चितौडचा इतिहास
इसवी सनाच्या ७ व्या शतकात मौर्य घराण्याने चितौड वसवले. पौराणिक मेवाडी नाण्यांवर आढळणार्या चित्रांगद मोरी यांचे नावावरून त्याचे नाव चित्रकूट असे ठेवलेले होते. बाप्पा रावल यांनी इसवी सन ७३४ मधे चितौड जिंकून घेतल्यावर त्यास मेवाडची राजधानी केले. त्यानंतर अकबराने १५६८ मधे जिंकून घेपर्यंत चितौडच मेवाडची राजधानी राहिले. त्यानंतर मग मेवाडची राजधानी उदयपूरला हलवण्यात आली.
बाप्पा रावल यांच्या पश्चात त्यांच्याच गहलोत घराण्यातच सत्ता राहिली. इसवी सन १३०३ मधे दिल्लीच्या अल्लाउद्दिन खिलजी याने पद्मिनीकरता चित्तौडवर हल्ला केला. तत्कालीन राजे, रावल रतनसिंग युद्धात मारले गेले. त्यांची पत्नी पद्मिनी हिने जौहार केला. चित्तौडवर अल्लाउद्दिन खिलजीची सत्ता स्थापन झाली. इसवीसन १३२७ मधे गेहलोत घराण्यातीलच हमीरसिंग यांनी पुन्हा सत्ता परत मिळवली. हमीरसिंग यांचा जन्म ज्या शिसोदा गावात झाला होता, त्यावरून मग या राजघराण्यास शिसोदिया असेही म्हणू लागले.

महाराणा कुंभा यांनी १४५८ पर्यंत राज्य केले. १४५८ मधे त्यांचेच पुत्र उदयसिंग (प्रथम) यांनी सत्तासंपादनार्थ, त्यांचा वध केला. महाराणा कुंभांच्या कारकीर्दीत सर्वप्रकारच्या कलागुणांना ऊर्जितावस्था प्राप्त झाली. मेवाडमधील ८४ किल्ल्यांपैकी ३२ किल्ले बांधले गेले. यांच्यातच मेवाडमधील, चित्तौडनंतरचा सर्वात अभेद्य किल्ला, कुंभलमेर किंवा कुंभलगढचा समावेश होतो. महाराणा प्रताप यांचा जन्मही कुंभलगढचाच. महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ शिवनेरी आहे. तसेच राजस्थानात महाराणा प्रतापांचे जन्मस्थळ कुंभलगढ आहे. कुंभलगढची तटबंदी ३६ किलोमीटर लांबीची आहे. चीनच्या भिंतीनंतर, जगातील दुसर्या क्रमांकाची सर्वात लांब तटबंदी आहे ही. महाराणा कुंभांच्याच कारकीर्दीत राणकपूरचे त्रैलोक्य-दीपक जैन मंदिर, चित्तौडची कुंभास्वामी आणि आदिवर्ष तसेच शांतिनाथ जैन मंदिरे बांधली गेली. स्वतः महाराणा कुंभांनी “संगीत-राजा”, गीतगोविंदावरची “रसिक-प्रिय” ही टीका, “सूडप्रबंध” आणि “कामराज-रतिसार” या ग्रंथांचे लेखन केले आहे. त्यांच्याच कार्यकाळात विद्वान अत्रींनी “चित्तौडच्या कीर्तीस्तंभाची प्रशस्ती” लिहीली आणि कहना व्यास यांनी “एकलिंग-महात्म्य” लिहीले.
१५२७ मधे राणा संग्रामसिंग (राणा संगा) यांनी खानवा येथे बाबराशी निकराची लढाई केली. त्यात बाबराचा जय झाला. पुढे जखमी झालेले राणा संग्रामसिंग थोड्याच वर्षांत मृत्यू पावले. १५३५ मधे गुजरातचा राजा बहादुरशहा चित्तौडवर चालून आला असता संग्रामसिंगाची पत्नी राणी कर्मवती हिच्याकडे चित्तौडची सूत्रे होती. तिने यावेळी बाबराचा मुलगा हुमायूनची मदत मागितली. त्याने होकारही दिला. मात्र हुमायून पोहोचण्यापूर्वीच बहादुरशाहने चित्तौड काबीज केल्यामुळे राणी कर्मवतीसह सर्व स्त्रियांनी जौहार केला तर गडावरील सर्वच्या सर्व ३२,००० लोक धारातीर्थी पडले.
वरील चित्रपट्टीत पहिले चित्र कुंभलगढाचे आहे तर दुसर्या चित्रात बनवीर, उदयसिंग समजून चंदनचा वध करत असतांनाचे चित्र दिसत आहे. बनवीर, राजपुत्र उदय याचा शिरच्छेद करण्याकरता आला असता, पन्नाधायने आपला स्वतःचा पुत्र चंदन याला राजपुत्राचे जागी झोपवले आणि उदयला आधीच दूर पाठवून त्याचे प्राण वाचवले. त्या अत्युच्च त्यागाची ही स्मृती.

महाराणा उदयसिंग (जन्मः ऑगस्ट ४,१५२२, मृत्यूः फेब्रुवारी २८, १५७२)
त्यानंतर महाराणा उदयसिंग यांनी चित्तौडवर राज्य केले. ते राणा संग्रामसिंग व राणी कर्मवती यांचे चौथे पुत्र होते व त्यांचा जन्म झाला तेव्हा राणा संग्रामसिंग हयात नव्हते. मेवाडच्या राजघराण्यातील ते ५३ वे शासक होते. महाराणा उदयसिंगांनी राजपूत राज्यव्यवस्थेचे एकचालकानुवर्तित्व घातक ठरत असल्याचे जाणून जाणत्यांच्या सामूहिक प्रशासनास जन्म दिला. या राज्यव्यवस्थेचा उपयोग पुढे अकबराच्या आक्रमणाचे काळी झाला. तेव्हा सर्वांच्या सल्ल्याने उदयसिंग चित्तौड सोडून निघून गेले होते. तरीही चित्तौडने चार महिनेपर्यंत शर्थीची झुंज दिली. २५ फेब्रुवारी १५६८ रोजी पुन्हा एकदा चित्तौड पडले आणि सर्व स्त्रियांना पुन्हा एकदा जौहार करावा लागला. चित्तौड राज्य करण्यास सुरक्षित राहिलेले नाही हे पाहून महाराणा उदयसिंग यांनी उदयपूर शहराची निर्मिती केली. त्यांच्या पश्चात महाराणा उदयसिंगांनी आपल्या आवडत्या जगमल्ल नावाच्या पुत्रास राज्याची सूत्रे सुपूर्त केली. मात्र त्यांनीच घडवलेल्या सामूहिक प्रशासनास हे रुचले नाही. महाराणा प्रताप हे महाराणा उदयसिंगांचे थोरले पुत्र होते. ते पराक्रमी आणि राज्यकर्ते म्हणून सर्वमान्य होते. म्हणून, त्या सामूहिक प्रशासनाने त्यांस गादीवर बसवले. महाराणा प्रतापांनी अकबराच्या आक्रमणाविरुद्ध हल्दीघाटीत निकराची लढाई केली. मात्र त्यात त्यांचा पराभव झाला. त्यांचा आवडता घोडा चेतकही मारला गेला. महाराणा प्रताप वाचले. त्यांनी चित्तौड वगळता सारे मेवाड पुन्हा ताब्यात घेतले. चित्तौड ताब्यात येईपर्यंत सारे राजभोग सोडून दिले. पत्रावळीत जेवण्याची शपथ घेतली. पण अखेरपर्यंत ते चित्तौडवर ताबा मिळवू शकले नाहीत.
हल्दीघाटी
अशा तीव्र संघर्षाचा आणि प्रखर स्वाभिमानाचा इतिहास असलेल्या चित्तौडगढाकडे आम्ही आता अग्रसर होत होतो. मग जगप्रसिद्ध हल्दीघाटी लागली. खरोखरीच तिथे आजही हळदीसारखे खडक दिसून येतात. ही एक खूपच अरुंद खिंड आहे. जेमतेम एक वाहन जाऊ शकेल असा डांबरी रस्ता त्यातून पलीकडे घेऊन जातो. बाहेर पडल्यावर एक खासगी वस्तुसंग्रहालय आहे. त्यात हल्दीघाटीचा इतिहास शिल्परूपाने अंकित करण्यात आलेला आहे. एक ग्रंथालयही आहे. तसेच तत्कालीन चित्तौड साकार करणारे देखावेही आहेत. सोबतच स्थानिक पद्धतीच्या जेवणाचीही सोय आहे. तिथे आम्हाला दाल-चुर्मा, बाजरीची भाकरी-ताडाचा गूळ-साजुक तूप, छाछ इत्यादींसहित सुग्रास जेवण घेता आले.

हल्दीघाटीच्या ग्रामीण वस्तुसंग्रहालयात जेवण करून मग आम्ही नाथद्वारच्या श्रीनाथजी मंदिराकडे निघालो. नाथद्वारच्या मंदिरात बॅगा, कॅमेरे, मोबाईल्स यांना परवानगी नसल्याने हे सर्व सामान बसमधेच ठेवलेले होते. तिथल्या अफाट गर्दीत चटकन ओळखता यावे म्हणून सगळ्यांनी डोक्यांवर सचिनच्या टोप्या घातलेल्या होत्या. नाथद्वार गावात खूपच अरुंद गल्ल्याबोळ असल्याने बस दूरच उभी करावी लागली. श्रीनाथजी मंदिरात बाळकृष्णाची मूर्ती असल्याने, देवाला दिवसात अनेकदा निरनिराळे भोग चढवण्यात येत असतात. भोग चढवणे म्हणजे देवासमोर तर्हतर्हेचे नैवेद्य सुबक रचनेने मांडून ते देवास अर्पण करणे. ही प्रक्रिया बराच काळ चालत असल्याने, सगळ्यांकरता खुल्या दर्शनाच्या वेळा मर्यादित होतात. अशा दैनंदिन भोग चढवण्याच्या आणि दर्शनास मंदीर खुले असण्याच्या वेळा आधीच नक्की केलेल्या असतात. सचिनच्या प्रतिनिधींनी त्या आधीच माहीत करून घेतलेल्या होत्या.

इथून आम्ही एकलिंगजी मंदिराकडे गेलो. हे मंदिर महाराजांच्या खासगी मालकीच्या जागेवर असल्याने इथे निराळ्या प्रकारची सुरक्षा व्यवस्था आहे. मंदिराचा बराचसा भाग पर्यटकांसाठी खुला नाही. दर्शनार्थ एक लांबच लांब रांग होती. इतरही अनेक मंदिरे या मंदिराजवळच्या मंदिरसमूहात आहेत. मार्गदर्शकाने त्यातील काही मंदिरे व्यवस्थित दाखवली. नंतर पुन्हा बसमधे बसून आम्ही उदयपूरच्या मुख्य रस्त्यावरील सुभाषनगरातील “ओरिएंटल पॅलेस” या हॉटेलात जाऊन राहिलो.
.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा