20110108

पुस्तक परीक्षण: जेस्सी पांढरे हरीण

पुस्तक परीक्षण: जेस्सी पांढरे हरीण (अमेरिकन प्रवासानुभवाच्या व्यक्तिचित्रणात्मक कथा)
लेखकः डॉ.अशोक ज. ताम्हनकर, प्रकाशकः राजे पब्लिकेशन्स, ठाणे
प्रथमावृत्तीः दत्तजयंती, २० डिसेंबर २०१०, मूल्यः रू.१६०/- फक्त, पृष्ठे १६८

ठाण्यात नुकत्याच संपन्न झालेल्या साहित्य-संमेलनाचे निमित्ताने, अनेक पुस्तके त्यादरम्यानच प्रसिद्ध झाली. हे पुस्तकही त्यातीलच एक होय.

मुख्यत्वे वेंडेल आणि ब्युला यांच्या आठवणी जपण्यासाठी हे पुस्तक लिहील्याचे लेखकानेच अर्पण-पत्रिकेत लिहून ठेवलेले असले तरीही ब्युला, वेंडेल, रिकी, एजाज, रीफ आणि जेस्सी या सहा व्यक्तींची व्यक्तीचित्रे असे या पुस्तकाचे स्वरूप आहे.

या पुस्तकास धनंजय राजे यांची प्रस्तावना असून, दिलीप प्रभावळकर यांचा अभिप्राय लाभलेला आहे. प्रभावळकर लिहीतातः “अनोखी पार्श्वभूमी असलेल्या कथा आणि चक्रावून टाकणार्‍या या वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिरेखा तुम्हाला गुंतवून ठेवतात! परक्या देशात, परक्या वातावरणात, कामानिमित्त गेलेल्या डॉ.अशोक ताम्हनकरांची नव्या अनुभवांना सामोरे जाण्याची उत्कंठा तर यात दिसतेच, शिवाय भेटलेल्या व्यक्तींमधले माणूसपण जाणून घेण्याचे कुतुहलही जाणवते. अत्यंत वाचनीय अशा या कथा आहेत. एक वेगळा आणि अमेरिकेचा खराखुरा अनुभव देणार्‍या.”

डॉ.अशोक ताम्हनकर वैज्ञानिक आहेत. कामानिमित्त देशविदेशात त्यांनी केलेल्या प्रवासादरम्यान त्यांना भेटलेल्या व्यक्तींच्या –किंबहुना वैज्ञानिकांच्या- ह्या सहा कथा आहेत.

ब्युला ग्लासगो या ८४ वर्षे वयाच्या “प्रचंड ऊर्जा” असलेल्या स्त्रीच्या घरी लेखक पेईंग गेस्ट म्हणून दीर्घकाळ राहिले होते. पुढे त्या स्वतःही वनस्पतीशास्त्रातील पी.एच.डी. असल्याचे लेखकास समजले. ते लिहीतात की, “बाई ह्या वयातदेखील स्वतः गाडी चालवायच्या!”

तिथे एका धर्मगुरूंनी, “तू भारतात परत काय घेऊन जाशील?” असा प्रश्न विचारल्यावर लेखक त्यांना सांगतात, “अमेरिकन माणसाच्या चेहर्‍यावर सतत असणारे स्मितहास्य. अमेरिकेतल्या माझ्या संपूर्ण वास्तव्यात कधीही कुणाच्याही डोळ्याला माझा डोळा भिडला की, मी पाहिले आहे की ती व्यक्ती एक सुंदर स्मित देते. ते स्मित मला हवे आहे.” त्यांनी विचारले, “पण तू ते नेणार कसे?” त्यावर लेखकाने दिलेले उत्तर मननीय आहे. ते म्हणाले, “तोच भाग महा कठीण आहे. ते नेता येणार नाही. कारण ती अमेरिकेतल्या सुखी जीवनाची निशाणी आहे. पण ते स्मित निर्माण व्हायला जी कारणे आहेत, ती मला आता माहीत झालेली आहेत. ती कारणे मी जर माझ्या देशात निर्माण करू शकलो तर मी माझ्या देशातही स्वर्ग निर्माण करू शकेन. देशातल्या प्रत्येक माणसाच्या चेहर्‍यावर सुखाचे स्मित फुलवू शकेन.” त्यावर ते धर्मगुरू म्हणाले, “हे उत्तर देणारा, विकसनशील देशातून आलेला, असा तू पहिला इसम आम्हाला भेटला आहेस.” तेव्हा लेखक उत्तरले होते की, “विकसनशील देश विकास पावत आहेत. माझे उत्तर ही त्याचीच एक निशाणी आहे.”

