२०११-११-११

मेरी स्तोत्र

नव्यानेच सुरू झालेल्या ’ऐसी अक्षरे’ या संकेतस्थळावर, http://www.aisiakshare.com/node/173 या दुव्यावर “हजारो वर्षांपूर्वी लिहीलेल्या स्तोत्रांचा साठा करण्यापेक्षा मला महत्त्वाचे वाटतात ‘आजचे आदर्श’. आधुनिक ऋषि-मुनि आणि देव - आयझॅक न्यूटन, चार्ल्स डार्विन, मारी क्यूरी, महात्मा गांधी आणि अगदी सचिन तेंडूलकरसुद्धा! तर हा धागा आहे आजच्या काळाच्या आदर्शांबद्दल काही लिहीण्याचा. फक्त एकच अट आहे, हे लिखाण करायचं ते स्तोत्रांच्या स्वरूपातच. ” - ३_१४ विक्षिप्त अदिती (Tue, 08/11/2011 - 22:12) असे आवाहन दिसले! ७ नोव्हेंबर हा मेरी क्युरीचा जन्मदिन होता. म्हणून मी "मेरी स्तोत्र" लिहायला घेतले. तिच्या काही ठळक वैशिष्ट्यांचा समावेश करून तयार केलेले तेच हे "मेरी स्तोत्र". मेरीच्या लोकोत्तर गुणांना, ते उजागर करते!



मेरी क्युरी
(७ नोव्हें. १८६७, वॉर्सा, पोलंड-४ जुलै १९३४, सॅव्हॉय, फ्रान्स)

जन्मगाव वॉर्सा, मुळी वारसा न फारसा ।
तरीही उजळलीस तू, मेरी किरण-अर्जिता१ ॥ धृ ॥

उदय२ गोंधळात ना, म्हणून त्यजशी देश ना ।
कष्ट काढले जिथे ती, कर्मभूमी फ्रान्स ना ॥ १ ॥

रुचसी शिक्षकास३ तू, पियरेस कांक्षसीही तू ।
शोधवेड साधण्या, वरशीही लग्नगाठ तू ॥ २ ॥

’किरणे युरेनियमची४’ ती, विषय कठीण मानती ।
निवडसी तयास तू, तुला न वाटते क्षिती ॥ ३ ॥

“मी” म्हणत थंडी ये, नळात पाणी गोठते ।
उबेस कोळसा५ नसे, तरी ज्ञानभक्ती तेवते ॥ ४ ॥

प्रखर युरेनियमहुनी, जे द्रव्य किरण सोडते ।
शोधण्या तयास, सकल मूलद्रव्य६ हुडकते ॥ ५ ॥

गवसले असेही द्रव्य, किरण दिव्य सोडते ।
’पोलोनियम७’ म्हणून ती देशाभिमान दावते ॥ ६ ॥

पिचब्लेंड८मधून आगळे मग द्रव्य आढळे नवे ।
प्रारणे सशक्त, दिप्ती लक्षगुणित जाणवे ॥ ७ ॥

हे ’रेडियम९’ नवेच द्रव्य, दिप्ती दूर फाकते ।
टनात खनिज चाळता, लघुग्रॅम फक्त हाती ये ॥ ८ ॥

शोध लावला म्हणून, लाभले ’नोबेल१०’ही ।
शोधते कसे जनांस उपयुक्त ते ठरेल, ही ॥ ९ ॥

अकस्मात, चालता पियरेस देत धडक११ एक ।
वाहने उजाडले तिचे आयुष्य विरह देत ॥ १० ॥

आयरीन१२ गुणी खरीच, किरणोत्सार घडवते ।
ईव्ह धाकटी, पियानो, जन-रंजनास वाजवे ॥ ११ ॥

उपचार१३ दिप्तीचेही ती, शोधण्यास राबली ।
’नोबेल’ लाभले पुन्हा, दिगंत कीर्ती जाहली ॥ १२ ॥


१ अर्जिले किरणांस जिने ती, किरण-अर्जिता
२ वॉर्सा त्याकाळी रशियाच्या गुलामगिरीत कितपत असल्याने, देशात उदय होणे कठीण असे वाटून मेरी स्क्लोडोवस्का हिने पोलंड हा स्वदेश सोडला होता. ती चरितार्थ चालवण्याकरता तसेच शोधजिज्ञासा शमवण्याकरता फ्रान्समधे स्थलांतरित झाली होती.
३ पिअरे क्युरी या भौतिकशास्त्राच्या प्राध्यापकांना, मेरी तिच्या कष्टाळू आणि जिज्ञासूवृत्तीमुळे आवडू लागली. तिलाही ते आवडत असत. परस्परपूरक वैज्ञानिक काम करत राहिल्याने, पुढे त्यांच्यात प्रेम होऊन, मग त्यांचे लग्न झाले.
४ मेरीने युरेनियमची किरणे हा अवघड विषय अभ्यासाकरता निवडलेला होता.
५ मेरी क्युरीची गोष्ट हाडे गोठवणार्‍या थंडीत चौथ्या मजल्यावर कोळसा वाहून नेऊन ती ऊब मिळवत असे. तोही संपला की असतील नसतील ती कापडे गुंडाळून कुडकुडत बसावे लागे. तरीही तिची शिकण्याची जिद्द उणावली नाही.
६ अनेक मूलद्रव्यांची छाननी करून मेरीने किरणोत्सारी मूलद्रव्ये वेगळी काढली होती.
७ सर्वप्रथम ज्या किरणोत्सारी मूलद्रव्याचा शोध तिने लावला त्यास तिच्या मायदेशाच्या नावावरून त्यांनी ’पोलोनियम’ हे नाव दिले.
८ हे युरेनियमचे प्रख्यात असलेले खनिज आहे. युरेनियम काढून घेतलेल्या पिचब्लेंडमध्ये अथक परिश्रमानी शोध घेऊन मेरीने पोलोनियम हुडकून काढले.
९ पुढे पोलोनियमपेक्षाही अधिक सक्रियता पिचब्लेंडमध्ये आढळून आली. तेव्हा रेडियमचा शोध लागला.
१० पोलोनियम आणि रेडियमच्या शोधाखातर मेरी क्युरी आणि तिचे पती पिअरे क्युरी यांना १९०३ सालचे नोबेल पारितोषिक, नैसर्गिक किरणोत्सर्जनाचा शोध लावणार्‍या हेन्री बेक्वेरल यांचेसोबत विभागून मिळाले होते.
११ या अपघातात पियरे यांचा मृत्यू झाला.
१२ ही क्युरी दंपत्याची मोठी मुलगी. कृत्रिम किरणोत्सर्जनाचा शोध लावल्याखातर हिला १९३५ सालचे रसायनशास्त्राचे पारितोषिक मिळाले होते.
१३ मेरीने पियरे यांच्या पश्चात किरणोत्साराचे वैद्यकीय उपयोग आणि तत्संबंधित कायदे यांचा व्यासंगी अभ्यास केला होता. तिच्या ह्या कामाची पावती म्हणून किरणोत्साराच्या अभ्यासाखातर तिला १९११ सालचे रसायनशास्त्राचे पारितोषिक मिळाले होते.
.

1 टिप्पणी:

mannab म्हणाले...

अत्यंत प्रवाही आणि अर्थगर्भ कविता. मेरी क्युरीचे समग्र चरित्र वाचले होते,असे नव्हे, तर अन्य कुणालाही बोध व्हावा अशी कविता.योग्य तेथे टिपा दिल्या आहेत, त्यांचा उपयोग केल्यास अधिक चांगले. अशीच कविता एकेका संशोधकावर वाचण्यास मिळाव्यात अशी आशा व्यक्त करतो.

मंगेश नाबर.