सहेलियों की बाडी
हल्लीच्या स्वरूपातील “सख्यांचे घर” बाग, फतेहसागर तलावाच्या बंधार्याच्या पूर्वेस, महाराजा फतेहसिंग यांनी इसवीसन १८८८ मधे बांधली आहे. पूर्वी १६६८ मधे मिर्झाराजे जयसिंग यांनी जो मातीचा बंधारा इथे बांधलेला होता, तो २०० वर्षांनंतर वाहून गेल्यामुळे हा बंधारा महाराज फतेहसिंग यांना पुन्हा बांधून घ्यावा लागलेला होता. प्रफुल्लित कमळ पुष्करण्या, लांब रूंद हिरवळींच्या विस्तीर्ण बागा, तर्हतर्हेच्या रंगीबेरंगी फुलांचे ताटवे यांनी ही बाग सदा बहरलेली दिसते. पुष्करण्यांच्या तीरांवर चहुबाजूंना संगमरवरी हत्ती आपल्या वळवलेल्या सोंडांतून पुष्करणीतील कमळांवर कारंजी उडवत असतात. पक्षांच्या चोचींतून, हत्तींच्या सोंडांतून आणि निरनिराळ्या सूप्त मुखांतून उत्साहाने उसळणारी कारंजी; फतेहसागर तलावाच्या बंधार्यातून नैसर्गिक गुरूत्वीय शक्तीने संचालित केलेली आहेत.
त्या कारंजांना उडवण्याकरता पंप वापरलेले नाहीत. कारंजी इथे इतक्या मोठ्या संख्येने आहेत की या बागेस “कारंजांचा बाग” असेही म्हटले जाते. या कारंजांच्या तुषारांनी सारी बागच भारित झालेली असते. पर्यटकास परी-राज्यातच फेरफटका करतो आहोत असा आभास होतो. अनेक चित्रपटांचे चित्रीकरण इथेच झाल्याचे मार्गदर्शक सांगतात. इथेच पारंपारिक राजस्थानी पेहरावात फोटो काढवून घेण्याचीही सोय आहे. इथले सारे वातावरणच भारून टाकणारे, अविस्मरणीय आणि आनंदित करणारे आहे.

फतेहसागर तलावात तीन बेटे आहेत. चार वर्ग किलोमीटर क्षेत्रफळाच्या मोठ्या बेटावर नेहरूपार्क आहे. त्यावर लोकप्रिय उद्यान, उपाहारगृह तसेच प्राणीसंग्रहालयही आहे. तिथे जाण्याकरता मोतीमगरीच्या पायथ्यापासून मोटार बोटींची सोय आहे. दुसर्या ०.०६ वर्ग किलोमीटर क्षेत्रफळाच्या लहान बेटावर सार्वजनिक उद्यान आहे. तिसर्या १.२ वर्ग किलोमीटर क्षेत्रफळाच्या बेटावर “उदयपूर सौर वेधशाळा (Udaipur Solar Observatory-USO)” वसवलेली आहे.
नगरमहाल (सिटीपॅलेस)
उदयपूर नगर, महाराज उदयसिंगांनी वसवले. चित्तौड अकबराचे हाती गेल्यानंतर मेवाडची राजधानी उदयपूरच राहिली. या नात्याने इथे राजमहाल असणे साहजिकच आहे. मात्र मी भारतात इतरत्र पाहिलेल्या राजप्रासादांचे मानाने उदयपूरचा राजप्रासाद भव्य, दिव्य आणि वैभवशाली ठरला. इथल्या राजवाड्याचे वैशिष्ट्य म्हणजे इथली कलाकुसरींनी नटलेली दालने आणि इथली भव्यता. स्फटिकसज्जा (crystal galary) हे इथले आणखी एक आकर्षण. राजवाड्याच्या फतेह पोल मधून बाहेर पडल्यावर समोरच्या तलावात दिसणारा जलमहालही इथले आकर्षणच ठरावा. प्रथम आम्ही वरच्या मजल्यापर्यंत फिरून राजवाडा पाहिला. तिथे एका दर्शनीय प्रवेशद्वारावर बसवलेले स्फटिकतुरे सोन्यासारखे पिवळेधमक झळकत होते.

उदयपूरच्या नगरप्रासादातील दरबार दालन. इथेच आमचे चहापान झाले. नंतर श्राव्यसहल यंत्र सोबत घेऊन आम्ही दरबार दालन तसेच स्फटिक सज्जेची (क्रिस्टल गॅलरीची) प्रदक्षिणा केली.

तिच्या प्रदक्षिणामार्गात जागोजाग स्फटिककाचेची तसेच पैलू पाडलेल्या काचेची (कट ग्लास) विविध भांडी (चहापानाची भांडी, अत्तरदाण्या, गुलाबदाण्या, हळदीकुंकवाची भांडी, कप, बशा, पेले, दारूचे प्याले, बाटल्या इत्यादी अनेकविध वस्तू), उपकरणे, बैठकीचे सामान (मेज, खुर्च्या, घडवंच्या, दिवाण, चौरंग, पाट, पायदाने, तिवया व इतर अनेक ज्यांची नावेही आठवत नाहीत) अशा नानाविध वस्तू काचेच्या कपाटांतून बैजवार मांडून प्रदर्शित केलेल्या होत्या. त्या त्या जागांवर लिहिलेले क्रमांक आपापल्या श्राव्य उपकरणांच्या कळांवर दाबले असता कानाला लावलेल्या श्रवणसंचातून त्या त्या विभागाची माहिती इंग्रजीतून ऐकू येण्याची सोय होती. आजूबाजूच्या ऐश्वर्याने दिपून जात आणि भवतालच्या गर्भश्रीमंती थाटाने भारावून जातच आम्ही तिथून बाहेर पडलो.
उदयपूरचा जलमहाल. याचेबाबत इतकेच सांगता येईल की याची वर्णने करतांना मार्गदर्शक थकत नाहीत, कित्येक चित्रपटांची चित्रीकरणे इथेच झालेली आहेत, आणि श्रीमंतातले श्रीमंत चित्रपट अभिनेते, अभिनेत्या इथे राहण्यास कायमच उत्सुक असतात.

संध्याकाळी आम्ही उदयपूरच्या सूरजपोल ते हाथीपोल दरम्यानच्या बाजारात खरेदीप्रीत्यर्थ गेलो खरे. मात्र रविवारचा दिवस असल्याने बराचसा बाजार बंद होता. त्यामुळे काहीसा हिरमोड झाला. दुसर्या दिवशी सकाळी चित्तौडगढ पाहून संध्याकाळी अजमेरपर्यंतचा प्रवास करून ख्वाजा मुईनुद्दीन चिस्तीचा दर्गा पाहायचा व शेवटास पुष्करच्या हॉटेलात जाऊन मुक्काम करायचा होता. म्हणून आम्ही जरा लवकरच बिछाने गाठण्याचा बेत निष्ठेने अंमलात आणला. आमच्या सार्या एकवीस प्रवाशांपैकी सारेच्या सारेच अतिशय वक्तशीर असल्यामुळे कधी कुणामुळे पाच मिनिटे उशीर झाला असे झालेच नाही. हे एक सुखद आश्चर्य होते. याचकरता आमचा हा गट आमच्याकरता अविस्मरणीय ठरला आहे. शिवाय उत्साहही एवढा की प्रत्येकजण गुरूशिखरावरही चढून गेलेला होता. इथे हेही नमूद करणे गरजेचे आहे की विशीतले फक्त तीन जण होते. इतर सर्व पन्नाशी-साठीच्या घरातले.
1 टिप्पणी:
So you are travelling. Enjoy
टिप्पणी पोस्ट करा