वेंडेल हे त्यांचे अमेरिकेतील प्रशिक्षणादरम्यानचे मार्गदर्शक होते. राष्ट्राध्यक्षांच्या शिष्टमंडळांतून अनेकदा प्रवास केलेल्या उच्चपदस्थांपैकी ते एक होते. मात्र त्यांच्या वर्तणुकीतून ही गोष्ट ते कधीही जाणवू देत नसत. व्यक्तिगत जीवनातील ताण-तणावांचे प्रतिबिंबही कार्यालयीन कामकाजावर पडू देत नसत. पुढे ऑस्ट्रेलियात भेटल्यावर सत्तरीस पोहोचलेल्या वेंडेल यांनी आपण स्वतःच्या स्वीय सचिव असलेल्या मुलीशीच लग्न केले आहे, ही गोष्ट एवढ्या उत्साहाने त्यांना सांगितली की लेखक थक्क झाले. वेंडेल त्यांना म्हणाले की आम्ही आता इथे या परिषदेच्या निमित्तने येऊन, हनिमून साजरा करणार आहोत. “चल, आम्ही सायकली भाड्याने घेऊन भटकणार आहोत. येतोस?” त्यावर लेखक म्हणाले, “नाही बाबा, मी तुमच्यासारखा तरूण नाही. मी जेमतेम प्रवास करून आत्ता पोहोचतो आहे. तुम्ही जाऊन परत या, मग बोलू.” वेंडेल या संस्मरणीय व्यक्तीरेखेची ही कहाणी रंगवलीही अगदी सुरस आहे. मुळातच वाचावी अशी!

सिएटलजवळ लेवेनवर्थ नावाचे एक गाव अमेरिकेतील जर्मनी म्हणून वसवलेले आहे. तिथे झाडावर घर करून राहणार्‍या रिकीशी, लेखकांची भेट योगायोगानेच झाली. रिकी उच्चविद्याविभूषित होती. ज्येष्ठ, प्रसिद्ध शास्त्रज्ञाची पत्नी होती. तरीही, ते सर्व सोडून ती झाडावर जाऊन का राहू लागली? झाडावर राहून, गावात ती “पुस्तकघर” कसे चालवत असे?. पुस्तकघरात जागोजाग प्रसिद्ध कविता का लिहीलेल्या असत? तिथे लेखकास भगवद्गीता कशी आढळली? हे सर्व मुळातच वाचण्यासारखे चित्तवेधक वर्णन मूळ पुस्तकातच वाचावे. रिकी एकदा लेखकांस म्हणाल्या की, “अनेक भारतीयांना अमेरिकेचे खूप आकर्षण वाटते आणि बरेच भारतीय इथे येऊन राहू लागलेले आहेत, म्हणून तू अजूनही भारतात राहतोस याचे मला आश्चर्य वाटले!” त्यावर लेखकाने दिलेले उत्तरही आगळे-वेगळे आहे. ते म्हणाले, “माझा भारत मला आवडतो. जगातले अनेक देश चांगले आहेत; पण भारत हा मला एकमेवाद्वितीय वाटतो. तो सगळ्यांपेक्षा वेगळाच आहे. तिथे अनेक अडचणी आहेत. तरीपण मला नेहमी तिथेच राहायला आवडेल. जगात जे जे आहे ते ते सगळे भारतात आहेच; पण भारतात काहीतरी वर्णनाच्या पलीकडले आहे. जे जगातल्या कुठल्याही देशात नाही. कधीतरी भेट द्यायला इतर देश ठीक आहेत.” त्यावर रिकी म्हणाल्या, “म्हणूनच मला भारताला भेट द्यायची वर्षानुवर्षे इच्छा आहे; पण अजून काही जमलेले नाही. मी आले तर तू मदत करशील?” रिकीचे वय त्यावेळेस ऐंशीचे आसपास होते, हे विशेष.

वॉशिंग्टनमधील हिल्टन हॉटेलात झालेल्या एका जागतिक परिषदेकरता लेखक गेलेले होते. तीन दिवस राहण्याची त्यांची सोय झालेली होती. उर्वरित दोन दिवसांकरता रूममेट मिळाला असता तर त्यांना हवा होता. त्याच्याच शोधात त्यांना ऐजाज मिळाला. हिंदुस्तानी मुलीशी लग्न केलेला तो एक पाकिस्तानी तरूण शास्त्रज्ञ होता. सोबत राहू लागण्यापूर्वीच तो उचल्या असल्याचे निष्पन्न झाले. म्हणून लेखकास त्याचेसोबत राहणे नको वाटू लागले. तरीही परिस्थितीच्या रेट्याखाली ते राहिले. त्यांची आपापसात मैत्री झाली. ती पुढेही बरीच टिकली. त्याचीच एक कथा लेखकाने लिहीली आहे.

ऐजाज जीवनाशकांच्या पर्यावरणात होणार्‍या प्रदूषणावर काम करत होता. कीटकनाशके, बुरशीनाशके, तणनाशके आपण फवारत असतो. त्यांचे अवशेष दीर्घकाळ पर्यावरणात टिकून राहतात, आपल्या खाद्यशृंखलेत शिरून ती आपल्यापर्यंत पोहोचतात आणि उपद्रवकारी ठरतात. हिवताप निर्मूलनाच्या कामात वापरली जाणारी डीडीटी, मज्जातंतूंमध्ये पॅरॅलिसिस निर्माण करू शकते. ही माहिती कथेच्या अनुषंगाने लेखकाने अधोरेखित केलेली आहे.

लेखकाची, वीस वर्षीय संतप्त अमेरिकन युवकाशी -रीफ- याचेशी, ते जिथे पेईंग गेस्ट म्हणून राहत असत त्या घरीच गाठ पडली. त्या युवकाच्या संतप्ततेचे कारण उमजून घेण्याच्या कुतुहलाने, लेखकास अडचणीच्या प्रसंगात नेऊन पोहोचवले. प्रेयसीच्या खुनाकरता तुरूंगवास भोगणार्‍या त्याच्या वडिलांना भेटून समजवण्याचा विदारक प्रसंग लेखकावर आला. या कथेतून अमेरिकन सामाजिक जीवनाचे एरव्ही न दिसणारे काही पैलू लेखकाने समोर आणले आहेत.

सोनेरी सुंदर केसांची एक तरूण जर्मन शास्त्रज्ञ, लेखक अमेरिकेत असतांना, त्यांच्याच प्रयोगशाळेत काम करत असलेली त्यांना दिसली. तिचे नाव जेस्सी असल्याचे समजले. तिने एकदा “पॉटलक” मध्ये हरिणाची सागुती आणली होती. त्या भागात लेखकाने कधी हरिणे पाहिलेली नव्हती. ती म्हणाली, मी दाखवते चांगले “पांढरे हरीण”. मग ती लेखकाला प्रवेश निषिद्ध असलेल्या संरक्षण आस्थापनेत कशी घेऊन गेली, त्या भागात ठेवलेल्या अण्वस्त्रधारी प्रक्षेपणास्त्रांचे सांकेतिक नाव “पांढरे हरीण” असल्याचा समज कसा प्रचलित होता, हे सारे मुळातच वाचण्यासारखे उत्कंठावर्धक लिहीलेले आहे. ती स्त्री हेर होती का? लेखकाची त्या प्रसंगातून सुटका कशी झाली? खर्‍या-खोट्याची काल्पनिक सरमिसळ असलेल्या या कथेत, पुढे पुढे तर ही कथा सत्य की काल्पनिक हाच पेच महत्त्वाचा ठरत जातो. ह्या पेचाचा निकाल आपण हे पुस्तक वाचूनच लावू शकता.

सरळसोटपणे व्यक्तिचित्रणे न रेखाटता, वास्तविक जीवनास काल्पनिकतेची झूल चढविण्याच्या लेखकाच्या प्रयत्नांना अपेक्षित यश आलेले नाही. एरव्ही, अमेरिकन शास्त्रज्ञांची व सर्वसामान्य माणसांची सुंदर व्यक्तिचित्रणे रेखाटण्यात लेखक महाशय यशस्वी ठरलेले आहेत. ज्यांची व्यक्तिचित्रणे रेखाटलेली आहेत, ते आहेतच तसे. प्रातिनिधिक!
.

No comments: