द्र गोळे आपण ऊजळा दिला.समाधान वाटले त्यांच्या कविता १०,वी ला आम्ही पाठ केल्या होत्या .मराठी असे आमुची मायबोली जरी आज ती राजभाषा नसे."मराठी माणसाची भाषिक जबाबदारी. हा निबंध लिहीताना आठवली. आपण "नामा निराळा" हे शिर्षक मोठे मार्मिक दिले आहे. धन्यवाद.
अविनाश कृ.गोळे नाशिक.
.