सद्य शालेय शिक्षणाचा नव्याने विचार होणे गरजेचे आहे असे मला वाटू लागले, त्यावेळपासून, मी ते कसे असावे याचा विचार करत आहे. प्रचलित शिक्षण प्रणालीवर टीका करणे सोपे आहे, मात्र त्यात कसकसे बदल घडवायला हवे आहेत याचा त्रयस्थपणे विचार करून बदल सुचविण्याची प्रक्रिया कुठेही होतांना दिसली नाही. दरम्यान मी जो विचार केला तोही केव़ळ माझ्यापुरताच सीमित राहिला. म्हणून तो विचार इतरांना कळवावा, तसेच या विषयावर विधायक चर्चा व्हावी ह्या अपेक्षेने हे इथे लिहीत आहे.
मनुष्यापाशी सात प्रकारच्या जन्मजात प्रज्ञा असतात. त्यांचा वापर करून निरनिराळ्या सात प्रकारची कौशल्ये विकसित करणे शक्य असते.
१. भाषा कौशल्य: आपल्या भाव-भावना, संवेदना, विचार, संकल्पना, आशा-आकांक्षा, अपेक्षा, संदेश, संकेत; इतर मनुष्यप्राण्यांस समजावून देण्याचे म्हणजेच बोलून संवाद साधता येण्याचे कौशल्य.
२. गणितीय कौशल्य: आसपासच्या वस्तू, त्यांचे परिमाण, आकार-प्रकार, संगती-विसंगती, तुलनात्मक निदान, तुलनात्मक प्रमाण; या सार्यांचे सापेक्ष गणन व मापन करता येण्याचे कौशल्य. तर्ककौशल्य.
३. शारीरिक कौशल्य: शारीरिक हालचाली करण्याचे कौशल्य. यात आसन, प्राणायाम, व्यायाम, खेळ, वाद्यवादन, नृत्य, निरनिराळ्या कसरती करण्याचे कौशल्य यांचा समावेश होतो.
४. सांगितिक कौशल्य: शब्द, स्वर, नाद, ताल, ठेका, गत, लय, गीत, संगीत यांचे ज्ञान, त्यांची निर्मिती, आस्वाद, वर्णन, विश्लेषण, चिकित्सा, अभ्यास, आराधना आणि परस्परांत विनिमय करण्याचे कौशल्य.
५. कला कौशल्य: चित्रकला, हस्तकला, शिल्पकला, कुंभारकला, चांभारकला, कासारकला, विणकाम, शिवणकला, पणन-विपणन कला, इत्यादी अनेकानेक कौशल्यांचा समावेश होत असतो.
६. व्यक्ती विषयक कौशल्य: इतर व्यक्तींशी सुसंवाद साधण्याचे कौशल्य. यात प्रेम, मैत्री, नातेसंबंध, कौटुंबिक संबंध तसेच परस्परपूरक संबंध यांचा समावेश होतो.
७. समष्टी विषयक कौशल्य: व्यक्तीव्यक्तींत संघटन घडवून आणण्याचे कौशल्य. यात व्यवस्थापन, प्रशासन, समाजकारण, राजकारण, अर्थकारण, लोककारण, देशकारण, विश्वकारण इत्यादींचा समावेश होतो.
या कौशल्यांत सर्व पाचही म्हणजेच डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा या ज्ञानेंद्रियांचा उपयोग केला जात असतो. रूप, शब्द, गंध, रस आणि स्पर्श या माहितींचे संकलन केले जात असते. ज्ञानेंद्रियांचा उपयोग करून मिळवलेल्या ज्ञानाची चिकित्सा आणि विश्लेषण तर्कसंगतीने केले जात असते. इतरांसोबत त्या ज्ञानाचा परस्पर विनिमयही केला जात असतो. प्राप्त ज्ञानास अभिव्यक्त करण्याकरता, त्याच्या विनिमयार्थ, लिहीण्या-वाचण्याची अतिरिक्त कौशल्येही हल्लीच्या युगात प्राप्त करूनच घ्यावी लागत असतातच.
या कौशल्यांचा वापर सर्वप्राणीमात्रांच्या सामुदायिक हिताकरता करण्याच्या प्रेरणेमुळे समाज व संस्कृती यांचा उदय होतो. अशा समाज व संस्कृतीचा सूज्ञ नागरिक घडवायचा असेल तर शालेय शिक्षण, वरील कौशल्यांचा विकास करण्याखातर संकल्पित केलेले असायला हवे. मात्र हल्लीचे शालेय शिक्षण, भाषा व गणितीय कौशल्यांना अवास्तव महत्त्व देऊन संकल्पित केलेले दिसून येते. शारीरिक, सांगितिक आणि कलाविषयक कौशल्यांचा, शालेय शिक्षणात अलीकडेच, केवळ वैकल्पिक कौशल्ये म्हणून होत असलेला दिसू लागलेला आहे. तर व्यक्तीविषयक आणि समष्टीविषयक कौशल्यांचा विचारही हल्लीच्या शालेय शिक्षणात पुरेसा झालेला दिसून येत नाही.
शालेय शिक्षणाच्या दृष्टीने, सृष्टीवरील मानवी वास्तव्यात पौराणिक, ऐतिहासिक, पारतंत्र्यातील, स्वातंत्र्योत्तर काळातील आणि आजच्या वर्तमान काळातील कालखंडांचा विचार करावा लागेल.
पौराणिक आणि ऐतिहासिक काळातही, भारतात, गुरुकुल शिक्षणाचीच पद्धत प्रचलित होती. व्यक्ती व संस्कृतीच्या विकासादरम्यान मिळवलेले सर्व ज्ञान सूत्रबद्ध करून मौखिक पद्धतीने वंशपरंपरेने सांभाळले जात असे. या काळात वरील सातही कौशल्यांचा विकास संतुलित पद्धतीने होत असल्याचे स्पष्टपणे दिसते. वेद, पुराणे, विद्या, कला, शास्त्रे व परंपरा यांच्या संहितांवरून आजही हे सहजपणे पडताळून पाहता येते.
गुरूकुल पद्धतीत हजारो वर्षांत साठवलेले ज्ञान सूत्रबद्ध ऋचांच्या स्वरूपात, मौखिक पाठांतर पद्धतीने, पिढ्या-दर-पिढ्या हस्तांतरण होत होत, आजतागायत टिकून राहिले. हे या पद्धतीचे सर्वात मोठे श्रेय आणि संचितही आहे. मात्र स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नाकारण्यात आल्याने अर्धी लोकसंख्या शालेय शिक्षणापासून वंचित राहिली. ही या पद्धतीची सर्वात मोठी त्रुटी होय. त्याकाळच्या समाजाची धारणाच, "न स्त्री स्वातंत्र्यमर्हते" म्हणजे स्त्री ही स्वातंत्र्यास पात्र नाही, सशा स्वरूपाची होती.
पारतंत्र्यादरम्यान गुरुकुल पद्धतीस मोठ्या प्रमाणात हानी सोसावी लागली. पाश्चात्यांनी, त्यांच्या नव्या ज्ञानाधारित शालेय शिक्षणास, समाजात प्रतिष्ठा मिळावी ह्याकरता, केलेल्या योजनाबद्ध प्रयत्नांतून भारतातील पारतंत्र्या-दरम्यानची शालेय शिक्षण व्यवस्था उदयास आली. तिच्या कित्येक उद्दिष्टांवरून, एतद्देशियांस कायमच पारतंत्र्यात जखडून ठेवण्याचे दृष्टीने तिची योजना केली असल्याचे स्पष्ट होते. एतद्देशियांस केवळ भाषा व गणितविषयक ज्ञान देऊन त्यांच्या सांस्कृतिक विकासास कायमची खीळ घालण्याचा उदेश, त्यामागे असल्याचे स्पष्टपणे दिसून येते.
मात्र, स्वातंत्र्योत्तर काळातही ती व्यवस्था जशीच्यातशीच सुरू राहिल्याकारणाने संस्कृतीसाधन मागे पडले. स्वातंत्र्योत्तर काळात ती सुधारण्याकरता अनेकदा बदल घडवून आणण्यात आले. तरीही आजच्या पद्धतीमध्ये इंग्रजी व गणित या विषयांमध्ये, शालांत परीक्षा अनुत्तीर्ण होणाऱ्यांची संख्या ५०% एवढी राहत आलेली आहे. अकारणच येणारे सामाजिक दूषण, तडजोड आणि व्यावसायिक शिक्षण शालेय जीवनोत्तर शिकणे हेच या सर्व अनुत्तीर्णांचे पदरी पडत आहे. अर्धी लोकसंख्या अशाप्रकारे उमेदीच्या काळात, हतोत्साह होत असल्याने समाजाचा झपाट्याने सांस्कृतिक विकास घडण्यात अनेक अडथळे निर्माण झालेले आहेत. अशाप्रकारे, स्त्रियांना शिक्षणाचा समान अधिकर देऊनही, अर्धी लोकसंख्या योग्य शालेय शिक्षणा-अभावी नाउमेदच राहते. ही आजच्या शालेय शिक्षण पद्धतीची एक प्रमुख त्रुटी आहे.
मनुष्याच्या माहिती प्रक्रियाक्षमतेचे दहा प्रमुख पैलू असतात.
१. संवेदन: रूप, शब्द, गंध, रस आणि स्पर्श यांच्या ज्ञानाबाबतच्या माहितीचे संकलन करणे
२. साठवण: संवेदित महितीचा मेंदूत साठा, वर्गीकरण आणि उपलब्धता राखणे
३. आठवण: साठवलेल्या माहितीस कधीही आठवू शकणे, तिचा वापर करता येणे
४. आकलन: साठलेल्या माहितीवरून सभोवतालच्या परिस्थितीच्बाबत अनुमान काढणे
५. चिकित्सा: तर्कसंगतीने त्या माहितीची चिकित्सा करता येणे
६. विश्लेषण: त्या माहितीचे विश्लेषण करता येणे
७. निष्कर्षण: त्या विश्लेषणाचे निष्कर्षात रुपांतरण करणे
८. अभिव्यक्ती: संवेदना, साठा, स्मृती, ज्ञान, विवरण, पृथक्करण आणि निश्चय; व्यक्त करणे
९. कारणमिमांसा: अभिव्यक्त ज्ञानाची तरतम भावाने मिमांसा करणे
१०. निर्णयक्षमता: या सार्या क्षमतांचा वापर करून, "जगात वागावे कसे" याचा निश्चय करू शकणे
याचा नीट विचार करून शालेय शिक्षणाची संकल्पना करायला हवी आहे. प्रशिक्षणाचा हेतू वरील सातही कौशल्यांचा निरंतर विकास करून मानवी संस्कृतीस वर्धिष्णू ठेवण्याचा असायला हवा आहे.
प्रशिक्षणाचा हेतूच वर्तणुकीचे स्वातंत्र्य मिळवून देण्याचा असतो. "न स्त्री स्वातंत्र्यमर्हते" मुळे नाकारलेले स्वातंत्र्य आज स्त्रियांचा अधिकार बनलेले आहे. तरीही इंग्रजी व गणित या विषयांच्या शिक्षणाची सक्ती केल्याने अर्ध्या लोकसंख्येला स्वातंत्र्य नाकारले जात आहे. याकरता शालेय शिक्षणादरम्यान कुठलाही विषय सक्तीचा नसावा. तर, ज्या विषयात प्राविण्य मिळवायची इच्छा असेल, ज्याच्यात त्या व्यक्तीला गती असेल, त्या विषयाचा तिला अभ्यास करू दिल्यास, पुढाकाराचा आदर होऊन, मानवी ज्ञानाचे संवर्धन व विकास झपाट्याने होऊ शकेल. कोणतीही सक्ती नसल्याने सर्व व्यक्ती प्रच्छन्न स्वातंत्र्याचा उपभोग घेऊ शकतील. मात्र विकास अनिवार्य करायचा झाल्यास, वरील सातपैकी कोणत्याही, किमान पाच विषयांत प्रशिक्षण घेणे अनिवार्य करता येऊ शकेल. यामुळे इंग्रजी वा गणितासारखे नावडते विषय वैकल्पिक ठरून, प्रगतीच्या मार्गावरून दूर करता येऊ शकतील.
परीक्षा ही व्यक्तीच्या शैक्षणिक स्तराचे केवळ निदान करत असल्याने, परीक्षेत केवळ गुणांकन करून त्या व्यक्तीचे, त्या त्या विषयातले नैपुण्य नक्की करावे. उत्तीर्ण अनुत्तीर्ण असले ठप्पे मारू नयेत. उपजीविकेसाठी व्यवसाय निवडतांना, ज्या व्यवसायाकरता ज्या विषयात जेवढे गुण निर्धारित असतील, तेवढे असलेल्या व्यक्तीच त्यात आपोआपच पात्र ठरतील.
भाषा तसेच विषय शिकतांना धेडगुजरी शिक्षणाचा अव्हेर करावा. आज मराठी माध्यमातून गणित शिकणार्यांस आकडे इंग्रजीत लिहीण्याची विचित्र सक्ती महाराष्ट्र शासनाने केलेली आहे. हे अशाप्रकारचे शिक्षण धेडगुजरी आहे. शुद्ध नाही. शिक्षण शुद्ध असावे. जे शिकण्याची त्या व्यक्तीची इच्छा असेल, तेच केवळ, तिला शिकण्याचे स्वातंत्र्य असावे. विनाकारण सरमिसळ करून ज्ञानाची भेळ करू नये. इंग्रजीत गणित शिकू इच्छिणार्यांस मराठीत आकडे लिहीण्याची सक्ती करू नये.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
1 टिप्पणी:
namaskar ...olakhala ka...kashe ahat....blog faar chan ahe....
टिप्पणी पोस्ट करा