२०२४-११-११

डॉ. अनिल काकोडकर यांचा जन्मदिवस

आज ११ नोव्हेंबर २०२४.
आज डॉ. अनिल काकोडकर यांचा जन्मदिवस. त्यानिमित्ताने हा त्यांचा अल्पपरिचय.

डॉ. अनिल काकोडकर (जन्मः ११ नोव्हेंबर १९४३) यांनी १९६४ साली ’ऍटॉमिक एनर्जी एस्टॅब्लिशमेंट’मधील ’अणुविज्ञान आणि तंत्रज्ञाना’तील एक वर्षाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रथम क्रमांकाने पूर्ण केला. त्यानंतर ते ’ऍटॉमिक एनर्जी एस्टॅब्लिशमेंट’ या संस्थेत रुजू झाले. पुढे भाभांच्या अपघाती निधनानंतर याच संस्थेचे नाव ’भाभा अणुसंशोधनकेंद्र’ असे ठेवण्यात आले. मग १९९६ साली ते ’भाभा अणुसंशोधनकेंद्रा’चे संचालक झाले. पुढे २००० ते २००९ ते भारतीय अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष राहिले. या नात्याने ते भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागाचे पदसिद्ध सचिवही होते. जानेवारी २०१० ते जानेवारी २०१५ दरम्यान ते, अणुऊर्जाखात्याच्या ’होमी भाभा अध्यासना’चे प्राध्यापक राहिले. मग जानेवारी २०१५ ते जानेवारी २०१७ दरम्यान ते ’इंडियन नॅशनल ऍकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग’च्या, ’सतीश धवन अभियांत्रिकी ख्याती’ अध्यासनाचे अधिकारी राहिले. सध्या ते ’ऑल इंडिया कौन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन’च्या ’ख्याती अध्यासना’चे प्राध्यापक आहेत.

काकोडकर यांनी १९६३ साली मुंबई विद्यापीठातून बी.ई. (यांत्रिकी अभियांत्रिक) पदवी प्राप्त केली आणि ’प्रायोगिक तणाव विश्लेषण’ विषयात १९६९ साली त्यांनी नॉटिंगहॅम विद्यापीठातून एम.एस.सी. पदवी प्राप्त केली [१].

त्यांच्या सर्व व्यावसायिक आयुष्यात ते भारतातील अणुऊर्जा कार्यक्रमाच्या विकासाकरता कार्यरत राहिले. भारतीय गरजांकरता, अणुभट्टी प्रणालीचा विकास करण्यावर त्यांचे लक्ष केंद्रित राहिले. आंतरराष्ट्रीय समुदायाने लादलेल्या निर्बंधांनी विचलित न होता ते; ’दाबित जड पाणी अणुभट्टी’च्या निरनिराळ्या प्रणाली विकसित करण्यात, ध्रुव अणुभट्टीच्या संकल्पनेपासून तर उभारणीपर्यंतच्या कार्यात, मद्रास अणुकेंद्राच्या दोन्ही एककांच्या पुनर्वसनात (यांपैकी एक एकक तर, विमंदक प्रवेशमुखाच्या बिघाडापश्चात कार्यनिवृत्त करावे लागेल की काय अशा अवस्थेप्रत पोहोचलेले होते), नव्या पिढीच्या उद्दिष्टांसह तसेच थोरियमवापर आणि तत्सम तंत्रप्रणालींच्या नव-आविष्कारी आराखड्यासह ’प्रगत जड पाणी अणुभट्टीची’ संकल्पना आणि विकास करण्यात; ते यशस्वी झाले.

आपल्या विस्तृत थोरियम संसाधनांचा उपयोग ऊर्जानिर्मितीकरता करून घेण्याखातर काकोडकरांच्या नेतृत्वाचे विशेष लक्ष राहिले. भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमाच्या तिसर्‍या पायरीला आकार देण्याकरता त्यांनी एक कृतीयोजना निर्माण केली. प्रचंड संभाव्य ऊर्जाक्षमता असलेल्या थोरियम संसाधनांच्या दोहनाचा उद्देश त्यामागे होता. केवळ वीजच नव्हे तर इतर ऊर्जास्वरूपांकरताही ते संस्रोत म्हणून थोरियमचाच विचार करत होते. त्याकरता त्यांनी त्यात, त्वरकचालित प्रणाली, उच्च तापमान अणुभट्ट्या, पदार्थ आणि पुनर्चक्रण तंत्रे इत्यादी नव्या तंत्रक्षेत्रांचा समावेश केलेला होता. आपल्या सर्व ऊर्जा गरजा भागवण्याकरता, अणुकार्यक्रमात थोरियम वापर करण्यासाठीच्या संसाधनांचा साठा करणे आणि जीवाश्मविरहित प्राथमिक इंधनविकासात काकोडकर आजही व्यग्र असतात.

भारताच्या व्यूहरचनात्मक कार्यक्रमाचे ते कळीचे सहयोगी राहिले आहेत. १८ मे १९७४ रोजी पोखरण येथे केलेल्या पहिल्या, यशस्वी, शांततामय प्रायोगिक अणुचाचणीस्फोटात गुंतलेल्या काही निवडक कार्यकर्त्यांपैकी ते एक आहेत. पुढे जाऊन त्यांनी ११ व १३ मे १९९८ रोजी पोखरण येथे केलेल्या चाचणी अणुस्फोटांच्या यशस्वी मालिकेतही त्यांनी कळीची भूमिका बजावलेली होती. काकोडकरांच्या नेतृत्वाखालीच भारताने अणुपाणबुडीच्या ऊर्जाप्रणालीचे तंत्रज्ञानही विकसित केले आहे.

युरेनियमच्या पुरवठ्यातील मर्यादांनिरपेक्षपणे भारताच्या अणुकार्यक्रमास काकोडकरांच्या अस्सल नेतृत्वाखाली लक्षणीय पुष्टी लाभलेली आहे. अनेक मुद्द्यांच्या पल्ल्याकडे त्यांनी लक्ष दिल्यामुळे हे घडून आलेले आहे. युरेनियम गवेषण आणि खनिकर्म कार्यांचे एकसूत्रीकरण, उपलब्ध युरेनियमसहित लक्षणीयरीत्या अधिक ऊर्जानिर्मिती साधण्याकरता अणुभट्टीच्या संरचनेची पुनर्रचना, आण्विक पुरवठा गटावरील निर्बंधांचे शिथिलीकरण ज्यामुळे आंतरराष्ट्रीय अणुव्यापाराची कवाडे खुली झाली, भारताच्या अणुकार्यक्रमाचा दुसरा टप्पा असलेल्या प्रारूप जलद ऊर्वरक अणुभट्टी (प्रोटोटाईप फास्ट ब्रिडर रिऍक्टर) प्रकल्पाची सुरूवात, संबंधित इंधन पुनर्चक्रण सुविधा उभारणी आणि आण्विक पुनर्चक्रण मंडळाची स्थापना; हे ते मुद्दे आहेत. परिणामी भारतीय अणुऊर्जानिर्मितीक्षमता जलदीने वर्धनास सिद्ध झाली. काकोडकरांच्या नेतृत्वाखालील सर्वसमावेशक आणि सशक्त कार्यक्रमाने भारतास, प्रगत अणुतंत्रज्ञान असलेला देश म्हणून विशेष स्थान प्राप्त करवून दिलेले आहे.

त्यांनी भारतास, युरोपीय अणुसंशोधन केंद्रात (सर्न येथे) निरीक्षक म्हणून स्थान प्राप्त करवून दिलेले आहे. आंतरराष्ट्रीय उष्माआण्विकी प्रायोगिक अणुभट्टीत सहभाग मिळवून दिलेला आहे. आण्विक व्यापाराकरता आण्विक पुरवठा गटावरील निर्बंधांतून अपवाद मिळवून दिलेला आहे. अणुऊर्जा, युरेनियम प्रग्रहण आणि अणुसंशोधनाच्या क्षेत्रात, अनेक आंतरराष्ट्रीय सहकारिता करारही त्यांनी केलेले आहेत.

भारतीय अणुऊर्जा कार्यक्रमाचा असा क्वचितच एखादा पैलू असेल ज्यावर काकोडकरांच्या नेतृत्वाचा प्रभाव पडलेला नाही. आपल्या लोकांच्या आयुष्यांच्या उत्तम गुणवत्तेकरता तंत्रज्ञान कामी लावण्यास काकोडकरांच्या नेतृत्वात बळ मिळालेले आहे. ऊर्जेव्यतिरिक्त अन्नावरील आणि शेतीउत्पादनांवरील प्रारणप्रक्रिया, विशेषतः डाळी आणि तेलबिया, आरोग्यनिगा विशेषतः कर्करोगासंबंधित, शहरी आणि ग्रामीण कचरा व्यवस्थापन आणि पाण्याचे निर्क्षारीकरण ही क्षेत्रे त्यात समाविष्ट आहेत.

मानव संसाधन विकासाकरताचे त्यांचे पुढाकारही दखलपात्र आहेत. विज्ञान शिक्षण आणि संशोधनाकरताच्या राष्ट्रीय संस्थेची अणुऊर्जाविभाग मुंबई विद्यापीठ येथे स्थापना. मूलभूत विज्ञानकेंद्राची स्थापना. होमी भाभा राष्ट्रीय संस्थेची स्थापना. यामुळे मानवसंसाधनविकासात नव्या लाटा निर्माण होणे अपेक्षित आहे. यामुळे अधिकाधिक प्रायोगिक सामर्थ्ये विकसित होतील. मूलभूत विज्ञान आणि तंत्रज्ञान विकासात पूल निर्माण होतील. भारताच्या बहुआयामी अणुऊर्जाकार्यक्रमास गती लाभेल. काकोडकरांच्या इतर कार्यांत, विशाखापट्टणम, हैदराबाद, कोलकाता आणि बंगळुरू येथे नवी संशोधनकेंद्रे उभारणे समाविष्ट आहे.

अनेक वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी, अणुभट्टी अभियांत्रिकी कार्यक्रमांकरता, विशेषज्ञ शास्त्रज्ञ व अभियंत्रज्ञांच्या समर्थ चमू तयार केलेल्या आहेत. त्यांनी त्यांच्या कार्यासंबंधितच्या निरनिराळ्या पैलूंवर सुमारे २५० शास्त्रीय शोधनिबंध आणि अहवाल समोर आणलेले आहेत.

डॉ. अनिल काकोडकर यांनी ’ध्रुव’ अणुभट्टीच्या संकल्पना आणि उभारणीत कळीची भूमिका बजावलेली आहे [२]. भारतीय दाबित जड पाणी अणुभट्टीकरताच्या असंख्य क्रांतिक प्रणालींच्या विकासात त्यांनी खूप सहभाग नोंदवलेला आहे. आपल्या ४५ वर्षांच्या कारकीर्दीदरम्यान त्यांनी अणुभट्टी कार्यक्रमाकरता, विशेषज्ञ शास्त्रज्ञ व तंत्रज्ञांची एक मोठीच फळी उभी केलेली आहे. आपल्या देशातील मर्यादित युरेनियमचे साठे लक्षात घेऊन, थोरियम वापराकरताचे तंत्रज्ञान विकसित करण्याचे ते समर्थन करत आलेले आहेत. औद्योगिक पातळीवरील थोरियम वापराचा अनुभव गोळा करण्यासाठी त्यांनी ’प्रगत जड पाणी अणुभट्टी’ही संकल्पित केली. तिच्या ऊर्जानिर्मितीपैकी, त्यापैकी दोन तृतियांश ऊर्जा थोरियमपासून प्राप्त करावी असा तिचा उद्देश आहे. संशोधन आणि विकास क्षेत्रातील नवव्या पंचवार्षिक योजनेची संकल्पना अंशतः त्यांनीच केलेली आहे. भाभा अणुसंशोधनकेंद्राच्या संघटनेत त्यांनी अनेक महत्त्वाचे संरचनात्मक बदल घडवलेले आहेत. त्यांच्याच कारकीर्दीत १९९८ चे पोखरण येथील चाचणी अणुस्फोट करण्यात आलेले होते. भाभा अणुसंशोधनकेंद्रातील त्यांच्याच संचालकत्वाखाली, भारत, आंतरराष्ट्रीय उष्माआण्विक प्रायोगिक अणुभट्टी प्रकल्पात सहभागी झाला होता. होमी भाभा राष्ट्रीय संस्थेच्या विद्यमाने डॉ. काकोडकर यांनी एक अद्वितीय असा पी.एच.डी.चा कार्यक्रम संकल्पित केलेला आहे. ’विद्यापीठ अनुदान आयोग आणि अणुऊर्जाविभाग सहयोग संस्था’ त्यांनी उभी केली. या संस्थेत अणुऊर्जाविभागाशी संबंधित संशोधन आणि विकास सुविधा विद्यापीठीय विद्यार्थ्यांनाही उपलब्ध करवून दिल्या जातील.

त्यांच्या अध्यक्षतेखालील एका समितीने एक तपशीलवार अहवाल तयार केला आहे. त्यात भारतीय प्रौद्योगिकी संस्थानांना जागतिक दर्जा प्राप्त करून देण्याकरता अधिकाधिक स्वायत्तता देण्याची शिफारस करण्यात आलेली आहे. या शिफारसींची अंमलबजावणी करणार्‍या आधिकारिक समितीचे अध्यक्षपदही त्यांनीच भूषवलेले आहे. राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थानांकरताच्या अशाच समितीचे नेतृत्वही त्यांनी केलेले आहे. राज्यातील उच्च शिक्षणाकरता महाराष्ट्र शासनाने नियुक्त केलेल्या समितीचे नेतृत्वही त्यांनी केलेले आहे. या समितीने महत्त्वाच्या शिफारशी केलेल्या आहेत, ज्यांमुळे राज्यातील उच्च शिक्षणाच्या दर्जात आमूलाग्र सुधारणा होतील.

त्यांच्या अध्यक्षपदाखालील आणखी एका समितीने भारतीय रेल्वे सुरक्षा सुधारांकरता सर्वसमावेशक शिफारशी केलेल्या आहेत. त्यांच्या नेतृत्वाखालील ’तंत्रज्ञान माहिती अनुमान आणि मूल्यांकन परिषदेच्या (टेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन फोरकास्ट अँड असेसमेंट कौन्सिलच्या)’ सर्वोच्च गटाने ’तंत्रदृष्टी-२०३५’ हे दस्त तयार केले आहे. माननीय पंतप्रधानांनी ३ जानेवारी २०१६ रोजी ते ’सायन्स काँग्रेस’मध्ये प्रकाशित केलेले आहे.

’अवकाशशास्त्र आणि अवकाशभौतिकीसाठीच्या आंतरविद्यापीठ केंद्राचेही (आयुका-आय.यू.सी.ए.ए.-इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ऍस्ट्रोनॉमी अँड ऍस्ट्रोफिजिक्सचे)’ ते २००६ ते २०१२ दरम्यान अध्यक्ष राहिलेले आहेत. नवी दिल्ली येथील आंतरविद्यापीठ त्वरक केंद्राच्या प्रशासकीय मंडळाचेही ते अध्यक्ष राहिलेले आहेत. मुंबई येथील भारतीय प्रौद्योगिकी संस्थानांच्या प्रशासकीय मंडळाचेही ते २००६ ते २०१५ दरम्यान अध्यक्ष राहिलेले आहेत.

डॉ. काकोडकर सध्या आपला वेळ प्रामुख्याने ऊर्जा, शिक्षण आणि सामाजिक विकासाच्या क्षेत्रांकरता व्यतित करत असतात. शहरी आणि ग्रामीण (सीटी अँड व्हिलेज - सिलेज) जीवनास जोडणार्‍या तंत्रसमर्थ शाश्वत विकासाकरता ज्ञानाधारित पर्यावरण निर्मितीच्या संकल्पनेचा ते हल्ली प्रचार करत असतात.

सौर ऊर्जा महामंडळाच्या सुरूवातीच्या काळात काकोडकर त्याचे अध्यक्ष राहिले आहेत. त्यांच्या कल्पनेनुसार खरा शाश्वत ऊर्जास्रोत सौरऊर्जाच असतो. आजच्या अतिसंपर्कित, परस्परावलंबी जगात, जागतिक सांख्यिकीच्या आधारे असे दिसते की, दरसाल, दरडोई सुमारे ५,००० एकके (किलोवॉट-अवर) वीज उपलब्ध झाल्यास, आपल्या देशात सन्माननीय मानवी विकास निर्देशांक गाठता येऊ शकेल. आपण हा आकडा साध्य करायला हवा. आपला वर्तमान दरसाल, दरडोई वीजवापर याहून सुमारे सातपट कमी आहे. शिवाय आपली लोकसंख्याही वाढत आहे. ती १.६ ते १.८ अब्ज लोकसंख्येवर स्थिरावेल असे दिसते. त्यामुळे या लोकसंख्येस पुरेसे ऊर्जास्रोत आणि तंत्र आपण हस्तगत केले पाहिजे. याकरता वर्तमान वीज वापर दहापट व्हावा लागेल.

दरसाल, दरडोई सुमारे ५,००० एकके वीज वापर (म्हणजेच संपूर्ण भारताकरता दरसाल ८,००० अब्ज एकके) गृहित धरल्यास; नवीनीकरण शक्य नसलेले ज्ञात ऊर्जास्रोत किती वर्षे पुरतील याचे आकडे पुढीलप्रमाणे आहेत. कोळसा-११.५ वर्षे, युरेनियमचा एकदाच वापर-०.३६ वर्षे, युरेनियमचा पुनर्चक्रित वापर-१८.५ वर्षे आणि थोरियम वापरल्यास-१७० हून अधिक वर्षे.

संपूर्ण भारताकरता दरसाल ८,००० अब्ज एकके वीज वापर गृहित धरल्यास; पुनर्नवीनीकरण शक्य असलेले ज्ञात ऊर्जास्रोत या आकड्याच्या कितीपट ऊर्जा पुरवू शकतील याचे आकडे पुढीलप्रमाणे आहेत. जलविद्युत-०.०७५, सौर-१.००० हून अधिक (मात्र याकरता भारतातील एकूण पडिक जमिनीच्या एक चतुर्थांश तरी जमीन आवश्यक असेल, जी अदमासे ४५,००० वर्ग किलोमीटर इतकी असेल), अन्य पुनर्नवीनीक्षम स्रोत-०.०२२५.

यावरून हे स्पष्टच आहे की, आपण अणुऊर्जा आणि सौरऊर्जा यांवरच उच्च प्राधान्याने लक्ष केंद्रित केले पाहिजे. निर्विवाद जमीनवापराची संधी उपलब्ध असेल तर, मोठ्या परिमाणावरील पडिक (शेतीयोग्य नसलेली) जमिनी सौरऊर्जेकरता वापरण्याची तंत्रे विकसित केली पाहिजेत. डॉ. काकोडकर हे आज देशातील सौरऊर्जाविकासात देशाचे नेतृत्व करत आहेत. त्यांच्या या प्रयासांना अपूर्व यश लाभो हीच सदिच्छा!

संदर्भः

१. डॉ. अनिल काकोडकर https://www.anilkakodkar.in/index.php/profile
२. बी.ए.आर.सी.चे नेते https://www.barc.gov.in/leaders/ 

(हा लेख म्हणजे संदर्भित संकेतस्थळांवरील इंग्रजी माहितीचा मी केलेला मराठी अनुवाद आहे. त्यात अनवधानाने काही चूक राहिली असेल तर अवश्य नजरेस आणावी. ती यथावकाश दुरुस्त केली जाईल.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: