वृत्तबद्ध काव्ये ही नेहमीच अपार
आनंदाचा ठेवा असतात. आनंदाचा कंद असतात. मात्र आनंदकंद
नावाच्या वृत्तात, आनंदकंद अशा आपल्याच देशाचे उत्तम वर्णन केलेले आहे. ते उत्तम
प्रकारे गाता येते. त्यापासून अलोट आनंद मिळतो. ही सगळी अनुभूती निव्वळ योगायोग
नसून वर्षानुवर्षांच्या वृत्तसाधनेचे फलितच आहे ते. ह्या वृत्तात गाता येणार्या
काही उदाहरणांची झलक जरी पाहिली तरी त्यात दडलेल्या असंख्य संभावनांची चुणूक सहजच
प्राप्त होईल.
हे एक गझलवृत्त आहे. गझलवृत्तामधे लघु-गुरु क्रमाला ‘लगावली’
म्हणतात. यात एका ‘गुरु’च्या
ऐवजी दोन ‘लघु’ ही सवलत घेता येते.
आनंदकंद वृत्ताचे लक्षणगीतः ताराप राधिका गा, ताराप राधिका गा
आनंदकंद वृत्तातील
मात्रा:
२४, लगावली :
गा गा ल गा ल गा गा
उदाहरणेः
१.
केव्हां तरी पहाटे उतरून रात्र गेली । - सुरेश भट
२.
अंदाज आरशाचा वाटे खरा असावा । - ईलाही जमादार
३.
प्रेमस्वरूप आई ! वात्सल्यसिंधु आई ! - माधव ज्युलिअन
४.
आनंदकंद ऐसा । हा हिंददेश माझा । - आनंदराव टेकाडे
५.
एका
तळ्यात होती बदके पिले सुरेख ।
- ग.दि.माडगुळकर
६.
गवतात कोळियाने, विणले सुरेख जाळे । - नरेंद्र गोळे
७.
राजास जी महाली,
सौख्ये कधी मिळाली । - राष्ट्रसंत
तुकडोजी महाराज
त्यांच्या श्राव्य संचिकांचे दुवे
इतकी उदाहरणे आणि त्यांच्या निरनिराळ्या चाली! एकाच
वृत्ताच्या प्रतिनिधी असल्याने परस्परांच्या चालींत गाता येणारच. हा प्रयत्न अतिशय
मनोरंजक होत जातो. बघा प्रयत्न करून!
------------------
केव्हातरी पहाटे उलटून रात गेली; मिटले चुकून डोळे हरवून रात गेली
कळले मला न केव्हा सुटली मिठी जराशी; कळले मला न केव्हा निसटून रात गेली
सांगू तरी कसे मी वय कोवळे उन्हाचे ?; उसवून श्वास माझा फसवून रात गेली
!
उरले उरात काही आवाज चांदण्याचे; आकाश तारकांचे उचलून रात गेली !
स्मरल्या मला न तेव्हा माझ्याच गीतपंक्ती; मग ओळ शेवटाची सुचवून रात गेली !
गीत- सुरेश भट, संगीत- पं. हृदयनाथ मंगेशकर,
स्वराविष्कार- पद्मजा फेणाणी-जोगळेकर, आशा भोसले, चित्रपट- निवडूंग, राग - दुर्गा
-----------------
-----------------
वाचलेली, ऐकलेली, माणसे गेली कुठे ? पुस्तकातून पाहिलेली माणसे गेली
कुठे ?
रोज अत्याचार होतो आरशावरती आता, आरशाला
भावलेली माणसे गेली कुठे ?
अंदाज आरशाचा वाटे खरा असावा; बहुतेक माणसाचा तो
चेहरा असावा
काठावरी उतरली स्वप्ने तहानलेली डोळ्यांत वेदनेचा माझ्या झरा असावा
जखमा कशा सुगंधी झाल्यात काळजाला केलेत वार ज्याने तो मोगरा असावा
माथ्यावरी नभाचे ओझे सदा 'इलाही' दाही दिशा
कशाच्या हा पिंजरा असावा
गीत- इलाही जमादार, संगीत- भीमराव
पांचाळे, स्वर- भीमराव पांचाळे, अल्बम- एक जख्म सुगंधी
-------------------
प्रेमस्वरूप आई ! वात्सल्यसिंधु आई ! बोलावुं तूज आता मी कोणत्या उपायीं ?
नाहीं जगांत झाली आबाळ या जिवाची, तूझी उणीव चित्तीं आई, तरीहि जाची.
चित्तीं तुझी स्मरेना कांहींच रूपरेखा, आई हवी म्हणूनी सोडी न जीव हेका.
ही भूक पोरक्याची होई न शांत आई, पाहूनियां दुज्यांचें वात्सल्य लोचनांहीं.
वाटे इथूनि जावें, तूझ्यापुढें निजावें, नेत्रीं तुझ्या
हसावें, चित्तीं तुझ्या ठसावें !
वक्षीं तुझ्या परि हें केव्हां स्थिरेल डोकें, देईल शांतवाया हृत्स्पंद मंद झोके ?
घे जन्म तूं फिरूनी, येईन मीहि पोटीं, खोटी ठरो न देवा,
ही एक आस मोठी !
गीत- माधव
ज्यूलियन, संगीत- वसंत प्रभू, स्वर- लता मंगेशकर, राग- मधमाद सारंग
--------------------
आनंदकंद ऐसा । हा हिंददेश माझा ।
सत्यास ठाव देई । वृत्तीस ठेवि न्यायी । सत्यास मानि राजा । हा हिंददेश माझा ।
जगदीश जन्म घेई । पदवीस थोर नेई । चढवी स्वधर्मसाजा । हा हिंददेश माझा ।
गंगा हिमाचलाची । वसती जिथें सदाची । होऊनि राहि कलिजा । हा हिंददेश माझा ।
तिलकादि जीव देहीं । प्रसवूनि धन्य होई । मरती स्वलोककाजा । हा हिंददेश माझा ।
पूजोनि त्यास जीवें । वंदोनि प्रेमभावें । जयनाद हाचि गर्जा । हा हिंददेश माझा
।
गीत- आनंदराव टेकाडे, संगीत- श्रीधर फडके,
स्वराविष्कार- श्रीधर फडके
---------------------------
एका तळ्यात होती बदके पिले सुरेख; होते कुरूप वेडे पिल्लू तयांत एक
ग.दि.माडगुळकर, श्रीनिवास खळे, आशा/मधुबाला झवेरी
ग.दि.माडगुळकर, श्रीनिवास खळे, आशा/मधुबाला झवेरी
कोणी न तयास घेई खेळावयास संगे; सर्वांहुनी निराळे ते वेगळे तरंगे
दावूनि बोट त्याला म्हणती हसून लोक; आहे कुरूप वेडे पिल्लू तयांत एक
पिल्लास दु:ख भारी,
भोळे रडे स्वतःशी; भावंड ना विचारी, सांगेल ते कुणाशी
जे ते तयास टोची दावी उगाच धाक; होते कुरूप वेडे पिल्लू तयांत एक
एके दिनी परंतु पिल्लास त्या कळाले; भय वेड पार त्याचे वार्यासवे पळाले
पाण्यात पाहताना चोरूनिया क्षणैक; त्याचेच त्या कळले तो राजहंस एक.
-----------
गवतात कोळियाने, विणले सुरेख जाळे । सावज तयात यावे, आशा
मनात पाळे ॥ धृ ॥
थंडीत रामप्रहरी, दव साखळून आले । सावज बनून थेंबहि, जाळ्यात कैद
झाले ॥ १ ॥
अडकून बिंदु शतशः, झुंबर तयार झाले । देदीप्यमान तेजे, चमकून रत्न झाले ॥ २ ॥
ते रत्नहार सारे, जाळ्यास भार झाले । चिंतीत कोळि झाला, सावज
फरार झाले ॥ ३ ॥
मग रत्न-पारखाया, तो “सर्वसाक्षि आला । दृश्यास
जोखणारा, तो पारखी मिळाला ॥ ४ ॥
उकलून एक एक, हर पृथक तार केला । दवबिंदु एक एक, सुट्टा
हिराच केला ॥ ५ ॥
जरि रत्नहार भासे, धागा गहाळ झाला । त्या “ईश्वरी”१ कलेचा, चित्रात कळस झाला ॥ ६ ॥
१. “ईश्वर”च “सर्वसाक्षी” म्हणवतो,
नाही का!
- नरेंद्र गोळे २०११११२७
------------
राजास जी महाली - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, (माणिक बंडोजी इंगळे) १९३५, मोझरी
राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली, ती
सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या ॥ धृ ॥
भूमीवरी पडावे, तार्यांकडे पहावे, प्रभुनाम
नित्य गावे, या झोपडीत माझ्या ॥ १ ॥
पहारे आणि तिजोर्या,, त्यातूनी होती चोर्या, दारास नाही दोर्या,,
या झोपडीत माझ्या ॥ २ ॥
जाता तया महाला, ‘मज्जाव’ शब्द आला, भीती
न यावयाला, या झोपडीत माझ्या ॥ ३ ॥
महाली मऊ बिछाने, कंदील शामदाने, आम्हा जमीन माने, या झोपडीत माझ्या ॥ ४ ॥
येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, कोणावरी न बोजा, या झोपडीत माझ्या ॥ ५ ॥
पाहून सौख्यं माझे, देवेंद्र तोही लाजे, शांती सदा विराजे,
या झोपडीत ॥ ६ ॥
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा