२०१२-०९-०३

उत्तराखंडाची सहल भाग-१: पूर्वतयारी

राजकीय अवस्था

९ नोव्हेंबर २००० रोजी, भारतीय प्रजासत्ताकाचे २७ वे राज्य म्हणून उत्तरांचलाचा जन्म झाला. तात्पुरते दिलेले उत्तरांचल हे नाव जानेवारी २००७ मध्ये बदलवण्यात आले आणि मग आजचे उत्तराखंड हे राज्य निर्माण झाले. ते दोन भागांत वसलेले आहे. वायव्येला गढवाल आणि आग्नेयेला कुमाऊँ. गढवालमध्ये हरिद्वार, डेहराडून, उत्तरकाशी, चामौली, रुद्रप्रयाग, टिहरी आणि पौडी हे सात जिल्हे आहेत. तर कुमाऊँमध्ये उधमसिंगनगर, नैनिताल, अलमोडा, बागेश्वर, पिथौरागड आणि चंपावत असे सहा जिल्हे आहेत. डेहराडून हे राजधानीचे शहर आहे [१].



या राज्याच्या उत्तरेस नेपाळ आणि चीन हे देश आहेत तर दक्षिणेला हिमाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेश ही राज्ये आहेत. एकूण ५३,४८४ वर्ग किलोमीटर क्षेत्रफळापैकी ३४,४३४ वर्ग किलोमीटर क्षेत्रफळ वनविभाग असलेले हे नैसर्गिक संपत्तीने समृद्ध असे राज्य आहे. सुमारे ९३% भाग डोंगराळ आहे तर केवळ सुमारे ७% भाग सपाटीवर वसलेला आहे.

नैसर्गिक अवस्था

भागिरथी (गंगा), अलकनंदा, मंदाकिनी, पिंढारी, तोन्स, यमुना, काली, न्यार, भिलंगन, शरयू आणि रामगंगा ह्या नद्या राज्यातून वाहतात. थोडक्यात काय, तर गंगा-यमुनेच्या खोर्‍यांचे डोगराळ भागातून मैदानी भागात अवतरण होते तेच हे विख्यात स्थान आहे. गहू, तांदूळ, बार्ली, मका, मंडुआ, हंगोरा इत्यादी पीके इथे घेतली जातात. सफरचंद, लिची, आलुबुखार, नास्पती इत्यादी फळेही इथे होत असतात. चुनखडी, मॅग्नेसाईट आणि जिप्सम ही खनिजे इथे प्राप्य आहेत.  इथे कुमाऊँनी, गढवाली आणि हिंदी ह्या भाषा बोलल्या जातात. ह्या राज्याच्या अधिकृत भाषा हिंदी आणि संस्कृत ह्या आहेत [२]. मार्च महिन्यापासून जूनच्या मध्यापर्यंत उन्हाळा असल्याने हाच काळ इथल्या पर्यटनास सोयीचा असतो.

नैनिताल, मसूरी, पौडी, अलमोडा, रानीखेत, किर्सू, चंपावत, दयरा, औली, खटलिंग, वेदिनी बुग्याल, व्हॅली ऑफ फ्लॉवर्स, लॅन्सडॉन, लखमंडल पाताळ-भुवनेश्वर, गंगोलीहाट, जोलजीवी, कतारमाल, कोसिनी, जागेश्वर, द्वारहाट, सोमेश्वर, बैजनाथ, पिंढारी हिमनद इत्यादी पर्यटन स्थळे येथे आहेत. शिवाय, बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री, पंचकेदार, पंचबद्री, पंचप्रयाग, हरिद्वार, हृषीकेश, हेमकुंडसाहिब, रेठ्ठासाहिब इत्यादी तीर्थक्षेत्रेही इथे भेटीस सिद्ध आहेत. इथे झुमालो, थड्या, चौन्फ्ला, रसौ, पंडवाना, तांडी, भादगीत, जागर, चांचरी, छोलिया इत्यादी लोकगीते वा लोकनृत्य लोकप्रिय आहेत.

पौराणिक संदर्भ

कुमारसंभवात महाकवी कालिदास म्हणतातः

अस्त्युत्तरस्यां दिशि देवतात्मा हिमालयो नाम नगाधिराजः।
पूर्वापरौ तोयनिधीवगाह्य स्थितः पृथिव्या इव मानदण्डः॥

म्हणजे उत्तर दिशेला देवतांचा आत्माच असलेला हिमालय नावाचा पर्वत आहे. पृथ्वीचा जणू मानदंडच असलेला, पूर्वापार चालत आलेला हा जलनिधी आहे.

स्कन्द पुराणात हिमालयाचे पाच भौगोलिक भाग सांगितले आहेत.

खण्डाः पञ्च हिमालयस्य कथिताः नैपालकूमाँचलौ।
केदारोऽथ जालन्धरोऽथ रूचिर काश्मीर संज्ञोऽन्तिमः॥

अर्थात्‌ हिमालय क्षेत्रात नेपाळ कुर्मांचल (कुमाऊँ) केदारखण्ड (गढ़वाल) जालन्धर (हिमाचल प्रदेश) आणि सुरम्य कश्मीर असे पाच भाग आहेत [३]. पौराणिक ग्रंथांत कुर्मांचल क्षेत्रास मानसखण्ड या नावानेही पसिद्धी प्राप्त झालेली होती. त्यांत उत्तर हिमालयात सिद्ध, गन्धर्व, यक्ष, किन्नर, इत्यादी जातींची, सृष्टी असून तिथला राजा, कुबेर, असल्याचे सांगितले आहे. कुबेराची राजधानी अलकापुरी असल्याचे सांगितले आहे. शैक्षणिक वारसा पुराणांनुसार कुबेराच्या राज्यात, ऋषि-मुनि तप व साधना करत असत. म्हणून ह्या क्षेत्रास देव-भूमी किंवा तपोभूमी समजले जाते. उत्तराखंड ही वेद, शास्त्रे व महाभारत जिथे रचले गेले ती पुण्यभूमी आहे. सुदैवाने अर्वाचिन काळातही उत्तराखंड, तपःसाधनेची भूमी बनून राहिलेली आहे. हृषीकेशला आजमितीसही योगसाधनेकरताची जागतिक राजधानी मानले जाते. स्वामी रामदेव यांचे पतंजलि योगपीठ आणि दिव्ययोग मंदिरही उत्तराखंडातच हरिद्वार येथे आहे.

भारतीय प्रशासकीय-अधिकाऱ्यांकरिता लाल-बहादूर-शास्त्री नॅशनल-ऍकॅडमी-ऑफ-ऍडमिनिस्ट्रेशन
मसुरी ही संस्था १९५९ मध्ये प्रस्थापित करण्यात आली. भारतातील सर्वात जुनी (१८४७) अभियांत्रिकी संस्था उत्तराखंडातील रूरकीमध्ये आहे. डेहराडून येथे भारतीय लष्करी अकादमी आहे. तसेच भारतीय वनसंशोधन [४] संस्थाही डेहराडूनमध्ये प्रतिष्ठित आहे. ही संस्था मुळात (१८७८ मध्ये) ब्रिटिश इंपिरिअल फॉरेस्ट स्कूल म्हणून स्थापन झालेली विख्यात संस्था आहे. भारतीयांना ज्या शैक्षणिक संस्थांचा अभिमान वाटावा अशा ह्या अग्रगण्य संस्था हल्लीच्या उत्तराखंडातच स्थित आहेत.



वन-संशोधन-संस्था, डेहराडून



मे महिन्यातील उत्तराखंडातील सरासरी हवामान



वरील आलेखावरून, सर्वसामान्य मुंबईकरास, कमाल किमान-तापमान आणि किमान-पर्जन्य वृष्टीचा काळ सोयीचा असल्याचे दिसते. यास्तव मे महिन्याचा पूर्वार्धच ह्या सहलीकरता निवडला होता [६]. मुंबई नैनिताल हा एकूण सुमारे २०-२५ तासांचा एकतर्फी प्रवास करावा लागणार असल्याने निदान दोन दिवस तरी प्रवासातच खर्ची पडणार होते. त्यामुळे सहलीचा एकूण कालावधी त्याच्या किमान पाचपट असल्याखेरीज आर्थिकदृष्ट्या तो काटकसरीचा ठरला नसता. मात्र, साधारण दहा दिवसांनंतर सहल एकसुरी आणि क्वचित कंटाळवाणीही होऊ शकत असल्याने सहलीचा कालावधी अंदाजे दहा दिवसांचा ठरवला. जाता-येता दिल्लीवरूनच प्रवास करायचा असल्याने किमान एका वेळेस तरी अक्षरधाम बघण्याचे नक्की केले. मे महिना असल्याने, दिल्लीला इतर पर्यटन करण्याचा मोह टाळणेच श्रेयस्कर होते. कारण मे महिन्यात दिल्लीचे तापमान शिगेला पोहोचलेले असते. शिवाय या काळात दिल्लीला धुळीची वादळे आणि लू लागण्याची भीतीही असतेच. मग पाहण्याची स्थळे नक्की केली. नैनिताल आणि मसूरी आधीच पक्की होती. त्यात अभयारण्य असावे म्हणून कॉर्बेटचा समावेश केला. हरिद्वार आणि हृषीकेश ह्यांचीही त्यात भर पडली. घरचे आम्ही चौघेच जाणार. त्यामुळे समूहासोबत सहलीचा आनंद साजरा करणे शक्य व्हावे म्हणून, पर्यटक संस्थेसोबत जाण्याचा विचार आला. केसरी, सचिन इत्यादींचे सहल कार्यक्रम तपासून आमच्या अपेक्षा अधिकाधिक पूर्ण करेल आणि काटकसरीचाही ठरेल असा सचिनच्या नैनिताल सहलीचा कार्यक्रम नक्की केला. मात्र, त्याची नोंदणी लगेचच केली नाही. नोंदणी मिळण्याची खात्री केली. मुंबई-दिल्ली व दिल्ली-मुंबई ऑगस्ट क्रांती राजधानीने प्रवासाची तिकिटे आरक्षित केली आणि मगच सचिनकडे नोंदणी केली. आता आमचा कार्यक्रम निश्चित झालेला होता.

संदर्भः

१. गढवाल-मंडल-विकास-निगम-लिमिटेडचे अधिकृत संकेतस्थळ
२. उत्तराखंड सरकारचे अधिकृत संकेतस्थळ
३. मेरा पहाड डॉट कॉम हे संकेतस्थळ
४. जंगलची वाट, डॉ.आनंद मसलेकर, भारतीय वनसेवा, माजी प्रधान मुख्य वन संरक्षक, महाराष्ट्र राज्य, काँटिनेंटल प्रकाशन, प्रथमावृत्तीः २००४, किंमत रु.२००/- फक्त.
५. उत्तराखंडावरचे विकिपेडियावरील इंग्रजी पान
६. सरासरी हवामान देणारे एक संकेतस्थळ
.

४ टिप्पण्या:

अनामित म्हणाले...

पूर्वापरौ तोयनिधी वगाह्य - पूर्वापार चालत आलेला हा जलनिधी आहे.
---
मूळ शब्द निधि, निधी हे द्‌वि-वचन. पूर्व-अपर (पश्चिम) या दोन दिशा, म्हणून पुन्हा 'पूर्वापरौ' हे द्‌विवचन. दूरवरून पूर्वेकडचा बंगालचा (उप)समुद्र आणि पश्चिमेचा सिन्धुसागर यांपर्यन्त नज़र ज़ाऊ शकून त्यांना पाहणारा असा हा हिमालय ज़णू पृथ्वीचा मानदंडच आहे.

- नानिवडेकर

अनामित म्हणाले...

Can't type in Marathi easily right now, but I checked for the exact meaning of 'vagaahya', and it is lyabant of ava+gaah dhaatu, whose meaning is given to be: to bathe in. Not sure how this meaning fits. I would expect nidhi's saptami to be used. Even dviteeya is okay but still I wonder how Himalaya can bathe in the two oceans. Some websites say that Kalidas is suggesting that it is spread all the way to the oceans. And gaahati -> ranges over.

Also, devataatmaa = devataa-swarup, not the Gods' aatmaa.

नरेंद्र गोळे म्हणाले...

नानिवडॆकर साहेब, नमस्कार,

आपल्या सविस्तर प्रतिसादांखातर मनःपूर्वक धन्यवाद!

Naniwadekar म्हणाले...

नरेन्द्रराव - आपल्या अनुदिन्यांचा 'वाचावे नेटके' सदरातला परिचय वाचला, आणि तो फार आवडला. जिथे टीका हवी तिथे सौम्य का असे ना, पण टीका केली आहे. आणि जी भरभरून दाद दिली आहे, तिला आपण माझ्या मते पूर्ण पात्र आहात. तो हिमालय दोनच दिशांना पाहतो, पण ब्लॉगजगतावर चौफेर दृष्टी ठेवणारे, आणि तरी तिथे दाबून भरलेल्या फालतूपणापासून कुणाचे शत्रुत्व न ओढवून घेत दूर असलेले, असे तुम्ही मानदंड आहात, असे म्हणायला हरकत नसावी.

आपल्या 'आरोग्य आणि स्वस्थता' (http://aarogyasvasthata.blogspot.com/) या अनुदिनीच्या मुखपृष्ठावरची एक चूक मी मागल्या महिन्यात निदर्शनाला आणली होती, पण ती दुरुस्ती तुमच्यापर्यन्त पोचली नसेल वा यथायोग्य बदल करायला तुम्हाला वेळ मिळाला नसेल.

न त्वहं कामये राज्यं न स्वर्गं न पुनर्भवं । कामये दुखतप्तानां‌ प्राणिनां आर्तिनाशनम्‌ ॥ --
हा श्लोक: न त्वहं कामये राज्यं न स्वर्गं नापुनर्भवम्‌ । कामये दु:खतप्तानां प्राणिनामार्तिनाशनम्‌ ॥ असा आहे.
यात श्लोककर्त्यानी एक छान युक्ती वापरली आहे. तो 'न पुनर्भवम्‌' न म्हणता 'नापुनर्भवम्‌' म्हणतो. अ-पुनर्भव म्हणजे चौर्‍यांशीच्या फेर्‍यातून मुक्ती, म्हणजे मोक्ष. पण श्लोककर्त्याला दुरितांचे तिमिर ज़ाण्याच्या महत्त्वापुढे 'न-अपुनर्भवम्‌ इच्छामि' , म्हणजे तो मोक्षही क्षुद्र वाटतो.

तेव्हा 'नको राज्य, नको स्वर्ग, पुनर्जन्म नको मला' ऐवजी 'मोक्षही नको मला' असे तो रचनाकार म्हणतो आहे.

- डी एन