डॉ.वर्घिज कुरिअन हे “ऑपरेशन फ़्लड” ह्या जगातील सर्वात मोठ्या दुग्ध-विकास-कार्यक्रमाचे शिल्पकार आहेत. भारतातील दुग्ध-क्रांतीचे जनक आहेत. त्यांनीच भारताला जगातला सर्वात मोठा दुग्धोत्पादक देश बनवले. भारत देशाने त्यांना पद्मश्री (१९६५), पद्मभूषण (१९६६) आणि पद्मविभूषण (१९९९) या पदव्या देऊन गौरवान्वित केले आहे. तर सामाजिक नेतृत्वाकरता मेगॅसेसे (१९६३) आणि जागतिक-अन्न-पारितोषिक (१९८९) मिळवून ते जगभरातील सगळ्यांकरता लोकोत्तर ठरले आहेत. अमूल उद्योग समूहाचे ते अग्रणी आहेत.
आज त्यांचा ९० वा जन्मदिन. त्यांच्या अनन्यसाधारण कर्तुत्वास माझा सादर प्रणाम. त्यांना उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो हीच प्रार्थना!
२६ नोव्हेंबर १९२१ रोजी केरळामधील कालिकत येथे वर्घिज पुथेनपुरक्कल कुरिअन यांचा जन्म झाला. उच्च साक्षरतादर असलेल्या सिरिअन ख्रिश्चन समाजात ते वाढले. ख्रिश्चन मिशनरी शाळेत शिकले. टेनिस, बॅडमिंटन, क्रिकेट आणि बॉक्सिंग इत्यादी मैदानी खेळांत त्यांनी कॉलेजचे प्रतिनिधित्व केले. स्वभावाने नास्तिक. लष्करात भरती होण्याची त्यांची इच्छा होती. मात्र ते २१ वर्षांचे असतांना त्यांचे वडील गेले आणि आई त्यांना लढाईवर जाऊ देण्यास तयार नव्हती, म्हणून ते लष्करात दाखल होऊ शकले नाहीत. चेन्नईतील लॉयोला कॉलेजमधून ते १९४१ साली भौतिकशास्त्रात पदवीधर झाले. १९४४ साली चेन्नई विद्यापीठातून ७व्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन अभियंत्रज्ञ झाले. १९४६ मध्ये जमशेदपूर येथील टिस्कोमधून त्यांनी अभियांत्रिकीतील एक विशेष अभ्यासक्रम पूर्ण केली. १९४८ मध्ये मिशिगन-स्टेट-युनिव्हर्सिटीतून त्यांनी अभियांत्रिकीतील “मास्टर्स इन सायन्स” ही पदयुत्तर पदवी प्राप्त केली. तिच्याकरता आण्विक अभियांत्रिकी आणि धात्विकी हे त्यांचे प्रमुख विषय होते. ही पदवी त्यांनी दुग्ध-विकास-अभियांत्रिकीतील विशेषज्ञतेसहित प्राप्त केलेली होती. मग त्यांनी राष्ट्रीय-दुग्धविकास-संशोधन-संस्था, बंगलोर येथून दुग्धविकास-अभियांत्रिकीतील विशेष प्रशिक्षण प्राप्त केले.
४ जानेवारी १९४६ रोजी काइरा जिल्ह्यातील समरखा येथे झालेल्या शेतकरी संमेलनाच्या फलस्वरूप, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या सल्ल्यावरून मोरारजी देसाई यांनी, कुरियन यांना, बेभरवशाच्या दुध-व्यापार्यांविरुद्ध लढण्याकरता पाचारण केले. बॉम्बे-मिल्क-स्किम ह्या सरकारी संस्थेस मग काइरातले शेतकरी थेट दूध पुरवू लागले. १९५५ मध्ये “अमूल”चा उदय झाला. इथे दुग्धोत्पादन, संकलन आणि विक्री या सर्वांवर शेतकर्यांचेच पूर्ण नियंत्रण असे. यामुळे शेतकर्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळाले. १ कोटी शेतकरी आणि ८१,००० सहकारी संस्था यांच्या संगमातून घडलेल्या अमूलला, दरसाल २,४०० कोटी रुपये उत्पन्न मिळू लागले. जागतिक अधिकोषाने पुरवलेल्या केवळ २०० कोटी भांडवलावर एवढे उत्पन्न मिळू लागले. युरोपिअन किंवा अमेरिकन बाजारातल्या भावापेक्षा ४०% खर्चात दूध निर्माण होऊ लागले. अमूल पॅटर्न/ आणंद पॅटर्न म्हणून ह्याचा भरपूर बोलबाला झाला.
कुरिअन म्हणतातः
१. “लोकांवर दबाव आणून किंवा त्यांना केवळ दायित्व देऊन संशोधन साधता येत नाही. लोक आणि परिस्थिती यांच्या गुणवत्तेवरच हे सारे घडत असते. पुरेसे कुशल लोक स्वयं-कार्यान्वित परिस्थितीतून पुढे यावे लागतात, तेव्हाच कुठे संशोधन साधता येते!”
२. “मी मांजरीसारखा आहे. कसेही फेका. मी पायांवरच उभा राहेन.”
३. “आठ तास डेअरीकरता, आठ तास कुटुंबाकरता आणि आठ तास झोप.”
४. “माझे जीवनाचे तत्त्वज्ञान हे आहे की, जे कमी सुदैवी आहेत त्यांच्याकरता जे जे चांगले करणे शक्य असेल ते ते सर्व करा. मात्र, माझे स्वतःचे आयुष्य मी सामान्य माणसाप्रमाणे जगणेच पसंत करेन!”
कुरियन यांनी शेतकर्यांना काम देण्याऐवजी त्यांना संघटित केले. नोकरशहा, मंत्री, प्रस्थापित संस्था इत्यादींसोबत शेतकर्यांच्या हिताकरता लढा दिला. त्यांनी शेतकरी जणू देवच मानला. गुणवत्ता, पैशाचे पूर्ण मूल्यदान, सदोदित उपलब्धता आणि उत्तम सेवा यांचे आधारे त्यांनी अमूलला यशोशिखरावर चढवले. लोकच मग “अमूल द टेस्ट ऑफ इंडिया” म्हणू लागले. मानू लागले.
संदर्भः
१. http://www.amul.com/
२. http://www.slideshare.net/leo/milkman-of-india-varghese-kurien
३. http://www.iloveindia.com/indian-heroes/verghese-kurien.html
.
४ टिप्पण्या:
आपण लिहिलेला कुरियन यांच्यावरील लेख आवडला. आपण त्यांच्या २६ नोव्हेंबर या वाढदिवसाऐवजी 'जन्मदिन' हा शब्द वापरलात. birthday या इंग्रजी शब्दाचे ते सरळ भांषांतर असावे. पण 'वाढदिवस' हा शब्द अधिक अर्थपूर्ण नाही का वाटत ?
मंगेश नाबर
'वाढदिवस' हा शब्द अधिक अर्थपूर्ण नाही का वाटत ?>>>
नाही! त्याचाही अर्थ तदर्थच नाही का?
मात्र, वाढदिवस म्हणायचा तर तो ८९ वा ठरला असता!
मला एकदा 'अमूल'पहायची संधी मिळाली होती आणंदच्या भेटीत. त्यांनी उभ केलेल काम पाहून त्यांच्याबद्दल आदर वाढला आहे माझा. त्यांच आत्मचरित्रही (I too had a dream) प्रेरणादायी आहे.
मला अजूनपर्यंत अमूल पाहण्याची संधी मिळालेली नाही. मात्र त्याचे आत्मचरित्र मी वाचलेले आहे. त्यातून उदिष्टाप्रतीचा त्यांचा ध्यास ठायी ठायी जाणवत राहतो.
टिप्पणी पोस्ट करा