२०१०-०१-२३

उंट खड्ड्यात पडला!

चोवीस मार्च दोन हजार सहाच्या सकाळच्या पुणे आवृत्तीत उंट पडला खड्ड्यात! (http://www.esakal.com/20060324/pune33.html) ही बातमी प्रसिद्ध झाली.

त्यावर मनोगत डॉट कॉम वर गरमागरम चर्चा झाली. ती चर्चा आजही मनोगतवर http://www.manogat.com/node/5037 या दुव्यावर आहे. मात्र http://www.esakal.com/20060324/pune33.html या दुव्यावर तेव्हा उपलब्ध असणारी मूळ बातमी आज पाहण्यास उपलब्ध नाही. म्हणून खास वाचकांच्या सोयीकरता ती ससंदर्भ इथे प्रस्तुत करत आहे. चर्चाच एवढी मनोरंजक आहे की आणखी काही भाष्य आवर्जून करण्याची आवश्यकताच नाही.

वाचा तर ...

प्रथम मूळ बातमी:

--------------------------------------------------------------------------



पुणे, ता.२३: सोमवार पेठेतील संत गाडगे महाराज मठासमोरील रस्त्याची एवढी दुरावस्था झाली आहे, की या रस्त्यावर असलेल्या खड्ड्यात आज उंट पडला. खड्ड्यात अडकलेल्या उंटास बाहेर काढण्यास अग्निशामक दलाच्या जवानांना तब्बल अडीच तासांनंतर यश आले.

सोमवारपेठेतील नरपतगीर चौक ते सरदार मुदलियार चौकापर्यंत रस्त्याची दुरावस्था झालेली आहे. त्यात संत गाडगे महाराज मठ ते शाहू तलावापर्यंतचा पदपथ खणला आहे. आज दुपारी दोनच्या दरम्यान या रस्त्यावरून उंटांचा कळप चालला होता. त्यातील एक उंट खड्ड्यात पडला व त्यात अडकला. नंतर तेथील नागरिकांनी अग्निशामक दलास कळवले. पुणे स्टेशनचा बंब प्रथम आला. त्यातील व्ही.एम.चौरे आणि कानिफनाथ कुंभार यांच्या पथकाने तब्बल अडीच तास मेहनत करून उंटास बाहेर काढले. दीपक चव्हाण या उंटाच्या मालकाने त्यांचे आभार मानले.

--------------------------------------------------------------------------

मग मनोगतावरील चर्चा:

प्रेषक माफीचा साक्षीदार (शनि., २५/०३/२००६ - ०२:२७)

मार्च २४, २००६ च्या "सकाळ"मधली, "उंट पडला खड्ड्यात!" ही बातमी वाचलीत का?

पुणे शहरातील सोमवार पेठेतील रस्त्यावर असलेल्या खड्ड्यात उंट पडला.
त्यावर माझी प्रतिक्रिया - अरे अख्खाच्या अख्खा उंट खड्ड्यात कसा पडतो?
हा रस्त्यावरचा खड्डा आहे की दरी?
तुमची प्रतिक्रिया काय?

पुणे तिथे काय उणे! प्रे. अनिकेतसमुद्र (शुक्र., २४/०३/२००६ - ०६:५०).
पुणे तिथे काय उणे! ही म्हण ऐकून होतो. आज त्याची प्रचिती आली.
एक पुणेकर असल्याचा फार अभिमान वाटला.
पावसाळ्यात याच खड्ड्यात पाणी साठल्यावर भर लक्ष्मी रस्त्यावर फिशींग चा अनुभव घेता येईल.

अतिशयोक्ती अलंकार प्रे. अमित चितळे (शुक्र., २४/०३/२००६ - ०६:५०).
मला आठवतं, लहानपणी मराठी व्याकरणाच्या पुस्तकात अतिशयोक्ती अलंकाराचं उदाहरण होतं.
त्यात तेलाचा घडा सांडला आणि त्यात उंट वाहून गेला असं काहीसं होतं.
आता नवीन पुस्तकात, "रस्त्यावर खड्डा पडला, त्यात उंट अडकला" असे उदाहरण देता येईल. कंसात "सत्यघटनेवर आधारीत" असे लिहीता येईल.

स्वभावोक्ती प्रे. शिक्षक (शुक्र., २४/०३/२००६ - ०७:०९).
श्रीयुत चितळे, वेशीपर्यंत ओघळ गेला, त्यात उंट पोहून गेला.
पूर्वी हे मी माझ्या विद्यार्थ्यांना अतिशयोक्ती अलंकाराचे उदाहरण म्हणून शिकवीत असे.
आता हेच स्वभावोक्ती अलंकाराचे उदाहरण म्हणून शिकवावे लागेल असे दिसत आहे.

काळजी नसावी प्रे. एकलव्य (शुक्र., २४/०३/२००६ - ०७:१७).
रस्त्यांवरील खड्डे चुकविणाचा रामबाण उपाय,उंटावरून शेळ्या हाकणार्‍यांनी शोधला आहे.
विसरला असाल म्हणून परत दवंडी पिटतो हवी तर.
"ऐका हो ऐका! पुणेकरांना - आणि त्यांच्या उंट/शेळ्यांना –
मध्ययुगातून विज्ञानयुगात नेण्यासाठी लवकरच पुणे वाय-फ़ाय करण्यात येणार आहे हो!!"

हसावे की रडावे? प्रे. एक वात्रट (शुक्र., २४/०३/२००६ - ०७:२६).
१० फुट उंचीचा उंट, चक्क पडतो खड्ड्यात,
याहून जास्त पुण्यातल्या रस्त्यांची वाताहात काय व्हावी?
( दुःखी झालेला) एक_वात्रट

खरंच कमाल आहे. हसून प्रे. सुखदा (शुक्र., २४/०३/२००६ - ०७:४६).
खरंच कमाल आहे. हसून हसून पुरेवाट झाली !

शहाण्यांचे ठिकाण प्रे. नितीन पोरे (शनि., २५/०३/२००६ - ०६:०८).
असे सर्व शहाणे महापालिकेत बसतात असे ऐकून आहे.

व्याख्यान/प्रतिक्रिया प्रे. नंदन (शुक्र., २४/०३/२००६ - १०:३०).
१. वसंत व्याख्यानमालेसाठी विषय - खड्ड्यात पडलेला उंट आणि पुणे मनपा यांच्यातील साम्यस्थळे आणि त्यामागील कारणीमीमांसा.
२. या बातमीवर राजकीय नेत्यांच्या काय प्रतिक्रिया (काल्पनिक) असू शकतील यावर मनोगतींनी काही खल केला तर तो मोठा रंजक ठरेल. यामागे परकीय शक्तींचा/विरोधी पक्षांचा हात आहे येथपासून ते 'अहो, उंटाची चाल तिरकीच' अशा अनेक शक्यता संभवतात. Why did the chicken cross the road? चा हा पुणेरी अवतार म्हणायला हरकत नाही.

कारणे सांगा प्रे. माफीचा साक्षीदार (शुक्र., २४/०३/२००६ - १०:३८).
मस्त. दुसर्‍या मुद्द्यावर मनोगतीही आपापली कारणमीमांसा देऊ शकतील. मी सुरू करतो.
कारण-१: त्या रस्त्याच्या दुसर्‍या बाजूने एक सुंदर उंटीण चालली होती, उंट तिच्याकडे आ वासून बघत राहिला त्यामुळे त्याचे लक्ष खड्ड्याकडे गेले नाही आणि चालता चालता तो खड्ड्यात पडला.

त्याआधी प्रथम... प्रे. टग्या (शुक्र., २४/०३/२००६ - १४:३६).
उंट खड्ड्यात का पडला याची कारणे जाऊद्यात खड्ड्यात!
मुळात उंटांचा कळप पुण्याच्या रस्त्यांत काय करत होता याची कारणे शोधा!
(संदर्भ: मूळ बातमी) रस्त्यात काय करतो?
हे शहर आहे की अभयारण्य?

(आमच्या काळी पुण्यात असे नव्हते हो!
फक्त बांधकामावरची/उकिरड्यावरची गाढवे आणि गोठ्यातून मुठेवर धुवायला नेल्या जाणार्‍या म्हशी, अगदीच झाले तर बेवारशी कुत्रे, एवढेच काय ते प्राणी रस्त्यात समूहाने हिंडताना दिसायचे!)

पुण्यातल्या प्रे. भोमेकाका (शुक्र., २४/०३/२००६ - १४:३८).
पुण्यातल्या शहाण्यांना शेळ्या हाकण्यासाठी मदत करत असावेत काय? (ह.घ्या.)

कारण २ प्रे. नंदन (शुक्र., २४/०३/२००६ - १०:४८).

कारण-२: सोनिया गांधींच्या अभूतपूर्व त्यागाने उंटाचे डोळे दिपले होते. रस्त्यावरचा खड्डा त्यामुळे त्याला दिसला नाही. (फा.वि. म्हणून सोडून द्यावा.)

भाग्यवान विजेता प्रे. अनिकेतसमुद्र (शुक्र., २४/०३/२००६ - ११:३९).
खड्यात पडणार्‍या पहिल्या दहा भाग्यवंतांचा पुणे मनपा कडुन पुणेरी पगडी देउन सत्कार करण्यात येणार आहे. हे वाचुन उंट त्या खड्यात पडला.

हत्तीला खायला प्रे. भोमेकाका (शुक्र., २४/०३/२००६ - १४:२४).
पलीकडच्या बाजूला 'हत्ती' होता, त्याला खाण्यासाठी 'उंट' चालला होता. (संदर्भ-बुद्धीबळ)

कारण! प्रे. टग्या (शुक्र., २४/०३/२००६ - १४:४४).
त्या उंटाला कोणीतरी सकाळीसकाळी "खड्ड्यात जा!" म्हणून धुडकावून लावले असावे.

आत्महत्येचा प्रयत्न - प्रे. अभिजित पापळकर (शुक्र., २४/०३/२००६ - १२:४४).
राजकारण्यांच्या अनास्थेमुळे दुःखी होऊन उंटाने आत्महत्येचा प्रयत्न केला, ते सुध्दा त्याच खड्ड्यांचा वापर करुन !

मृगजळ(खड्डा) प्रे. ग्रामिण मुम्बईकर (शुक्र., २४/०३/२००६ - १५:२४).
या उंटांना वाळवंटात मृगजळ पाहण्याची सवय असते. त्या बिचार्‍याला तो खड्डा 'मृगखड्डा' वाटल्यास नवल ते काय?

भारताच्या प्रे. माधव कुळकर्णी (शुक्र., २४/०३/२००६ - १५:४३).
क्रिकेट टिमला शोधायला आंत उतरला असावा !

उंटाचा त्याग प्रे. बाळू (शुक्र., २४/०३/२००६ - १६:३८).
खाण्यासाठी चारा (खादाड) आणि चालण्यासाठी रस्ता (पदचारी) या दोन पदापैकी एकाचा त्याग करण्यासाठी म्हणून त्याने रस्त्याचा राजिणामा दिला. (संदर्भ, त्यागमूर्ती सोनियाजी देवी गांधी रायबरेलीवाल्या)

मुंगी प्रे. प्रीती दी (शुक्र., २४/०३/२००६ - १७:४७).

मुंगीने उंटाला पायात पाय घालून पाडले असावे.

उन्ट्च का पडला? प्रे. मिलिन्द२००६ (सोम., २७/०३/२००६ - ०५:३८).
हा उन्ट पडायच्या आधी इतर कोणताही प्राणी - मानव अथवा अन्य - का पडला नाही, ह्याची चौकशी व्हायला हवी. तुमचे काय मत आहे?

अशक्य! प्रे. नितीन (मंगळ., ०६/०६/२००६ - २१:१३).
पुण्यात उंट खड्ड्यात कसा पडेल? (हा अस्सल पुणेरी प्रश्न). खड्ड्या शेजारी पाटी लावली जाईलः
"येथे उंटांना चालण्यास सक्त मनाई आहे. उंट खड्ड्यात पडल्यास तक्रार ऐकून घेण्यात येणार नाही - हुकुमावरुन"

पिल्लू? प्रे. ४२०८४० (बुध., २३/०८/२००६ - २१:१५).
उंटाचे पिल्लू असेल.

--------------------------------------------------------------------------

शेवटास वाचकांचे अभिप्राय:

तुम्हाला ही चर्चा पुरेशी सुरस झालेली नाही असे वाटल्यास चर्चा योग्य वाटेवर न्यावी.
इथे तुम्ही तुम्हाला सुचणार्‍या कुठल्याही प्रासंगिक सूचना, टिक्काटिप्पण्या, मल्लीनाथी, तज्ञांचे-(ता)शेरे बिनदिक्कत नमूद करू शकता!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: