विडंबने-१ आम्ही कोण?
आम्ही कोण?
आम्ही कोण म्हणूनि काय पुससी? आम्ही असू लाडके ।
देवाचे, दिधले असे जग तये आम्हांस खेळावया ॥
विश्वी या प्रतिभाबले विचरतो चोहीकडे लीलया ।
दिक्कालातूनि आरपार अमुची दृष्टी पहाया शके ॥ १ ॥
सारेही बडिवार येथिल पाहा! आम्हापुढे ते फिके ।
पाणिस्पर्शच आमुचा शकतसे वस्तूप्रती द्यावया ॥
सौन्दर्यातिशया, अशी वसतसे जादू करांमाजी या ।
फोले पाखडिता तुम्ही, निवडतो ते सत्त्व आम्ही निके ! ॥ २ ॥
शून्यामाजि वसाहती वसविल्या कोणी सुरांच्या बरे ? ।
पृथ्वीला सुरलोकसाम्य झटती आणावया कोण ते ? ॥
ते आम्हीच, सुधा कृतींमधुनिया ज्यांच्या सदा पाझरे ।
ते आम्हीच, शरण्य मंगल तुम्हां ज्यांपासुनी लाभते ! ॥ ३ ॥
आम्हाला वगळा - गतप्रभ झणी होतील तारांगणे ।
आम्हाला वगळा - विकेल कवडीमोलावरी हे जिणे ! ॥
मूळ कवीः कृष्णाजी केशव दामले उर्फ केशवसु, फैजपूर, २९ नोव्हेंबर, १९०१, मनोरंजन, मे, १९०२
ही कविता त्यांच्या 'हरपले श्रेय' ह्या कॉन्टिनेंटल प्रकाशनच्या १९८५ सालच्या पुनर्मुद्रणातून घेतलेली आहे. कृष्णाजी केशव दामले उर्फ केशवसुत (०७-१०-१८६६ ते ०७-११-१९०५) हे मराठी नवकवितेचे आद्य उद्गाते होत. केशवसुत मुख्याध्यापक होते. ते वयाच्या 39 व्या वर्षी प्लेगने वारले.
केशवसुतांच्या निवडक कविता 'हरपले श्रेय' ह्या त्यांच्या कवितासंग्रहात प्रसिद्ध झालेल्या आहेत. 'अढळ सौंदर्य' ह्या कवितेत, त्यांनी निसर्गाचे सौंदर्य कसे अढळ असते, त्याचे बहारदार वर्णन केलेले आहे. त्यांची 'गोष्टी घराकडील' ही कविता, गावातील स्वगृहाचे स्वाभिमानाने गुणगान करण्याचा एक उत्कृष्ट नमुना आहे. त्यांनी 'दुर्मुखलेला' ह्या कवितेत, त्यांना दुर्मुखलेला म्हणणाऱ्या शिक्षकाला उद्देशून, 'लंगड्यास लंगडा म्हटल्याने काहीच साध्य होत नाही, लंगडा मात्र मनाने दुखावल्या जातो' हे जगन्मान्य सत्य निर्विवादपणे उजागर केलेले आहे.
लोकमानसात त्यांच्या तुतारी कवितेचे स्थान अढळ आहे. 'आम्ही कोण?' ह्या कवितेत त्यानी व्यक्तविलेला कवीविषयक दृष्टिकोन आजवर मी वाचलेल्या सर्व अभिप्रायात सर्वोत्कृष्ट म्हणता येईल. त्यातून केवढा आत्मविश्वास प्रकट होतो ते प्रत्यक्षच वाचून सहज समजेल.
आम्ही कोण? (विडंबन)
केशवसुत, क्षमा करा.
आम्ही कोण? म्हणून काय पुसतां दांताड वेंगाडुनी? ।
फोटो मासिक पुस्तकांत न तुम्ही का आमुचा पाहिला? ॥
किंवा गुच्छ तरंग अंजली कसा अद्यापि ना वाचिला? ।
चाले ज्यावरती अखंड स्तुतिचा वर्षाव पत्रांतुनी? ॥ १ ॥
ते आम्ही - परवाङ्मयातिल करूं चोरून भाषांतरे, ।
ते आम्ही - न कुणास देऊ अगदी याचा सुगावा परी! ॥
डोळ्यांदेखत घालुनी दरवडा आम्ही कुबेराघरी! ।
त्याचे वाग्धन वापरून लपवूं ही आमुची लक्तरे! ॥ २ ॥
काव्याची भरगच्च घेऊनि सदा काखोटिला पोतडी, ।
दावूं गाउनि आमुच्याच कविता आम्हीच रस्त्यामधे, ॥
दोस्तांचे घट बैसवून करुं या आम्ही तयांचा उदे ।
दुष्मानांवर एकजात तुटुनी की लोंबवू चामडीं! ॥ ३ ॥
आम्हाला वगळा - गतप्रभ झणीं होतील साप्ताहिके! ।
आम्हाला वगळा - खलास सगळी होतील ना मासिके! ॥
विडंबन: आचार्य प्रल्हाद केशव अत्रे उर्फ केशवकुमार, १९२२
ही कविता आचार्य अत्रे यांच्या झेंडूची फुले ह्या, परचुरे प्रकाशनतर्फे १९८६ साली प्रसिद्ध झालेल्या, अकराव्या आवृत्तीतून घेतलेली आहे. आचार्य प्रल्हाद केशव अत्रे उर्फ केशवकुमार (१३-०८-१८९८ सासवड, ते १३-०६-१९६९) हे, मराठी शिक्षणक्षेत्र (कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या प्रशालेत प्रिन्सिपॉल, अनेक शिक्षक परिषदांचे अध्यक्ष, बी.टी. चे परीक्षक), वाङमय (कऱ्हेचे पाणी हे आत्मवृत्त, बडोदा वाङमय परिषदेचे अध्यक्ष), साहित्य (झेंडूची फुले, बडोद्याच्या कुमारसाहित्य परिषदेचे अध्यक्ष, नाशिक साहित्यसंमेलनाचे अध्यक्ष), नाटक (साष्टांग नमस्कार, ब्रह्मचारी, घराबाहेर, उद्याचा संसार), चित्रपट (पायची दासी, पहिले राष्ट्रपती सुवर्णपदक विजेता शामची आई, चित्रमंदिर चित्रपटगृहाचे मालक, अत्रे पिक्चर्स चे निर्माता), पत्रकारिता (जयहिंद सायंदैनिक, दैनिक मराठा, नवयुग साप्ताहिक, समीक्षक मासिक यांचे संपादन, बेळगावच्या पत्रकार संमेलनाचे अध्यक्ष, अत्रे प्रिंटींग प्रेस), राजकारण (कॉन्ग्रेस, समाजवादी पक्ष, संयुक्त महाराष्ट्र परिषद यांचे कार्यकर्ते, आमदार, लोकसभा निवडणुकीत अपयश), समाजकारण (संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे नेते) या सर्वांवर अमिट छाप सोडणारे उत्तुंग व्यक्तिमत्त्व आहे. व्यवसायाने शिक्षणतज्ञ (बी.ए., बी.टी., टी.डी. लंडन) असणाऱ्या अत्र्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अत्यंत कळीची भूमिका बजावली. त्यांच्या कऱ्हेचे पाणी ह्या पाच खंडी आत्मवृत्ताच्या प्रस्तावनेत ते म्हणतात:
"आयुष्यात मी काय वाटेल ते केले असेल, पण ढोंग कधी केले नाही. ढोंगाचा मी पहिल्यापासून शत्रू. माझ्या नाटकांतून, चित्रपटांतून आणि वृत्तपत्रांतून ढोंगाचे मी क्रूरपणे वाभाडे काढलेले आहेत. गेली पन्नास वर्षे समाजाच्या सर्व अंतरंगांमधून मी वावरलो आहे. मजुरापासून तो महाराजापर्यंत, शाळामास्तरापासून तो गिरणीमालकापर्यंत आणि कंगालापासून तो कुबेरापर्यंत मी अनिरुद्ध संचार केलेला आहे. त्यामुळे समाजाच्या बहिरंगामध्ये आणि त्याच्या अंतरंगामध्ये केवढी फारकत आहे, ह्याची जाणीव माझ्या इतकी दुसऱ्या कुणालाही असणे शक्य नाही. आज जीवनाच्या सर्व क्षेत्रात दंभाचा आणि ढोंगाचा जो बुजबुजाट झालेला आहे त्याचे कारण सत्य काय आहे हे जाणण्याचे आणि सांगण्याचे फार थोड्या लोकांत धैर्य आहे. ते धैर्य दाखवण्याचा मी प्रयत्न केला आहे."
त्यांचा झेंडूची फुले नावाचा विडंबनात्मक कवितासंग्रह जगद्विख्यात आहे. मराठीत तरी दुसरा विडंबनकाव्यसंग्रह वाचल्याचे मला स्मरत नाही. त्यांच्या सर्वव्यापी अनुभवाचे सार रोकड्या शब्दात, त्यामध्ये व्यक्त झालेले आहे. हे पुस्तक मुळातच वाचनीय आहे. त्यातच 'आम्ही कोण' ह्या केशवसुतांच्या कवितेचे हे विडंबन दिलेले आहे. विडंबनाची व्याख्या, वापर आणि मर्यादा ह्यांबाबत त्या पुस्तकाचे संपादक श्री.स.गं.मालशे, स्वत: आचार्य अत्रे आणि त्यांचे गुरू साहित्याचार्य श्रीपाद कृष्ण उर्फ तात्यासाहेब कोल्हटकर यांचे विचार ह्या पुस्तकात ग्रथित केलेले आहेत.
२००९-०७-०९
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा