न्यू
मेक्सिकोतील अल्बुकर्कच्या दक्षिणेस १२० मैलांवरील अमेरिकेच्या
अलामागार्डो भूदलाच्या, बिकिनी बेटावरील हवाई तळावरील एका उंच लोखंडी मनोर्यावर, स्थानिक वेळेनुसार, १६ जुलै १९४५ रोजी सकाळी ०५३० वाजता, जगातील
पहिला ज्ञात अणुस्फोट करण्यात आला. मनोर्याभोवती
विविधप्रकारची वैज्ञानिक वेध घेणारी साधने ठेवलेली होती. मात्र, स्फोटामुळे सबंध मनोर्याची वाफ झाली आणि स्फोटाबाबतची नोंद करणारी बहुतेक
सर्व सामुग्रीही हवेत विरून गेली. स्फोटाने ८०० यार्ड परिघातील वाळवंटाचा पृष्ठभाग
बेचिराख केला. वाळू वितळवून, कठीण, ठिसूळ
आणि काचेगत दिसणार्या आणि वाटणार्या हिरव्या पदार्थात गोठवून टाकली.
अणुस्फोट होतो तेव्हा असंख्य अणुंची अगणित
किरणोत्सारी छकले तयार होतात आणि ही छकले आपापल्या परीने पर्यावरणास किरणोत्सारी
करत राहतात. ती मनुष्य मात्रांकरता अत्यंत धोकादायक असतात. वेगवेगळ्या प्रकारच्या
व्याधी आणि विकार निर्माण करू शकतात.
अमेरिकेने पहिला चाचणी अणुस्फोट बिकिनी
बेटावर घडवला होता. या अणुस्फोटात खूप किरणोत्सार निर्माण झाला. तो दूरवर
विखुरलाही गेला, कारण एका उंच मनोऱ्यावर अणुस्फोटके ठेवून त्यांचा स्फोट घडवून
आणलेला होता. तो किरणोत्सार सगळीकडे विखरून वातावरण प्रदूषित झाले. एवढेच नाही तर ते
बेट महासागरातील असल्यामुळे, महासागरातील पाणी प्रदूषित झाले आणि पृथ्वीवरील सर्व
महासागरांशी ते जोडलेले असल्या कारणाने पृथ्वीच्या वातावरणात सर्व दूर हे प्रदूषण
फैलावले.
भारतानेही १९७४ साली चाचणीकरता अणुस्फोट
केला. तो अणुस्फोट मात्र भूमीच्या अंतर्गत खोलवर केला. त्यामुळे जेव्हा स्फोट झाला
तेव्हा ताबडतोब आसपासची जमीन वितळली. त्याचा ज्वालामुखीसारखा लाव्हा रस तयार झाला
आणि त्या लाव्हा रसालासुद्धा वितळल्यानंतर निवण्याकरता वेळच न मिळाल्या कारणाने
त्याचे काचेत रूपांतर झाले. हे होत असताना सारा किरणोत्सार हा जमिनीमध्ये जिवंत
गाडल्या गेला आणि त्याचा उपसर्ग कोणत्याही प्रकारे पर्यावरणाला झाला नाही. भारताने
मग १९९८ सालीही चाचणीकरता अणुस्फोट केले. या अणुस्फोटानंतर, जगभर अशी मान्यता
उदयास आली की, चाचणी अणुस्फोट भूमीच्या अंतर्गत खोलात करावेत, म्हणजे
किरणोत्साराचा प्रसार होणार नाही. त्यामुळे चाचणीकरता भूमीअंतर्गत स्फोट, हे धोरण
जगाने भारताच्या अनुभवावरून स्वीकारले.
अणुविवेक नावाच्या राजहंस
प्रकाशनाने १९९५ साली प्रकाशित केलेल्या एका पुस्तकात, लेखक
दिलीप कुलकर्णी म्हणतात, “अण्वस्त्रे ही विनाशकारी, प्रलयंकारी आहेत हे आपण जाणतो.
पण अण्वस्त्रांच्या चाचण्याही तितक्याच घातक आहेत हे आपल्याला ठाऊकच नसते. अणुवीज
ही स्वच्छ, स्वस्त आणि सुरक्षित आहे या भूलथापेवर आपण भाबडेपणाने विश्वास ठेवतो!”
हे विधान वस्तुस्थितीवर आधारित नाही. वस्तुतः भारताकरता अणुऊर्जेचा इतिहास अत्यंत
आश्वासक राहिलेला आहे. भारतातल्या शास्त्रज्ञांनी “अणुवीज ही स्वच्छ, स्वस्त आणि
सुरक्षित आहे” हे वेळोवारी सप्रमाण सिद्धही केलेले आहे. भाभा अणुसंशोधन केंद्रात
कसे काम चालते आणि देशातले बिनीचे शास्त्रज्ञ अपार कष्ट करून देशास जगात
सर्वांपुढे कसे ठेवतात हे, मनोविकास प्रकाशनाच्या एका नव्याच पुस्तकात
तपशीलाने लिहिले आहे.
“भारतीय वैज्ञानिक
संस्थांमधील एक अव्वल यशस्वी संस्था असलेल्या भाभा अणुसंशोधन केंद्राच्या आत नेमके
काय चालते याची उत्सुकता सर्वांच्या मनात असते. त्याचे कथन या यशाचे साक्षीदार
असलेले आल्हाद आपटे उत्कृष्टतेबरोबरच अधिकारवाणीने करू शकतात. अणुकार्यक्रमाचा
इतिहास सुस्पष्टपणे, संबंधित मानवी कंगोरे, निगडित परिस्थितीचा संदर्भ, आनुषंगिक
मनोरंजक व चित्तवेधक गोष्टी यांनी सजवून रंजकपणे प्रस्तुत केला आहे. भाभा
अणुसंशोधन केंद्राचे दार किलकिले करून आतील वैज्ञानिक विश्वाचे दर्शन घडवणारा
मराठीतील पहिलाच ग्रंथ.” असे त्याचे वर्णन त्यात सांगितलेले आहे. या पुस्तकास डॉ. अनिल
काकोडकर ह्यांची प्रस्तावनाही लाभलेली आहे.
भारताच्या भूमीअंतर्गत चाचणी अणुस्फोटांमध्ये
किरणोत्साराचे प्रदूषण झाले नाही. मनुष्य हानी झाली नाही. चिटपाखराचेही त्यात
नुकसान झाले असा अहवाल नाही. भारतातील अणुऊर्जेचा इतिहास किरणोत्सारावरील विजयाचाच
इतिहास आहे. हा विजय अभूतपूर्व आहे. याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे.
त्यापूर्वी
आधुनिक जगास अणुऊर्जेची ओळखच झालेली नव्हती. अणुच्या अंतरंगात अपार ऊर्जा दडलेली
असते. ती मुक्त करता येते असा शोधच मुळी या घटनेने लागला होता. अणुतील संहारक
ऊर्जेचे तर प्रात्यक्षिकच झालेले होते. पुढील दहा वर्षांत अणुऊर्जेच्या नियंत्रित
विमोचनाचे मार्गही शोधले गेले. भारत, अणुऊर्जेच्या दोहनार्थ सर्वाधिक चपळाईने
सिद्ध झाला. डॉ. होमी भाभांच्या पुढाकाराने अणुऊर्जा आयोगाचा
जन्म १९४८ मध्येच झाला. ३ ऑगस्ट १९५४ रोजी भारतीय अणुऊर्जा विभागाची स्थापना झाली.
अणुऊर्जा आयोगाने निर्धारित केलेल्या धोरणांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी या
खात्यावर सोपवण्यात आली. संसदेने मंजूर केलेल्या अंदाजपत्रकी मर्यादांतर्गतचे भारत
सरकारचे सर्व प्रशासकीय आणि आर्थिक अधिकार या विभागाला प्रदान करण्यात आले. डॉ.
होर्मसजी जहांगीर भाभा, भारतीय अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष झाले. २४ जानेवारी
१९६६ रोजी माऊंट ब्लांकवरील दुर्दैवी विमान अपघातात त्यांचा मृत्यू होईपर्यंत
त्यांनी ही जबाबदारी सांभाळली. त्यांना भारतीय अणुऊर्जा संशोधनाचे जनक मानले जाते.
त्यांच्या दूरदृष्टीतूनच भारतीय अणुऊर्जा कार्यक्रमाचा उदय झाला.
विश्वकिरणांच्या वर्षावांवर
त्यांनी मोलाचे संशोधन केले होते. ते ब्रिटनमध्ये राहूही शकले असते. तिथे त्यांना
सन्मानही मिळाला असता. मात्र, पुरेसा सन्मान आणि आर्थिक पाठबळ
मिळत असेल तर देशातच राहून, इतर सुदैवी देशांत असलेल्या शैक्षणिक संस्थांच्या
तुल्यबळ संस्था, आपल्या देशातच उभ्या करणे हे आपले कर्तव्य आहे असे त्यांचे मत होते. टाटा मूलभूत विज्ञान संस्था,
ऍटॉमिक एनर्जी एस्टॅब्लिशमेंट ट्रॉम्बे (ए.ई.ई.टी., भाभांच्या अपघाती मृत्यूनंतर याच
संस्थेचे नामकरण भाभा अणुसंशोधन केंद्र असे करण्यात आले) आणि त्याची प्रशिक्षण
शाळा, या भारताच्या संशोधनक्षेत्रावर चिरकाल राहणारा ठसा उमटविणार्या संस्था
त्यांनीच स्थापन केल्या. अशा देशप्रेमी विज्ञान नेतृत्वाचा आपल्याला अभिमान वाटला
पाहिजे.
होमी नसरवानजी सेठना
ह्यांनी भारतीय अणुऊर्जा आयोगाची जबाबदारी सांभाळली. १९७२ ते १९८३ अशी एकूण ११
वर्षे ते अणुऊर्जाआयोगाचे अध्यक्ष राहिले. भारतातील पहिली अणुभट्टी ’सायरस’ नावाची ४००
लक्षवॉट औष्णिक क्षमतेची अणुभट्टी होती. १९५६ ते १९५८ दरम्यान ’सायरस’च्या उभारणी
प्रकल्पाचे ते व्यवस्थापक होते. भारतातील पहिल्या प्ल्युटोनियम कारखान्याचे
अभिकल्पन आणि उभारणीही त्यांच्याच नेतृत्वाखाली करण्यात आली. १९६४ सालीच त्यांनी
प्ल्युटोनियम तयार केलेले होते. प्ल्युटोनियम या किरणोत्सारी जड धातूचा उपयोग
अणुस्फोटके तयार करण्यासाठी होत असतो. अणुऊर्जेपासून विद्युतऊर्जा निर्माण
करण्यासाठीही त्याचा उपयोग होऊ शकतो. तशा विद्युतऊर्जा निर्मितीची संयंत्रे तयार
करावी लागतात. भारताने तर अणुऊर्जादोहनार्थ एक संपूर्ण कार्यक्रमच तयार केला होता.
या सार्याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे.
मात्र जेव्हा अणुसंयंत्र चालवल्या जाते
तेव्हा त्याचा अणुस्फोटाशी काहीही संबंध नसतो. अणुस्फोटासारखे किरणोत्सार त्यात
निर्माणच होत नाहीत. संयंत्र चालवण्यामधून जो किरणोत्सार होतो त्याचे प्रमाण
अत्यंत नगण्य असते आणि त्याचा मनुष्यजातीला कुठलाही अपाय होत नाही. संयंत्रात किरणोत्साराचा
प्रसार होऊ शकत नाही आणि अणुस्फोटासारखा संयंत्राचा स्फोट तर कधीही होऊच शकत नाही,
कारण दोन्हींच्या संकल्पनाची उद्दिष्टे मुळातच निरनिराळी असतात.
२८ ऑक्टोंबर १९६९ रोजी भारताने
अणुऊर्जादोहनार्थचे पहिले संयंत्र तारापूर येथे स्थापन केले होते.
त्यात प्रत्येकी १६ कोटीवॉट विद्युतनिर्मिती क्षमतेच्या दोन अणुभट्ट्या उभारण्यात
आलेल्या होत्या. आजमितीस भारताची अणुऊर्जेपासून विद्युतनिर्मितीची स्थापित क्षमता ८.१८ अब्जवॉटस इतकी
आहे. या दरम्यान वाढत्या प्रमाणात ऊर्जानिर्मिती करत असतांना गेल्या ५५ वर्षांच्या
इतिहासात एकही उल्लेखनीय दुर्घटना या प्रकल्पांत झालेली नाही आणि उल्लेखनीय
किरणोत्सार तर नाहीच नाही. अणुऊर्जादोहनाचा आपला इतिहास पूर्णनियंत्रित, सुरक्षित
ऊर्जाविमोचनाचा राहिलेला आहे. स्थापित क्षमतेच्या पूर्ण क्षमतेने संयंत्र वापराचे
प्रमाण आपल्याकरता गौरवास्पद राहिलेले आहे. संपूर्ण संयंत्र इंधनभरणार्थ वा
देखरेखीकरताही न थांबता सलग एक वर्षाहून अधिक काळपर्यंत चालवत ठेवण्याचा विक्रमही
आपण अनेकदा केलेला आहे. कैगा जनरेटिंग स्टेशन युनिट-१, आपण १३ मे २०१६ पासून तर ३१
डिसेंबर २०१८ पर्यंत सलग चालवलेले आहे. हा ९६२ दिवसांचा आपण रचलेला एक जागतिक
विक्रम आहे.
त्याचाही आपल्याला अभिमान वाटला पाहिजे.
असे लक्षात आलेले आहे की, वातावरणातील
अतितरल धूलिकणांचा प्रमुख स्रोत कोळशावर चालणारे विद्युतप्रकल्प असतात.
देशात एकूण विजनिर्मिती ही सुमारे ४४२ अब्जवॉटस इतकी आहे. त्यातील सुमारे ५०% वीज
ही कोळसा वा तत्सम इंधनांपासुन तयार केली जात असते. त्यामुळे उद्भवणारे अतितरल
धूलिकण, मानवी मृत्यूंचा दर वाढवत असतात. त्यातील गंधकप्राणिल (सल्फर डाय
ऑक्साईड), काजळी (ब्लॅक कार्बन) आणि धात्विक धूळ पर्यावरणाचा र्हास घडवत असते.
असा र्हास अणुसंयंत्रामध्ये होतच नाही. अणुसंयंत्रामध्ये कोळशाच्या
संयंत्रांप्रमाणे कर्बप्रदूषण होत नाही. त्यांत होणारे कर्बप्रदूषण अत्यंत नगण्य
असते. त्यामुळे पर्यावरण पूरक असा आपल्याला जर प्रकल्प निवडायचा असेल तर,
कोळशाच्या संयंत्राच्या तुलनेत अणुसंयंत्र हे पसंत करायला हवे.
कोळशापासून विद्युत निर्मिती करण्याच्या
प्रकल्पामध्ये वातावरणातील वायू कर्बप्रदूषित तर होत असतोच, पण त्यासोबतच राख
सुद्धा उत्पन्न होत असते. एकूण राखेच्या निष्पन्नापैकी २०% राख खाली उरते. मात्र
८०% राख उडून वातावरणास प्रदूषित करत असते. कोळशाच्या विद्युत निर्मितीमुळे
वातावरणामध्ये राखेचे ढिगारेच्या ढिगारे निर्माण होतात. त्या राखेचं काय करायचं हे
कोणालाही समजत नाही. अत्यंत हलकी आणि सहज उडून जाणारी तरल स्वरूपाची राख तर
पर्यावरण खराब करत असतेच शिवाय त्या राखेच्या पसरण्यामुळे जमिनी नापीक होत असतात.
भारतीय वनखात्याच्या १४ सप्टेंबरच्या परिपत्रकात, विविक्षित कालावधीत, खाली उरलेली
१००% राख निरनिराळ्या उपयोगांत वापरली जावी असे म्हटले आहे.
मात्र हे केवळ ५०% च साधले जाऊ शकले आहे. अशा मोठ्या प्रमाणातील प्रदूषणाच्या
समस्या अणुऊर्जाप्रकल्पांत असतच नाहीत.
भारतातील जलविद्युतप्रकल्पांची अनुमानित
क्षमता सुमारे १४८ अब्जवॉटस इतकी आहे.
सुमारे ८४ अब्जवॉटस इतकी विजेची मागणी ती भागवू शकते. मात्र सध्या भारतात यातील
केवळ २०% क्षमताच वापरली गेलेली आहे. २००८ साली पूर्ण झालेल्या तिस्ता
जलविद्युतप्रकल्पातील वीज एका एककास रु.१.५३/- एवढ्या कमी दराने उपलब्ध होत असते.
विजेच्या शिखर मागणीस भागविण्याकरता जलविद्युतप्रकल्पच प्राधान्याने वापरले जात
असतात, कारण ते सत्वर सुरू वा बंद करता येतात. मात्र जलविद्युतप्रकल्पाच्या दर दशलक्षवॉट
स्थापित क्षमतेपाठी सुमारे ०.७६ हेक्टर जमीन, पाणलोटक्षेत्राखाली बुडून जात असते. जलविद्युत
प्रकल्पामध्ये पाणलोट क्षेत्राच्या जमिनीवरती पाणी भरल्या कारणाने पर्यावरणाचा खूप
ऱ्हास होतो. ती भूमी ही पाण्याखाली जाते आणि तिचा वापर मनुष्याकरता होऊ शकत नाही.
अशा प्रकारची कुठलीच समस्या अणुसयंत्राच्या संदर्भात उपस्थित होत नाही. अणुविद्युतप्रकल्पांची
जमिनीची गरज यामानाने नगण्यच असते.
गेल्या तिमाहीत भारतातील सौर विद्युत
उत्पादन एकूण विजनिर्मितीच्या सुमारे २०% पर्यंत वाढले आहे.
देशातील सुमारे ४३% वीज आज पुनर्नविनीक्षम स्रोतांपासून तयार होत आहे. ती सुमारे
१९० अब्जवॉटस इतकी आहे. देशात एकूण विजनिर्मिती ही सुमारे ४४२ अब्जवॉटस इतकी आहे.
यात अणुऊर्जा केवळ ८ अब्जवॉटस इतकी नगण्य आहे. अणुऊर्जा स्वच्छ आहे, सुरक्षित आहे,
तुल्यखर्चिक आहे आणि तिच्यातील आपला अनुभवही आजवर गौरवास्पद राहिलेला आहे.
त्यामुळे आपल्याला अणुऊर्जेचा विकास करून आपल्या विकासास गती देण्याची आवश्यकता
आहे.
या
प्रकाशचित्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी इंधनभरणास सुरूवात करतांना दिसत आहेत. सोबतच (उजवीकडून डावीकडे) अणुऊर्जा आयोगाचे विद्यमान अध्यक्ष डॉ. अजितकुमार मोहंती, भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, भाभा अणुसंशोधन केंद्राचे संचालक श्री. विवेक भसीन आणि भाविनीचे अध्यक्ष श्री. के. व्ही. सुरेशकुमार हेही दिसत आहेत.
४ मार्च २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी, भारताच्या तीन टप्प्याच्या अणुकार्यक्रमातील, दुसर्या टप्प्यातील ऐतिहासिक प्रवेश, कळपक्कम येथील ५० कोटीवॉट विद्युत क्षमतेच्या, “प्रारूप शीघ्र प्रजनक अणुभट्टी”च्या गर्भातील इंधनभरण्यास सुरूवात होतांना स्वतः प्रत्यक्ष उपस्थित राहून अनुभवला. या प्रकारची ही पहिलीच अणुभट्टी असल्याने तिला ’प्रारूप’ म्हणजे पथदर्शी असे म्हटलेले आहे. शीघ्रगती विरक्तकांवर (फास्ट न्यूट्रॉन्स वर) ती चालत असल्याने तिला ’शीघ्र’ म्हणतात. मात्र ती जेवढे इंधन खर्च करते, त्याहून जास्त इंधनाची निर्मितीही ती त्याच वेळी करत असते, त्यामुळे तिला ’प्रजनक’ अणुभट्टी असे म्हटले जाते. या अर्थाने ती पुनर्नविनीकरणक्षम आहे असेही म्हणता येईल.
इंधनभरणा
पूर्ण होताच अणुभट्टीची क्रांतिकतेकडे पहिली वाटचालही सुरू होईल. मग यथावकाश विद्युतनिर्मितीही सुरू होईल. ’आत्मनिर्भर भारत’ धोरणानुसार ही अणुभट्टी, भारतीय अणु-विद्युत निगम मर्यादित (भाविनी- BHAVINI-Bharatiya
nabhikiya Vidyuta Nigam) ही नोंदित पेढी निर्माण करत आहे. पूर्णतः स्वदेशी बनावटीची संकल्पना करून, तशीच ती घडवलेली आहे. भारतातील २०० हून अधिक मध्यम व लहान उद्योगांचाही या
कार्यात सहभाग राहिलेला आहे. भारताचा अणुकार्यक्रम अशा उद्देशाने तयार केलेला आहे की, दीर्घकालीन ऊर्जा सुरक्षा साध्य व्हावी आणि
त्याच वेळी शाश्वत विकासही व्हावा.
भारताने
संपूर्ण अणुइंधनचक्रावरील सर्वंकश सामर्थ्ये प्राप्त करून घेतलेली आहेत. सरकारने २००३ साली ‘भाविनी’स
भारताची सर्वात प्रगत अशी प्रारूप शीघ्र प्रजनक अणुभट्टी उभारण्यास तसेच चालवण्यास
संमती दिली. ही कार्यान्वित होईल
तेव्हा, रशियानंतर भारत हा
दुसरा असा देश ठरेल, ज्याने
शीघ्र प्रजनक अणुभट्टी व्यापारी स्तरावर सुरू केलेली आहे.
आपल्या
देशात युरेनियम साठे मर्यादित आहेत आणि थोरियम साठे विपुल प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यांच्यापासून दीर्घकालीन ऊर्जासुरक्षा
प्राप्त करणे गरजेचे आहे. भारताने त्यासाठी तीन टप्प्यांचा अणुकार्यक्रम अवलंबलेला आहे. त्याचा उद्देश देशातील आण्विक स्रोतांचा
इष्टतम वापर करण्याचा आहे. हा कार्यक्रम क्रमवार आहे. प्रत्येक टप्प्याकरता इंधनक्रम योजलेले आहेत. वापरलेल्या इंधनाचे पुनर्प्रक्रियण करून पुढील
टप्प्यातील इंधन मिळवता येत असते. हे तीन टप्पे पुढीलप्रमाणे आहेत.
१. नैसर्गिक युरेनियम
इंधनावर चालणार्या, दाबित जड पाणी अणुभट्ट्या,
२. प्ल्युटोनियम इंधनावर
चालणार्या, शीघ्र प्रजनक
अणुभट्ट्या आणि
३. थोरियम-युरेनियम चक्रात, युरेनियम-२३३ इंधनावर चालणार्या, प्रगत अणुभट्ट्या.
पहिल्या
टप्प्यातील दाबित जड पाणी अणुभट्ट्यांचा कार्यक्रम, भारतीय अणुऊर्जा महामंडळ मर्यादित (एन.पी.सी.आय.एल. -NPCIL-
Nuclear Power Corporation of India Limited) ही नोंदित पेढी चालवत आहे. दुसर्या टप्प्यातील शीघ्र प्रजनक अणुभट्ट्यांचा कार्यक्रम ’भाविनी’ पुढे नेत आहे.
भाविनी
ही भारत सरकारच्या अणुऊर्जाविभागाच्या प्रशासकीय नियंत्रणातील नोंदित पेढी आहे. तिचा उद्देश तामिळनाडूतील कळपक्कम येथे, पहिली ५० कोटीवॉट विद्युत क्षमतेची
शीघ्र प्रजनक अणुभट्टी उभारणे आणि तिचे कार्यान्वयन करण्याचे आहे. त्यानंतर देशाला दीर्घकालीन ऊर्जासुरक्षा
पुरवण्याकरता भारत सरकारच्या
अणुऊर्जा कार्यक्रमाखाली, विद्युत निर्मितीकरता भावी प्रजनक अणुभट्ट्यांची उभारणी, कार्यान्वयन, संचालन व देखभाल यांची जबाबदारीही भाविनीस दिलेली
आहे.
शीघ्र
प्रजनक अणुभट्टी प्रकाराची ही सुरूवात आहे. भावी काळात ६० कोटीवॉट क्षमतेच्या आणखी २
शीघ्र प्रजनक अणुभट्ट्या, प्रारूप अणुभट्टीलगतच कळपक्कम येथे उभारल्या जाणार आहेत. त्या, देशास दीर्घकालीन ऊर्जा सुरक्षा पुरवतील अशी अपेक्षा
आहे. कळपक्कम येथील इंदिरा
गांधी अणुऊर्जासंशोधनकेंद्रात (सेंटर फॉर ऍटॉमिक रिसर्च) विकसित केलेल्या अभिकल्पन आणि तंत्रज्ञानाचे आधारे ही प्रारूप अणुभट्टी
उभारली जात आहे.
सुरूवातीस
प्रारूप शीघ्र प्रजनक अणुभट्टीत युरेनियम प्राणील व प्ल्युटोनियम प्राणील यांचे
मिश्रण इंधन म्हणून वापरले जाईल. इंधनाभोवतीचे आच्छादन इंधनाच्या
पुनर्निर्मितीकरता वापरले जाते. या भागास पांघरूण (ब्लँकेट) म्हणतात. इंधनातून
बाहेर पडणारे शीघ्र विरक्तक (न्यूट्रॉन्स) यात शोषले जाऊन यातील धातूचे रूपांतर
विदलनक्षम धातूत होते. पुनर्प्रक्रियणानंतर हा विदलनक्षम धातू मग इंधन म्हणून
वापरता येतो. वापरल्या जाणार्या इंधनाहून नव्याने निर्माण होणारे इंधन जास्त असते,
म्हणूनच अशा प्रकारच्या अणुभट्टीस प्रजनक अणुभट्टी म्हटले जात असते. युरेनियम-२३८ चा उपयोग पांघरूण म्हणून केला जाईल. थोरियम-२३२ विदलनक्षम नाही. मात्र पांघरूण म्हणून वापरल्यास त्याचे अंशतः
युरेनियम-२३३ या विदलनक्षम धातूत
रूपांतरण होत असते. म्हणूनच
या टप्प्यात थोरियम-२३२
चा उपयोगही पांघरूण म्हणून केला जावयाचा आहे. रुपांतरणात तयार होणार्या युरेनियम-२३३ चा उपयोग तिसर्या टप्प्यातील
अणुभट्ट्यांत इंधन म्हणून केला जाणार आहे. जगात थोरियमचा साठा आपल्याच भूमीत सर्वाधिक आहे. तिसरा टप्पाही कार्यान्वित झाल्यावर, भारतातील थोरियम साठ्याचा पूर्णांशाने वापर
होऊ लागून, आपल्या दीर्घकालीन
ऊर्जासुरक्षेकरता, आपण त्याचा
उपयोग करून घेऊ शकू, कारण
अशा प्रकारे वापरल्यास स्वदेशी थोरियम देशाला २५० वर्षांहूनही अधिक काळपर्यंत वीज
पुरवू शकेल असे अनुमान आहे.
सौरऊर्जा आणि पवनऊर्जा हे
पुनर्नविनीकरणक्षम स्रोत वगळता, मनुष्यनिर्मित सर्व विद्युत प्रकल्पांमध्ये अणुविद्युत
प्रकल्प हे सर्वाधिक दीर्घकालीन ऊर्जापुरवठा करण्यास सक्षम आहेत. त्यांच्याहून इतर
कोणताही प्रकार हा अधिक काळ ऊर्जा पुरवू शकत नाही. मात्र कोळशाची व इतर खनिज
तेलांवर आधारित विद्युत यांहून अणुऊर्जा प्रकल्प खूप दीर्घकाळ ऊर्जापुरवठा करू
शकतात.
अणुऊर्जा प्रकल्पांत निर्माण होणार्या,
वापरलेल्या आण्विक इंधनातील सक्रिय किरणोत्सारी अवशिष्ट पदार्थांतील किरणोत्सार
निराळा करून, संघनित करून, काचेत बंद करण्याचा आणि जमिनीत पुरून टाकण्याच्या
तंत्राचाही आपण भारतात विकास केलेला आहे. त्यामुळे संपूर्ण अणुइंधनचक्राबाबत आपण
स्वावलंबी झालो आहोत. एवढेच नव्हे तर, त्यामुळे होऊ शकणारे संभाव्य किरणोत्सार
प्रदूषणही आपण नामशेष केलेले आहे. असे करू शकणार्या मोजक्या देशांत आपणही आलो
आहोत. याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे.
ऊर्जेविना विकास होऊ शकत नाही.
सर्वसामान्य इंधनांवर चालणारी संयंत्रे आपल्याला सुमारे ५०% ऊर्जा पुरवतात खरी,
मात्र प्रदूषणाची किंमत मोजून. प्रदूषणाविना ते साध्य करायचे तर अणुऊर्जा हवीच.
त्याशिवाय दीर्घकालीन ऊर्जा सुनिश्चित करायची तरीही अणुऊर्जा हवीच.
त्यामुळे उपलब्ध ऊर्जांचा विचार करता
भारतात आज तरी अणुऊर्जा ही एक आशादायक संभावना बनून राहिलेली आहे. सौर आणि पवन
ऊर्जांव्यतिरिक्त आपल्या गरजा भागवण्याकरताची अपार क्षमता अणुऊर्जेत आहे. ती
पर्यावरण स्नेही आहे, पर्यावरणपूरक आहे आणि आपले तिच्या तंत्रावर संपूर्ण
नियंत्रणही प्रस्थापित झालेले आहे. तिच्या बाबतीत आपण पूर्णतः स्वावलंबी झालेलो
आहोत. दीर्घकालीन ऊर्जासुरक्षेचा विचार तर अणुऊर्जेविना केलाच जाऊ शकत नाही. अशा
परिस्थितीत आपले धोरण सौर ऊर्जेस सर्वात अनुकूल आहे. २०४० सालपर्यंत आपली एकूण
ऊर्जेच्या ४०% वीज सौर असणार आहे. तरीही, अणुऊर्जेचे दोहन करून आपण दीर्घकालीन
ऊर्जासुरक्षा सुनिश्चित करावी हेच शहाणपणाचे ठरेल. जागतिक तापमानवाढीस रोखणारे
ठरेल. तसे करण्यास आज आपण पात्र आहोत, याचाही आपल्याला अभिमान वाटला पाहिजे.
पूर्वप्रकाशनः ग्रंथालीच्या ’विज्ञानधारा’
पुस्तिकेचा जून-२०२४ चा अंक.