आजच आम्ही सावित्रिबाई फुले नाट्यगृहात ’अनन्या’ नाटक पाहिले. त्याचे हे रसग्रहण. ह्या नाटकाचा विवरणात्मक भाग https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/entertainment-drama/ananya-drama/articleshow/62286418.cms ह्या दुव्यावर सहजच उपलब्ध असल्याने पुनरावृत्ती करत नाही. मात्र जो अभिप्राय सांगितल्याविना हे रसग्रहण पूर्णच होणार नाही तो व्यक्तिगत आकलनाचा भाग इथे देत आहे.
अचानकच अपघाताने एखादी व्यक्ती हातपाय गमावते तेव्हा घरच्यांना हा आघात कसा सोसावा हेच कळत नाही. अपघातग्रस्त व्यक्तीशी कसे वागावे हेही कळत नाही. त्या व्यक्तीच्या सामर्थ्यावर रचलेल्या सगळ्यांच्याच आशा-आकांक्षा चक्काचूर होतात त्याचे दुःख असते. ती व्यक्ती यापुढे परावलंबी होणार ह्याचे दुःख असते. तिला सर्वकाळ आधार द्यावा लागेल आणि त्यामुळे आपला र्हास होईल ह्या जाणीवेने घरच्यांचा घोर अपेक्षाभंग झालेला असतो त्याचे दुःख असते. परिणामी नैराश्याने ग्रासून जाणे हेच ह्याचे पर्यवसान असते.
अचानकच अपघाताने एखादी व्यक्ती हातपाय गमावते तेव्हा घरच्यांना हा आघात कसा सोसावा हेच कळत नाही. अपघातग्रस्त व्यक्तीशी कसे वागावे हेही कळत नाही. त्या व्यक्तीच्या सामर्थ्यावर रचलेल्या सगळ्यांच्याच आशा-आकांक्षा चक्काचूर होतात त्याचे दुःख असते. ती व्यक्ती यापुढे परावलंबी होणार ह्याचे दुःख असते. तिला सर्वकाळ आधार द्यावा लागेल आणि त्यामुळे आपला र्हास होईल ह्या जाणीवेने घरच्यांचा घोर अपेक्षाभंग झालेला असतो त्याचे दुःख असते. परिणामी नैराश्याने ग्रासून जाणे हेच ह्याचे पर्यवसान असते.
त्या व्यक्तीला होणारे दुःख तर
अपरिमित असते. तिला अपघातानेच प्राप्त झालेल्या अपंगत्वाचे दुःख असते.
परावलंबित्वाचे दुःख असते. कौटुंबिक अपेक्षाभंगास कारण झाल्याचे दुःख असते.
निकटवर्तियांच्या ओढाताणीचे आणि चिडचिडीचे कढही त्या व्यक्तीवरच रिते होत असतात.
त्या व्यक्तीला अपघात होण्यात तिचा काही दोषही नसू शकतो. मग तिलाच का बरे ह्या
त्रासाला सामोरे जावे लागते? अशासारख्या अनुत्तरित प्रश्नांचा डोंगरच उभा राहतो.
प्रेक्षकांना ह्या सार्या
प्रश्नांची जाणीव करून देणे, त्या परिस्थितीतही सकारात्मक राहता येण्याचा मार्ग
दाखवणे, समाजाच्या बदललेल्या दृष्टीकोनाला स्वीकारून प्राप्त परिस्थितीत सर्वात
चांगले आणि शक्यप्राय असे काय बरे करता येईल ह्या स्वप्नरंजनास उद्युक्त करणे हा
नाटकाच्या संहितेचा हेतू समर्थपणे सिद्ध झालेला आहे. आजमितीस रस्त्यावरील
अपघातांची संख्या अवाजवीपणे वाढलेली असतांना; ह्या विषयावरील अशा चर्चेची,
विचारावर्तनांची, सुसंभावनांच्या शोधाची आवश्यकता वेगळ्याने अधोरेखित करण्याची तर
आवश्यकताच नाही. शेकडो रुपये तिकिट मोजून मोठ्या संख्येने हे नाटक पाहणार्या
प्रेक्षकांच्या गर्दीनेच समाजास ही आवश्यकता असल्याचे आवर्जून सांगितले आहे.
खूप दिवसांनी, सशक्त संहितेवर
आधारलेले सहजसुंदर नाटक अनुभवण्याचा आनंद आज मिळाला. प्राप्त परिस्थितीत कसे
वागावे ह्याबाबत आपल्या तत्त्वज्ञानात खूप काही लिहून ठेवलेले आहे. मात्र स्वामी
विवेकानंदांनी उद्धृत केलेले ’उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्नि बोधत’ म्हणजे ’उठा
जागे व्हा आणि मिळू शकणार्या सर्व वरांचा पुरेपूर लाभ घ्या’ ह्या मार्गदर्शनास,
ह्या नाटकाने सशक्तपणे उजागर करून दाखवलेले आहे.
दोन्ही हात गमावलेली अनन्या आपल्या
पायांवर उभी राहते. हातांची सर्व सामर्थ्ये पायांनी साधू पाहते. नाटकापुरतेच का
होईना पण स्वप्नरंजनास सत्यस्वरूप देऊ पाहते. तिचे प्रयत्न, त्यामुळे साधलेली
प्रगती, बदलेले समाजमन, उघडलेल्या नव्या संभावना अक्षरशः चित्रदर्शी वेगवान
घटनाक्रमाने साकार होतांना प्रस्तुत केलेले आहेत. कलाकारांचे सर्व प्रयास यशस्वीही
झालेले आहेत.
बिनहाताच्या नवसामर्थ्यप्राप्त
अनन्याशी लग्न करायला, हतापायांनी धडधाकट असलेला सुकुमार समर्थ तरूण तयार होतो अशी
नाट्यमय पेशकश, ह्या नाटकाची रंगत आणखीनच वाढवते. मात्र बिनहातांची अनन्या, ज्या
अप्रतिहत उमेदीने पुन्हा हवीहवीशी ठरलेली असते, त्या उमेदीच्याच प्रेमात पडल्याचे
सांगून तो सुकुमार तरूण तिचे मन जिंकतो, हे स्वप्नरंजन नाटकापुरते का होईना पण
प्रेक्षकांना पटते. रुचते. स्वीकारार्ह वाटते. ह्यातच सर्व कलाकारांचे यश
सामावलेले आहे.
अनन्याचे पायांनी हातांची उणीव
भरून काढण्याचे प्रयत्न वास्तव, पोटतिडिकीचे आणि खरेखुरे वाटावे ह्याकरताचे सर्व
संहिता लेखन वाणण्याजोगे आहे. ऋतुजाचे नवार्जित चरणकौशल्यच त्यास विश्वसनीयता
मिळवून देते. तिच्या उमेदीच्या प्रेमात पडावे अशीच, ती उमेद लिहिलेली आहे,
आविष्कृत करवून घेतलेली आहे आणि नाटकात जो त्या उमेदीच्या प्रेमात पडतो, त्याने तर
ती बहारीने पेश केली आहे. संहिता लेखन, दिग्दर्शन आणि कलाकांची पेशकश नाटकाला
अंतीम परिणतीप्रत उन्नत करत नेतात. समकालीन संहितेचा, नाट्यतंत्राचा आणि
नाट्यशास्त्रीय आविष्करणांचा सुयोग्य वापर प्रेक्षकांचे स्वारस्य खिळवून ठेवतो. हे
नाटक संस्मरणीय आहे, वर्तमान सामाजिक समस्यांत मोलाचे मार्गदर्शन करणारे आहे आणि त्यांवरील
विचारमंथनास प्रवृत्त करणारे आहे.
नाट्याविष्कार पाहण्यात, अनुभवण्यात
खर्ची पडलेल्या शेकडो रुपयांचे दुःख नाहीसे व्हावे असेच हे नाटक आहे. नाटकाकडून
ज्या ज्या अपेक्षा प्रेक्षक बालगू शकतो, त्या त्या सर्व अपेक्षांची निदान आंशिक
तृप्ती तरी साधून देण्यात ते यशस्वी ठरलेले आहे. त्याखातर लेखक, दिग्दर्शक कलाकार
सगळ्यांचेच मनःपूर्वक आभार.
भावी प्रेक्षकांना सांगणे असे की,
मुळीच चुकू देऊ नका, अवश्य पाहा. अशाच नाटकांना तर आपण प्रेक्षकाश्रय देण्याची गरज
आहे. त्यांच्यामुळेच मराठी नाट्यसृष्टी आघाडीवर आहे. देदिप्यमान आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा