२०१७-०८-१२

असा धरी छंद

असा धरी छंदः २५ काव्यप्रकारांसह, छंदशास्त्राची तोंडओळख
लेखकः नरेंद्र गोळे २०१७०८०९


युनान, मिस्र, रोमा सब मिट गये जहाँ से ।
कुछ बात हैं की हस्ती मिटती नहीं हमारी ॥ - डॉ. महंमद अल्लामा इक्बाल, १९०५

चीनी, इजिप्ती, रोमन, कुणीही टिकू न शकले ।
आहो विशेष म्हणुनी, आम्ही टिकून आहो ॥ - मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०१७०८०९

सर्व पुरातन संस्कृतींत आपली हिंदवी संस्कृती टिकून राहिली आहे. चीनी, इजिप्ती आणि रोमन यांसारख्या इतर संस्कृती लयास गेल्या. पण आपण टिकून आहोत. कारण आपल्या अनुभवाच्या नोंदी कागदपत्रांवर नव्हे तर, वृत्त-छंदांत बांधून मौखिक परंपरेने अत्यंत काळजीपूर्वक, हजारो वर्षे सातत्याने सांभाळण्यात आल्या. आपले वेद, उपनिषदे, पुराणे; रामायण, महाभारत यांसारखे इतिहासग्रंथ आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपले अष्टांग योगशास्त्र१; सूत्रबद्ध, वृत्तबद्ध, छंदबद्ध करून मौखिक परंपरेने साठवले गेले. छंद म्हणजे नाद. लयबद्ध ध्वनी. छंदाचा दुसरा अर्थ म्हणजे पिसे. खूळ. वेड. याड. कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त अर्थ सामावणे म्हणजे काव्यलेखन. काव्यात लिहिलेले आपल्या पूर्वसुरींचे अनुभव, लक्षात राहायला, पाठांतराला, सोपे ठरले. काळाच्या ओघास पुरून उरले. मात्र काव्य छंदबद्ध करण्याचे ’छंदशास्त्र’ आपण विसरत चाललो आहोत. त्याचीच उजळणी करण्याचा हा प्रयास आहे. आशा आहे की आपल्याला आवडेल.

टिटवी, मैनावती, उपमन्यू, ध्रुव, मार्कंडेय, जडभरत, रावण, राम (प्रत्येकाची सुरस कहाणी आपल्या इतिहासात नमूद आहे. शोधा म्हणजे सापडेल.) यांच्या समस्त गोष्टींची केवळ उल्लेखातून याद देणार्‍या कवी गोविंद ह्यांच्या पुढील ओवीबद्ध कवितेतूनच ह्या लेखाचे शीर्षक घेतले आहे.  मतितार्थ असा की, आपल्याला असा छंद लावून घ्या, ज्यामुळे भवतालच्या संसाराचा विसरच पडेल. ’छंदशास्त्रा’च्या नादाने आपले पौराणीक साहित्य जसे कालौघाच्या घडामोडींचा विसर पडून, टिकू शकले आहे, अगदी तसेच मग आपणही टिकून राहू.

असा धरी छंद । जाई तुटोनिया भवबंध ॥ध्रु॥
छंद लागला टिटवीला । सप्तसागर शोषित केला । मैनावतीने कृतार्थ केला । गोपीचंद ॥१॥
दुधाचा सागर उपमन्यूला। ध्रुव तो अढळपदी स्थापिला। मार्कंड्याने यम हटवीला। चालिला मंद ॥२॥
तीन देह जडभरताला । रावण रामरूप तो झाला । गोपी चढल्या वैकुंठाला । यशोदानंद ॥३॥
अशा या छंदे कितिएक तरती। नराचे नारायण ते होती। दीनबंधु अपुला करिती। निजसुखकंद ॥४॥

छंद, मात्रावृत्ते, गझलवृत्ते आणि अक्षरगणवृत्ते

१. छंद

अभंग, ओवी, घनाक्षरी इत्यादी पद्यप्रकारांत लघुगुरू हा भेद नाही. स्थूलमानाने सर्व अक्षरे सारख्याच दीर्घ कालांत म्हणजे गुरूच उच्चारायची असतात. या लगत्वभेदातीत अक्षरसंख्याक पद्यप्रकाराला काहीतरी पारिभाषिक नाव पाहिजे म्हणून डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन (माधव जूलियन) ह्यांनी त्यांच्या "छंदोरचना" ह्या अत्यंत मौलिक ग्रंथात, वैदिक पद्यप्रकाराला असणारे छंद हे नाव दिले आहे२. अर्थात, या पद्यप्रकारात मुख्य नियमन अक्षरसंख्येचे दिसते.

मोडक आणि मोडकं ह्यांचे अर्थ अनुक्रमे, मोडक हे आडनाव आणि मोडकी वस्तू असे होतात, पण दोन्हींतील ’क’ एकच असूनही त्यांचे उच्चारण अनुक्रमे ’अल्प’ आणि ’दीर्घ’ काळात केले जाते, म्हणूनच उच्चारणातील भिन्नता अभिव्यक्त होत असते. ज्या अक्षराचा उच्चार ’अल्प’काळात होतो त्यास ’र्‍हस्व’ आणि ज्या अक्षराचा उच्चार ’दीर्घ’काळात होतो त्यास ’दीर्घ’ अक्षर असे संबोधले जाते. र्‍हस्व अक्षराची एक मात्रा (एक एकक उच्चारण काळ) आणि दीर्घ अक्षराच्या दोन मात्रा (दोन एकके उच्चारण काळ) मानल्या जातात. परशुरामतात्या गोडबोले ह्यांच्या ’वृत्तदर्पण’ पुस्तकात ह्याबाबत असे म्हटले आहे कीः

र्‍हस्व स्वराते लघू बोलताती, दीर्घ स्वराते गुरू नाम देती ।
पुढे अनुस्वार, विसर्ग येतो, संयोग र्‍हस्वास गुरूत्व देतो ॥

उदाहरणार्थः पुस्तक शब्दात, ’पु’ नंतर जोडाक्षर आहे ’स्त’ हे. म्हणून ’पु’ हे अक्षर र्‍हस्व असूनही गुरू धरले जाते. अंगण शब्दात ’अ’ वर अनुस्वार असल्याने ’अं’ हे अक्षर र्‍हस्व असूनही गुरू धरले जाते. ’स्वतःचा’ ह्या शब्दातील ’त’ च्या पुढे विसर्ग येत असल्याने ’तः’ करता दोन मात्रांइतका काळ त्याचे उच्चारणास दिला जातो. ’छंदा’त मात्र, प्रत्येक अक्षरांचा काल दोन मात्रांचाच धरत असल्यामुळे या पद्यप्रकारात अष्टमात्रक आणि षण्मात्रक अशा दोन आवर्तनांची रचना होऊ शकते.

२. मात्रावृत्ते

काव्याच्या एका ओळीतील सर्व मात्रांची मिळून संख्या एकच राखली जाते त्या काव्यप्रकारांना जाती किंवा मात्रावृत्ते अथवा श्लोक म्हणतात. बालकवींच्या कविता, शालेय पुस्तकांतील असंख्य कविता ह्याच काव्य प्रकारात मोडतात. त्यांच्या तपशीलात जाऊ तेव्हा आपण ती उदाहरणे घेणारच आहोत.

3. गझलवृत्ते


गझलवृत्तामधे लघु-गुरु क्रमाला लगावलीम्हणतात. यात एका गुरुच्या ऐवजी दोन लघुही सवलत घेता येते. (गझलवृत्ते: विजय चिपळूणकर http://www.marathisanrakshan.com/?page_id=204).

४. अक्षरगणवृत्ते

मात्र प्रत्येकी तीन तीन अक्षरांचे आठ गण तयार करून त्यांची लयबद्ध आविष्करणे केली जातात त्यांना वृत्ते (किंवा अक्षरगणवृत्ते) म्हणतात. अक्षर-गण-वृत्ते म्हणजे लघु-गुरु अक्षरांचे साचेबद्ध आणि व्याकरणनिष्ठ आविष्कार असतात. अक्षरगणवृत्तात लघु म्हणजे र्‍हस्व उच्चार होणारी अक्षरे आणि गुरू म्हणजे दीर्घ उच्चार होणारी अक्षरे असतात. त्यांचा क्रम, रचनेतल्या प्रत्येक ओळीत पाळण्याचा नियम आहे. यामध्ये एकूण ४ ओळींच्या कडव्यामधील, चारही ओळींची गणरचना एकसारखी असते त्यास समवृत्त, दोन ओळींची एकसारखी असते त्यास अर्धसमवृत्त अथवा सर्वच ओळींची गणरचना वेगवेगळी असू शकते त्यास विषमवृत्त म्हणतात.

अक्षरगणवृत्तबद्ध कवितेच्या एका कडव्यात चार ओळी असतात. एका ओळीतील सर्व अक्षरांचे तीन तीन अक्षरांचे गट पाडायचे. प्रत्येक गटाचा एक गण असतो. मात्र, अक्षरगणवृत्तात बांधलेल्या कवितांच्या ओळींत तीनच्या पटीत न बसणारी अक्षरेही कधी कधी असतात. अशा वेळी शेवटी अधिकतम दोन अक्षरे उरतील. लघु अक्षर उरल्यास त्याचा गण ल आणि गुरू अक्षर उरल्यास त्याचा गण ग धरावा. गण म्हणजे तीन अक्षरांचा एक गट असतो. असे एकूण आठ गण आहेत. त्यातील गणांची नावे आणि गणांतील लघुगुरूक्रम खालील सारणीत दिलेले आहेत.














थोडक्यात काय तर द्विमान गणितातील ००० ते १११ असे हे आठ संयोग आहेत. ० = लघु, १ = गुरू. अक्षरगणांची मांडणी, पारंपारिक यरतनभजसम अशी न करता (०००, ००१, ०१०, ०११, १००, १०१, ११०, १११) अशा प्रकारे नव्या वैज्ञानिक पद्धतीने केल्यास, हीच किल्ली "न सजय भरतम" अशी मांडता येईल. (००० ते १११) याचा अर्थ 'भारत (कधीही) विजयी होणार नाही' असा निघतो. म्हणूनच कदाचित, पारंपारिक मांडणी यरतनभजसम अशी करत असावेत.

छंदः घनाक्षरी, ओवी, अभंग आणि अनुष्टुप्‌ छंद

१. घनाक्षरी

घनाक्षरीत चार चरण असतात. प्रत्येक चरणात १६,१५ च्या विरामाने ३१ अक्षरे असतात. प्रत्येक चरणाचा अंत गुरू अक्षरानेच होत असतो. छंदाची गती योग्य राखण्यासाठी ८, ८, ८, आणि ७ अक्षरांवर यती (विराम) असायला हवा. घनाक्षरी ओजपूर्ण काव्यांना जितकी धार्जिणी आहे, तेवढी ती मधुर भावनांच्या अभिव्यक्तीस सोयीची नाही. घनाक्षरीचे उत्तम उदाहरण म्हणजे हिंदीत रचलेली कवीराज भूषण ह्यांची, शिवाजी महाराजांची स्तुती करणारी ओजस्वी कविता आहे.

इंद्र जिमि जंभ पर, बाडव सुअंभ पर । रावण सदंभ पर, रघुकुलराज है ॥ धृ ॥
पौन बारिबाह पर, संभु रतिनाह पर । जो सहसबाह पर, राम द्विजराज है ॥ १ ॥
दावा द्रुमदंड पर, चीता मृगझुंड पर । भूषन वितुण्ड पर, जैसे मृगराज है ॥ २ ॥
तेज तम-अंस पर, कन्ह जिमि कंस पर । त्यो मलीच्छबंस पर, सेर शिवराज है ॥ ३ ॥
- कवीराज भूषण, सुमारे १६८०

२. ओवी

ओवी व अभंग हे मराठीतील सर्वात जुने व परंपरेने चालत आलेले असे लोकप्रिय छंद आहेत. या दोन्ही छंदात पुष्कळसे साम्य आहे. रचनेच्या बाबतीत अभंग काटेकोर असून, ओवीची रचना मात्र अतिशय शिथिल असते. ज्ञानेश्वर, एकनाथ, मुक्तेश्वर, रामदास इत्यादी संतांनी आपली कविता मुख्यतः ओवी छंदात लिहिली आहे.  ओवीला चार चरण असतात. पहिल्या तीन चरणांच्या शेवटी यमक असते. आधुनिक ओवीला तीनच चरण असतात. चौथा चरण लहान असेल, तर साडेतीन चरणी ओवी म्हणतात. चरणातील अक्षरांचे बंधन फारच शिथील असते. ओवीच्या पहिल्या तीन चरणांतील प्रत्येकात पाचपासून तर पंधरापर्यंत अक्षरे असतात. चौथ्या चरणात पहिल्या तीन चरणांतील अक्षरांपेक्षा जास्त अक्षरे नसतात. अलीकडच्या ओव्यांत प्रत्येकी आठ अक्षरांचे चार चरण असून दुसर्‍या व चौथ्या चरणांचे यमक जुळविलेले असते. बहिणाबाई चौधरी यांच्या ’मन’ कवितेतील ओव्या या प्रकारच्या आहेत.

मन वढाय वढाय - कवयित्री - बहिणाबाई चौधरी, १९५०
मन वढाय वढाय, उभ्या पीकातलं ढोर । किती हाकला हाकला, फिरी येतं पिकांवर ॥ धृ ॥
मन मोकाट मोकाट, त्याले ठायी ठायी वाटा । जशा वार्‍यानं चालल्या, पान्यावरल्यारे लाटा ॥ १ ॥
मन लहरी लहरी, त्याले हाती धरे कोन ? । उंडारलं उंडारलं जसं वारा वाहादन ॥ २ ॥
मन जह्यरी जह्यरी, याचं न्यारं रे तंतर । आरे इचू साप बरा, त्याले उतारे मंतर ॥ ३ ॥
मन पाखरू पाखरू, त्याची काय सांगू मात ? । आता व्हतं भुईवर, गेलं गेलं आभायात ॥ ४ ॥
मन चप्पय चप्पय, त्याले नही जरा धीर । तठे व्हयीसनी ईज, आलं आलं धर्तीवर ॥ ५ ॥
मन एवढं एवढं, जसा खाकसचा दाना । मन केवढं केवढं ? आभायात बी मायेना ॥ ६ ॥
देवा, कसं देलं मन आसं नही दुनियात । आसा कसा रे तू योगी काय तुझी करामत ॥ ७ ॥
देवा, आसं कसं मन ? आसं कसं रे घडलं । कुठे जागेपनी तूले असं सपनं पडलं ॥ ८ ॥

३. अभंग

सर्वच संतांनी अभंग लिहिले असले तरी नामदेव अभंगाचा प्रणेता मानतात. मात्र तुकारामांनी ते सर्वाधिक लोकप्रिय केले. तुकारामांच्या गाथा इंद्रायणीत बुडवल्या, तरी त्या अभंग राहिल्या म्हणून तुकारामांच्या रचनेला अभंग मानतात. संत सोहिरोबानाथांचा एक अभंग अतिशय बोधप्रद आहे. अभंगाचे उदाहरण म्हणून आपण तोच पाहू या.

हरीभजनाविण काळ - सोहिरोबानाथ, सुमारे १७८०

हरीभजनाविण काळ घालवू नको रे ॥ धृ ॥
संतसंगतीने उमज । चिद्‌रूपासी पुरते समज । अनुभवाविण मान डोलवू नको रे ॥ १ ॥
दोरीच्या सापा भिऊनी भवा । भेटी नाही जिवा-शिवा । अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको रे ॥ २ ॥
विवेकाची ठरेल ओल । ऐसे की बोलावे बोल । आपुल्या मते उगीच चिखल कालवू नको रे ॥ ३ ॥
सोहिरा म्हणे ज्ञानज्योती । तेथ कैची दिवसराती । तयाविणे नेत्रपाती हालवू नको रे ॥ ४ ॥

४. अनुष्टुप्‌ छंद

अनुष्टुप्‌ छंद अथवा वृत्त म्हणजे अष्टाक्षरी चार चरणांचे काव्य. ह्यालाच श्लोक असेही म्हणतात. रामरक्षेतील बरेचसे काव्य ह्याच छंदात लिहिले गेले आहे. ह्या छंदाचे वर्णन संस्कृत श्लोकात खालील प्रमाणे केले गेलेले आहे. त्यात असे म्हटले आहे की, श्लोकाच्या प्रत्येक चरणातील आठ अक्षरांमध्ये पाचवे र्‍हस्व (लघु), सहावे अक्षर दीर्घ (गुरू), सातवे अक्षर पहिल्या व तिसर्‍या  चरणांत दीर्घ (गुरू) असते, तर दुसर्‍या व चवथ्या चरणांत र्‍हस्व (लघु) असते३.

श्लोके षष्ठं गुरू ज्ञेयं सर्वत्र लघु पञ्चमम्‌। द्विचतुःपादयोर्र्‍हस्वं सप्तमं दीर्घमन्ययोः॥ श्रुतबोध४-१०

सहावे गुरू सर्वत्र, लघु सर्वत्र पाचवे ।
समांत सातवे र्‍हस्व, विषमी दीर्घ ते असे॥

- मराठी अनुवादः नरेंद्र गोळे

मराठीमध्ये जो छंद वा वृत्त यांपैकी कोणत्याच प्रकारात बसू शकत नाही, तथापि तो मुक्तही नाही; तो अनुष्टुप्‌ छंद होय. अनुष्टुप्‌ अष्टाक्षर-नियत आहे, तरी त्यातील अर्ध्या भागात लघु-गुरुत्वाचा विचार करावा लागतो, पण अर्ध्या भागात तो तसा करावा लागत नाही, तसेच त्याचे लक्षण, मात्रा मापनानेही वर्णन करता येत नाही५. चरणांती यती येत असल्यामुळे आठवे अक्षर लघु असले तरी त्याचा उच्चार दीर्घच होतो. भगवत् गीता आणि गीताई ह्यांतील बहुतांशी श्लोक अनुष्टुप् छंदातच रचलेले आहेत.

उदाहरणार्थः

यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थ धनुर्धरः ।
तत्र श्री: विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम ॥ गीता-१८-७८

योगेश्वर जिथे कृष्ण जिथे पार्थ धनुर्धर ।
तिथे मी पाहतो नित्य धर्म श्री जय वैभव ॥ गीताई-१८-७८
 
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: ।
गुरु: साक्षात्परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नम: ॥

गुरू ब्रम्हा गुरू विष्णू गुरूदेव महेश्वर ।
गुरू साक्षात परब्रम्ह म्हणून गुरू वंदू या ॥ - मराठी अनुवादः नरेंद्र गोळे
 
उद्योगेनैव सिद्ध्यन्ति कार्याणि न मनोरथै: ।
न हि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगा: ॥ - पंचतंत्र

केल्याने होत आहे रे, इच्छिल्याने न केवळ ।
न कधी सूप्त सिंहाच्या तोंडी प्रवेशती पशू ॥ - मराठी अनुवादः नरेंद्र गोळे

मात्रावृत्ते किंवा जातीवृत्ते

१. कामदा (पादाकुलक, ८,८ जातीवृत्त)
गणपति तुझे नाम चांगले ।  आवड़ी बहू चित्त रंगले ॥
प्रार्थना तुझी गौरीनंदना ।  हे दयानिधे श्री गजानना ॥

२. नववधू (१६, विषम जातीवृत्त)

नववधू प्रिया मी बावरते                      २+८+६            १६
लाजते, पुढे सरते, फिरते ॥ धृ ॥          २+८+६            १६
कळे मला तू प्राणसखा जरि                 ८+८                १६
कळे तूच आधार सुखा जरि                 ८+८                 १६
तुजवाचुनि संसार फुका जरि              ८+८                  १६
मन जवळ यावया गांगरते                 २+८+६              १६

३. दिंडी (९,१०; जातीवृत्त)

दंडी हे वाद्य घेऊन फिरणार्‍या, गोसाव्यांची एक जमात असे. तिच्या वाद्यावरून ह्या वृत्तास, दंडी, दिण्डी, दिप्डी, किंवा दंडीगान असे संबोधले जाते. परशुरामतात्या गोडबोले ह्यांच्या वृत्तदर्पणात अशी माहिती दिलेली आहे की, “दिंडीला चार चरण असतात. चरणांच्या अखेरीस अनुप्रास किंवा यमक असते. ह्या छंदास अक्षरांचा नियम नाही परंतु मात्रांचा नियम आहे. म्हणून हे मात्रा वृत्त आहे. प्रत्येक चरणात एकोणीस मात्रा असतात आणि नवव्या मात्रेवर अवसान असते म्हणून प्रत्येक चरणाचे, नऊ मात्रांचा एक आणि दहा मात्रांचा एक असे दोन भाग पडतात. पहिल्या भागात प्रथम तीन मात्रांचा एक गण असावा. त्यात एक गुरू व एक लघु किंवा एक लघु व एक गुरू, किंवा तीनही मात्रा लघु असाव्यात. त्यापुढे तीन गुरू किंवा सहा लघु किंवा लघु व गुरू मिळून सहा मात्रांचा गण असावा. दुसर्‍या  भागात पहिल्याप्रमाणेच प्रथम तीन मात्रांचा एक गण असावा. मग पुन्हा आणखी तीन मात्रांचा तसाच एक गण असावा. अखेरीस दोन गुरू असावेत.”

रघुनाथ पंडितांचे हे सर्वात आवडते वृत्त असावे. एकूण २२५ श्लोकांच्या ’ नल-दमयंती स्वयंवर६ ’ आख्यानात, हे वृत्त त्यांनी ६९ वेळा योजले आहे. उदाहरणः

हंस मिळणे हे कठिण महीलोकी, सोनियाचा तो नवल हे विलोकी ।
तशा मजलाही सोडिले तुवा की, तुझा ऐसा उपकार मी न झाकी ॥
- नल-दमयंती स्वयंवर, कवीः रघुनाथ पंडित

तोच उदयाला येत असे सूर्य, अहो क्षितिजावर त्याच नव्हे काय?
तेच त्याचे कर न का कुंकुमाने, वदन पूर्वेचे भरिति संभ्रमाने? - अढळ सौंदर्य, केशवसूत

पोर खाटेवर मृत्युच्याच दारा, कुणा गरिबाचा तळमळे बिचारा;
दूर आई राहिली कोकणात, सेविकेचा आधार एक हात ! - कवीः गिरीश यशवंत कानिटकर

४. सूर्यकांत (८+८+८+३, समुदितमदना, जातीवृत्त)

र्‍हस्व अक्षराची एक मात्रा आणि दीर्घ अक्षराच्या दोन. काव्याच्या एका ओळीतील सर्व मात्रांची मिळून संख्या एकच राखली जाते त्या काव्यप्रकारांना जाति (किंवा मात्रावृत्ते अथवा श्लोक) म्हणतात. सूर्यकांत वृत्त असेच एक जाती वृत्त आहे. बालकवींची विख्यात ’औदुंबर’ कविता ह्याच वृत्तात आहे. हे वृत्त समजाती (पद्यातील सर्व पंक्ती सारख्याच असल्या की त्यास सम म्हणावयाचे), मात्रावृत्त, आहे. ह्यात ८+८+८+३ = २७ मात्रा एका ओळीत येत असतात.  उदाहरणः

औदुंबर११
ऐलतटावर पैलतटावर हिरवाळी घेऊन ।  निळासावळा झरा वाहतो बेटाबेटातून ॥
चार घरांचे गाव चिमुकले पैलटेकडीकडे । शेतमळ्य़ांची दाट लागली हिरवी गरदी पुढे ॥
पायवाट पांढरी तयातुनि अडवीतिडवी पडे। हिरव्या कुरणांमधुन चालली काळ्या डोहाकडे ॥
झाकळुनी जळ गोड काळिमा पसरी लाटांवर। पाय टाकुनी जळांत बसला असला औदुंबर ॥ 
- कवी: बालकवी. (त्र्यंबक बापुजी ठोंबरे)

५. साकी (८+८+८+४, लवंगलता, जातीवृत्त)

हा काव्यप्रकारही असाच आहे. हे वृत्त समजाती (पद्यातील सर्व पंक्ती सारख्याच असल्या की त्यास सम म्हणावयाचे), मात्रावृत्त, आहे. ह्यात ८+८+८+४ = २८ मात्रा एका ओळीत येत असतात. उदाहरणः आचार्य अत्रे ह्यांची विडंबनात्मक कविता “कवी आणि चोर”

पाल पाहुनी जसा बिचारा विंचू टाकी नांगी;
तसा आमुचा नायक खिळला उभा जागच्या जागी!
भान विसरला, कार्य विसरला, टकमक पाहत राही,
वेळ लोटला, असा किती तरि, स्मरण न त्याचे काही!

६. फटका (२४, हरिभगिनी, जातीवृत्त)

लोकांनी जगात कसे वागावे हे सांगण्यासाठी ’अनंतफंदी’ ह्यांनी जे उपदेशाचे फटके मारले. त्यावरून अशा रचनांना ’फटका’ हेच नाव पडले.

अक्र                बिकट वाट       वहिवाट नसावी     धोपटमार्गा                   सोडू नको
                      संसारामधि       ऐस आपला          उगाच भटकत              फिरू नको
र्‍हस्व / दीर्घ    -  -  - U  U       - U   - U  -          U  - U  U  U  U  U       U  - U  -
मात्रा               २ २ २ १   १        २ १   २ १ २           १  २ १   १   १   १   १        १  २ १  २
एकूण मात्रा     ८                      ८                         ८                                  ६


गझलवृत्ते

१. आनंदकंद

वृत्तबद्ध काव्ये ही नेहमीच अपार आनंदाचा ठेवा असतात. आनंदाचा कंद असतात. मात्र आनंदकंद नावाच्या वृत्तात, आनंदकंद अशा आपल्याच देशाचे उत्तम वर्णन केलेले आहे. ते उत्तम प्रकारे गाता येते. त्यापासून अलोट आनंद मिळतो. ही सगळी अनुभूती निव्वळ योगायोग नसून वर्षानुवर्षांच्या वृत्तसाधनेचे फलितच आहे ते. ह्या वृत्तात गाता येणार्‍या काही उदाहरणांची झलक जरी पाहिली तरी त्यात दडलेल्या असंख्य संभावनांची चुणूक सहजच प्राप्त होईल. हे एक गझलवृत्त आहे.

आनंदकंद वृत्ताचे लक्षणगीतः ताराप राधिका गा, ताराप राधिका गा
आनंदकंद वृत्तातील मात्रा: २४, लगावली : गा गा ल गा ल गा गा
उदाहरणेः
१.      केव्हां तरी पहाटे उतरून रात्र गेली । - सुरेश भट
२.      अंदाज आरशाचा वाटे खरा असावा । - ईलाही जमादार
३.      प्रेमस्वरूप आई ! वात्सल्यसिंधु आई ! - माधव ज्युलिअन
४.      आनंदकंद ऐसा । हा हिंददेश माझा । - आनंदराव टेकाडे
५.      एका तळ्यात होती बदके पिले सुरेख । - ग.दि.माडगुळकर
६.      गवतात कोळियाने, विणले सुरेख जाळे । - नरेंद्र गोळे
७.      राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली । -  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

त्यांच्या श्राव्य संचिकांचे दुवे
१.                         https://www.youtube.com/watch?v=1Oczz2Mpz2M
२.                         https://www.youtube.com/watch?v=dIWrolOc4tE
३.                         https://www.youtube.com/watch?v=n3FJrpNV-hw
४.                         https://www.aathavanitli-gani.com/Song/AanandKand_Aisa
५.                         https://www.youtube.com/watch?v=UFvDYxyiKCY
६.                         http://srujanashodha.blogspot.in/2011/11/blog-post_27.html#links
७.                         https://www.youtube.com/watch?v=Pz2_lLpyFgY

इतकी उदाहरणे आणि त्यांच्या निरनिराळ्या चाली! एकाच वृत्ताच्या प्रतिनिधी असल्याने परस्परांच्या चालींत गाता येणारच. हा प्रयत्न अतिशय मनोरंजक होत जातो. बघा प्रयत्न करून!
------------------

केव्हातरी पहाटे उलटून रात गेली; मिटले चुकून डोळे हरवून रात गेली

कळले मला न केव्हा सुटली मिठी जराशी; कळले मला न केव्हा निसटून रात गेली
सांगू तरी कसे मी वय कोवळे उन्हाचे ?;  उसवून श्वास माझा फसवून रात गेली !
उरले उरात काही आवाज चांदण्याचे; आकाश तारकांचे उचलून रात गेली !
स्मरल्या मला न तेव्हा माझ्याच गीतपंक्ती; मग ओळ शेवटाची सुचवून रात गेली !
गीत- सुरेश भट, संगीत- पं. हृदयनाथ मंगेशकर, स्वराविष्कार- पद्मजा फेणाणी-जोगळेकर, आशा भोसले, चित्रपट- निवडूंग, राग  - दुर्गा
-----------------



वाचलेली, ऐकलेली, माणसे गेली कुठे ?    पुस्तकातून पाहिलेली माणसे गेली कुठे ?
रोज अत्याचार होतो आरशावरती आता,    आरशाला भावलेली माणसे गेली कुठे ?

अंदाज आरशाचा वाटे खरा असावा; बहुतेक माणसाचा तो चेहरा असावा
काठावरी उतरली स्वप्ने तहानलेली डोळ्यांत वेदनेचा माझ्या झरा असावा
जखमा कशा सुगंधी झाल्यात काळजाला केलेत वार ज्याने तो मोगरा असावा
माथ्यावरी नभाचे ओझे सदा 'इलाही' दाही दिशा कशाच्या हा पिंजरा असावा

गीत- इलाही जमादारसंगीत- भीमराव पांचाळे, स्वर- भीमराव पांचाळे, अल्बम- एक जख्म सुगंधी

-------------------

प्रेमस्वरूप आई ! वात्सल्यसिंधु आई ! बोलावुं तूज आता मी कोणत्या उपायीं ?

नाहीं जगांत झाली आबाळ या जिवाची, तूझी उणीव चित्तीं आई, तरीहि जाची.
चित्तीं तुझी स्मरेना कांहींच रूपरेखा, आई हवी म्हणूनी सोडी न जीव हेका.

ही भूक पोरक्याची होई न शांत आई, पाहूनियां दुज्यांचें वात्सल्य लोचनांहीं.
वाटे इथूनि जावें, तूझ्यापुढें निजावें, नेत्रीं तुझ्या हसावें, चित्तीं तुझ्या ठसावें !

वक्षीं तुझ्या परि हें केव्हां स्थिरेल डोकें, देईल शांतवाया हृत्स्पंद मंद झोके ?
घे जन्म तूं फिरूनी, येईन मीहि पोटीं, खोटी ठरो न देवा, ही एक आस मोठी !

गीत-  माधव ज्यूलियन, संगीत- वसंत प्रभू, स्वर- लता मंगेशकर, राग- मधमाद सारंग

--------------------

आनंदकंद ऐसा । हा हिंददेश माझा ।

सत्यास ठाव देई । वृत्तीस ठेवि न्यायी । सत्यास मानि राजा । हा हिंददेश माझा ।
जगदीश जन्म घेई । पदवीस थोर नेई । चढवी स्वधर्मसाजा । हा हिंददेश माझा ।
गंगा हिमाचलाची । वसती जिथें सदाची । होऊनि राहि कलिजा । हा हिंददेश माझा ।
तिलकादि जीव देहीं । प्रसवूनि धन्य होई । मरती स्वलोककाजा । हा हिंददेश माझा ।
पूजोनि त्यास जीवें । वंदोनि प्रेमभावें । जयनाद हाचि गर्जा । हा हिंददेश माझा ।

गीत- आनंदराव टेकाडे, संगीत- श्रीधर फडके, स्वराविष्कार- श्रीधर फडके

---------------------------

एका तळ्यात होती बदके पिले सुरेख; होते कुरूप वेडे पिल्लू तयांत एक         

कोणी न तयास घेई खेळावयास संगे; सर्वांहुनी निराळे ते वेगळे तरंगे
दावूनि बोट त्याला म्हणती हसून लोक; आहे कुरूप वेडे पिल्लू तयांत एक

पिल्लास दु:ख भारी, भोळे रडे स्वतःशी; भावंड ना विचारी, सांगेल ते कुणाशी
जे ते तयास टोची दावी उगाच धाक; होते कुरूप वेडे पिल्लू तयांत एक

एके दिनी परंतु पिल्लास त्या कळाले; भय वेड पार त्याचे वार्‍यासवे पळाले
पाण्यात पाहताना चोरूनिया क्षणैक; त्याचेच त्या कळले तो राजहंस एक.

ग.दि.माडगुळकर, श्रीनिवास खळे, आशा/मधुबाला झवेरी
----------------------------

गवतात कोळियाने, विणले सुरेख जाळे । सावज तयात यावे, आशा मनात पाळे ॥ धृ ॥
थंडीत रामप्रहरी, दव साखळून आले । सावज बनून थेंबहि, जाळ्यात कैद झाले ॥ १ ॥
अडकून बिंदु शतशः, झुंबर तयार झाले । देदीप्यमान तेजे, चमकून रत्न झाले ॥ २ ॥
ते रत्नहार सारे, जाळ्यास भार झाले । चिंतीत कोळि झाला, सावज फरार झाले ॥ ३ ॥
मग रत्न-पारखाया, तो सर्वसाक्षि आला । दृश्यास जोखणारा, तो पारखी मिळाला ॥ ४ ॥
उकलून एक एक, हर पृथक तार केला । दवबिंदु एक एक, सुट्टा हिराच केला ॥ ५ ॥
जरि रत्नहार भासे, धागा गहाळ झाला । त्या ईश्वरी१ कलेचा, चित्रात कळस झाला ॥ ६ ॥

१. ईश्वरसर्वसाक्षीम्हणवतो, नाही का!
- नरेंद्र गोळे २०११११२७
---------------------------

राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या ॥ धृ ॥
भूमीवरी पडावे, तार्‍यांकडे पहावे, प्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या ॥ १ ॥
पहारे आणि तिजोर्‍या,, त्यातूनी होती चोर्‍या, दारास नाही दोर्‍या,, या झोपडीत माझ्या ॥ २ ॥
जाता तया महाला, ‘मज्जावशब्द आला, भीती न यावयाला, या झोपडीत माझ्या ॥ ३ ॥
महाली मऊ बिछाने, कंदील शामदाने, आम्हा जमीन माने, या झोपडीत माझ्या ॥ ४ ॥
येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, कोणावरी न बोजा, या झोपडीत माझ्या ॥ ५ ॥
पाहून सौख्यं माझे, देवेंद्र तोही लाजे, शांती सदा विराजे, या झोपडीत ॥ ६ ॥
राजास जी महाली - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, (माणिक बंडोजी इंगळे) १९३५, मोझरी

-----------------------------

२. देवप्रिया

हे मराठी भाषेत फार मोठ्या प्रमाणात वापरले गेलेले वृत्त आहे. हे नावही श्री. माधव ज्युलियन यांनी दिलेले आहे७. या अक्षरगणवृत्ताचे मात्रांच्या हिशोबात ७-७-७-५ असे उपभाग आहेत.

लक्षणगीतः
राधिका ताराप गा गा, राधिका ताराप गा
गा ल गा गा, गा ल गा गा, गा ल गा गा, गा ल गा

त्या फुलांच्या गंधकोशी८
त्या फुलांच्या गंधकोशी, सांग तू आहेस का? त्या प्रकाशी तारकांच्या, ओतिसी तू तेज का?
त्या नभाच्या नीलरंगी, होवूनी आहेस का? गात वायूच्या स्वरानी, सांग तू आहेस का?
मानवाच्या अंतरीचा, प्राण तू आहेस का? वादळाच्या सागराचे, घोर ते तू रूप का?
जीवनी या वर्षणारा, तू कृपेचा मेघ का? आसमंती नाचणारी, तू विजेची रेघ का?
जीवनी संजीवनी तू, माउलीचे दूध का? कष्टणार्‍या बांधवांच्या, रंगसी नेत्रात का?
मूर्त तू मानव्य का रे, बालकांचे हास्य का? या इथे अन्‌ त्या तिथे, रे सांग तू आहेस का?
गीतः सूर्यकांत खांडेकर, संगीतः पं. हृदयनाथ मंगेशकर, गायकः सुरेश वाडकर

चांदणे शिंपीत जाशी चालता तू चंचले९
चांदणे शिंपीत जाशी चालतां तूं चंचले ओंजळीं उधळीत मोतीं हासरी ताराफुलें
वाहती आकाशगंगा कीं कटीची मेखला तेजपुंजाची झळाळी तार पदरा गुंफिले
गुंतवीले जीव हे मंजीर कीं पायीं तुझ्या जे तुझ्या तालावरी बोलांवरी नादावले
गे निळावंती कशाला झाकिसी काया तुझी पाहुं दे मेघांविण सौंदर्य तुझे मोकळे

गीत- राजा बढे, संगीत- पं. हृदयनाथ मंगेशकर, स्वर- आशा भोसले, राग-आनंदस्वरूप हंसध्वनी

मात्र, ’देवप्रिया’ वृत्ताचे सर्वात देदिप्यमान उदाहरण म्हणजे त्यांची ’भ्रांत तुम्हां कां पडे?’ ही कविता. राष्ट्रभक्तांना आजही तेवढेच सशक्त मार्गदर्शन करणारी ही कविता एका उत्तम चालीत गाताही येते. “आपकी नजरों ने समझा, प्यार के काविल मुझे” ह्या चालीत गाऊन पाहा. कवितेतला शब्द आणि शब्द जागा होईल.

भ्रांत तुम्हां कां पडे?१०
हिंदपुत्रांनो,स्वतांला लेखिता कां बापडे? भ्रांत तुम्हां कां पडे?
वाघिणीचें दूध प्यालां, वाघबच्चे फाकडे. भ्रांत तुम्हां कां पडे?   धृ
कायदा पाळा गतीचा, काळ मागे लागला, थांबला तो संपला!
धावत्याला शक्ति येई आणि रस्ता सापडे. भ्रांत तुम्हां कां पडे?  २६

३. वियद्गंगा वृत्त

वियत्‌+गंगा म्हणजे लोप पावत असलेली गंगा. उपक्रम डॉट ऑर्ग ह्या संकेतस्थळावरील एका लेखात, चित्तरंजन सुरेश भट ह्यांनी, भवानीशंकर पंडित यांची 'धबधबा' नावाची कविता ही ’वियद्गंगा’ वृत्तात लिहिलेली असल्याचे निस्संदिग्धपणे सांगितले आहे. प्रदीप कुलकर्णीं१२च्या मनोगत डॉट कॉम वरील एका लेखात ’वियद्गंगा’ वृत्ताची माहिती दिलेली आहे. त्याच सूत्रात अशोक पाटील ह्यांनी 'धबधबा' ही कविता "आठवणीतल्या कविता" या पुस्तकाच्या क्रमांक-४ च्या संचात दिलेली असल्याचे सांगून तिथे प्रस्तुतही केली. ती मूळ कविता अशी आहेः

धबधबा१३ [गज्जल]१४

किती उंचावरूने तूं । उडी ही टाकिसी खालीं॥ जणों व्योमांतुनी येसी । प्रपाता! जासि पातालीं ॥ १ ॥
कड्यांना लंघुनी मागें । चिपांना लोटिसी रागे॥ शिरीं कोलांटुनी वेगे । शिळेचा फोडिसी मौली! ॥ २ ॥
नगाचा ऊर फोडोनी । पुढे येसी उफाळोनी ॥ उडे पाणी फवारोनी । दरीच्या सर्द भोंताली ॥ ३ ॥
तुषारांचे हिरेमोत्यें । जणों तू फेंकिसी हाते ॥ खुशीचे दान कोणाते । मिळे ऐसे कधी काळी? ॥ ४ ॥
कुणी तांदूळ् वा कांडे । रुप्याचे भंगती हांडे॥ मण्यांचा की भुगा सांडे । कुणाच्या लूट ही भाली? ॥५॥
घळीमाझारिं घोटाले । वरी येऊनिं फेंसाळे ॥ कुठे खाचांत् रेंगाळे । करी पाणी अशी केली ॥ ६ ॥
उभी ताठ्यांत् जी झाडे। तयांची मोडिसी हाडें॥ कुशीं गेसी लव्हाळ्यांना । तयांचा तूं जणो वाली! ॥७॥
विजेचा जन्मदाता तूं । प्रकाशाचा निशीं हेतू॥ तुला हा मानवी जंतू । म्हणोनी फार सांभाळी! ॥ ८ ॥

ह्याच वृत्तात बांधलेले ’जगी हा खास वेड्यांचा, पसारा माजला सारा’ हे नाट्यपद नमुनेदार आहे.

जगी हा खास वेड्यांचा१५

जगी हा खास वेड्यांचा, पसारा माजला सारा । गमे या भ्रांत संसारी, ध्रुवाचा 'वेड' हा तारा ॥ धृ ॥
कुणाला वेड कनकाचे, कुणाला कामिनीकांचे । भ्रमाने राजसत्तेच्या, कुणाचे चित्त ते नाचे ॥ १ ॥
कुणाला देव बहकावी, कुणाला देश चळ लावी । कुणाची नजर धर्माच्या, निशेने धुंदली भारी ॥ २ ॥
अशा या विविध रंगाच्या, पिशांच्या लहरबहरींनी । दुरंगी दीन दुनियेची, जवानी रंगली सारी ॥ ३ ॥

गीतः वीर वामनराव जोशी, संगीतः वझेबुवा, स्वरः मा. दीनानाथ
नाटकः रणदुंदुभी, चालः नियामत सखे आई है

’तुझ्या पंखावरूनी या मला तू दूर नेशील का१६’ हे चित्रपटगीतही ह्याच वृत्तात आहे. म्हणजे त्याचे धृवपद. अंतरा मात्र निराळ्याच आकृतीबंधात आहेत. हे गीत असे आहेः

तुझ्या पंखावरूनि या मला तू दूर नेशिल का? । तुझ्या गे भावसुमनांचा मला तू गंध देशिल का? ॥धृ॥

गंध नवा, धुंद करी, हवेत हा गारवा । साथ तुझी, त्यात अशी, मला मिळे राजिवा ।
प्रीतीच्या, स्वप्‍नी सदा, अशीच येशील का? ॥ १ ॥

आज नवे, गीत हवे, सांगे मनोभावना । आज दिसे, विश्व कसे, नवे नवे लोचना! ।
नित्य असा, सांग सदा, माझाच होशिल का? ॥ २ ॥

गीतः गंगाधर महाम्बरे, संगीतः एन. दत्ता, गायिकाः उषा मंगेशकर, रविंद्र साठे१७
चित्रपटः प्रीत तुझी माझी, सालः १९७५, भूमिकाः रमेश देव, सीमा देव

’खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे’ ही साने गुरूजींची विख्यात कविताही वियद्गंगा वृत्तातच आहे.

खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे१८
जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित । तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे ॥ धृ ॥
जयांना ना कुणी जगती, सदा ते अंतरी रडती । तया जाऊन सुखवावे, जगाला प्रेम अर्पावे ॥ १ ॥
समस्तां धीर तो द्यावा, सुखाचा शब्द बोलावा । अनाथा साह्य ते द्यावे, जगाला प्रेम अर्पावे ॥ २ ॥
सदा जे आर्त अतिविकल, जयांना गांजती सकल । तया जाऊन हसवावे, जगाला प्रेम अर्पावे ॥ ३ ॥
कुणा ना व्यर्थ शिणवावे, कुणा ना व्यर्थ हिणवावे । समस्तां बंधु मानावे, जगाला प्रेम अर्पावे ॥ ४ ॥
प्रभूची लेकरे सारी, तयाला सर्वही प्यारी । कुणा ना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे ॥ ५ ॥
असे जे आपणापाशी, असे जे वित्त वा विद्या । सदा ते देतची जावे, जगाला प्रेम अर्पावे ॥ ६ ॥
भरावा मोद विश्वात, असावे सौख्य जगतात । सदा हे ध्येय पूजावे, जगाला प्रेम अर्पावे ॥ ७ ॥
असे हे सार धर्माचे, असे हे सार सत्याचे । परार्थी प्राणही द्यावे, जगाला प्रेम अर्पावे ॥ ८ ॥
जयाला धर्म तो प्यारा, जयाला देव तो प्यारा । तयाने प्रेममय व्हावे, जगाला प्रेम अर्पावे ॥ ९ ॥

कविवर्य भा.रा.तांबे ह्यांची “कळा ज्या लागल्या जीवा” ही कविताही ह्याच वृत्तातली आहे१९.

कळा ज्या लागल्या जीवा, मला की ईश्वरा ठाव्या! ।
कुणाला काय हो त्यांचे? कुणाला काय सांगाव्या  ॥ धृ ॥

उरीं या हात ठेवोनी उरींचा शूल का जाई? । समुद्री चौंकडे पाणी, पिण्याला थेंबही नाही ॥ १ ॥
जनांच्या कोरड्या गप्पा, असे सारे जगद्बंधू! । हमामा गर्जनेचा हो, न नेत्रीं एकही बिंदू ॥ २ ॥
नदीला पूर हा लोटे, न सेतू ना कुठे नावा । भुतांची झुंज ही मागे, धडाडे चौंकडे दावा ॥ ३ ॥
नदी लंघोनि जे गेले तयांची हाक ये कानीं । इथे हे ओढती मागे मला बांधोनि पाशांनी ॥ ४ ॥
कशी साहू पुढे मागे जिवाला ओढ जी लागे? । तटातट्‌ काळजाचे हे तुटाया लागती धागे ॥ ५ ॥
पुढे जाऊ? वळू मागे? करू मी काय रे देवा? । खडे मारी कुणी, कोणी हसे, कोणी करी हेवा! ॥ ६ ॥
संगीतः वसंत प्रभू, स्वरः लता मंगेशकर

अर्थात्‍ ह्या सर्व कविता, गाणी; प्रायः एकाच वृत्तात रचलेल्या असल्याने परस्परांच्या चालींत गाता येणार. तसा प्रयत्न करणे नेहमीच आनंददायी ठरते. त्यामुळे अर्थांच्या आस्वादाला चालींचे नवे परिमाण लाभते.

अक्षरगणवृत्ते

१. इंद्रवज्रा  (११ अक्षरी अक्षरगण, यती ५,६)

लक्षणगीतः२०
स्यादिन्द्रवज्रा यदि तौ जगौ गः;  ताराप ताराप जनास गा गा

ती इंद्रवज्रा म्हणिजे कवीने । ता ता ज गा गा गण येत जीने ॥
त्या अक्षरे येत पदात अक्रा । 'तारी हरी जो धरि शंखचक्रा' ॥

भगवद्‌गीता दोनच वृतांत लिहिली गेलेली आहे. बहुतांश श्लोक हे अनुष्टुप्‌ छंदात लिहिले गेले आहेत. तर काही श्लोक इंद्रवज्रा वृतांत. इंद्रवज्राचे उदाहरणः

वासांसि जीर्णानि यथा विहाय । नवानि गृण्हाति नरोऽपराणि ॥
तथा शरीराणि विहाय जीर्णांनि । अन्यानि संयाति नवानि देही ॥ गीता-२-२२

सांडूनिया जर्जर जीर्ण वस्त्रे । मनुष्य घेतो दुसरी नवीन ॥
तशीचि टाकूनि जुनी शरीरे । आत्माहि घेतो दुसरी निराळी ॥ गीताई-२-२२

इतर उदाहरणेः

कायेन वाचा मनसेंद्रियेर्वा । बुद्ध्यात्मना वा प्रकृतिः स्वभावः ।
करोमि यद्यद्‌ सकलं परस्मै । नारायणायच समर्पयामि ॥ - श्रीमद्भागवत पुराण

तना मनाने वा इंद्रियाने, बुद्धी, हृदय वा स्वतः स्वभावे ।
करेन जे जे मी सारेच ते ते, असो समर्पित नारायणा  ते ॥
- मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०११०१०३

चोरा बरा तू मज गावलासी । का सांग येथे अजि पावलासी ॥
ना बोलसी तै चल ठाणियासी । वाचाळ होशील तु पोलिसासी ॥ - नरेंद्र गोळे

कैलासराणा शिवचंद्रमौळी । फणींद्र माथा मुकुटी झळाळी ॥
कारूण्यसिंधू भवदुःख हारी । तुजविण शंभो मज कोण तारी ॥

आदिशंकराचार्यकृत द्वादशज्योतिर्लिंगस्तोत्रही इंद्रवज्रा वृत्तातच रचलेले आहे.  उदाहरणार्थः

कावेरिकानर्मदयोः पवित्रे समागमे सज्जनतारणाय ।
सदैवमान्धातृपुरे वसन्तमोङ्कारमीशं शिवमेकमीडे ॥ ४ ॥

२.उपेंद्रवज्रा (११ अक्षरी अक्षरगण, यती ५,६)

लक्षणगीतः जनास ताराप जनास गा गा
उपेंद्रवज्रा म्हणतात तीला, ज ता ज गा गा गण येती जीला ।
पदास होणे शिव अक्षरांनी, पहा मनी धुंडिशी काय रानी ॥

उदाहरणः
तया वनी एक तटाक तोये । तुडुंबले तामरसानपाये ॥
निरंतरामंद मरंद वाहे । तपांतही यास्तव रिक्त नोहे ॥

एकूण २२५ श्लोकांच्या “नल-दमयंती स्वयंवर” आख्यानात, हे वृत्त फक्त एकदाच योजले आहे.

यदिंद्रवज्रादचरणेषुपूर्वे भवन्ति वर्णा लघवः सुवर्णे ।
अमंदमाद्यन्मदने तदानी मुपेंद्रवज्रा कथिता कविंद्रैः ॥ - श्रुतबोध-२२

३. उपजाती (११ अक्षरी अक्षरगण, यती ५,६)

पहिल्या आणि तिसर्‍या चरणांत इंद्रवज्रा, व दुसर्‍या आणि चवथ्या चरणांत उपेंद्रवज्रा असेल तर ते उपजाती वृत्त होय. उदाहरणः कविता, वनसुधा; कवीः वामन पंडित

परोपरी खेळति जी वनात । .................... इंद्रवज्रा (ताराप ताराप जनास गा गा)
अर्पूनि चित्ते जगजीवनात ॥ .................... उपेंद्रवज्रा (जनास ताराप जनास गा गा)
धरूनिया मर्कटपुच्छ हाती । .................... इंद्रवज्रा (ताराप ताराप जनास गा गा)
तयांसवे वृक्षि उडो पहाती ॥ .................... उपेंद्रवज्रा (जनास ताराप जनास गा गा)

४. भुजंगप्रयात (अक्षरगण, १४)

लक्षणगीतः
क्रमानेच येती य चारी जयात, म्हणावे तयाला भुजंगप्रयात ।
पदी अक्षरे ज्याचिया येत बारा, रमानायका दुःख माझे निवारा ॥
यमाचा यमाचा यमाचा यमाचा, यमाचा यमाचा यमाचा यमाचा ।

उदाहरणः
रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक ह्याच वृत्तात लिहिले आहेत.

मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे, मना बोलणे नीच सोशित जावे ।
स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोकांस रे नीववावे ॥

विचारून बोले विवंचून चाले, तयाचेनि संतप्त तेही निवाले ।
बरे शोधल्यावीण बोलो नको हो, जनी चालणे शुद्ध नेमस्त राहो ॥

कृष्णाजी नारायण आठल्ये ह्यांची, मूळ २० कडव्यांची, प्रख्यात कविता “प्रमाण”
हीही ह्याच वृत्तात लिहिलेली आहे.

अतीकोपता कार्य जाते लयाला, अती नम्रता पात्र होते भयाला ।
अती काम ते कोणतेही नसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ॥ - कृष्णाजी नारायण आठल्ये

कशाला पुसावी खुशाली कुणाची, कशाला उगा काळजी संभ्रमाची ।
कशाला वहावी तमाही उद्याची, कशाला भिती बाळगावी जनांची ॥ - नरेंद्र गोळे

मना सज्जना तू कडेनेच जावे, न होऊन कोणासही दूखवावे ।
कुणी दुष्ट अंगास लावील हात तरी दाखवावा भुजंगप्रयात ॥ - मा.त्रिं.पटवर्धन

५. वसंततिलका२१ (अक्षरगण, १४)

वसंत ऋतू म्हणजे कुसुमाकर. त्याचा तिलक म्हणजे वसंततिलक, अर्थात पुष्पगंध. हे मराठीतील एक सुंदर अक्षरगणवृत्त आहे. ह्याच्या प्रत्येक ओळीत १४ अक्षरे आणि त भ ज ज ग ग हे गण येतात. त्यामुळे वृत्ताची चाल ठरलेली असते.

लक्षणगीतः
जाणा वसंततिलका व्हय तेचि वृत्त । येती जिथे त भ ज जा ग ग हे सुवृत्त ॥
ताराप भास्कर जनास जनास गा गा । ताराप भास्कर जनास जनास गा गा ॥

उदाहरणः कविताः माझे मृत्युपत्र, कवीः स्वातंत्र्यवीर सावरकर
की घेतले व्रत न हे अम्ही अंधतेने । लब्धप्रकाश इतिहास निसर्गमाने ॥
जे दिव्य दाहक म्हणून असावयाचे । बुद्ध्याच वाण धरिले करी हे सतीचे ॥

पूजावसानसमये दशवक्त्रगीतं । यः शम्भुपूजनपरं पठति प्रदोषे ॥
तस्य स्थिरां रथगजेंद्रतुरंगयुक्तां । लक्ष्मीं सदैव सुमुखिं प्रददाति शम्भुः ॥
- रावणविरचित शिवतांडवस्तोत्र

पूजासमाप्तिस संध्येस म्हणेल जो हे । लंकेशगीत शिवस्तोत्र अनन्य-भावे ॥
शंभू तया, रथ-गजेंद्र-तुरंग-स्थायी  । लक्ष्मी प्रसन्न-वदना, वर-दान देई ॥
- मराठी अनुवादः नरेंद्र गोळे

आरक्त होय फुलुनी प्रणयी पलाश । फेकी रसाळ तरूही मधुगंधपाश ॥
ऐकू न ये तुज पिकस्वर मंजुळे का? । वृत्ती वसंततिलका न तुझी खुले का? ॥
-  मा.त्रिं.पटवर्धन

६. मालिनी

मालिनी हे अत्यंत गोड वृत्त आहे. पहिल्या सहा लघु अक्षरांची मजा लुटायची असेल तर यासारखे दुसरे वृत्त नाही. हे अक्षरगणवृत्त असून, प्रत्येक चरणात १५ अक्षरे असतात. यती ८-व्या अक्षरावर असतो.  उदाहरण:

कणभर उरलेले रूप माझे उरी घे,  मधुतर जळवंती हात माझे करी घे
तनुभर जमलेली रात्र घे ना मिठीला, क्षणभर जवळी ये झाकुनी दे दिठीला  - ग्रेस

उडत उडत चाले जेवि मंडूकजाती, उकड बसति तैसे त्यासवे तीव्र जाती
न बहु पसरितां ते हस्तपादादि, पाणी, तरति नवल पाहे हांसतो चक्रपाणी
- वनसुधा, वामन पंडित

७. पञ्चचामर (अक्षरगण, १६)

पञ्चचामर हे प्रत्येक ओळीत १६ अक्षरे असलेले अक्षरगणवृत्त आहे. दर आठ अक्षरांनंतर यती (अल्पविराम) असते. त्यात अनुक्रमे ज र ज र ज ग हे गण येतात.

लक्षणगीतः

जरौ जरौ ततो जगौ च पञ्चचामरं वदेत् ।
जनास राधिका जनास राधिका जनास गा ।

उदाहरणः
रावणविरचित शिवतांडवस्तोत्र हे काव्यही पञ्चचामर वृत्तात बांधलेले आहे.

जटा कटाहसंभ्रम भ्रमन्निलिंपनिर्झरी । विलोलवीचिवल्लरी विराजमानमूर्धनि ॥
धगद्धगद्धगज्ज्वल ल्ललाटपट्टपावके ।  किशोरचंद्रशेखरे रतिः प्रतिक्षणं मम ॥

जटांतुनी गतीस्थ, गुंतल्या झर्‍यांपरी अहा । तरंग ज्याचिया शिरी विराजती, शिवा पहा ॥
ललाट ज्योतदाह ज्या शिवाचिया शिरी वसे । किशोर चंद्रशेखरा-प्रती रुचीहि वाढु दे ॥
- मराठी अनुवादः नरेंद्र गोळे

८. शिखरिणी (अक्षरगण, १७)

लक्षणगीतः
यमानासाभाला ग गण पदि येता शिखरिणी । यमाचा मानावा नमन समरा भास्कर ल गा ।
उदाहरणः शुकान्योक्ती, कृष्णशास्त्री चिपळूणकर

तुझी वाणी कोणी म्हणत गुण हा अद्भुत असे।  मला वाटे मोठा तुजजवळ हा दोषच वसे॥
शुका तीच्या योगे सतत पिंजर्‍यामाजि पडशी।  गड्या स्वातंत्र्याच्या अनुपम सुखा सर्व मुकशी॥
बकान्योक्ती, कृष्णशास्त्री चिपळूणकर

उभा राहे एके चरणी धरणीते धरुनिया । तपश्चर्या वाटे करत जणु डोळे मिटुनिया ॥
बका ऐशा ढोंगे तव अमति मासेच ठकती । परी ज्ञाते तूझे कपट लवलाही उमजती ॥

महाराष्ट्री सृष्टी स्वविभव चतुर्मास मिरवी । अहा ती मैदाने चिररुचिर येथे न हिरवी ॥
वहाती येथे न स्थिर गहन विस्तीर्ण तटिनी । पहा सह्याचीच प्रखर गिरिराजी शिखरिणी ॥
-  मा.त्रिं.पटवर्धन

९. मंदाक्रांता (अक्षरगण, १७)

कालीदासाने मेघदूत हे महाकाव्य मंदाक्रांता वृत्तात रचले आहे. पूर्वमेघ (६३) आणि उत्तरमेघ (५४) मिळून, एकूण चार चार ओळींची १२७ कडवी ह्या महाकाव्यात आहेत. रामगिरीवरील आश्रमात शापित यक्ष, अलकापुरीतील आपल्या वास्तव्याची आठवण करत असता, तिथून अलकापुरीस जाणारे मेघ त्याला दिसतात. त्या मेघांतील एकालाच आपला दूत करून त्याचेजवळ आपल्या प्रियतमेस केवळ सजीवाकरवीच पाठवावा असा प्रीतीचा संदेश तो पाठवतो. मेघमार्गावरील, भरतवर्षातील सर्व ठिकाणांची वर्षाकालीन सुंदर वर्णने हे ह्या महाकाव्याचे देखणे अलंकार आहेत. त्या यक्षाला शाप कसा मिळाला, काय मिळाला इथपासून सुरू होणारी काव्यात्मक कथा, मेघाला वर्षावैभव प्राप्त होऊन सौदामिनीसोबत रत होत असता, विरहाची अनुभूती कधीही न येवो अशी कामना यक्ष व्यक्त करतो, तिथवर जाऊन थांबते!

लक्षणगीतः
मंदाक्रांता म्हणति तिजला, वृत्त हे मंद चाले ।
ज्याच्या मध्ये म भ न त त हे आणि गा दोन आले ॥

उदाहरणः
धूमज्योतिः सलिलमरुतां संनिपातः क्व मेघः।  संदेशार्थाः क्व पटुकरणैः प्राणिभिः प्रापणीयाः ॥
इत्यौत्सुक्यादपरिगणयन्गुह्यकस्तं ययाचे ।  कामार्ता हि प्रकृतिकृपणाश्चेतनाचेतनेषु ॥
- पूर्वमेघ-मेघदूत, कालीदास

म्हणजेच

धूर-ज्वाला-जल-झुळुक ह्यांनीच हा मेघ दाटे ।   प्राण्याद्वारे कळवु शकतो, तोच संदेश हा ने॥
निर्जीवांची युति असुनही, योजिला दूत कामी । प्रेमार्ताला, सजिव नसुनी, भासला मेघ नामी ॥
- मराठी अनुवादः नरेंद्र गोळे

आकाशाचे क्षितिज जगती पाहता दूर वाटे । जाता तेथे मग क्षितिज ते आणखी दूर जाते ॥
जाणा तैसे क्षितिज जगती एक आहे सुखाचे । प्राप्तीसाठी अथक श्रमता दूरची दूर जाते ॥ -  नरेंद्र गोळे

१०. पृथ्वी (अक्षरगण, १७)

लक्षणगीतः
पदी गण जसा जसा यलग वृत्त पृथ्वी म्हणा ।  पदी गण जसा जसा यलग वृत्त पृथ्वी म्हणा ॥

उदाहरणः कड्यावरूनिया उड्या धडधडा पये टाकिती ।  करून गुरुगर्जना निकट देश नादावती ॥
दुधापरी जलौघ ते मज बघावया ते कदा ।  फिरून मिळतील गा कधी तरी उदरांबुदा ॥ - भा.रा.तांबे

न निश्चय कधी ढळो; कुजनविघ्नबाधा टळो; न चित्त भजनी चळो; मति सदुक्तमार्गी वळो ।
स्वतत्त्व ह्रदया कळो; दुरभिमान सारा गळो; पुन्हा न मन हे मळो; दुरित आत्मबोधे जळो ॥
- केकावली-१२०, मोरोपंत

११. शार्दूलविक्रीडित (अक्षरगण, १९)

लग्नाची मंगलाष्टके सामान्यतः शार्दूलविक्रीडितात रचली गेलेली असल्याने हे वृत्त सर्वात अधिक लोकप्रिय वृत्त आहे. लग्नात जरी हे वृत्त एका विशिष्ट चालीत म्हणत असले, तरी ह्या वृत्तातली कविता, वृत्ताच्या पारंपारिक लक्षणगीताने व्यक्तवलेल्या चालीतच म्हटली जात असते.

लक्षणगीतः

आहे वृत्त विशाल त्यास म्हणती शार्दूलविक्रीडित
मा सा जा स त ता ग येति गण हे पादास की जोडित

मानावा समरा जनास समरा ताराप ताराप गा

उदाहरणः
सन्तप्तायसि संस्थितस्य पयसो नामापि न ज्ञायते ।
मुक्ताकारतया तदेव नलिनीपत्रस्थितं राजते ॥
स्वात्यां सागरशुक्तिमध्यपतितं तन्मौक्तिकं जायते ।
प्रायेणाधममध्यमोत्तमगुणः संसर्गतो जायते ॥ - नीतिशतक, राजा भर्तृहरी, ख्रिस्तपूर्व-५५४

तोयाचे परि नावही नच उरे संतप्त लोहावरी ।
ते भासे नलिनीदलावरि पहा सन्मौक्तिकाचे परी ॥
ते स्वातीस्तव अब्धिशुक्तिपुटकी मोती घडे नेटके ।
जाणा उत्तममध्यमाधमदशा संसर्ग योगे टिके ॥
- मराठी अनुवादः वामन पंडित (वामन नरहरी शेष), ख्रिस्तोत्तर १७-वे शतक

पाण्याचा मुळि थेंबही न उरतो लोहावरी तापल्या ।
ते भासे नव मोतियापरि जणू पर्णावरी रांगता  ॥
स्वातीचे जल शिंपल्यात पडता मोती घडे तत्वता ।
होते उच्च मधील निम्न अवस्था संसर्ग तो लाभता ॥
- मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०१७०७०७

या कुंदेंदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता ।
या वीणावरदंडमंडितकरा या श्वेत पद्मासना ॥
या ब्रम्हाच्युतशंकरप्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता ।
सा मां पातु सरस्वती भगवती निःषेश जाड्यापहा ॥


कुंदाचंद्रतुषारहारसमशा वस्त्री रमे श्वेतशा ।
वीणा वादन जी स्वये करतसे पद्मातही शुभ्रशा ॥
जी पूज्या विधि-विष्णु-शंकर अशा देवांसही तत्त्वता ।
रक्षो ती मज शारदा हरवु दे निर्बुद्धता पूर्णतः ॥  - मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०१२०३३०

आम्ही कोण म्हणूनि काय पुससी? आम्ही असू लाडके ।
देवाचे, दिधले असे जग तये, आम्हांस खेळावया ॥
विश्वी या प्रतिभाबले विचरतो चोहीकडे लीलया ।
दिक्कालातूनि आरपार अमुची दृष्टी पहाया शके ॥

आम्हाला वगळा - गतप्रभ झणी होतील तारांगणे ।
आम्हाला वगळा - विकेल कवडीमोलावरी हे जिणे ! ॥
कवीः कृष्णाजी केशव दामले उर्फ केशवसुत, फैजपूर, मनोरंजन, मे-१९०२

भाषा संस्कृति थोर एकच महाराष्ट्रा, तुझी देख रे ।
नाना धर्म असंख्य जाति असती अद्यापि सारे खरे ॥
भेदांनी परि या किती दिन तुवा व्हावे त्रिधा पीडित ।
जाणूनी अपुले स्वरूप कर तू शार्दूलविक्रीडित ॥ - मा.त्रिं. पटवर्धन

१२. मंदारमाला (अक्षरगण, २२)

लक्षणगीतः

मंदारमाला कवी बोलती हीस, कोणी हिला अश्वघाटी असे ।
साता तकारी जिथे हा घडे पाद, तेथे गुरू एक अंती वसे ॥

ताराप ताराप ताराप ताराप, ताराप ताराप ताराप गा ।

उदाहरणः ना.वा. ऊर्फ रेव्हरंड टिळक ह्यांची कविता, “माझ्या मातृभूमीचे नाव”
सृष्टी तुला वाहुनी धन्य माते, अशी रूपसंपन्न तू निस्तुला ।
तू कामधेनू ! खरी कल्पवल्ली, सदा लोभला लोक सारा तुला ॥
या वैभवाला तुझ्या पाहुनीया, मला स्फूर्ति नृत्यार्थ होई जरी ।
सामर्थ्य नामी तुझ्या आर्यभूमी, तसे पाहिले मी न कोठे तरी ! ॥

संदर्भः

१. सुगम मराठी व्याकरण व लेखन, मो.रा.वाळंबे, नितीन प्रकाशन, आवृत्ती-१, १९८९, रु.२२५/- पृ-४४३.
२. काव्यरचनेची लोकप्रिय वृत्ते-१ http://nvgole.blogspot.in/2014/03/blog-post.html#links
३. काव्यरचनेची लोकप्रिय वृत्ते-२  http://nvgole.blogspot.in/2015/10/blog-post.html#links
४. वियद्गंगा वृत्त http://nvgole.blogspot.in/2016/04/blog-post.html#links
५. कवी माधव ज्यूलियन यांचा आज जन्मदिन http://nvgole.blogspot.in/2016/01/blog-post.html#links
















































१ विश्व स्वधर्मसूर्ये पाहो http://nvgole.blogspot.in/2013/08/blog-post.html#links
२ “वेचक छंदविचार”, चित्त (चित्तरंजन सुरेश भट), मनोगत डॉट कॉम, प्रकाशन-०५/०९/२००७, दुवाः http://www.manogat.com/node/11366
३  श्रुतबोध- कविकुलगुरू महाकवि कालिदास, एकूण पृष्ठे-२३.
     https://drive.google.com/file/d/0B3nBnL96VGVgWWxpczgxYlVUcU0/view?usp=sharing
४  छंदःशास्त्राची चाळीस वर्षे, कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर, पूर्वप्रसिद्धी: नवभारत, सप्टेंबर, १९६२,
     http://vechak.org/chandashastrachi40varshe, वृत्तांबाबत थोडेसे - प्रदीप कुलकर्णी,  http://www.manogat.com/node/13552
५  छंदोरचनाः मा.त्रिं.पटवर्धन, पृष्ठसंख्या-५१४
६  रघुनाथ पंडित विरचित नल-दमयंती स्वयंवर, संपादकः प्रा.श्री.र.भिडे, सोमैय्या पब्लिकेशन्स, १९७१, किंमत रु.६/- फक्त.
७  हे वृत्त काय आहे? - अरविंद कोल्हटकर, http://mr.upakram.org/node/3480
८  त्या फुलांच्या गंधकोशी http://manik-moti.blogspot.in/2010/04/blog-post_19.html
९  चांदणे शिंपीत जाशी चालता तू चंचले https://www.youtube.com/watch?v=eFbJAXnhxVM
१०  “भ्रांत तुम्हां कां पडे?”, माधव ज्युलिअन, आठवणीतल्या कविता भाग-३, पृष्ठ-१०२ ते १०५.
११  औदुंबर, संजीवनी गोळे https://drive.google.com/open?id=0B3nBnL96VGVgaWlIdEpZOFhyRmM, अनघा भिडे https://www.youtube.com/watch?v=RNJeyAodV1M, पॉला मॅक-ग्लिन https://www.youtube.com/watch?v=1XES09bMs1g,
१२  वृत्तांबाबत थोडेसे - प्रदीप कुलकर्णी,  http://www.manogat.com/node/13552
१३  धबधबा, भवानीशंकर पंडित, ’आठवणीतल्या कविता’ संच क्रमांक ४
१४  गझलेचा आकृतिबंध सुरेश भट ह्यांचेवरील संकेतस्थळ http://www.sureshbhat.in/node/12
१५  जगी हा खास वेड्यांचा गाण्याचे शब्द http://www.aathavanitli-gani.com/Song/Jagi_Ha_Khas_Vedyancha, जगी हा खास वेड्यांचा गाण्याची अधोभारणक्षम श्राव्य आवृत्ती  http://mr-jatt.com/download-ysbr/jagi-ha-khaas-asha-bhosle.html.
१६   विश्वकोशातील छंदोरचनेवरील लेख
https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand6/index.php/component/content/article?id=11059
१७  तुझ्या पंखावरूनी, या गाण्याचे शब्द http://www.aathavanitli-gani.com/Song/Tujhya_Pankhavaruni_Ya, तुझ्या पंखावरूनी, या गाण्याची अधोभारणक्षम श्राव्य आवृत्ती http://mr-jatt.com/download-tals/tujhya-pankha-varuni-usha-mangeshkar.html
१८   खरा तो एकची धर्म http://www.aathavanitli-gani.com/Song/Khara_To_Ekachi_Dharma
१९  कळा ज्या लागल्या जीवा http://www.aathavanitli-gani.com/song/kala_jyaa_lagalya_jeeva
२०  इंद्रवज्रा वृत्ताचे लक्षणगीत (श्राव्य)
    https://drive.google.com/file/d/0B3nBnL96VGVgQ3lDUFEtMTdkTlU/view?usp=sharing
२१ रावण विरचित शिवतांडव स्तोत्राचा संगीतबद्ध मराठी अनुवाद, प्रकाशनकाल- २७ फेब्रुवारी २०१३,
दुवाः http://www.maayboli.com/node/41491


११ टिप्पण्या:

Anand Ghare म्हणाले...

मला हातचे राखून ठेवायचे नाहीच, पण कुठून सुरू करावे तेच समजत नाही इतका मी हा ब्लॉग वाचून भारावून गेलो आहे. शाळेत असतांना मी काही वृत्ते आणि छंद शिकून व्याकरणात चांगले मार्क मिळवले होते, पण त्याच्या पलीकडे इतके काही असेल याची मला कल्पनासुध्दा नव्हती. अत्यंत अभ्यासपूर्ण लेख म्हणणे इतकेच मी कमीत कमी शब्दांत म्हणू शकेन. या लेखाचा संदर्भ म्हणून उपयोग करता येण्यासारखा आहे.

S B Rege म्हणाले...

उत्तम कार्य

Vijay Sawant म्हणाले...

खूप छान! धन्यवाद!

Unknown म्हणाले...

खरतर शब्दच सु़चत नाहि आहेत. इतक्या सुंदर अलंकारांनी सजलेली माझी माय मराठी. खुप खुप धन्यवाद

PRASHANT DHIVANDE म्हणाले...

पादाकुलक वृत्ताबाबत काही सांगावे

नरेंद्र गोळे म्हणाले...

प्रशांत,
प्रतिसादाखातर मनःपूर्वक धन्यवाद.

१. कामदा (पादाकुलक, ८,८ जातीवृत्त)
गणपति तुझे नाम चांगले । आवड़ी बहू चित्त रंगले ॥
प्रार्थना तुझी गौरीनंदना । हे दयानिधे श्री गजानना ॥

>>>>>>>>

हे लिहिलेलेच आहे की! कदाचित आपले वाचण्यातून सुटून गेले असावे!!

Unknown म्हणाले...

खूप अभ्यासपूर्ण...

सावित्री जगदाळे म्हणाले...

छान

QrioS म्हणाले...

फारच छान! उत्तम! कित्येक दिवसांपासून अशी माहिती शोधत होतो. धन्यवाद!

गायत्री मुळे म्हणाले...

अफाट

Unknown म्हणाले...

धन्यवाद नरेंद्र दादा,
आणि खूप खूप कौतुक पण !

प्राचीन काव्य वाङमयाला पुनरुज्जीवित करणारा लेख वाचून खूपच आनंद झाला. ही परंपरा व काव्य नष्ट होत चाललं आहे.
आपल्यासारखी माणसं ती टिकवण्याची धडपड करत आहेत, ते पाहून खूप बरं वाटलं.
एक विनंती आहे, या काव्य पंक्तींबरोबर त्याचे अर्थ व त्याच्या गेयतेचे ऑडियो टाकलेत तर सोन्याहून पिवळं !
काव्य, त्याचा अर्थ आणि चाल एकाचवेळी समजली तर अभ्यासूंना व वाचकांनां त्याची गोडी लागेल.
शिक्षकांना त्यातील यती कळेल व मुलांना गोडी लावायला उपयुक्त ठरेल.