२०१२-०४-०४

हिताची निगा किती करावी?


 
हा पर्जन्य वृक्षाच्या कटघराचा, १ एप्रिल २०१२ रोजी सकाळी सात वाजताच्या सुमारास काढलेला, आजदे गावातील डॉ.नानासाहेब धर्माधिकारी मार्गावरील फोटो आहे.

हा रस्ता कदाचित डोंबिवलीतील सर्वात सरळ, सर्वात लांब व रुंद असलेला आणि दोन्ही बाजुंनी सुव्यवस्थित वृक्षारोपण केलेला सुंदर रस्ता आहे. आजदे ग्राम-पंचायतीने रस्त्याकाठच्या वृक्षांची उत्तम काळजी घेतलेली दिसून येते. त्यामुळेच सकाळ, संध्याकाळ फिरायला जाण्यास डोंबिवलीत रस्ता शोधायचा झाल्यास मी तरी ह्याचीच निवड करेन.

तिथल्या, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अनेकविध उद्योगांना दिलेल्या खुल्या धोरणांमुळे झालेल्या प्रच्छन्न वायूप्रदुषणाबद्दल आता आपण बोलू नको या. त्या रस्त्याच्या कडेने वाहणार्‍या डोंबिवलीतील सांडपाण्याच्या भव्य नाल्यातील जलप्रदूषणाची चर्चा, आपण आता नको करू या. कारण ही वेळ फक्त अति-काळजीने पडणार्‍या विकासावरील निर्बंधांचीच चर्चा करण्याची आहे.

मला कदाचित माहितही नसेल, पण रस्त्याकाठच्या वृक्षारोपणात स्वाध्याय परिवारानेही मोलाचे योगदान दिलेले असू शकेल. रस्ता झाला. सुरेख झाला. किनार्‍याला वृक्षारोपण झाले. चांगले झाले. पांथस्थांना सावली झाली. रस्त्यावरल्या काजळीचा उपयोग करून गर्द सावली वाढवणारी झाडे झाली. मात्र झाडांच्या रोपांना लावलेली कटघरे काढायचीच राहिली. बर्‍याच झाडांची कटघरे, कदाचित झाडांनीच झुगारून दिली असावित. त्यांना झेपली नाहीत, ती डबा-बाटली-पत्रा-पेटी वाल्यांनी सोडवून नेली असावित. आता उरलेले, न काढलेले कटघर हे एकलेच आहे.

आपण आपल्या मुलाबाळांना खूप सुरक्षित वातावरणात वाढवतो. स्वतःची सुरक्षा करण्यास त्यामुळेच ती कधीकधी अयशस्वी ठरतात. पुण्यातील शुभम शिर्केचे उदाहरण याबाबतीत डोळे उघडणारे आहे. मित्रांनी फोनवरून बाहेर बोलावून घेतले, तेव्हा जाण्याचा निर्णय घेण्यास तो समर्थ होता. मात्र बाहेर पडल्यावर स्वतःची सुयोग्य काळजी तो घेऊ शकला नाही. त्याच्याच मित्रांनी खंडणी मिळवण्याच्या उद्देशाने त्याचा निर्घूण खून केला! मुले निर्णय घेण्यास समर्थ होतात, तेव्हा त्यांना त्या निर्णयाच्या पर्यवसानांनाही सामोरे जाण्याची सवय असावी लागते, व्हावी लागते. त्यातून सहिसलामत सुटका करण्याचे कौशल्यही प्राप्त करून घ्यावेच लागते. याकरताच, उबदार घराच्या संरक्षणाची कटघरे योग्य वेळीच मोकळी करणे आपण शिकून घ्यायला हवे आहे.

अशी कटघरे कदाचित आपल्याही पाहण्यात असतील. प्रत्यक्षात आपल्या डोळ्यांना दिसलेली कटघरे ओळख पटवून सांगताही येतील कदाचित. मात्र आपल्या वर्तनात, आपणच बांधलेली अशी कटघरे काढायची राहून गेलेली असतील तर मात्र सावध व्हा. ताबडतोब सुयोग्य कृती करा आणि जे आपण जपू, वाढवू इच्छितो त्याच्या विकासाचा मार्ग मोकळा करा.

अशी कटघरे कुठवर द्यावी, निकोप वृद्धी न आकसावी !
हिताची निगा किती करावी? जरूर सरता निगा नुरावी !
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: