20090531

मी पाहिलेले जयपूर


जयपूर मी आकाशातून, आगगाडीतून, बसमधून, जीपमधून आणि पायी फिरून पाहिलेले आहे. अर्वाचीन भारतातल्या आधुनिक शहरांपैकी एक अतिशय देखणे शहर आहे जयपूर. इथले रेल्वेस्टेशन पश्चिम टोकाला आहे, तर हवाई अड्डा टोंक रोडवर दक्षिण टोकाला आहे. जयपूर शहर दोन भागांत वसलेले आहे. तटबंदीच्या आतील ’गुलाबी शहर’ आणि तटबंदीच्या दक्षिणेला वसलेले नवे जयपूर शहर. जयपूर शहराच्या उत्तरेला ’आमेर’, ’अंबर’ आणि ’जयगड’ किल्ल्यांना अंगाखांद्यांवर घेऊन उभा आहे अरवली पर्वताचा बेलाग कडा. गुलाबी शहरातील सर्व इमारती, मग त्या गुलाबी दगडांनी बांधलेल्या असोत वा नसोत, त्यांना गुलाबी रंग देणे कायद्याने बंधनकारक केलेले असल्याने, शहराचा गुलाबी रंग सर्वदूर भरून राहिलेला दिसतो. राजस्तानात दरवाज्याला ’पोल’ म्हणतात. गुलाबी शहराच्या पश्चिमेकडील तटबंदीतील मुख्य दरवाज्याला ’चाँद’पोल म्हणतात, तर पूर्वेकडील तटबंदीतील मुख्य दरवाज्याला ’सुरज’पोल म्हणतात. दोन्ही दरवाजांना जोडणारा आडवा रस्ता गुलाबी शहरातला मुख्य रस्ता होय. या रस्त्याच्या दोन्ही बाजूस गुलाबी शहर उभ्या-आडव्या रस्त्यांवर प्रशस्तपणे वसलेले आहे. या रस्त्याच्या मध्यभागी ’इशारलट’ नावाचा उंच जयस्तंभ आहे. गुलाबी शहराच्या अतिपूर्वेला एक उंचसा डोंगर आहे. त्यावर एक प्रेक्षणीय स्थळ आहे, ते म्हणजे ’गलताजी’ उर्फ गालव मुनींचे मंदिर. इथून, चौरस सुनियोजित रस्त्यांतून वसलेले जयपूर शहर अतिशय रमणीय दिसते. गुलाबी शहराच्या दक्षिणेकडील तटबंदीतून मुख्य शहराकडे जाणारे तीन प्रमुख रस्ते आहेत. अजमेर रस्ता ’अजमेरी गेट’ मधून बाहेर पडतो. ’मोतीडुंगरी” उर्फ ’एमडी’ रोड मोतीडुंगरी राजप्रासादाकडे घेऊन जातो. डुंगरी म्हणजेच टेकडी. हा राजप्रासाद उंच टेकडीवर बांधलेला आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी तो पर्यटकांना पाहण्यासाठी खुला असतो. मी नेमका त्याच दिवशी तिथे पोहोचलो होतो. मात्र, हाताशी पुरेसा वेळ नव्हता. म्हणून मग याच्या पायथ्याशी सुरेख बिर्लामंदिर आहे, तेच पाहून समाधान मानले होते. आणि ’टोंक’ रोड अर्थातच टोंक गावाकडे जातो. याच रस्त्यावर गावाबाहेर विमानतळ आहे. या तिन्ही रस्त्यांच्या आजूबाजूस नवे जयपूर शहर औरस चौरस वसलेले आहे. भारतातल्या बव्हंशी शहरात एक ’एम.जी.’रोड असतो. मात्र इथे एक ’एम.आय’ रोड आहे. मिर्जा इस्माईल रोड. हा रस्ता गुलाबी शहरातील मुख्य रस्त्याला समांतर, पण दक्षिण तटबंदीच्या दक्षिणेला, रेल्वेस्टेशनपासून निघून तर पार गलताजीपर्यंत दूरवर जातो.

शहरातील संस्मरणीय स्थळे म्हणजे जंतरमंतर किंवा यंत्रमंदिर, हवामहल, आमेरगढ, शीशमहल, गलताजी, राजमंदिर चित्रपटगृह इत्यादी. याशिवाय मातीच्या पेल्यातील लस्सी आणि गजक यांच्या उल्लेख केल्याशिवाय जयपूरचे वर्णन अपुरेच ठरेल.

जंतरमंतर, महाराज जयसिंग यांची आकाशाचा वेध घेणारी, भारतीयांना सदैव अभिमान वाटावा अशी, अभूतपूर्व प्रयोगशाळा. अतिविशाल संगमरवरी कमानीवर, एक एक सेंटीमीटर अंतरावर खोदलेल्या रेघांवर, तिरप्या उभ्या केलेल्या उतरत्या पत्थरांच्या सावल्या सूर्याच्या संदर्भात कशा फिरतात ते मोजून, आजही, तिथे प्रचलित वर्षाचा दिवस आणि त्या दिवसाची निरीक्षण करण्याची वेळ निश्चित करता येते. हे समजल्यावर मला मी स्वतः त्याच परंपरेचा वारस असल्याचा सर्वथैव अभिमान वाटला. देशाविदेशातील अनेक विद्यार्थी आजही तिथल्या यंत्रांच्या वापरावर पी.एच.डी. चा अभ्यास करत असलेले मी पाहिले. धन्य आपले खगोलशास्त्र आणि धन्य महाराज जयसिंग.

हवामहल ही भिंतीसदृश, रस्त्याच्या किनाऱ्यास उभारलेली, दुतर्फा उतरत्या भाजणीने बांधलेली, सहा मजल्यांची भव्य इमारत आहे. असे म्हणतात की वरील मजल्यावर बसलेल्यांना खालील रस्त्यावरून जाणार्‍या मिरवणुका स्पष्टपणे पाहता येत आणि हवेशीर वाटत असे. मला मात्र वर जाऊन स्वतः अनुभव घेण्याचा मोह, पायी चालून (जंतर मंतर मधे) थकून गेल्याने टाळावा लागला. खूप जुन्या काळी विविध भारती नावाच्या नभोवाणी केंद्रावर रात्री पावणेनऊ वाजता एक सुरेख मनोरंजनात्मक कार्यक्रमही लागत असे ’हवामहल’ नावाचा. त्याचीही आठवण झाली.

मी पाहिलेल्या अनेक डोंगरी किल्ल्यांच्या मानाने आमेरगढ अभेद्य, अवघड आणि विस्तृत आहे. त्यावर शीशमहल आहे. त्याच्या भिंतींवर तसेच छतावर आरशाच्या काचा जडवलेल्या असल्याने अगदी वेगळेच वाटते. शयनगृहाच्या आत गेल्यावर गाईडने दारे लावून घेतली आणि एक मेणबत्ती उजळली. क्षणार्धात लाख लाख दिव्यांच्या प्रकाशात उजळावी तशी ती खोली उजळून निघाली. तो म्हणाला, ह्या बघा लाखो चांदण्या. पण चंद्र कुठे आहे? अहो राजाजवळ राणीचा मुखचंद्रमा असल्यानंतर खर्‍या चंद्राची गरजच काय? ही मात्र अगदी प्रत्ययदायी ओळख होती त्या जागेची, जी मी आजवर विसरलेलो नाही.

गलताजीला गालवमुनींचे मंदिर आहे. तिथून जयपूर शहराचे विहंगम दृश्य दिसते. राजमंदिर चित्रपटगृहासारखे चित्रपटगृह मी आजवर पाहिलेले नाही. जुना राजवाडाच होता तो. त्याची वेटिंग रूमच किती भव्य आहे. सर्वदूर हिरवा गालिचा अंथरलेला आहे. सगळाच थाट अत्यंत रहीशी. आतील कलाकुसर तर प्रेक्षणीय. जयपूरला जाणार्‍यांनी अवश्य पाहावी. मातीच्या पेल्यातील लस्सी ही जयपूरची एक खासियत आहे. अवश्य प्यावी. तिचे वर्णन इथे करून मी मजा किरकिरा करत नाही. गजकाबद्दल मात्र थोडेसे लिहायलाच हवे. तिळ आणि गुळ यांचे मिश्रण फेसून ते तयार करतात. गजक फक्त हिवाळ्याच्याच दिवसांत ’जमता है’ असे सांगितले जाते. पण खायला चविष्ट, रुचकर, हलका आणि एवढा अद्भूत पदार्थ मी तरी आजवर खाल्लेला नाही. तेव्हा मंडळी जयपूरला जरूर भेट द्या आणि माझे हे वर्णन पुन्हा जगा. विशेषतः त्या लोकांनी जयपूर अवश्य पाहावे ज्यांना वास्तुशास्त्रात गती आहे, रुची आहे.

श्रेय अव्हेरः या नोंदीतील प्रकाशचित्रे महाजालावरून साभार घेतलेली आहेत.

1 comment:

Asha Joglekar said...

खूप वर्षां पूर्वी पाहिलेले जयपूर आठवले.