२०१९-०९-१२

विक्रम साराभाई जन्मशताब्दी


विक्रम साराभाई ह्यांची जन्मशताब्दी

भारतीय अवकाश कार्यक्रमाचा द्रष्टा प्रणेता
जन्मः १२-०८-१९१९, अहमदाबाद, गुजरात
मृत्यूः ३०-१२-१९७१, कोवलम्‌, थिरुवनन्तपुरम्‌, केरळ

“कुणीही नेता नसतो आणि कुणीही नेला जात नसतो. पुढारी म्हणूनच जर ओळख करून द्यायची असेल तर, उत्पादक म्हणून करून देण्याऐवजी जोपासक म्हणून करून द्यावी. तो जमिनीची मशागत करतो. बीज रुजण्यास, वाढण्यास, पोषक वातावरण निर्माण करतो, पर्यावरण घडवतो. स्वतः पुढारी असल्याचे पटवून देण्याची निकडीची गरज नसलेल्या, उदार व्यक्ती त्याकरता हव्या आहेत.” – विक्रम साराभाई

भारतीय अवकाश कार्यक्रमापासून विक्रम साराभाईंचे नाव विलग करणे अशक्यच आहे. त्यांनीच भारतास अवकाश संशोधनाच्या जागतिक नकाशावर आणले. मात्र त्यांनी इतर क्षेत्रांतही तेवढे पायाभूत कार्यही केलेले आहे. वस्त्रोद्योग, औषधनिर्मिती, अणुऊर्जा, विजकविद्या आणि इतर अनेक क्षेत्रांत अखेरपर्यंत त्यांनी निरंतर कार्य केलेले आहे.

साराभाईंच्या व्यक्तिमत्वातील सर्वात लक्षणीय पैलू म्हणजे त्यांच्या स्वारस्यांचा विस्तृत पल्ला होय. संकल्पनांचे रूपांतरण संस्थांत घडवण्याची त्यांची शैलीही अपूर्वच आहे. आजच्या सशक्त इस्रोचे जनकही तेच आहेत. ते एक सर्जनशील शास्त्रज्ञ होते. यशस्वी आणि दूरदृष्टीचे उद्योजक होते. सर्वोच्च कोटीचे संशोधक होते. थोर संघटक होते. आगळे शिक्षणशास्त्री होते. कलेचे मर्मज्ञ होते. सामाजिक बदलांचे उद्यमी होते. पथदर्शी व्यवस्थापन प्रशिक्षक होते. आणखीही बरेच काही होते.

मात्र, सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हे सर्व असूनही ते एक सहृदय व्यक्ती होते. त्यांच्यात इतरांप्रतीची करूणा ओतप्रोत भरलेली असे. त्यांच्या संपर्कात येणार्‍या प्रत्येक व्यक्तीवर जादू करून तिला ते आपलेसे करून टाकत असत. त्यांच्यासोबत त्यांची वैयक्तिक मैत्री ताबडतोब प्रस्थापित होत असे. आपल्या आश्वासक पुढाकाराने आणि इतरांप्रतीचा आदर ते सहज व्यक्त करू शकत असल्यानेच हे संभव झाले असावे.

ते स्वप्ने पाहत असत. त्यांचेपाशी अपार कष्ट करण्याचे अतुलनीय सामर्थ्यही होते. ते द्रष्टे होते. ते संधी पाहू शकत. नसलेल्या संधी निर्माण करू शकत. साराभाईंबाबत असे निरीक्षण नोंदवतात की; “त्यांच्याकरता आयुष्याचे उद्दिष्ट आयुष्यासच स्वप्न बनवणे आणि मग ते साकार करणे हे होते”. शिवाय साराभाईंनी इतर अनेकांनाही स्वप्ने पाहायला शिकवले. ती साकार करायला शिकवले. भारताच्या अवकाश कार्यक्रमाचे यश हे त्याचे प्रमाणपत्रच आहे. “साराभाई एक संशोधक शास्त्रज्ञ आणि दूरदृष्टीचे उद्योग संघटक व कल्पक संस्थानिर्माते ह्या दोहोंचे एक विरळ मिश्रण होते. देशाच्या आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक उन्नतीकरता त्यांनी अनेक संस्था निर्मिल्या.” त्यांना अर्थशास्त्र आणि व्यवस्थापनशास्त्रांतील कौशल्यांची उत्तम जाण होती. कुठलीही समस्या त्यांच्याकरता किरकोळ नव्हती. त्यांचा बहुतांशी वेळ त्यांच्या संशोधन कार्यातच व्यतीत होत असे. पुढे त्यांच्या अकालीच झालेल्या मृत्यूपर्यंत ते संशोधनकार्यांवर देखरेख करत राहिले. त्यांच्या देखरेखीखाली अनेक व्यक्तींनी पी.एच.डी. पदवी प्राप्त केली. साराभाईंनी वैयक्तिकरीत्या आणि आपल्या सहकार्‍यांच्या सोबत मिळून अनेक शोधनिबंध राष्ट्रीय नियतकालिकांत प्रकाशित केले होते.

असे सांगितले जाते की, संघटनेतील पदानिरपेक्ष कुणीही, कोणत्याही दडपणाविना आणि कोणत्याही न्यूनतेच्या भावनेविना साराभाईंना भेटू शकत असे. ते त्या व्यक्तीस बसवून घेत असत. समानतेने वागवत असत. त्यांचा वैयक्तिक प्रतिष्ठेवर विश्वास होता. इतर व्यक्तींची प्रतिष्ठाही ते सांभाळत असत. कामे करावयाच्या अधिक चांगल्या आणि कार्यक्षम उपायांचा ते सदैव शोध घेत असत. जे काही ते करायचे, ते सर्जनशील असायचे. तरूण व्यक्तींची ते पराकोटीची काळजी करत असत. त्यांच्या सामर्थ्यांवर त्यांना प्रचंड विश्वास असे. त्यांना संधी आणि स्वातंत्र्य पुरविण्यास ते नेहमीच तयार असत.

विक्रम साराभाईंचा जन्म १२ ऑगस्ट १९१९ रोजी अहमदाबादेतील एका सधन कुटुंबात झाला. त्यांच्या वंशपरंपरागत घरातच त्यांचे बालपण गेले. आयुष्याच्या निरनिराळ्या क्षेत्रांतील महत्त्वाचे लोक तिथे भेटी देत असत. ह्याचा साराभाईंच्या व्यक्तिमत्त्वविकासावर महत्त्वाचा परिणाम झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव अंबालाल होते आणि आईचे सरलादेवी. मादाम मारिया माँटेसरी ह्यांच्या धर्तीवर, त्यांच्या आई सरलादेवींनी काढलेल्या शाळेत त्यांचे सुरूवातीचे शिक्षण झाले. गुजरात महाविद्यालयातून इंटरमिडिएट सायन्सची परीक्षा पूर्ण केल्यावर, १९३७ मध्ये ते ब्रिटनमधील केंब्रिज येथे आले. तेथून १९४० मध्ये त्यांनी नॅचरल सायन्सेसमधील ट्रायपॉस परीक्षाही पार केली. दुसर्‍या महायुद्धाच्या सुरूवातीस ते भारतात परतले आणि बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (आय.आय.एस.सी.) मध्ये रुजू झाले. तिथे ते सी.व्ही रमण ह्यांच्या देखरेखीखाली विश्वकिरणांवर संशोधन करू लागले. “टाईम डिस्ट्रिब्यूशन ऑफ कॉस्मिक रेज” हा त्यांचा पहिला शोधनिबंध त्यांनी इंडियन अकॅडमी ऑफ सायन्सेसच्या प्रोसिडिंग्जमध्ये प्रकाशित केला. १९४० ते १९४५ दरम्यानच्या साराभाईंच्या विश्वकिरणांवरील कामात विश्वकिरणांच्या कालसापेक्ष बदलांवर गायगर-मुल्लर गणकांच्या साहाय्याने बंगळुरू येथे आणि काश्मीरी हिमालयातील उच्चस्तरीय स्थानांवर केलेला अभ्यासही समाविष्ट आहे. युद्धसमाप्तीनंतर त्यांचा विश्वकिरण भौतिकशास्त्रातील पी.एच.डी.चा अभ्यास पूर्ण करण्यासाठी ते केंब्रीजला परतले. १९४७ मध्ये त्यांना केंब्रीज विद्यापीठाकडून त्यांच्या, “कॉस्मिक रे इन्व्हेस्टिगेशन इन ट्रॉपिकल लॅटिट्यूडस” ह्या शोधनिबंधाकरता, पी.एच.डी. प्रदान करण्यात आली. युरेनियम-२३८ च्या, ६२ लाख विजकव्होल्ट ऊर्जेच्या गॅमा किरणांच्या साहाय्याने केलेल्या, प्रकाशकीय विदलनाच्या छेदाचे अचूक मापनही, त्यांनी पी.एच.डी. शोधनिबंधाचा एक भाग म्हणून पूर्ण केले होते. पी.एच.डी. मिळाल्यानंतर ते भारतात परतले आणि आपले विश्वकिरण भौतिकशास्त्रातील संशोधन पुढे सुरू केले. भारतात त्यांनी आंतरग्रहीय अवकाशांचा अभ्यास केला. सौर-अवकाशीय संबंधांचा आणि भूचुंबकीय शक्तींचाही अभ्यास केला.

साराभाई एक थोर संस्था संघटक होते. त्यांनी विविध क्षेत्रातील मोठ्या संख्येतील संस्था एकतर स्वतःच उभारल्या आहेत किंवा त्या उभारण्यास हातभार लावलेला आहे. साराभाईंनी ज्या संस्था उभारण्यास हातभार लावले त्यातील पहिली संस्था होती, अहमदाबाद टेक्सटाईल इंडस्ट्रीज रिसर्च असोसिएशन (ए.टी.आय.आर.ए.). विश्वकिरण भौतिकशास्त्रातील पी.एच.डी.चा अभ्यास पूर्ण करून केंब्रीजहून परतल्यावर लगेचच त्यांनी हे काम पत्करलेले होते. वस्त्रोद्योग तंत्रज्ञानातील कुठलेली औपचारिक शिक्षण त्यांनी घेतलेले नव्हते. ए.टी.आय.आर.ए.ची स्थापना ही भारतातील वस्त्रोद्योग क्षेत्राच्या आधुनिकीकरणातील एक महत्त्वाची पायरी होती. त्या काळी बहुसंख्य कापड गिरण्यांत गुणवत्ता दर्जा नियंत्रणाची कुठलीच तंत्रे वापरली जात नसत. ए.टी.आय.आर.ए. मध्ये साराभाईंनी असे वातावरण निर्माण केले की, निरनिराळ्या शाखांतील, निरनिराळ्या गटांत परस्पर विचारविनिमय होऊ शकेल, ज्यामुळे नव्या संकल्पनांचा उदय होऊ शकेल. संस्थेकरता कर्मचारी निवडतांना त्यांनी अनुभवाच्या अर्हतेकडे हेतूपूर्वक दुर्लक्ष केले. साराभाईंनी निर्माण केलेल्या आणि सांभाळलेल्या विविध संस्थाना परस्परांच्या अनुभवांचा आणि तंत्रांचा लाभ मिळत असे. साराभाईंनी निर्माण केलेल्या त्यातील सर्वात प्रसिद्ध अशा काही संस्था पुढीलप्रमाणे आहेत.

१.            फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी (पी.आर.एल.), अहमदाबाद
२.            इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आय.आय.एम.), अहमदाबाद
३.            कम्युनिटी सायन्स सेंटर, अहमदाबाद
४.            दर्पण अकॅडमी ऑफ परफॉर्मिंग आर्टस, अहमदाबाद (पत्नीसोबत मिळून)
५.            विक्रम साराभाई स्पेस सेंटर, थिरुवनंतपुरम्‌
६.            स्पेस अप्लिकेशन्स सेंटर, अहमदाबाद (साराभाईंनी निर्माण केलेल्या सहा संस्था/ केंद्रे एकत्र करून ही संस्था निर्माण झाली)
७.            फास्ट ब्रीडर टेस्ट रिऍक्टर (एफ.बी.टी.आर.), कलपक्कम
८.            व्हेरायबल एनर्जी सायक्लॉट्रॉन प्रोजेक्ट, कलकत्ता
९.            इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (ई.सी.आय.एल.), हैदराबाद
१०.        युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (यू.सी.आय.एल.), जादुगुडा, बिहार

जानेवारी १९६६ मध्ये होमी भाभा ह्यांचा मृत्यू झाल्यानंतर साराभाईंना अणुऊर्जा आयोगाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सुपूर्त करण्यात आली. त्या वेळी ते प्रामुख्याने तीन क्षेत्रांत कार्यरत होते. त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर, “सध्या मी तीन क्षेत्रांतील मूलभूत जबाबदार्‍या सांभाळत आहे. पहिली म्हणजे, फिजिकल रिसर्च लॅबोरेटरीचा संचालक म्हणून आणि विश्वकिरण भौतिकीचा प्राध्यापक म्हणून. इथे मी माझे संशोधनही पूर्ण करत आहे आणि पी.एच.डी.च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही करत आहे. दुसरी म्हणजे इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च प्रोग्रॅमचा अध्यक्ष, तसेच प्रोजेक्ट फॉर द डेव्हलपमेंट ऑफ रॉकेटस अँड स्पेस टेक्नॉलॉजीचा प्रमुख म्हणून. तिसरी म्हणजे, विशेषतः रसायने आणि औषधनिर्मितीभोवती केंद्रित असलेल्या, आमच्या कुटुंबाच्या व्यापार क्षेत्रातील स्वारस्याच्या लक्षणीय भागाची धोरणनिर्मिती, संचालन, संशोधन नियोजन आणि मूल्यांकन.” अमेरिकेतील मॅसॅच्युसेटस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या लॅबोरेटरी ऑफ न्युक्लिअर सायन्सेसशीही त्यांचे नियमीत स्वरूपाचे संबंध होते. असे असूनही देशाच्या स्वारस्याखातर साराभाईंना, कोणतीही नवी जबाबदारी हाती घेण्यापासून काहीही परावृत्त करू शकत नव्हते. त्याकरता त्यांना कौटुंबिक व्यवसायांपासून स्वतःस दूर करून घ्यावे लागले. भारतातील अणुऊर्जा आणि अवकाशसंशोधन कार्यक्रम ह्या दोन्हींच्याही प्रमुखपदी तेच होते. मे १९६६ पासून तर त्यांचा मृत्यू होईपर्यंत हे असेच चालत राहिले.

अवकाश शास्त्र आणि तंत्रज्ञानातील अंगभूत प्रचंड सामर्थ्य-संभावनांची त्यांना जाण होती. विस्तृत पल्ल्यातील सामाजिक आणि आर्थिक विकासकार्यांत त्यांचा उपयोग होण्यासारखा होता. अशा विकासाकरता संचार, मापनशास्त्र, हवामानाचे अंदाजशास्त्र आणि नैसर्गिक संसाधनांचे दोहन अशा क्षेत्रांची नावे घेता येतील. साराभाईंनी निर्माण केलेल्या अहमदाबाद येथील फिजिकल रिसर्च लॅबोरेटरीने, अवकाश शास्त्रातील संशोधनात आणि पुढे जाऊन अवकाश तंत्रज्ञानात पुढाकार घेतला. साराभाईंनी देशातील प्रक्षेपण तंत्रज्ञानाचेही नेतृत्व केले. भारतातील उपग्रहाद्वारे दूरदर्शन प्रसाराच्या विकासातही त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली.

भारतातील औषधनिर्मिती क्षेत्रातील पायाभरणीचे कार्यही साराभाईंनीच केलेले आहे. कोणत्याही किंमतीत सर्वोच्च गुणवत्ता मानांकने प्रस्थापित करावी आणि सांभाळावी लागतील, ह्याची जाण असलेल्या औषधनिर्मिती क्षेत्रातील पहिल्या काही तज्ञांतीलच ते एक तज्ञ होते. विजकीय विदा प्रक्रियण आणि संचालन-संशोधन तंत्रे औषधनिर्मिती क्षेत्रात वापरणारेही ते पहिलेच होते. भारतातील औषधनिर्मिती क्षेत्रास स्वावलंबी करण्यास आणि स्वदेशात स्वतःच अनेक औषधे व उपस्करांची निर्मिती सुरू करण्यात त्यांची कळीची भूमिका होती.

साराभाईंची सांस्कृतिक स्वारस्ये सखोल होती. त्यांना संगीतात, प्रकाशचित्रणात, पुरातत्त्व शास्त्रात आणि विशुद्ध कलांतही रस होता. पत्नी मृणालिनी ह्यांच्यासोबत मिळून त्यांनी दर्पण अकॅडमी ऑफ परफॉर्मिंग आर्टस, अहमदाबाद; ही प्रकटीकरणकलांना वाहिलेली संस्था स्थापन केली होती.

शास्त्रज्ञांनी स्वतःला हस्तिदंती मनोर्‍यांत बांधून घेऊ नये, केवळ शुद्ध वैज्ञानिक शैक्षणिक उद्दिष्टांत हरवून जाऊन, समाजासमोरील समस्यांकडे डोळेझाक करू नये, असे त्यांना वाटत असे. देशातील विज्ञानशिक्षणाच्या अवस्थेबाबत त्यांना गहिरी चिंता वाटे. त्यात सुधार घडवण्याकरता त्यांनी सामुदायिक विज्ञान केंद्राची स्थापना केली.

एखाद्याशी केवळ काही मिनिटेच बोलून त्याची गुणवत्ता जाणून घेण्याची विलक्षण हातोटी त्यांना साधली होती. वस्तुतः ते अनेकदा असेही म्हणत असत की, व्यक्तीच्या डोळ्यातील चमक पाहूनच ते तिला जोखू शकत असत. प्रणालीबद्ध प्रयत्नांनी व्यक्तिविकास घडवण्यावर त्यांचा विश्वास होता. प्रसंगी चाकोरीबाहेर जाऊनही, ते एखाद्यास विकासाची पूर्ण संधी मिळवून देत असत. त्यांचे व्यक्तित्व प्रसन्न होते. त्यांच्यासोबत काम करणार्‍यांना त्यांच्या केवळ स्मितातूनही प्रेरणा प्राप्त होत असे.

साराभाई ३० डिसेंबर १९७१ रोजी कोवलम्‌, थिरुवनंतपुरम्‌, केरळ येथे निवर्तले. १९७४ मध्ये इंटरनॅशनल ऍट्रॉनॉमिकल युनिअन, सिडनी ह्यांनी साराभाईंच्या सन्मानार्थ असा निर्णय घेतला की, चंद्रावरील ’सी ऑफ सेरेनिटी’ मधील बेसेल विवरास, ’साराभाई विवर’ म्हणून ओळखले जावे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: