२०१५-०१-२६

वसंतपंचमी


उत्तर भारतात वसंतपंचमी साजरी केली जाते. आपण शाळांतून तोच सण सरस्वती पूजन म्हणून साजरा करतो. यंदा २४ जानेवारीस वसंतपंचमी होती. खरे तर हा सुगीचा सण सर्वच भारतात आनंदाने साजरा केला जातो. चला तर ह्या सुगीच्या बहारीचे आपणही स्वागत करू या!

वसंतपंचमी हा सण माघ शुक्ल पंचमीस येत असतो. ह्या दिवशी सरस्वतीदेवीचा प्रकटदिन असतो. ह्या दिवसास श्री-पंचमी म्हणूनही ओळखले जाते. भारतातील सर्व भागांत ह्या दिवशी शाळांतून “सरस्वती पूजन” केले जाते. खालील श्लोकाने तिचे स्तवनही केले जाते.

या कुंदेंदुतुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता ।
या वीणावरदंडमंडितकरा या श्वेत पद्मासना ॥
या ब्रम्हाच्युतशंकरप्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता ।
सा मां पातु सरस्वती भगवती निःषेश जाड्यापहा ॥

कुंदाचंद्रतुषारहारसमशा वस्त्री रमे श्वेतशा ।
वीणा वादन जी स्वये करतसे पद्मातही श्वेतशा ॥
जी पूज्या विधि-विष्णु-शंकर अशा देवांसही तत्त्वता ।
रक्षो ती मज शारदा हरवु दे निर्बुद्धता पूर्णतः ॥

- मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०१५०१२६



वरील ठिपक्यांच्या रांगोळीतून सरस्वती व्यक्त होते अशी पारंपारिक धारणा आहे. त्यामुळे ह्या रांगोळीचे पूजन करूनच नव-विद्यार्थ्याचे शिक्षणास आरंभ करण्याची प्रथा आहे.

आज, २०१५ सालच्या २६ जानेवारीस ज्यांना ’भारतरत्न’ प्रदान केले जात आहे त्या पंडित मदनमोहन मालवीय ह्यांनी बनारस हिंदू विश्वविद्यालयाची स्थापना वसंतपंचमीचेच मुहूर्तावर १९१६ साली केली होती. नववर्षाची सुगी येत असते. वसंत ऋतूचे आगमन होत असते. म्हणून सर्व सृष्टी सुंदर लतापल्लवांनी आणि पुष्प-बहरांनी सजू लागते म्हणून ह्या दिवसांत देशभर वसंतोत्सव साजरा करण्यात येत असतो. पुण्यात तर कालांतरापासून “वसंत व्याख्यानमालाही” आयोजित केली जात असते.

लोकप्रिय समजानुसार वसंतपंचमीच्या सणाचे मूळ आर्यांच्या काळापर्यंत पोहोचते. खैबर खिंडीतून, इतर नद्यांसोबतच सरस्वती नदीही ओलांडून आर्य भारतात आले. त्या बाल्यावस्थेतील संस्कृतीचा बव्हंशी विकास सरस्वती नदीच्या तीरांवरच झाला. म्हणून सरस्वतीचा संबंध सुपीकतेशी आणि ज्ञानाशी जोडला गेला. तेव्हापासूनच हा सण साजरा करण्याची प्रथा पडली.

वसंत ऋतूच्या आगमनार्थ शेतकरी हा सण साजरा करत असतात. हा सण बव्हंशी उत्तर भारतात साजरा केला जातो. ब्राम्हणांना दान दिले जाते, सरस्वती पूजन केले जाते. ह्या सणाशी जोडला गेलेला रंग पिवळा आहे. कारण पंजाब, हरियाणात ह्या काळात सर्वदूर होत असणार्‍या मोहोरीच्या शेताचा रंग तिच्या फुलांच्या बहारीने पिवळापिवळा दिसू लागलेला असतो. प्रख्यात सूफी संत अमीर खुसरो ह्यांची एक सुरेख रचना ह्या सुगीचे सुरेख वर्णन करते.

सकल बन फूल रही सरसों -अमीर ख़ुसरो

सकल बन फूल रही सरसों, सकल बन फूल रही सरसों

अम्बवा फूटे, टेसू फूले, कोयल बोले डार-डार,
 और गोरी करत सिंगार, मलनियाँ गेंदवा ले आईं कर सों,
सकल बन फूल रही सरसों, सकल बन फूल रही सरसों

तरह तरह के फूल खिलाए, ले गेंदवा हाथन में आए
निजामुदीन के दरवज़्ज़े पर, आवन कह गए आशिक रंग,
और बीत गए बरसों, सकल बन फूल रही सरसों

टेसू = पळस
सरसों = मोहरी
मलनियाँ = मालन




मोहरली वनी मोहरी फुले, मोहरली वनी मोहरी फुले

आम्रमंजिरीचे झुलती तुरे, वनीवनी रक्तपळस बहरे,
कोकीळही कूजती हर्षभरे, शृंगारत यौवन युवती पुरे,
फुलराणी रचते शत झेले, मोहरली वनी मोहरी फुले

असंख्य सजवून रानफुले, घेऊन पुष्पगुच्छ ते गेले,
दारी अवलियाच्या आले, रंगबहार गंधही परिमळे,
असे किती ऋतू आलेगेले, मोहरली वनी मोहरी फुले

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०१५०१२६

ह्या सणाच्या निमित्ताने पतंग उडविले जातात. मुक्तता आणि आनंद साजरा करण्यासाठी मुले आणि मोठी माणसे पतंग उडवतात. लहान मुलांच्या शिक्षणाची सुरूवात ह्या दिवशी करावी अशी परंपरा आहे. म्हणून लहान मुलांच्या शिक्षणास ह्याच दिवशी सुरूवात केली जाते. पिवळसर रंगाची मिष्टान्ने वाटली जातात. गरीबांना पुस्तके आणि इतर शैक्षणिक साहित्य वाटले जाते.

वेदांमध्ये सरस्वतीला जलदेवता मानले जाई. ती शुद्धतेचे, सुपीकतेचे आणि सुबत्तेचे प्रतीक होती. सरस्वती नदीच्या तीरावरील पवित्र प्रथांसोबत मग ती जोडली गेली. सर्व भाषांची, ग्रंथांची, साहित्याची आणि शिष्यवृत्तींची जननी असलेल्या संस्कृत भाषेचा शोध तिनेच लावला असेही मानले जाते. तिनेच सोमरसाचा अथवा अमृताचा शोध लावला असेही मानले जाते.

मत्स्य पुराणानुसार सरस्वती ब्रम्हदेवाच्या मुखातून प्रकट झाली. मग तिच्या सौंदर्यावर आणि शालीनतेवर ब्रम्हदेवच मोहित झाले. ती सैरावैरा पळू लागली तेव्हा प्रत्येक दिशेला तिला एक मुख दिसू लागले. त्यामुळेच ब्रम्हदेवाला पाच मुखे असल्याचा समज दृढ झाला. सरस्वती ब्रम्हदेवाची सर्वात अनुपम निर्मिती होती. तिच्या निरंतर स्त्रीत्वाचे प्रतीक म्हणूनच तिचा संबंध चंद्र आणि कमळ ह्यांचेशी जोडला जात असतो.

काही ठिकाणी, सरस्वतीस सूर्यकन्या मानले जाते. पश्चिम भारतात लोक सरस्वतीचा संबंध सिंहाशी किंवा मोराशी जोडतांना दिसतात कारण तिचे कार्तिकेयाशी लग्न झालेले होते. पूर्व भारतात, विशेषतः ओडिशा आणि बंगालात, सरस्वतीचे पार्वतीची मुलगी म्हणून पूजन केले जाते. असेही म्हटले जाते की, भगवान विष्णूंच्या तीन पत्नी आहेत. सरस्वती, गंगा आणि लक्ष्मी.

आर्य आणि सरस्वती

आर्य हे निषाद, साबर आणि पुलिंदर ह्या सरस्वतीच्या तीरांवरील वनवासी अनार्यांशी लढत असत. विष्णूच्या विनंतीवरून सरस्वती जमिनीवरून अदृश्य झाली आणि दूर राजस्थानात पुन्हा प्रकट झाली. अशा रीतीने वनवासी लोकांना जीवरक्षक जलापासून वंचित व्हावे लागले आणि त्यापायी ते क्षेत्रच सोडून जावे लागले. सरस्वतीच्या तीरावर आर्य लोक राहत असतांना त्यांच्या सुरूवातीच्या विकासात सरस्वतीने कळीची भूमिका बजावली. त्यामुळेच सरस्वती ज्ञानाचे प्रतीक म्हणून ओळखली जाऊ लागली.

अमरता आणि सरस्वती

सरस्वतीशी संबंधित अनेक पौराणिक कथांना सुरस सामाजिक स्पष्टीकरणे आहेत. देव आणि दानव ह्यांनी परस्पर सहमतीने अमृतासाठी सागरमंथन करण्याचे ठरवले. मेरू पर्वताची रवी आणि वासुकी नागाचा दोर करण्यात आला. जेव्हा लक्ष्मी अमृतकुंभ घेऊन प्रकट झाली तेव्हा दोघांनाही अमृत हवे झाले. सरस्वतीने आपल्या सौंदर्याने असुरांना आकर्षित करून घेतले. तेवढ्यात देवांनी अमृत पिऊन टाकले. ते अमृत पित असतांना राहू आणि केतू ह्या दोन्ही असुरांनी त्यांना पाहिले आणि ते देवांत मिसळून गेले. विष्णूने त्यांना अमृतपान करत असता पकडले. अमृतपान केल्यास ते अमर झाले असते. म्हणून विष्णूने ताबडतोब त्यांची मुंडकीच छाटून टाकली. त्यावर चिडून त्या असुरांनी सूर्य आणि चंद्र ह्यांनाच गिळून टाकले. मात्र त्यामुळे त्यांचे गळेच फाटून गेले. हिंदू पुराणांनुसार ह्याच कारणाने सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणे होत असतात.

सरस्वतीशी संबंधित इतरही अनेक कथा आहेत. एकदा वसिष्ठ आणि विश्वामित्र ऋषी परस्परांशी त्वेषाने भांडत होते. विश्वामित्रांनी सरस्वतीला (नदीला) सांगितले की तिने वसिष्ठांना त्यांच्या सर्व सामानानिशी वाहून घेऊन जावे. पण सरस्वतीने ह्यास नकार दिला. म्हणून सरस्वतीला शिक्षा करण्यासाठी त्यांनी सरस्वतीचे पाणी रक्तमय करून टाकले. नंतर शिवाचे विनंतीवरून दोन्ही ऋषींत सामंजस्य घडून आले आणि सरस्वती पूर्ववत शुद्ध झाली.

कालीदास आणि सरस्वती

लोककथांनुसार वसंतपंचमीचा संबंध महाकवी कालिदासासोबतही जोडला जातो. एका सुंदर राजकन्येशी त्याचा विवाह झाला होता. त्या राजकन्येने स्वतःहून बुद्धिमान नाहीत म्हणून असंख्य स्थळे धुडकावून लावलेली होती. त्या विवाहेच्छू पंडितांनी मग तिचे लग्न एका मूर्खाशी लावून देण्याचा घाट घातला आणि कालिदासाशी तिचे लग्न लावण्यात ते यशस्वीही झाले. त्यांना जंगलात एका झाडाच्या फांदीवर बसून ती फांदीच कुर्‍हाडीने तोडत असणारा एक माणूस दिसला. तो कालिदास होता. हाच माणूस तिच्याशी लग्न करण्यास निवडण्याचा त्यांनी निर्णय घेतला. कालिदासाला महान पंडित म्हणून दरबारात आणण्यात आले. असेही सांगण्यात आले की तो केवळ खुणांचे आधारेच बोलतो. त्याच्या त्या खुणांचा अर्थ मग त्या पंडितांनीच तिला आपापल्या परीने समजावून सांगितला. त्यावर प्रसन्न होऊन राजकन्येने त्याचेशी विवाह केला. मात्र नंतर तो मूर्ख असल्याचे आढळून आले तेव्हा राजकन्येने त्याला हाकलून दिले. त्यावर कालिदास आत्महत्या करण्यास प्रवृत्त झाला. सरस्वती नदीवर गेला. मात्र सरस्वती स्वतः पाण्यातून प्रकट झाली. तिने कालिदासास त्या पवित्र पाण्यात स्नान करण्यास सांगितले. बाहेर आला तेव्हा कालिदास सूज्ञ झालेला होता. तो कविता लिहू लागला. तो दिवस वसंतपंचमीचा होता. त्यानिमित्ताने मग विद्यादेवी सरस्वतीचे पूजन होऊ लागले. वसंतपंचमीचा सण साजरा होऊ लागला.
.

३ टिप्पण्या:

ninad kulkarni म्हणाले...

आमच्या जर्मनीत मरती सोडा इंग्रजी बोलायची बोंब आहे , अश्या परीस्थित काही दर्जेदार मराठी वाचायला मिळाले की मन तृप्त होते.

नरेंद्र गोळे म्हणाले...

निनाद, प्रतिसादाखातर मनःपूर्वक धन्यवाद! जर्मनीत तुम्ही रोज नव्या जगाची गाठ घेता तेही मुळीच कमी नाही. तेव्हा जी छोटा न करो. शिवाय हल्ली महाजालाने जगच जवळ आणले आहे, त्यामुळेच हे तुम्ही पाहू शकलात, आवर्जून मराठीतून/देवनागरीतून प्रतिसाद देऊ शकलात, मीही तुमच्या प्रतिसादाने प्रसन्न होऊ शकलो, हेही मुळीच कमी नाही. अनुदिनी परिचय ह्या सदरात मी इतर अनुदिनींचाही परिचय करून देत असतो. दुवे उजव्या बाजूच्या अनुक्रमात मिळतीलच. त्याही वाचा, स्वभाषा परिसण्याच्या अतृप्तीची मरगळ कुठल्याकुठे पळून जाईल. मग! आहेचतच हे बोल अमृताचे. मराठी भाषेचे. तुम्ही काय म्हणता?

सौ. प्राची शैलेश दामले म्हणाले...

फार अभ्यासपूर्ण लेख आहे हा. आपले त्याबद्दल अभिनंदन.