२०११-०१-२०

पुस्तकपरीक्षण: नॉट ओन्ली पोटेल्स

पुस्तकपरीक्षण: नॉट ओन्ली पोटेल्स (चार सत्यकथा)
लेखक: शोभा बोंद्रे
प्रकाशक:मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस
प्रकाशनकाल: पहिली आवृत्ती: ७ ऑगस्ट २०१०
पृष्ठे: २२७
किंमत: रु. २५०/-फक्त

इडली, ऑर्किड आणि मी, एक असतो बिल्डर, ही तो ’श्री’ची इच्छा व मुंबईचा अन्नदाता, या लोकप्रिय पुस्तकांचे शब्दांकन; ’लेगॉसचे दिवस’ हे आत्मकथन; आभाळमाया, अभिलाषा, ऊनपाऊस, अर्धांगिनी इत्यादी मालिकांचे संवादलेखन; याशिवाय कथा, कादंबरी इत्यादी विपुल साहित्याचे सृजन करणार्‍या शोभा बोंद्रे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेले हे पुस्तक वाचनीय आहे. एकदा हातात धरल्यावर संपूर्ण वाचल्याशिवाय सोडवत नाही इतके ते सुरस झालेले आहे.

मुळात ज्या चार सत्यकथा सांगायला घेतलेल्या आहेत, त्या पूर्णतया सत्य स्वरूपात कथन करण्याचे धोरण अखेरपर्यंत अबाधित राखल्याने, लिखाणास तथ्यात्मक वैधता प्राप्त झालेली आहे. "गुजराथी माणूस व्यवसायात हमखास यशस्वी होतो. इथे परदेशातही. ह्याचे कारण काय? ते विशद करणार्‍या, शोभा बोंद्रे ह्यांच्या साध्या सोप्या ओघवत्या शैलीतल्या चार सत्यकथा! " अशीच ह्या पुस्तकाची जाहिरात मलपृष्ठावर केलेली दिसून येते; आणि ती सार्थ आहे.

मोटेल्स म्हणजे अमेरिकेतील स्वस्त आणि मस्त अशी, हायवेच्या कडेला असलेली, राहण्याची सोय. शहरभागात वसवलेल्या हॉटेल्सपेक्षा यांचे दर तुलनेने कमी असतात. जेव्हापासून अमेरिकेतल्या मोटेल्सच्या व्यवसायात गुजराती लोक बहुसंख्येने शिरले, तेव्हापासून लोक मोटेल्सना पोटेल्स म्हणू लागले. कारण या गुजराती लोकांतील बहुतांश लोक ’पटेल’ असत. तेव्हा पटेल म्हटले की केवळ पोटेल्स. हा समज रुजू झाला.

मात्र, पटेल लोक आता त्याच्याही पलीकडे जाऊन इतर व्यवसायात आपले बस्तान बसवू लागलेले दिसून येतात. एवढेच नव्हे तर, त्या त्या नव्या व्यवसायांत दैदिप्यमान यशही मिळवून दाखवत आहेत. परक्या देशात, परक्या व्यवसायांत जिद्दीने आणि अपार कष्टाने आपली ओळख निर्माण करत आहेत. परदेशातील लोकप्रतिनिधी होऊन परदेशांतील नागरिकांच्या कौतुकास पात्र ठरण्याची किमया करून दाखवत आहेत. हे अधोरेखित करण्याकरताच ह्या पुस्तकाचे नाव ठेवलेले आहे "नॉट ओन्ली पोटेल्स"; आणि तेही पूर्ण अर्थाने सार्थ ठरले आहे.

पुस्तकाचे मनोगत लिहितांना त्या म्हणतात, "अमेरिकेतल्या हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीसंबंधी काही माहिती आणि आकडेवारी प्रकाशित झालेली होती. त्यात म्हटले होते की, अमेरिकेतल्या हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये मोटेल्स आणि हॉटेल्स एकत्रित धरून सुमारे त्रेपन्न हजार प्रॉपर्टीज येतात. त्यांपैकी ५०% हून अधिक प्रॉपर्टीज भारतीयांच्या आहेत. त्यातही बहुतांश गुजराती आणि त्यातील ९९% पटेल. या प्रॉपर्टीजची किंमत आहे, चाळीस बिलियन डॉलर्स. त्यांचे मालक वर्षाला सातशे मिलियन डॉलर्स इतका कर भरतात. त्यांच्या व्यवसायात सुमारे दहा लाख कर्मचारी काम करतात. आज पटेल हे नाव केवळ मोटेल्सशी जोडलेले नाही तर हिल्टन, मॅरिऑट, स्टारवूड, हॉलिडे इन अशा अनेक नामांकित पंचतारांकित हॉटेल्सचे मालक आहेत पटेल. "

पहिली गोष्ट आहे मोहनभाई पटेल यांची. तिचे नाव ’वर्तुळाचे दुसरे टोक’. १९५८ साली हिमालयन ड्रग कंपनीची, औषध भरण्याच्या अल्युमिनमच्या ट्यूब्जची ऑर्डर मिळवून त्यांनी व्यवसायाचा पाया घातला. मेटलबॉक्स ह्या भारतातील विख्यात ब्रिटिश कंपनीच्या एकाधिकारशाहीस धुळीला मिळवत, आत्मविश्वासाने पदार्पण करणार्‍या मोहनभाईंनी, १९८० साली, अशा ट्यूब्ज बनवणार्‍या जगातील सर्वात मोठ्या उद्योगात आपली कंपनी कशी परिणत केली त्याची ही यशोगाथा आहे.

उमेदवारीच्या वर्षांत आय. सी. एस. होण्याकरता लंडनला गेलेले मोहनभाई, त्या वर्षीपासूनच ती परीक्षा लंडनमध्ये घेणे बंद होणार असल्याने, त्यांच्या आय. सी. एस. होण्याची शक्यता उरली नाही. म्हणून खूपच निराश झाले होते. अगदी भारतात परत जावे काय या विचारापर्यंत. पण मग त्यांनी बॅरिस्टर होण्याचे ठरवले. मात्र अखेरीस ते इलेक्ट्रिकल इंजिनियर झाले. कसे? ती कथा लेखिकेने अतिशय सुरस सादर केलेली आहे.

पुढे टाटांच्या कंपनीत अनेक वर्षे नोकरी, इनॅमल्ड रिफ्लेक्टर्सच्या व्यवसायात पाय रोवणे, अल्युमिनमच्या कोलॅप्सिबल ट्यूब्जच्या व्यवसायात प्रवेश, मग ऑप्थल्मिक नोझल ट्यूब्जची निर्मिती अशी यशाची शिखरे त्यांनी पादाक्रांत केली. पण ऑप्थल्मिक नोझल ट्यूब्जची निर्मिती सुरू करतांना एकदा दोनदा नव्हे तर तब्बल तीस वेळेला डाय तुटल्याने सामान्य माणूस असता तर खचूनच गेला असता. पण त्यातूनही त्यांनी धीराने मार्ग काढला. पुढे मोहनभाईंनी "सुपा फार्म" कसे निर्माण केले आणि स्वतः आदिवासी नसलेला "आदिवासी उत्कर्ष मंडळाचा" एकमेव सदस्य, तसेच अध्यक्षही कसे झाले ती कथाही लेखिकेने सुरस वर्णन केलेली आहे.

कथेचे नाव "वर्तुळाचे दुसरे टोक" असे का दिले, याचे मात्र समाधानकारक स्पष्टीकरण कथेत कुठेही सापडत नाही.

बडोदा विद्यापीठातून इंजिनियर होऊन, अमेरिकेतील सिव्हिल इंजिनियरींगमधील उच्च पदवी प्राप्त करून, पूल बांधणार्‍या एका कंपनीत नोकरीला लागलेले दलपत पटेल आणि त्यांचे बंधू मगन पटेल यांची गोष्ट, दुसरी आहे. "मोटेलवाला झाला मेयर". १९७० मध्ये या बंधुंनी एक मोटेल खरेदी केले. ते व्यवस्थित चालवले. तेव्हापासून मग गुजराथी लोक मोटेलच्या व्यवसायात धडाधड उतरू लागले आणि त्यावरूनच मग ’पोटेल’ हे नावही उदयास आले. त्यांच्या व्यावसायिक यशाचा मागोवा घेत घेत, लेखिकेने दीड वर्षे अनेक गुजराथी लोकांच्या मुलाखती घेऊन हे पुस्तक सिद्ध केलेले आहे. दलपत पटेल पुढे डेमॉक्रॅटिक पक्षाचे उमेदवार म्हणून न्यू जर्सीतल्या मॅन्सफिल्ड काऊंटीत, एकूण मतदानाच्या ६१% मते मिळवून कमिटीवर निवडून आले. पुढे नैसर्गिक आपत्तीच्या काळात त्यांनी असे काम केले की लोक, "अवर मेयर हॅज डन अ गुड जॉब" असे म्हणत असत. ही सर्वच कहाणी लेखिकेने सुसंगत सादर केलेली आहे.

तिसरी गोष्ट आहे "लाईफ ऑफ अ सेल्समन. " बडोदा विद्यापीठातून रसायनशास्त्रात एम. एस. सी. केलेल्या जयदेव पटेल यांना अमेरिकेत नोकरी मिळेना झाली. मुलाच्या संगोपनाच्या कर्तव्य भावनेने प्रेरित होऊन, काहीसे अबोल असणारे जयदेव विमा एजंटचा व्यवसाय करण्यास तयार झाले. त्या निर्णयाने त्यांच्या पत्नी पूर्णिमा यांना रडू फुटले. अबोल जयदेव, लोकांच्या गळ्यात पॉलिसी कशी काय मारू शकेल आणि मग त्यावर आपला चरितार्थ तो कसा चालणार, या सार्थ शंकेपोटी त्यांनी जयदेवला दुसरा कुठलाही व्यवसाय करायला सांगितले. मात्र जयदेव बधला नाही.

पुढे दरवर्षी आपलेच, विमा-विक्रीचे नवनवीन उच्चांक मोडीत काढत जयदेव "आदर्श विमा एजंट" बनला. १९९२ साली वॉलस्ट्रीट जर्नलमध्ये अमेरिकेतला क्रमांक एकचा विमा एजंट म्हणून जयदेवची सविस्तर माहिती छापून आली. जयदेव आणि पूर्णिमाच्या निवेदनात्मक लिखाणातून लेखिकेने ही सारीच कहाणी पुन्हा उभी केली आहे. अखेरीस गुजराथमधील सोजित्रा या आपल्या मूळ गावी कोट्यवधी रुपये खर्च करून आपल्या शाळेचा कसा जीर्णोद्धार केला तेही वर्णन मुळातच वाचावे असे, हृद्य केलेले आहे. लेखिकेच्या साहित्यिक सादरीकरणाची सर, माझ्या रूक्ष परीक्षणास कशी बरे येईल. तेव्हा ते मुळातच वाचलेले चांगले.

शेवटली "नॉट ओन्ली पोटेल्स" ही गोष्ट मात्र पटेलांची नाही. ती आहे हसू, हर्षा, जय आणि नील या चौकोनी शाह कुटुंबाची. २००१ च्या अमेरिकेतील "लॉजिंग" मासिकात कव्हर स्टोरी म्हणून त्यांचीच यशोगाथा लिहिलेली आहे. हॅरिसबर्गमध्ये राहणार्‍या, शिक्षणाने केमिकल इंजिनियर असणार्‍या आणि व्यवसायाने सरकारच्या पर्यावरणशास्त्र विभागात नोकरी करणार्‍या हसूने १९८४ मध्ये आपले पहिले हॉटेल विकत घेतले तेव्हा त्यांची मुले शाळेत शिकत होती. १९९९ पर्यंत त्यांनी आणखी पाच पार्टनर जोडले, दहा हॉटेल्स विकत घेतली, अनेक धाडशी निर्णय घेतले; "हर्षा हॉस्पिटॅलिटी ट्रस्ट" स्थापन केली. कुटुंब, व्यवसाय, समाजसेवा या सर्वच क्षेत्रांत हसूभाई आणि हर्षाबेन यांनी उत्तम ताळमेळ कसा साधला याची कहाणीही लेखिकेने सुरेख सादर केलेली आहे.

जिद्द, चिकाटी आणि अपार कष्ट यांच्या जोरावर अशक्य वाटणारी यशोशिखरे प्रत्यक्षात जिंकून घेणार्‍या चार कुटुंबांचे हे पुस्तक प्रेरणादायी आणि नमुनेदार आहे. केवळ अनुकरणीय!
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: