२०२०-०५-०९

ज्ञान अन्वेषण आणि भारत

ज्ञान, अन्वेषण आणि भारत

नरेंद्र गोळे
अवकाशप्राप्त अभियंता, भाभा अणुसंशोधन केंद्र आणि संलग्न अध्यापक, विद्याप्रसारक मंडळ ठाणे

भारताच्या विकासार्थ युवा अभियंते (यंग इंजिनिअर्स फॉर डेव्हलपिंग इंडिया)
ह्या मंचामार्फत ’अभियंत्रज्ञ दिना’ निमित्त विवेकानंद सेवा मंडळाच्या
शिक्षण, अन्वेषण आणि निर्माण केंद्राच्या (सेंटर फॉर लर्निंग, इनोव्हेशन अँड निर्माण)
विद्यमाने, आयोजित व्याख्यान

अभियंत्रज्ञदिनाचे यावर्षीचे सूत्रः ज्ञानयुगातील अभियांत्रिकी आव्हाने

अनुक्रम

१. सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या १५ सप्टें. १८६०
२. अभियांत्रिकी कौशल्यातील प्रगती इसवीसन १४४८
३. अवकाशवेधाचे तंत्रज्ञान इसवीसन १७२७
४. सर्वेक्षणातील सुयश इसवीसन १८५६
५. तीन पायर्‍यांचा अणुकार्यक्रम इसवीसन १९४८

सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या

१५ सप्टेंबर २०१८ हा दिवस म्हणजेच सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या ह्यांचा १५८ वा जन्मदिन आहे. सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या ह्यांच्या नावाने सुरू झालेल्या ’विश्वेश्वरय्या प्रादेशिक अभियांत्रिकी विद्यालय, नागपूर’ ह्या संस्थेतून मी विद्युत अभियंत्रज्ञ झालेलो असल्याने, त्यांच्या जन्मदिनानिमित्त बोलण्याची संधी मला लाभत आहे ही फारच आनंदाची गोष्ट आहे. मला नेहमीच भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्यांबाबत आपुलकी वाटत आलेली आहे. ह्याचे आणखीही एक कारण आहे. ते म्हणजे माझे पणजोबा नारायण गोडबोले, विश्वेश्वरय्यांसोबतच पुण्याच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरींगमधून इंजिनिअर झालेले होते.

सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्यांचा जन्म १५ सप्टेंबर १८६० रोजी चिकबल्लापूर, म्हैसूर येथे झाला होता. त्यांचा जन्मदिन अभियंत्रज्ञदिन म्हणून पाळला जातो. त्यांची मातृभाषा तेलुगू आहे. पुढे विश्वेश्वरय्यांनी प्रथम तत्कालीन म्हैसूर संस्थानाकरता आणि नंतर भारत देशाकरता अत्यंत महत्त्वाची अनेक पदे भूषवली. देशांतर्गत अनेक महत्त्वाच्या अभियांत्रिकी प्रकल्पांची संकल्पना रुजवली आणि ते देशाच्या सर्वोच्च आदरास पात्र ठरले. ते विख्यात अभियंत्रज्ञ आणि मुत्सद्दी होते. आधुनिक भारताच्या निर्माणात त्यांनी अत्यंत कळीची भूमिका बजावलेली आहे. ते कृष्णराजसागर धरण आणि प्रसिद्ध वृंदावन उद्यानाचे शिल्पकार होते. धरणांच्या दरवाजांकरता त्यांनी प्रथमच पोलादी झडपांचा उपयोग केला. हल्लीच्या पाकिस्तानातील सुक्कूर गावास सिंधू नदीचे पाणी पुरविण्याची योजना त्यांनी केली.

भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या (जन्मः  १५ सप्टेंबर १८६०, मृत्यूः १४ एप्रिल १९६२ )

१९१२ ते १९१८ दरम्यान ते म्हैसूर संस्थानचे दिवाण होते. त्या काळात त्यांनी संस्थानात चंदनतेल आणि चर्म वस्तूंच्या उद्योगांची निर्मिती केली. भद्रावती पोलाद प्रकल्प सुरू केला. तिरुमला आणि तिरुपती दरम्यानचा रस्ता त्यांनी निर्माण केला. १९०६-०७ दरम्यान प्रतिनियुक्तीवर एडनमध्ये असतांना त्यांनी एडन शहराची पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण योजना निर्माण केली. निजामाकरता काम करत असता, हैदराबाद शहराकरता त्यांनी पूरनियंत्रण योजना राबवली तर विशाखापट्टणम शहरास समुद्री क्षरणापासून संरक्षण करणारी योजना दिली. १९५५ मध्ये त्यांना भारतरत्न पदवी दिली गेली. पंचम जॉर्ज बादशहाने त्यांना ब्रिटिश भारतीय साम्राज्याचा नाईटहूडही दिलेला होता. ते शंभर वर्षांचे झाले तेव्हा त्यांच्या हयातीतच, भारत सरकारने त्यांचे नावे पोस्टाचे तिकीट काढले. वयाच्या १०१ व्या वर्षी १४ एप्रिल १९६२ रोजी त्यांना बंगळुरू येथे देवाज्ञा झाली. भारतातील अग्रगण्य अभियंत्यांत मानाचे स्थान असलेल्या ह्या आधुनिक भारताच्या आद्य अभियंत्यास अभियंत्रज्ञदिनी आदरपूर्वक प्रणिपात!

अभियांत्रिकी कौशल्यांतील प्रगती

मेवाड नरेश राणा कुंभा ह्यांनी इ.स. १४४८ मध्ये, मोहंमद खिलजीच्या नेतृत्वाखालील  माळवा आणि गुजरातच्या संयुक्त सैन्यावर मिळवलेला विजय साजरा करण्यासाठी हा विजयस्तंभ उभारला. चितौड गडावर गोमुखाकडून विजयस्तंभाकडे जातांना, विजयस्तंभ असा दिसतो.

विजयस्तंभाचे प्रवेशद्वाराकडून, म्हणजेच गोमुखाकडून दिसणारे हे देखावे. मधला जरा जवळून काढलेला असून, त्यात फक्त वरचे सहा मजलेच दिसत आहेत. म्हणूनच तो जरा जास्त तपशीलाने दिसतो आहे. दुसर्‍या मजल्याच्या छतावर दोन्ही बाजूंना दिसणारे सिंह पाहून ठेवा. दुसर्‍या मजल्यावर गेल्यानंतर, आतून बाहेर पाहिले असता, आधीच्या चित्रात आपल्या उजव्या हाताला दिसणारा सिंह असा विशालकाय दिसू लागतो. सुमारे दोन टन वजनाचा असावा. जरा वरच्या बाजूच्या नक्षीकडे पाहा. पुढल्या चित्रात आपण वरच पाहणार आहोत थेट. छत आणि त्याला आधार असणारा स्तंभ खाली कोपर्‍यात दिसत आहे. छताच्या कलाकुसरीतील विस्मयकारक भौमितिक अचुकता, आपल्या संस्कृतीतील, इसवीसनाच्या १५-व्या शतकातील, नेमकेपणाचे खरेखुरे आणि जितेजागते निदर्शक आहे. टनावारी वजनाचे दगड कोरून, कातून, १२० फूट उंच चढवायचे, वळंब्यात नीट आराखड्याबरहुकूम बसवायचे आणि सुबक सुंदर कक्षाचे चिरंतन स्मारक निर्माण करायचे हे सर्व अभिमानास्पद आहे.  छताच्या पत्थरावरील कलेचे समभुज, सममित, समांतर, सौष्ठव नजरेत भरणारे आहे.




अवकाशवेधाचे तंत्रज्ञानः महाराजा सवाई जयसिंग (द्वितीय)
(जन्मः नोव्हेंबर ३, १६८८, मृत्यूः सप्टेंबर २१, १७४३)

उंच अवकाशातून राजस्थान पाहत पाहत खाली येत गेल्यास, सर्वात वयस्कर अशा अरवली पर्वतांच्या बेलाग कड्यावर वसलेले अंबर (amber, आम्बेर, आमेर) व जयगड किल्ले दृष्टीत भरू लागतात. तत्कालीन आसपासच्या परिसरावर राज्य करण्यास योग्य अशा प्रकारे उंचावर, अंबरात वसवलेला डोंगरी किल्ला तो “अंबर”. तीच तत्कालीन अंबर साम्राज्याची राजधानी होती. अंबर राज्यात सूर्यवंशी राजपूत असलेल्या कच्छवाह घराण्याचे राज्य होते. १६९९ मधे महाराज बिशनसिंग यांचा देहांत झाला. त्यावेळी त्यांचे पुत्र महाराज जयसिंग, जे त्यावेळी केवळ ११ वर्षे वयाचे होते, ते अंबरच्या गादीवर बसले. “खेलना” इथली लढाई जिंकल्याखातर बक्षिसी म्हणून औरंगजेबाने त्यांना “सवाई” हा किताब दिला म्हणून ते सवाई जयसिंग म्हणूनही ओळखले जातात. मेवाडच्या राजांना आता कुणाचीही भीती उरलेली नसल्याने उंच अंबरातील राजधानी मैदानावर उतरवायची इच्छा झाली आणि जयपूर जन्मले. घड्याळाच्या विरुद्ध दिशेने १६ अंश फिरवून हा नकाशा तयार केलेला आहे.
जयनगर (जयपूर) नगर वसवणे ही जयसिंगांची सर्वात महत्त्वाची कामगिरी होती. विद्याधर भट्टाचार्य नावाच्या बंगाली स्थापत्यकलानिपुण शिल्पशास्त्र्याच्या नियोजनाखाली १७२७ मधे पायाभरणी करून
नव्या राजधानीचे काम सुरू झाले. १७३३ मधे संपूर्ण नगर सज्ज होऊन, कच्छवाहांची राजधानी अंबर मधून जयनगरात स्थलांतरित करण्यात आली.

केवळ सहा वर्षांत जयपूरसारखे नियोजनबद्ध नगर राहण्यायोग्य तयार करणे, ही आजच्या निकषांनीही अतुलनीय कामगिरीच ठरावी. ३,००० वर्षांपूर्वीच्या पौराणिक संस्कृतींच्या शोधात सापडलेल्या शहरांप्रमाणे, संस्कृत शिल्पसूत्रांबरहुकूम, नगरनियोजन केलेल्या औरस-चौरस संरचनेत जयपूर नगर वसवलेले आहे आणि त्यात समाविष्ट आहे ’यंत्रमंदिर’. भारतीय अभियांत्रिकीचा एकमेवाद्वितीय वारसा.

शाही प्रस्थानास मुहूर्त शोधण्याकरता झालेल्या कालनिश्चितीबाबतच्या चर्चेनंतर महाराज जयसिंग यांना अवकाशवेधांच्या अभ्यासाची गरज भासली. अशा प्रकारच्या अभ्यासास प्रोत्साहन देऊन त्यांनी पाच अवकाशनिरीक्षण वेधशाळा प्रस्थापित केल्या. दिल्ली, मथुरा (त्यांच्या आग्रा प्रांताची राजधानी), बनारस, उज्जैन (त्यांच्या माळवा प्रांताची राजधानी) आणि जयपूर येथे त्या वेधशाळा स्थापन केलेल्या होत्या. त्यांना “यंत्रमंदिर” म्हणून ओळखले जात असे. त्याचा अपभ्रंश होत होत त्यांना हल्ली “जंतर-मंतर” म्हणून ओळखले जाते. त्यापैकी फक्त जयपूरची वेधशाळा अजूनही पूर्णपणे कार्यरत आहे.

हिंदू व मुस्लीम अवकाशवेध शास्त्रांवर आधारित बांधलेल्या या वेधशाळा ग्रहणे व तत्सम अवकाशीय घटनांचे पूर्वभाकीत करू शकत. त्यांनी युरोपातून पाचारण केलेले ख्रिस्ती अवकाशशास्त्रज्ञ वापरत असत त्यांपेक्षाही, या वेधशाळांतील उपकरणे व तंत्रे जास्त प्रगत आणि उच्च प्रतीची होती.

राजप्रासादाच्या समोरच आहे जंतरमंतर म्हणजेच “यंत्रमंदिर”. आत प्रवेश करताच मार्गदर्शकाने लघुसम्राटयंत्रावर तत्कालीन वेळ, सूर्यकिरणांमुळे मधल्या भिंतीच्या वक्राकार-संगमरवरी-उताण्या-कमानींवर पडणार्‍या सावलीच्या स्थानावरून, कशी सांगता येते ते कृतीसह दाखवून दिले. कमानींवर खोदलेल्या मापनरेषा, २० सेकंदापर्यंतच्या कमीतकमी फरकाने, वेळ वर्तवू शकत होत्या. तिथली अनेकविध यंत्रे कशी वापरायची ते शिकण्याकरता तिथे राहून संशोधन करणारे विद्यार्थी आम्ही पाहिले.

त्यांच्या पासंगास पुरेल एवढाही वेळ आमच्यापाशी नव्हता. तरीही आपल्या संस्कृतिक समृद्धतेच्या वारशाचे भरभक्कम पुरावे पाहून मन भरून आले. असलेच काहीतरी देदिप्यमान आपल्यालाही करता यावे अशी उमेद जागली. याच्यासारख्या स्थळांच्या पर्यटनाने साधण्यासारखे यापरता जास्त काय असू शकेल.

सर्वेक्षणातील सुयश

१७१५ साली चीनमधील किंग साम्राज्याने हिमालयातील आपल्या भूभागाचे नकाशांकन करून ह्या शिखरास कोमोलुंगुमा संबोधले. १८०२ मध्ये ब्रिटिशांनी, स्थलनिश्चिती, उंचीनिश्चिती आणि जगातील सर्वोच्च पर्वतावरील शिखरांचे नामकरण करण्यासाठी भारताचा ’ग्रेट ट्रिग्नॉमेट्रिक सर्व्हे’ हाती घेतला. दक्षिण भारतापासून सुरूवात करून ते ’थिओडोलाईट’ नावाच्या ५०० किलो वजनाच्या भव्य यंत्राने सर्वेक्षण करत होते. त्या यंत्राची हालचाल करण्यास १२ माणसे लागत. त्याद्वारे अचूक उंचीमापने शक्य होत असत.

१८३० साली ते हिमालयाच्या पायथ्याशी पोहोचले. मात्र आक्रमणाच्या भीतीने नेपाळने त्यांना देशात शिरण्यास मनाई केली. ब्रिटिशांनी तराईच्या जंगलातून निरीक्षणे घेतली. १८४७ मध्ये अँड्र्यू वॉघ, सर्व्हेयर जनरल ऑफ इंडिया ह्यांनी पूर्व हिमालयातून अनेक निरीक्षणे घेतली. तेव्हा कांचनगंगा सर्वोच्च शिखर मानले जात असे. कोमोलुंगुमापासून २३० किलोमीटर दूरवरून कांचनगंगाच्याही पलीकडे दिसणारे दुसर्‍या क्रमांकाचे शिखर सर्वोच्च असावे अशी शक्यता त्यांनी वर्तवली.

१८४९ मध्ये त्यांनी आणखी जवळून म्हणजे १९० किलोमीटरवरील जिरोल येथून वेध घेण्याकरता निकोल्सन ह्यांना पाठवले. सर्वात मोठा ’थिओडोलाईट’ घेऊन ते पूर्वेकडे गेले. पाच निरनिराळ्या ठिकाणांहून तीस निरीक्षणे नोंदवली. जवळात जवळचे अंतर १७४ किलोमीटर होते. त्या निरीक्षणांवरून शिखराची ढोबळ उंची  सुमारे ९,२०० मीटर असल्याचे निष्पन्न झाले.

१८५२ मध्ये डेहराडूनच्या सर्व्हेक्षण केंद्रातील भारतीय गणितज्ञ राधानाथ सिकदर ह्यांनी त्याच निरीक्षणांवरून त्रिकोणामितीय गणित करून सर्वप्रथम हे शोधून काढले की तेच शिखर सर्वोच्च होते. त्या आकड्यांवरील प्रकाशकीय अपवर्तन, वातावरणीय दाब आणि वातावरणीय तापमानाचे अनुकूलन करण्यास दोन वर्षे लागली. अंतिमतः १८५६ साली त्यांनी असे घोषित केले की कांचनगंगा ८,५८२ मीटर उंच आहे तर कोमोलुंगुमा ८,८४० मीटर. त्यांनी मग असा निष्कर्ष काढला की हे शिखरच बहुधा जगातील सर्वोच्च शिखर आहे.

तीन पायर्‍यांचा अणुकार्यक्रम

होमी जहांगीर भाभा
(जन्मः ३० ऑक्टो.१९०९, मुंबई, मृत्यूः २४ जाने.१९६६, माऊंट ब्लांक)

होमी जहांगीर भाभा हे बहुधा भारतीय आण्विक कार्यक्रमाचे प्रमुख शिल्पकार म्हणून ओळखले जातात. मात्र, भारताच्या विकासातील त्यांची भूमिका अणुऊर्जेच्या क्षेत्राबाहेरही दूरवर पसरलेली आहे.

त्यांनी दोन महान संशोधन संस्था स्थापन केल्या. त्या म्हणजे 'टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च’ आणि 'ऍटॉमिक एनर्जी एस्टॅब्लिशमेंट ट्रॉम्बे', जिचे भाभांच्या मृत्यूनंतर 'भाभा ऍटॉमिक रिसर्च

सेंटर' असे पुनर्नामांकन करण्यात आले. भारतात विजकविद्या विकसित करण्यात त्यांनी कळीची भूमिका बजावलेली होती. भाभा उत्कृष्ट वैज्ञानिक आणि कुशाग्र अभियंते होते.

धन-विजकांच्या, विजकांमुळे होणार्‍या विखुरणांच्या संभाव्यतेकरता त्यांनी सुयोग्य अभिव्यक्ती शोधून काढली होती. अशा विखुरण्यास नंतर भाभा-विखुरणे (भाभा-स्कॅटरिंग) असे नाव पडले.

कार्ल डेव्हिड अँडरसन (१९०५-९१) यांनी, विश्वकिरणांत आढळून येणारा आणि विजक व धनक यांचेदरम्यानचे वस्तुमान असणारा एक नवा कण शोधून काढला होता, तेव्हा त्यांनी त्याला ’मेसॉटॉन’ असे नाव दिले होते. पुढे, बहुधा मिलिकन यांच्या सल्ल्यावरून, त्यांनी ते ’मेसॉट्रॉन’ असे बदलवले. प्राथमिक कणांच्या ह्या वर्गाकरता वापरले जाणारे ’मेसॉन’ हे नाव मग भाभा यांनीच सुचवलेले होते.

केंब्रिज विद्यापीठात होमी भाभांनी प्रथम यंत्र अभियांत्रिकीची ट्रायपॉस पास केली. नंतर गणिताचीही. अर्नेस्ट रुदरफर्ड, पॉल डिरॅक, जेम्स चॅडविक ह्यांसारखे सर्वोच्च शास्त्रज्ञ तिथे कार्यरत होते. सैद्धांतिक भौतिक शास्त्रातील पुंज यांत्रिकी क्षेत्र झपाट्याने विकसित होत होते. प्रायोगिक भौतिकशास्त्रात पदार्थांच्या अणुकेंद्रकीय आणि आण्विक संरचनेबाबत शोध लावले जात होते. आण्विक भौतिकशास्त्रात क्रांतिकारक संशोधन होत असलेला तो काळ होता. भाभांनी आपले नाव केंब्रिज येथे पी.एच.डी.करता नोंदवले. धनक (प्रोटॉन), वीजक (इलेक्ट्रॉन) आणि इतर कणांच्या विश्वकिरण वर्षावांबाबतच्या त्यांच्या संशोधनामुळे त्यांना १९३३ मध्ये डॉक्टरेट मिळाली.

डॉ.भाभा भारताचा दीर्घकालीन अणुकार्यक्रम तयार करत होते, तेव्हा त्यांना तो सशक्त पायावर उभा करायचा होता. स्वावलंबी होईल अशा प्रकारे, इतर देशांवर फारसे अवलंबून न राहता, स्वबळावर तयार करायचा होता. लक्षात घेण्यासारखी सर्वात महत्त्वाची गोष्ट होती, ती म्हणजे देशात असलेली आण्विक पदार्थांची उपलब्धता.

असे अनुमान होते की युरेनियम भारतातल्या खाणींतून उपलब्ध होईल, मात्र त्याचे परिमाण मर्यादितच असेल. जर सर्व अणुकार्यक्रम पूर्णपणे युरेनियमवर आधारलेला ठेवला असता तर, तो अनेक दशके चालला असता. पण त्यानंतर भारतास युरेनियम आयात करावे लागले असते. दुसर्‍या बाजूस, थोरियम, ज्यापासून आपण युरेनियम इंधनाचे दुसरे समस्थानिक निर्माण करू शकतो, तो आपल्या देशात विपुलतेने उपलब्ध आहे. म्हणून भारताच्या अणुकार्यक्रमाने, वीजनिर्मितीकरता थोरियम आधारित तंत्रज्ञानाकडे वाट चालली पाहिजे.

थोरियम आधारित तंत्रज्ञानाचा विकास आणि विद्युतनिर्मितीकरता त्याचा वापर, हे भाभांनी अभिकल्पित केलेल्या भारताच्या अणुकार्यक्रमामागचे पहिले मार्गदर्शक तत्त्व होते.

एकदा इंधन पदार्थांचे अणू, अणुभट्टीत तुकड्यांत विभाजित झाले की, अनेक किरणोत्सारी मूलद्रव्ये जन्म पावतात. किरणोत्सारी मूलद्रव्ये आण्विक प्रारणे दीर्घकाळ उत्सर्जित करतच राहतात. आण्विक प्रारण सजीवांकरता खूपच हानीकारक असते. जळीत इंधनातील बव्हंशी मूलद्रव्ये अनेक महिन्यांनंतर लक्षणीयरीत्या किरणोत्सारी राहत नाहीत तरी, काही मूलद्रव्ये एक लक्ष वर्षे पर्यंत प्रारणे उत्सर्जित करतच राहतात. जळित इंधनातील आण्विक कचर्‍याचे परिमाण किमान पातळीवर आणणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. अणुभट्टीतून बाहेर पडणार्‍या जळित इंधनाचे पुनर्प्रक्रियन आणि पुनर्चक्रण करणे आवश्यक ठरते. त्याचा एक मोठा लाभही आहे. त्यात प्लुटोनियमच्या स्वरूपात कृत्रिम इंधनही मिळते, जे दुसर्‍या प्रकारच्या अणुभट्टीत वापरले जाऊ शकते.

अशा प्रकारचे इंधनचक्र, ज्यात इंधनाचे कमाल संभाव्य मर्यादेपर्यंत पुनर्चक्रण केले जाते, त्यास ’बंद इंधनचक्र’ म्हटले जाते. ’बंद इंधनचक्र’ अवलंबणे हे, भाभांनी अभिकल्पित केलेल्या भारताच्या अणुकार्यक्रमाचे दुसरे मार्गदर्शक तत्त्व होते.

ह्या दोन्ही मार्गदर्शक तत्त्वांकरता आवश्यक असलेली, थोरियम आधारित अणुतंत्रज्ञान आणि जळित इंधनाच्या पुनर्प्रक्रियणाचे तंत्रज्ञान ही तंत्रे आपण आत्मसात करण्याची आवश्यकता आहे. आण्विक विज्ञान व तंत्रज्ञान तज्ञ देशातच उपलब्ध असण्याचीही आवश्यकता आहे. आण्विक तंत्रज्ञानात स्वावलंबी होण्याकरता स्वतःची मानवी संसाधने विकसित करणे, हे भाभांनी अभिकल्पित केलेल्या भारताच्या अणुकार्यक्रमाचे तिसरे मार्गदर्शक तत्त्व आहे.

ह्या तीन मार्गदर्शक तत्त्वांवर आधारित असा, तीन पायर्‍यांचा, अणुकार्यक्रम भाभांनी अभिकल्पित केलेला होता. पहिल्या पायरीत, भारतात नैसर्गिक युरेनियम इंधनावर आधारित अणुभट्ट्या असतील.

दुसर्‍या पायरीत, भारतात प्लुटोनियम इंधनावर आधारित अणुभट्ट्या असतील. हे प्लुटोनियम पहिल्या व दुसर्‍या पायर्‍यांतील अणुभट्ट्यांतच निर्माण केले जाईल. तिसर्‍या पायरीत, भारतात युरेनियम-२३३ चा इंधन म्हणून वापर करणार्‍या अणुभट्ट्या असतील. हे युरेनियम-२३३ थोरियमपासून दुसर्‍या व तिसर्‍या पायर्‍यांतील अणुभट्ट्यांतच निर्माण केले जाईल.

समारोप

हे युग ज्ञानाचे युग आहे. ह्या ज्ञानयुगातील अभियांत्रिकीसमोरील आव्हाने असंख्य आहेत. भारताचा इतिहास पाहता शतकानुशतके आपण अभियांत्रिकीतील अन्वेषण आणि कर्तब ह्यांचे नमुनेदार उदाहरण राहत आलेलो आहोत.

१. महाराणा कुंभा ह्यांनी बांधलेला ‘विजयस्तंभ’,
२. महाराज सवाई जयसिंह ह्यांनी वसवलेले जयपूर शहर व ’यंत्रमंदिरे’,
३. राधानाथ सिकदरांनी दर्शवलेले ‘त्रिकोणामितीय नैपुण्य’,
४. होमी भाभांनी तयार केलेला अणुऊर्जेच्या क्षेत्रातील ’स्वावलंबी कार्यक्रम’,
५. सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्यांनी केलेले ’नगरनियोजन’,

हे सारे अभियांत्रिकी कौशल्य अस्सल भारतीय आहे. त्यांचाच वारसा घेऊन, आपणही देदिप्यमान अभियांत्रिकीचे दाखले पेश करूया. सौर ऊर्जेने भारत उजळून टाकूया. घडवू या ऊर्जस्वल भारत. शक्तिशाली भारत. नवा भारत.

संदर्भः
१. वैज्ञानिक माहितीची अनुदिनी
http://scientistsinformation.blogspot.in/2010/03/sir-m-visvesvaraya-1888-1970.html
२. विकिपेडियावरील विश्वेश्वरय्यांची माहिती http://en.wikipedia.org/wiki/Visvesvaraya
३. होमी भाभाः भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमाचे जनक, मूळ इंग्रजी लेखकः आल्हाद आपटे, ऑगस्ट २०१७, मराठी अनुवादः नरेंद्र गोळे, ऑक्टोंबर २०१७, प्रकाशकः विद्यार्थी विज्ञान मंथन.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: