२०२०-०८-२४

होमी नुसेरवानजी सेठना

 होमी नुसेरवानजी सेठना
(२४ ऑगस्ट १९२३, मृत्यूः ५ सप्टेंबर २०१०)

आज होमी सेठना ह्यांचा जन्मदिन आहे. 
त्यानिमित्ताने त्यांच्या स्मृतीस सादर प्रणाम!

होमी नुसेरवानजी सेठना हे भारतीय अणुवैज्ञानिक व रासायनिक अभियंते होते. भारताने पोखरण येथे १९७४ मध्ये अणुचाचणी घेतली तेव्हा सेठना भारतीय अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष होते. भारताच्या शांततामय अणुऊर्जा कार्यक्रमामधील अणुभट्ट्या आणि अणुऊर्जा संयंत्रे उभारण्याच्या कार्यातील सेठना हे प्रमुख व महत्त्वाचे वैज्ञानिक होते. 

होमी सेठना यांचा जन्म मुंबईला एका सधन पारशी कुटुंबात झाला. मेहरबाई व नुसेरवानजी ही त्यांच्या आईवडिलांची नावे आहेत. मुंबईच्या सेंट झेव्हिअर महाविद्यालयातून त्यांनी बी.एस्‌सी. व बी.बी.एस्‌सी.(टेक) या पदव्या संपादन केल्या. १९४६ मध्ये त्यांनी अमेरिकेतील ॲन आरबोर येथील मिशिगन विद्यापीठातून रासायनिक अभियांत्रिकीची एम्.एस्‌सी. पदवी मिळविली. त्यानंतर काही काळ त्यांनी इंग्लंडमध्ये इंपीरियल केमिकल इंडस्ट्री या कंपनीत अणुसंशोधन विभागात वैज्ञानिक म्हणून काम केले[१]. इंग्लंडमधील इंपिरिअल केमिकल इंडस्ट्रीज मध्ये काही काळ काम केल्यावर, स्वदेशात मातृभूमीच्या उद्धरणार्थ काम करण्यासाठी डॉ. भाभा ह्यांनी त्यांना भारतात बोलावले. १९४९ साली भाभांच्या ह्या सादेस प्रतिसाद देऊन ते भारतात परतले. डॉ. भाभांनी त्यांना केरळातील अल्वाये प्रकल्पाचे प्रमुख नेमले[२]. ही भारतातील आण्विक पदार्थांच्या गवेषणाची सुरूवात होती.

केरळमधील अल्वाये येथे मोनॅझाइट वाळूतून विरल मृत्तिका नावाने ओळखण्यात येणारी धातुरूप मूलद्रव्ये अलग करण्यासाठी थोरियम (धातू) निष्कर्षण संयंत्र उभारण्यात आले. या उभारणीमध्ये सर्व तांत्रिक जबाबदारी सेठना यांच्याकडे सोपविण्यात आली होती. अल्वायेच्या समुद्र किनार्‍यावरील वाळूवर प्रक्रिया करून विरल मृदा आणि थोरियम-युरेनियम संहत खनिज निराळे करण्याची प्रक्रिया ह्या संयंत्रात केली जाते.

नंतर १९५५ मध्ये त्यांनी ट्रॉम्बे येथे थोरियम नायट्रेट आणि युरेनियमचे संहत खनिज निर्माण करणारे संयंत्र स्थापन केले. त्यांच्याच देखरेखीखाली १९५९ मध्ये, अणुकेंद्रकीय दर्जाच्या शुद्धतेचे युरेनियम निर्माण करण्यासाठी, धात्विक युरेनियम संयंत्र सुरू करण्यात आले. ह्याच कारखान्यात निर्माण झालेले युरेनियम पुढे ’सायरस’ अणुभट्टीत इंधन म्हणून वापरण्यात आले. ह्या संयंत्रास कच्चा माल पुरवण्याकरता, टाटानगरनजीक जादुगुडा येथे, निम्न गुणवत्तेच्या युरेनियम खनिजावर प्रक्रिया करण्यासाठी ’युरेनियम मिल’ कार्यान्वित करण्यात आली. ह्याच संयंत्राने मग संशोधन आणि वीज निर्मितीकरताच्या अणुभट्ट्यांना इंधन पुरविले. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मग युरेनियमच्या समृद्धिकरणाचा (एन्रिचमेंटचा) अभ्यास करण्यासाठीची प्राथमिक पावले उचलण्यात आली. जड पाणी निर्मिती प्रक्रिया आणि इतर समस्थानिकांच्या पृथक्करणाच्या विकासकामांना त्यांनी सुरूवात केली. प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या त्यांच्या ख्यातीमुळे, १९५६ ते १९५८ ह्या ’सायरस’ अणुभट्टी उभारणीच्या काळात, त्यांना त्या प्रकल्पाचे ’व्यवस्थापक’ नियुक्त करण्यात आलेले होते. ते संचालक असतांनाच ’ध्रुव’ अणुभट्टीची उभारणीही सुरू करण्यात आली होती.

’भारतात अणुऊर्जेच्या शांततामय विकासाकरता[३]’ नोव्हेंबर १९५४ मध्ये, नवी दिल्ली येथे आयोजित एका परिषदेत, सेठना ह्यांनी, ’युरेनियम व थोरियम निष्कर्षण आणि शुद्धीकरण’ ह्या शीर्षकाचा एक शोधनिबंध वाचला. १९४८ मध्ये अणुऊर्जा आयोगाची स्थापना झाल्यापासूनच्या गेल्या पाच वर्षांत फारशी प्रगती झाली नाही अशा प्रकारच्या, विस्तृत प्रमाणात होत असलेल्या टीकेस उत्तर म्हणून ही परिषद आयोजण्यात आलेली होती. भारतीय विरल मृदा पेढी त्यावेळी दरसाल १,५०० टन मोनाझाईटवर प्रक्रिया करत होती. शिवाय ही क्षमता दुप्पट करणार्‍या योजनेची तरतूदही होती. उपस्थित प्रतिनिधींमध्ये असलेले अनेक उत्कृष्ट शास्त्रज्ञ, उद्योजक आणि मंत्र्यांच्या लक्षात आले की, अणुऊर्जेच्या अभिनव क्षेत्रातील भावी तंत्र आणि विज्ञान विकासाची ही केवळ एक झलक आहे.

सेठना ह्यांनी जिनिव्हा येथील ’अणुऊर्जेच्या शांततामय वापरावरील’ १९५५ सालच्या पहिल्या परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व केले. १९५८ च्या दुसर्‍या जिनिव्हा परिषदेचे ते उपसरसचिव होते. आज ज्याला आपण भाभा अणुसंशोधन केंद्र म्हणतो त्या ऍटोमिक एनर्जी एस्टॅब्लिशमेंट मध्ये ते १९५९ साली मुख्य वैज्ञानिक अधिकारी म्हणून रुजू झाले.

मुंबई येथे प्लुटोनियम संयंत्र उभारण्याचा निर्णय भारताने घेतला होता. या संयंत्राचे पूर्ण अभिकल्प भारतीय वैज्ञानिकांनी केले. तसेच हे संयंत्र उभारण्याचे सर्व कामही भारतीय अभियंत्यांनी केले. होमी सेठना यांनी प्रकल्प अभियंता म्हणून या सर्व कामांवर देखरेख ठेवली होती. हा प्रकल्प १९६४ मध्ये सुरू झाला. त्याआधी १९५६-५८ दरम्यान ते, कॅनडा-इंडिया रिॲक्टर ’सायरस’ ह्या ४० मेगॅवॉ क्षमतेच्या अणुभट्टीचे प्रकल्प व्यवस्थापक होते. ’अप्सरा’ अणुभट्टीचे अभिकल्पन करणार्‍या समितीचेही ते सदस्य होते. त्या तरणतलाव प्रकारची ती भारतातील पहिलीच अणुभट्टी होती. भारतातील पहिल्या प्ल्युटोनियम कारखान्याचे अभिकल्पन आणि उभारणीही त्यांच्याच नेतृत्वाखाली करण्यात आली.

१९६६ मध्ये होमी भाभांच्या आकस्मिक निधनानंतर सेठना भाभा अणुसंशोधन केंद्राचे संचालक झाले. १९६६-७२ दरम्यान ते या पदावर होते. अणुऊर्जा विभागाशी निगडित सर्व विषयांवर संशोधन करणाऱ्या या केंद्राची त्यांच्या काळात चांगली भरभराट झाली. १९७१ मध्ये विक्रम साराभाईंच्या आकस्मिक निधनानंतर ते अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष झाले. १९८३ पर्यंत ते या पदावर होते. या काळात भारतातच तयार झालेल्या सहा अणुभट्ट्यांमध्ये वीजनिर्मिती सुरू झाली. अणुऊर्जा विभाग व संरक्षण विभाग यांमध्ये समन्वय साधण्याचे काम सेठना यांनी जबाबदारीने व गोपनीयता बाळगून उत्तम रीतीने केले. १८ मे १९७४ रोजी भारतात पोखरण येथे प्रोजेक्ट स्माइलिंग बुद्धा, ही अणुकेंद्रीय स्फोटाची पहिली शांततामय चाचणी घेतली गेली. या चाचणीमागील मार्गदर्शक प्रेरणा, सेठना यांची होती. १९७४ मधील शांततामय अणुविस्फोट प्रकल्पातील त्यांच्या ह्या सहभागास खूप प्रसिद्धी मिळाली. ह्या सहभागाखातर, त्यांना १९७५ साली पद्मविभूषण सन्मान देऊन गौरवण्यात आले.

पोखरण-१ चाचणीच्या दिवशी सेठना ह्यांनी आपल्या सहकार्‍यांना विचारले, “जर ही चाचणी यशस्वी झाली नाही तर कुणाचा बळी दिला जाईल?[४]” त्यावर अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अय्यंगार उत्तरले, “जर भौतिकशास्त्राचे नियम अपेक्षित कार्य करतील, तर कुणाचाही बळी दिला जाणार नाही!” ह्या उत्तरातूनच भारतीय शास्त्रज्ञांचा आत्मविश्वास व्यक्त होतो. चाचणी यशस्वी झाली. कुणाचाही बळी देण्याचा प्रश्नच उद्भवला नाही. मग सेठना ह्यांनी सांकेतिक परिभाषेत तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी ह्यांना कळवले की, ’बुद्ध हसला’.

पोखरण-१ नंतर कॅनडाने तारापूर प्रकल्पास समृद्ध युरेनियम इंधन पुरवण्यास नकार दिला. त्यावेळी समृद्ध युरेनियम इंधनास पर्याय म्हणून सेठना मिश्र प्राणिल इंधना[५]च्या विकासाचे कामही करत होते. समृद्ध युरेनियम मिळवण्यासाठी अमेरिकेशी करार करण्यास आवश्यक म्हणून, अण्वस्त्रप्रसारबंदी करार करण्याच्या ते विरुद्ध होते. देशास कायमस्वरूपी बंधनात जखडणारा हा करार होता. पक्षपाती होता. अणुऊर्जाआयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर म्हणतात[२], “संकटाच्या काळात सेठनांनी भारतास साहसी आणि कणखर नेतृत्व दिले. तारापूरकरता पर्यायी इंधन शोधण्यास त्यांनी देशास तयार केले. समृद्ध युरेनियमचा पुरवठा करण्यास फ्रेंच पुढे आले. तेही आले नसते तरी, मिश्र प्राणिल इंधनावर तारापूर अणुभट्टी चालवण्याची तयारी सेठना ह्यांनी आधीच केलेली होती. आपल्याला फ्रेंचांकडून समृद्ध युरेनियम तर मिळालेच, शिवाय आपण मिश्र प्राणिल इंधनही विकसित केले.”

अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अय्यंगार म्हणतात[२], “सेठना ह्यांनी त्यांच्या पातळीवर  अणुविज्ञानात, भारतीय तंत्रज्ञानाची भर घालण्याची हिंमत दाखवली. कोणतीही गोष्ट पहिल्यांदा करण्यास ते घाबरत नसत. स्वावलंबनावर त्यांचा विश्वास होता. त्यांनी कुणाकडूनही पक्षपाताची अपेक्षा ठेवली नाही. ज्या क्षेत्रांत भारतास माहिती आणि तंत्रज्ञान नाकारण्यात आलेले होते, त्या क्षेत्रात त्यांनी पुढाकार घेतला. त्यांनी १९६४ सालीच प्ल्युटोनियम तयार केले होते. ते राजकारणी नेत्यांना घाबरत नसत. ते एक थोर भारतीय तंत्रशास्त्री होते आणि आयुष्यभर त्यांनी भारताची सेवा केली.”

अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष म्हणून होमी भाभांना १९४८ ते १९६६ असा १८ वर्षांचा कार्यकाळ लाभला. डॉ. सेठनांना त्यांच्या नंतर दुसर्‍या दीर्घ लांबीचा कार्यकाळ लाभला. १९७२ ते १९८३ ह्या ११ वर्षांच्या काळात ते अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष राहिले. भारतीय अणुऊर्जा कार्यक्रमाच्या अनेक पैलूंचे ते पथप्रदर्शक राहिले. संपूर्ण अणुइंधनचक्रातील आण्विक पदार्थांच्या विकासात आणि उत्पादनात त्यांनी मोलाचे कार्य केले.

निवृत्त झाल्यानंतरही त्यांनी अणुविभागाला सल्ला देऊन मार्गदर्शन केले. अवकाशप्राप्तीनंतर त्यांनी आन्ध्रा व्हॅली पॉवर सप्लाय कंपनी लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून जबाबदारी पत्करली. तसेच ते नॉर्थ-ईस्टर्न युनिव्हर्सिटीचे कुलपतीही झाले. सेठना यांनी अनेक देशी व विदेशी संस्था-संघटनांमध्ये विविध पदांवरही काम केले. औद्योगिक अणुऊर्जेसाठी असलेली वैज्ञानिक सल्लागार समिती, इंटरनॅशनल ॲटॉमिक एंजिनिअरिंग एजन्सी, केंद्रीय मंत्रिमंडळाची सायन्स ॲड्व्हायझरी कमिटी इत्यादींचे सेठना सदस्य होते. इंडियन ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस, इंडियन नॅशनल सायन्स ॲकॅडेमी, इन्स्टिट्यूशन ऑफ एंजिनियर्स (इंडिया), इंडियन सायन्स काँग्रेस (१९७६), महाराष्ट्र ॲकॅडेमी ऑफ एंजिनियर्स (१९७६), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल एंजिनियर्स, रॉयल स्वीडिश ॲकॅडेमी ऑफ एंजिनियर्स (स्वीडन) वगैरे संस्थांचे सेठना अध्यक्ष होते.

पोखरण-१ च्या कठीण काळात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणार्‍या आणि व्यवसायाने डॉक्टर असलेल्या त्यांच्या पत्नी गुल, ह्या जुलै २०१० मध्येच त्यांना सोडून गेल्या[४]. नंतर २०१० सालीच रविवार तारीख ५ सप्टेंबर रोजी, डॉ. होमी नुसेरवानजी सेठना प्रदीर्घ आजारपणानंतर फुफ्फुसाच्या विकाराने निवर्तले[६]. मृत्यूसमयी त्यांचे वय ८७ वर्षाचे होते. त्यांचे दीर्घकाळचे सहकारी असलेले डॉ. मेहता ह्यांनी ’द हिंदू’ ह्या वृत्तसंस्थेस असे सांगितले की, ते ’लंग्ज फायब्रोसिस’ने आजारी होते. “दोन वर्षांपासून अविरतपणे त्यांना प्राणवायू द्यावा लागत असे. त्यामुळे ते चाकाच्या खुर्चीस खिळून असत. त्यांना बाहेर जाता येत नसे. तरीही ते घरूनच काम करत असत.”.

दीर्घकाळ सेठना ह्यांचे सहकारी राहिलेले फरिदुद्दिन म्हणाले[३], ’ते थोर नेते होते. त्यांनी सहकार्‍यांना विस्तृत प्रमाणात अधिकार सोपवले, त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांच्या कामांकरता उचित श्रेय व मान्यताही दिली. केवळ कामे होण्यात आणि लक्ष्ये साध्य करण्यातच त्यांना स्वारस्य असे. त्यामुळे कामे भराभर संपन्न होत असत’.

१९८० ते १९९० दरम्यान कच्छ पट्ट्याच्या हरितीकरणात त्यांनी रुची घेतली होती. मेहता सांगतात की, “त्यांनी जोजोबा बिया रुजवण्याकरता स्थानिक लोकांच्या आणि बागकामतज्ञ ह्यांच्या सहकारी संस्था स्थापन केल्या होत्या. ते सरळ साधे आणि कणखर व्यक्ती होते. त्यांना ऑपेरा आवडत असे. लुसिआनो पावारोट्टी हे त्यांचे आवडते व्यक्ती होते.”

सेठना यांना पुढील अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरांवरील मानसन्मान मिळाले होते: पद्मश्री (१९५९), अभियांत्रिकीमधील शांतिस्वरूप भटनागर पारितोषिक (१९६०), पद्मभूषण (१९६६), मिशिगन विद्यापीठाच्या (स्थापना १८१७) दीडशेव्या स्थापना दिनानिमित्तचा पुरस्कार (१९६७), सर वॉल्टर पुसकी पुरस्कार (१९७१), कोलकात्याच्या एशियाटिक सोसायटीचे सर विल्यम जेम्स मेमोरियल पदक (१९७४), पद्मविभूषण व सर देवप्रसाद सरबंदीकर सुवर्णपदक (१९७५), दुर्गाप्रसाद खैतान पदक (१९८३), विश्व गुर्जरी पुरस्कार (१९८५), पंडित जवाहरलाल नेहरू पुरस्कार (१९८९) वगैरे. यांशिवाय त्यांना भारतातील बारा विद्यापीठांनी आणि संस्थांनी डी.एस्‌सी. व डी.लिट्. यांसारख्या सन्माननीय पदव्या दिल्या आहेत. उदा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची डी.एस्‌सी. (१९७३), मुंबई विद्यापीठाची एल्.एल्.डी. (१९७४), हैदराबादच्या जवाहरलाल नेहरू टेक्नॉलॉजिकल विद्यापीठाची डॉक्टर इन टेक्नॉलॉजी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (मुंबई) या संस्थेची डी.एस्‌सी. इत्यादी.

होमी भाभा वगळता इतर भारतीय अणुशास्त्रज्ञांची नावेही सामान्य भारतीयांना माहीत नसतात. मग त्यांनी केलेल्या अलौकिक कर्तबगारीची माहिती त्यांना होणार तरी कशी. ती व्हावी. देशाच्या आज दिसणार्‍या प्रगतीचे खरेखुरे आधारस्तंभ कोण आहेत हे देशवासियांना माहीत असावे, ह्याकरता होमी सेठना ह्यांच्या कार्यांच्या साठा उत्तरांची कहाणी, मी इथे पाचा उत्तरांत सुफळ संपूर्ण करत आहे.

हे सारे प्रेरणादायक तपशील वाचून नव्या पिढीचे शास्त्रज्ञ कार्यप्रवण व्हावेत, देशोन्नतीकरता सर्वार्थाने सिद्ध व्हावेत, समर्थ व्हावेत हीच सदिच्छा!

होमी सेठना 
(शार्दूलविक्रीडित)

आला तो परतून सिद्ध करण्या देशात संशोधने
भाभा त्यास नियोजती अणुपदार्थांच्या तयारीमधे ।
तो थोरीयम शोधण्यास झटला वाळूत अल्वायच्या
होता शोधित कष्टला खनिज जे लागे अणू वेधण्या ॥ १ ॥ 

जेव्हा शोधत ते प्ल्युटोनियमला होते जगी सर्वही
ते निर्माण करे इथेच तव तो संयंत्र निर्मूनही ।
स्थापी तो अणुभट्टि ’सायरस’ ही, भट्टीतली इंधने
आणी तो, खणुनी युरेनियमला जादूगुडा येथुनं ॥ २ ॥ 

देशा लागतसे विदा[७] विदलने[८] होती अणूंची कशी
तेव्हा तो करि चाचणी उमगण्या इंगीतं स्फोटातली ।
कर्ते देश जगातले मिळुन ते झाले भये शंकित
रोखीती रसदा युरेनियमच्या, निर्मे तया तो इथं ॥ ३ ॥ 

नेई देश समर्थतेप्रत जसा, ऊर्जेचिया अंगणी
तैसा धाक भरे, करून जगती स्फोटा अणूच्या रणी[९]
मोलाचा करुनी प्रयास सगळा तो दीपवी ह्या जगा
होमी दीपक, सेठना कुळ करे देशा अलंकार या ॥ ४ ॥ 

नरेंद्र गोळे २०२००८२४



[१] होमी नुसेरवानजी सेठना - ठाकूर, अ. ना. https://vishwakosh.marathi.gov.in/25057/

[२] सेठना- द मॅन हू डेअर्ड टू ड्रीम, मीना मेनन व टी.एस.सुब्रमण्यम, द हिंदू, ७ सप्टेंबर २०१०
https://www.thehindu.com/news/national/Sethna-the-man-who-dared-to-dream/article15905378.ece#:~:text=life%20in%20India.%E2%80%9D-,Dr.,the%20entire%20nuclear%20fuel%20cycle

[३] होमी नसरवानजी सेठना, के.एस.पार्थसारथी, करंट सायन्स वॉल्यूम-१०० नं.८, २५ एप्रिल २०११

[४] होमी सेठना न्युक्लिअर लिजन्ड पासेस अवे
       https://parsikhabar.net/science/homi-sethna-nuclear-legend-passes-away/2643/

[५]  एम.ओ.एक्स. फ्युएल - मिक्स्ड ऑक्साईड फ्युएल.
    विदलनशील अशा अनेक पदार्थांच्या प्राणिलांचे मिश्रण असलेले इंधन.

[६] Dr.Homi N. Sethna Former Director, BARC during (1966-1972)
     http://www.barc.gov.in/leaders/sethna.html

[७] डाटा- माहिती, आवश्यक ती जाण.

[८] फिजन- म्हणजे विदलन. अणूचे अनेक दलांत होणारे विभाजन.

[९] १८ मे १९७४ रोजी पोखरण येथे भारताने पहिला शांततामय स्फोट केला. ’बुद्ध हसला’.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: