२०१४-११-१७

ओंकारेश्वर प्रवासवर्णन-एकूण ४ पैकी १-उज्जयिनी



उज्जयिनी, इंदौर, मांडू, महेश्वर आणि ओंकारेश्वरचे पर्यटन करावे असे कधीचेच मनात होते. मात्र संधी मिळत असे तेव्हा तिथे जाण्यास अनुकूल ऋतूमान नसे.

अनुकूल ऋतूमान निवडावे कसे ह्याकरता त्या ठिकाणांच्या हवामानचित्रांची मदत घेता येऊ शकते. लगतचे प्रकाशचित्र पाहा [१].

इंदौर आणि आसपासच्या प्रदेशात दिवसाचे तापमान नेहमीच अतिशय जास्त असते. ते कमी असण्याचा काळ पावसाळ्याच्या आसपासचा असतो. तिथले रात्रीचे तापमान नेहमीच खूप कमी असते. दिवसाच्या आणि रात्रीच्या तापमानातील फरक सुमारे १५ अंश सेल्शसचा असतो. म्हणून पाऊस पुरेसा घटल्यावर आणि रात्रीचे तापमान अगदी १० अंश सेल्शस पर्यंत उतरण्याच्या आतच म्हणजे नोव्हेंबरात तिथले ऋतूमान सुखकर असते. नंतर पुन्हा दिवसाचे तापमान फारसे वाढण्यापूर्वी म्हणजे फेब्रुवारीतही सोयीस्कर ऋतूमान असते.

आम्ही ह्या नोव्हेंबरच्या सुरूवातीस तिथे जाण्याचा निर्णय घेतला. इंदौरच्या पर्यटन वर्तुळातील ही ठिकाणे पाहायची तर निरनिराळ्या प्रकारे कार्यक्रम आखले जाऊ शकतात. ज्यांना स्थलदर्शन करत असतांनाच, वातानुकूलित स्वयंचलित वाहनांतील प्रवासही हवाहवासा वाटतो, त्रासदायक वाटत नाही, असे अनेकजण इंदौरला एकाच-जागी-राहणे पसंत करतात. तिथूनच एक दिवस उज्जयिनीला, एक दिवस मांडूला, एक दिवस महेश्वरला आणि एक दिवस ओंकारेश्वरला जाऊन परत येत असतात. ह्यात एकाच जागी राहणे होत असल्याने खाण्यापिण्याची, राहण्याची, सामानाची उत्तम सोय अनुभवता येते. पर्यटन संयोजकांच्या सोयीचा असा हा कार्यक्रम असतो. शहरात निवास ठेवल्याने पर्यटकाकडून शहरी दराने निवासखर्च वसूल करता येतो. वातानुकूलित स्वयंचलित वाहनांतील प्रवासही भरपूर होत असल्याने त्या गाड्यांच्या मालकांचाही भरपूर लाभ होत असतो.

किमान-निव्वळ-प्रवास करायचा तर मुंबईकडून येतांना उज्जयिनीसच उतरावे. दर्शनाच्या जागेवर मुक्काम हलवत न्यावे. परततांना इंदौरहून मुंबईकरता गाडी धरावी. ह्यामुळे पर्यटन स्थळावर प्रत्यक्ष निवास करण्याचा आनंद लाभू शकतो. निव्वळ प्रवास किमान राहून, पर्यटनास-लाभलेल्या-वेळेचा-इष्टतम-सदुपयोग होऊ शकतो. जास्तीत-जास्त-पर्यटन-कमीत-कमी-खर्चात होऊ शकते. आम्ही हेच धोरण पत्करले होते.

भारतातील असंख्य लोहमार्ग स्थानकांवर विश्रामकक्ष (रिटायरिंग रूम्स) आहेत. अतिशय वाजवी दरात ते प्रवासाच्या दोन दिवस आधीपासून तर प्रवासाच्या दोन दिवस नंतर पर्यंतच, रहिवासाकरता मिळू शकतात. वैध तिकिटाने प्रवास करणार्‍या प्रवाशासच केवळ ते उपलब्ध असतात. ह्या कारणानेच एवढ्या वाजवी दरात लोहमार्ग व्यवस्थापन ते आपल्याला उपलब्ध करून देऊ शकत असतात. एरव्ही मागणी अफाट वाढून, त्यांचे भाडे वाढविणे अत्यंत निकडीचे झाले असते. लोहमार्ग प्रवास करणार्‍याने निवासाकरता नक्कीच विचारात घ्यावा असा हा पर्याय आहे. आम्ही मात्र ह्यापूर्वी हा पर्याय कधीही वापरलेला नव्हता. ह्यावेळी मात्र तो वापरून प्रत्यक्ष अनुभव घ्यावा असा निर्णय घेतला. मुंबईहून आम्ही उज्जयिनी स्थानकावर उतरलो त्या दिवसाकरता, त्या स्थानकावरील विश्रामकक्ष आम्ही सुमारे रु.४००/- दरदिवस दराने आरक्षितही केला. आय.आर.सी.टी.सी.च्या संकेतस्थळावर तशी सोय आहे. लोहमार्गप्रवासाप्रमाणेच ह्या आरक्षणासही रद्द करण्याबाबत निश्चितस्वरूपाचे धोरणही आहे.

उज्जयिनीचे लोहमार्ग स्थानक! इथूनच आमच्या प्रवासाला सुरूवात झाली. पहिल्या मजल्यावरील डाव्या हाताच्या ओवरीत इथले विश्रामकक्ष आहेत. स्थलदर्शनाचे दृष्टीने ही जागा, शहरात मध्यवर्ती असून अत्यंत सोयीची आहे. सुरक्षित आहे. इथला प्रशासकीय व स्वच्छतेबाबतचा अनुभव फारसा वाखाणण्यासारखा नाही. एकूणातच असलेल्या सरकारी अनास्थेचा तो भाग आहे. मात्र त्याकरता हा पर्याय अव्हेरावा एवढा तो मुद्दा सशक्त नाही.



उज्जयिनीला महांकालेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले. इथे कुठलेही सामान, पर्स, मोबाईल, कॅमेरे आत नेऊ देत नाहीत. १५१ रुपयांचे विशेष दर्शन करणार्‍यांना मूळ रांगेत बरेच पुढे सोडले जाते, तसेच त्यांचे सामान ठेवण्याकरता एक कप्पाही कुलूप-किल्लीसहित मोफत पुरवला जातो. आम्ही हाच पर्याय निवडला. ह्या मंदिरात मात्र सुरूवातीपासून तर बाहेर पडेपर्यंत व नंतरही पंडे पिच्छा पुरवतात. त्यांच्यापासून होता होईस्तोवर दूरच राहावे. बडा गणपती मंदिरातही गणेशाचे दर्शन घेतले. मग आम्ही हरिसिद्धी मंदिरात गेलो. ही सर्व मंदिरे एकाच परिसरात आहेत. हरिसिद्धी मंदिराच्या प्रवेशद्वारावर कुठल्याशा उत्सवाच्या निमित्ताने पूर्ण रुंदीची, फुलांच्या माळांची झालर घातलेली होती. त्यातही हरिसिद्धीची मूर्ती साकारलेली असल्याने सुंदर देखावा दृष्टीस पडला.



हरिसिद्धी मंदिराच्या बाजूलाच, सम्राट वीर विक्रमादित्याच्या नवरत्नदरबारातील नऊ रत्नांच्या भव्य तस्विरी टांगलेले एक लांबलचक भव्य दालन पर्यटकांना खुले आहे. तिथे आम्हाला कोशकार अमरसिंह, संस्कृत वैय्याकरणी वररुची, विख्यात वैद्य धन्वंतरी, महान-वास्तुविशारद शंकू, कविकुलगुरू महाकवी कालिदास, यमक-काव्य-शिरोमणी घटकर्पर, महान-ज्योतिर्विद-वराहमिहीर, थोर- खगोल-शास्त्रज्ञ-क्षपणक आणि बेताल भट्ट नावाचा विख्यात-जादुगार अशा नवरत्नांची ओळख झाली. हा बेताल भट्ट म्हणजेच "विक्रम और वेताल" मधला वेताळ असावा. तो लक्ष्यार्थाने राजाच्या मानगुटीवर बसून न्याय्य मागण्यांची तड लावत असे. घटकर्पर याने २२ कडव्यांचे एक प्रसिद्ध यमक काव्य लिहिले आणि जाहीर केले की, याहून सरस यमक काव्य जो लिहील त्याचे घरी घटकर्पर फुटक्या मडक्याच्या खापराने पाणी भरेल. म्हणूनच त्याचे नाव घटकर्पर पडले.



ह्यानंतर आम्ही भर्तृहरी गुहेकडे गेलो. इसवीसनपूर्व ५५४ मध्ये महाराज गंधर्वसेन (वीरसेन), उज्जयिनी नगरीत राज्य करत असत. त्यांना दोन राण्या होत्या. सुशीला नावाच्या राणीपासून त्यांना भर्तृहरी नावाचा मुलगा झाला. दुसर्‍या राणीपासून विक्रमादित्य नावाचा मुलगा झाला. हा राजा-विक्रमादित्य, पराक्रमी, शककर्ता होता. आपण काल-गणनेकरता जे विक्रमसंवत अनुसरत असतो त्या शकाचा कर्ता तोच आहे. राजा विक्रमादित्याचा नवरत्न दरबार होता. त्यातच कालिदास, अमरसिंह इत्यादींचाही समावेश होता. भर्तृहरीस, विक्रमादित्य आणि सुभटवीर्य हे दोन धाकटे भाऊ होते. त्यांच्या बहिणीचे नाव मैनावती होते. मैनावतीचा मुलगा गोपीचंद हा पुढे जाऊन नाथ पंथातील साधू झाला. उज्जयिनीमध्ये भर्तृहरीगुहे नजीकच गोपीचंदाची गुहादेखील आहे.



भर्तृहरी भविष्यात मोठा योगी होईल असे भविष्य वर्तवले गेले. राजपुत्र मोठा झाला. सर्व विद्यापारंगत झाला. कलानिपूण झाला. महाराज गंधर्वसेनांचा भर्तृहरी हा मोठा मुलगा असल्याने, त्यांच्या पश्चात, वयाच्या सोळाव्या वर्षी त्यास राज्याभिषेक झाला. भर्तृहरीला दोन राण्या होत्या. त्यानंतर त्याचा मगधदेशाची राजकन्या पद्माक्षी हिचेशी विवाह झाला. तिचे नाव पिंगला ठेवले. पिंगला अतिशय सुंदर होती. तिच्या प्रेमपाशांत भर्तृहरी बुडून गेला.

राजा भर्तृहरी रसिक कवी होता. थोर मुत्सद्दी होता. कुशल प्रशासक होता. मात्र राणी पिंगलेच्या प्रेमात बुडून गेल्याने तो देहभान विसरला. राज्यकारभारात त्याचे मन रमेना. त्याने राज्यकारभार विक्रमादित्यावर सोपवला आणि नवयौवनाच्या सर्व शृंगारसुखांचा मनःपूत आस्वाद घेऊ लागला. कलासक्त कवी आणि संस्कृत भाषा पंडित असल्याने, शृंगाराच्या रसास्वादावर त्या कालावधीत त्याने शंभर सुरेख कवने रचली. शृंगाराचे यथातथ्य आणि सुरस वर्णन करणार्‍या ह्या काव्याचा प्रभाव, आजही सर्व भारतभर विद्यमान आहे. अनेक लेखन विवरणांतून भर्तृहरीच्या काव्याचे संदर्भ नेहमीच दिले जात असतात. संस्कृत वाङमयात, छंदशास्त्रावरील कविकुलगुरू महाकवी कालिदासाचा “श्रुतबोध” हा ग्रंथ विख्यात आहे. श्रुतबोधात वर्णिलेल्या वृत्तांत बांधलेल्या काव्याचे दाखले मात्र, भर्तृहरीच्या काव्यातूनच सहजगत्या उपलब्ध होत असतात. त्याच्या काव्याचा एक सरस दाखला खाली दिलेला आहे.

क्वचित्सुभ्रूभङ्गैः क्वचिदपि च लज्जापरिणतैः ।
क्वचिद् भीतित्रस्तैः क्वचिदपि च लीलाविलसितैः ॥
नवोढानामेभिर्वदनकमलैर्नेत्रचलितैः ।
स्फुरन्नीलाब्जानां प्रकरपरिपूर्णा इव दिशः ॥ -शिखरिणी, श्रुंगारशतक-४, राजा भर्तृहरी, इ.स.पू.५५४

म्हणजेः

कधी भ्रूभंगाने क्वचित कधि लाजून हसता ।
कधी भीतीयोगे क्वचित कधि लीलेत रमता ॥
कुमारींच्या सार्‍या नयन विभ्रमी चित्त हरता ।
असे वाटे सार्‍या उमलत दिशा नीलकमला ॥ - मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०१४१०२३

राजा भर्तृहरी शूर होता. राजाला आपल्या शौर्याचा सार्थ अभिमान होता. एकदा तो उज्जयिनीच्या उत्तरेकडील तोरणमाळ पर्वतावर शिकारीला गेला होता. दिवस मावळतीला आला, तरीही शिकार गवसली नव्हती. निराश होऊन परतत असतांना, त्याला हरणांचा एक प्रचंड मोठा कळपच दृष्टीस पडला. हरिणींना मारण्यात त्याला स्वारस्य नव्हते. त्याने काळवीटाचा वेध घेतला. राजा त्याला घोड्यावर बांधून नेऊ पाहत होता. असंख्य हरिणींचे डोळे तडफडणार्‍या काळवीटावर खिळून राहिले होते. काळवीट असहाय्यतेने मरणास सामोरे जात होता. तिथेच काही अंतरावर गोरखनाथ साधना करत होते. त्यांनी ही घटना पाहिली. त्यांनी राजाला निष्कारण केलेल्या हत्येबाबत दूषण दिले. ते राजाला म्हणाले की, “राजा, तुला ह्या काळवीटाचे प्राण घेण्याचा मुळीच अधिकार नाही. कारण त्याला जीवदान देण्याचे सामर्थ्य तुझ्यापाशी नाही.” मग, गोरखनाथांनी आपल्या विद्येने त्याचे प्राण वाचविले. काळवीट उठून उभा राहिला आणि जंगलात पळून गेला. ही सर्व अद्भूत घटना पाहून, राजा त्यांच्या विद्येच्या प्रभावाने स्तिमित झाला. राजा त्यांचा शिष्य झाला. त्यांना आपले गुरू मानू लागला.

राजा असाच वरचेवर शिकारीला जात असे. अशावेळी, श्रुंगारसुखाच्या आस्वादाला सदैव आसुसलेली राणी पिंगला, सुरक्षादलप्रमुख असलेल्या महिपाल ह्यासच जवळ करू लागली. राजाची शिकार, त्याची प्रेमासक्ती, इत्यादींमुळे राजाचे राज्यकारभाराकडे दुर्लक्ष होऊ लागले. त्या काळात उज्जयिनीस परकीय आक्रमणांचा धोका संभवत होता. विक्रमादित्याने भर्तृहरीला त्याची कल्पनाही दिली. मात्र श्रुंगाररसात आकंठ बुडालेल्या भर्तृहरीस ते रुचले नाही. त्याने विक्रमादित्यासच राज्याबाहेर घालवून दिले.

त्या दरम्यान, उज्जयिनीत एक जयंत नावाचा ब्राम्हण राहत असे. त्याने केलेल्या तपःसाधनेच्या फलस्वरूप, त्याला एक दिव्य फळ प्राप्त झाले होते. त्या फळाचे सेवन केले असता, सेवन करणारा मनुष्य अमर होणार होता. ब्राम्हणाने विचार केला की, मी अमर होऊन कुणाचे भले होणार? त्यापेक्षा राजा अमर झाला तर त्यामुळे प्रजेचे भले होईल. म्हणून राजदरबारात जाऊन त्याने ते फळ राजास अर्पण केले. राजाचे राणी पिंगलेवर अपार प्रेम होते. त्याला असे वाटे की, राणी पिंगला जर अशीच चिरतरूण राहिली, तरच आपल्याला खरा सुखोपभोग संभव आहे. म्हणून त्याने ते फळ राणी पिंगलेला दिले. राजाच्या अनुपस्थितीत राणीने असा विचार केला की, आपल्याला खरे सुख महिपालाकडूनच मिळत असते. तेव्हा तोच जर चिरतरूण राहिला तर आपल्याला खरे सुख दीर्घकाळ लाभू शकेल. म्हणून तिने ते फळ महिपालाला दिले. महिपालाचे लाखा नावाच्या एका राजनर्तिकेवर मन जडले होते. त्याने असा विचार केला की आपल्याला जर चिरसौख्य हवे असेल तर, राजनर्तकी चिरतरूण रहायला हवी. म्हणून त्याने ते फळ तिला दिले. राजनर्तिकेला असे वाटत होते की, एका राजनर्तिकेने चिरतरूण होऊन काय साधणार, त्यापेक्षा राजा चिरतरूण झाल्यास सार्‍याच प्रजेला दीर्घकाळ सुखात ठेवेल. म्हणून एक दिवस राजदरबारात येऊन ते दिव्य फळ तिने राजास अर्पण केले. राजाने ते दिव्य फळ ओळखले. फळाच्या प्रवासाची हकिकत त्याने शोधून काढली आणि तो सुन्न झाला. त्याला वाटत होते की राणी पिंगलेचे त्याच्यावर अपार प्रेम आहे. प्रत्यक्ष राजाची राणी असलेल्या पिंगलेने, महिपालावर प्रेम करावे ह्या वास्तवाने, त्याला वैराग्य प्राप्त झाले. ताबडतोब, म्हणजे वयाच्या सतराव्या वर्षी, त्याने विक्रमादित्यास पाचारण करून, राज्य त्याचे सुपूर्त केले आणि संसारत्याग करून तो चालता झाला.

राजाचे वैराग्य पराकोटीचे होते. गुरू गोरखनाथांपाशी त्याने संन्यास घेण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी त्याकरता आसक्तीचा संपूर्ण त्याग करणे आवश्यक असल्याचे सांगितले आणि त्याच्या वैराग्याची परीक्षा घेण्याकरता, त्याला राणी पिंगलेकडून भिक्षा मागून आणण्यास सांगितले. राजाने तेही केले. “भिक्षा दे, माते पिंगले!” अशी त्याने भिक्षा मागितली. राणीच्या अविरत विलापानेही तो मुळीच द्रवला नाही. योगचर्या पत्करण्याच्या त्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची, राणी पिंगलेची विनंती त्याने फेटाळून लावली. नंतर त्याने उज्जयिनी नगरीबाहेरील क्षिप्रा नदीच्या किनार्‍यावरील गुहेत बारा वर्षे तपश्चर्या केली. नाथपंथाच्या “वैराग्य ऊर्फ बैरागी” उपपंथाची त्याने स्थापना केली. पराकोटीच्या वैराग्याचे स्वतःचे अनुभवही, त्याने श्रुंगाराच्या अनुभवांप्रमाणेच काव्यात रचून ठेवले. ते काव्यही जनमानसात अजरामर झाले. त्या शंभर कवनांना वैराग्यशतक म्हणून ओळखले जाते. त्या सुरस काव्याची मोहिनी, भारतीय तत्त्वज्ञानावरील त्यानंतरच्या सर्वच रचनांवर पडलेली आहे. उदाहरणार्थ पुढील वर्णन पाहा. त्यातील “कालाय तस्मै नमः” हा शब्दसमूह तर मराठी, हिंदी आणि संस्कृत साहित्यातील वाक्प्रचारच बनून राहिला आहे.

सा रम्या नगरी महान्स नृपतिः सामन्तचक्रं च तत् ।
पार्श्वे तस्य च सा विदग्धपरिषत्ताश्चन्द्रबिम्बाननाः ॥
उद्वृत्तः स च राजपुत्रनिवहस्ते बन्दिनस्ताः कथाः ।
सर्वं यस्य वशादगात्स्मृतिपथं कालाय तस्मै नमः ॥ शार्दुलविक्रीडित, वैराग्यशतक-३९

म्हणजेः

ती माया नगरी, महान नृपती, मंत्रीहि सारे तसे ।
ती विद्वानसभा, तशाच ललना तेथील चंद्रानना ॥
तो गर्वोन्नत राजपुत्र, सगळे ते भाट, त्यांच्या कथा ।
हे ज्याचे कृतिने, स्मृतीत पुरले, काळा नमस्कार त्या ॥ - मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०१४१०२३

उत्तर आयुष्यात राजा, राजस्थानातील अलवार गावानजीक राहत असे. आजही तिथे राजा भर्तृहरीची समाधी आणि मंदिर आहे. तिथे पाण्याचे कायमच दुर्भिक्ष्य असे. आसपासच्या लोकांना राजास प्राप्त असलेल्या अद्भूत सिद्धी माहीत होत्या. त्यांनी त्यास, पाणी मिळवून देण्याची विनंती केली. आपल्या अलौकिक सिद्धीचा वापर करून राजाने पत्थरातून निर्झर उत्पन्न केले. राजस्थानातील लोककथांतून भर्तृहरीच्या असंख्य कहाण्या शतकानुशतके गायिल्या जात आहेत. उत्तर आयुष्यातील समृद्ध अनुभवांच्या आधारे, राजाने, जगात कसे वागावे ह्याचे सुरेख उद्बोधन शंभर कवितांत करून ठेवले आहे. ह्या शंभर कवनांना नीतीशतक म्हटले जाते. नीतीशतकांतील काव्य, भारतीय संस्कृतीत एखाद्या चमचमत्या तेजस्वी तार्‍याप्रमाणे कायमच तळपत आलेले आहे. उदाहरणार्थ पुढील कवनात तर त्याच्या स्वतःच्या जीविताचे सारच जणू भर्तृहरीने काव्यात गुंफून ठेवले आहे. एवढेच नव्हे तर सामाजिकदृष्ट्या ते निंदनीय आहे असे सांगून, अशा वर्तनांचा धिक्कारही केला आहे.

यां चिन्तयामि सततं मयि सा विरक्ता ।
साप्यन्यमिच्छति जनं स जनोऽन्यसक्तः ॥
अस्मत्कृते च परिशुष्यति काचिदन्या ।
धिक् तां च तं च मदनं च इमां च मां च ॥ - वसंततिलका नीतिशतक-२, राजा भर्तृहरी, इसवीसनपूर्व ५५४ वर्षे

म्हणजे:

मी जीस चिंतीत असे, न रुचे तिला मी ।
जो आवडे तीस, तयास रुचे परस्त्री ॥
तो आवडे ना परस्त्रीस, मला वरे ती ।
धिक्‌ तीस, त्यास, मदनास, हिला, मलाही ॥ मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०१४१०२३

राजाचे अनुभव अत्यंत समृद्ध होते. त्याची भाषा अतिशय श्रीमंत होती. अनुभवांचे सार काव्यबद्ध करून ठेवत असतांना त्याला भाषेची रंगत उमगली. त्याने संस्कृत भाषेच्या व्याकरणावर “वाक्यपदीय” ह्या नावाचा अलौकिक ग्रंथ रचला. त्यातील “स्फोट” सिद्धांताने, त्यानंतरच्या संस्कृत भाषारचनांवरील सर्व ग्रंथांत मानाचे स्थान मिळवले आहे. तोंडातून फुटणार्‍या अविभाज्य उच्चारांचे “वर्ण” असे वर्णन करण्याची संकल्पना ह्याच सिद्धांताचा भाग आहे.

राजा भर्तृहरी उज्जयिनीचा राजा असला तरीही, सर्व भारतभर तो लोककथांतून अजरामर झालेला आहे. दक्षिण भारतात भर्तृहरीकथांचे निरूपण केले जाते. उत्तर भारतात त्याच्या विचारांचा सन्मान केला जातो. त्याच्या उज्जयिनीत, लोकांच्या व्यवहारात त्याच्या शतक काव्यांची अमिट छाप पडलेली दिसून येते. तर त्याचे कर्तृत्वक्षेत्र असलेल्या राजस्थानात आजही, त्याच्या नावे यात्रा भरतात, मंदिरे घडविली जातात, आणि लोकगीतांच्या माध्यमातून त्याची शिकवण लोकमानसावर संस्कार करत असते. राजा भर्तृहरीच्या शतकत्रयीने, इतर संस्कृत साहित्यावर सखोल ठसा उमटवला आहे. शतकानुशतके जनमानसावर राज्य केले आहे. अनेक भारतीय भाषांतील वाक्प्रचार आणि म्हणी ह्यांत शतक-त्रयींतील श्लोक अभिव्यक्त झालेले दिसून येतात. उदाहरणार्थ “प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे” हे वाक्यही, वामन पंडितांनी मराठीत अनुवाद केलेल्या भर्तृहरीच्याच एका कवितेचा एक चरण आहे [२].

लभेत सिकतासु तैलमपि यत्नतः पीड्यन्पिबेच्च ।
मृगतृष्णिकासु सलिलं पिपासार्दितः॥
कदाचिदपि पर्यटन्शशविषाणमासादयेन्नतु ।
प्रतिनिविष्टमूर्खजनचित्तमाराधयेत् ॥ - नीतिशतक-५, राजा भर्तृहरी, इसवीसनपूर्व ५५४ वर्षे

म्हणजेः

प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलहि गळे ।
तृषार्ताची तृष्णा मृगजळ पिऊनीही वितळे ॥
सशाचेही लाधे विपिनी फिरता शृंगही जरी ।
परंतु मूर्खाचे हृदय धरवेना पळभरी ॥ - मराठी अनुवादः वामन पंडित, इ.स.१६८० ते १६९५

स्वतः राजा भर्तृहरी मात्र पूर्वसुरींच्या पुण्यप्रभावाने अतिशय प्रभावित झालेला होता. पतंजलि मुनींबाबत तर त्याला विशेष आदर वाटत असे. पुढील कवनातून तो यथार्थपणे अभिव्यक्त होतांना दिसतो.

योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्यच वैद्यकेन ।
योऽपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतंजलिं प्रांजलिरानितोऽस्मि ॥ - राजा भर्तृहरी [३]

म्हणजे, योगाचे साहाय्याने चित्तशुद्धी, पाणिनीच्या सूत्रांवर “महाभाष्य” लिहून वाचाशुद्धी आणि चरक संहितेच्या पुनर्संस्करणाद्वारे वैद्यकाचे आधारे शरीरशुद्धी, ह्यांची साधने उपलब्ध करून देणार्‍या पतंजलि मुनींना, मी अंजलीबद्ध करतो. अशाप्रकारे आपल्या “वाक्यपदीय” ह्या ग्रंथात पतंजलि मुनींबाबत गौरवपर उद्गार काढणार्‍या राजा भर्तृहरीने, पुढे त्यांचाच वारसा चालवला. नाथसंप्रदायात योगसाधना करत असता, “वैराग्य ऊर्फ बैरागी पंथ” स्थापन केला. “वाक्यपदीय” ग्रंथाची रचना करून वाचाशुद्धीचा वसा चालवला. तसेच पत्थरांतून निर्झर निर्माण करून शरीरशुद्धीची साधने सामान्यांना उपलब्ध करून दिली. एवंगुणविशिष्ट राजा भर्तृहरीस सादर प्रणाम!

अशा राजा भर्तृहरीचे तपश्चर्यास्थळ पाहण्याची उत्कंठा मला बर्‍याच काळापासून लागून राहिलेली होती. आता आम्ही तिथे प्रत्यक्षात पोहोचलो होतो. राजा भर्तृहरी आणि गोपीचंद ह्यांच्या गुहा शेजारी शेजारीच आहेत. उज्जयिनी शहराच्या उत्तरेला, क्षिप्रा नदीच्या पूर्व किनार्‍यावर हे ठिकाण आहे. अत्यंत स्वच्छ आणि सुव्यवस्थितपणे राखलेले हे उत्तम पर्यटन स्थळ आहे. कुठल्याही पर्यटकाने त्यास अवश्यमेव भेट द्यावी. वाहनतळापासून लांबलचक छन्नमार्गातून पायर्‍या पायर्‍यांची वाट आपल्याला ह्या गुहांपर्यंत घेऊन जाते. त्यांच्या नजीकच गोरखनाथांचे सुरेख, भव्य मंदिरही आहे.

भर्तृहरी गुहेनजीकच्या गोरखनाथ मंदिरातील गोरखनाथांची आणि मच्छिंद्रनाथांची मूर्ती

गुरूशिखरावर वाहणार्‍या वार्‍याचे वर्णन गोरखनाथांनी “पवनही भोग, पवनही योग, पवनही हरे छत्तीसो रोग” असे केले होते. ते म्हणतात तसा वारा वाहत असणारी सिद्धकाली मंदिराची टेकडी आम्ही त्या दिवशी संध्याकाळीच पाहिली. हे मंदिर पश्चिम इंदौरमध्ये विमानतळ रस्त्यावर आहे. आतापुरता मात्र आम्ही मंगळनाथ मंदिराच्या दिशेने मोर्चा वळवला. उज्जयिनी शहराच्या उत्तरेकडील टोकास हे मंदिर आहे. ह्या ठिकाणास मंगळ ग्रहाचे जन्मस्थान मानले जाते. कर्कवृत्ताची रेषा ह्या ठिकाणातून पार होते असे म्हणतात. शिरावर पोवळ्याच्या रंगाचा खडा जडवलेल्या शिवलिंगाच्या स्वरूपातील मंगळाचे इथे पूजन केले जाते. नंतर आम्ही परतीच्या वाटेवर सांदिपनी ऋषींच्या आश्रमास भेट दिली. बलराम, कृष्ण आणि सुदामा ह्यांचे हे गुरूकूल. त्याकाळी उज्जयिनी उपाख्य अवन्ति नगरी शिक्षणाकरता विख्यात होती.


मंगळनाथ मंदिर आणि सांदिपनी आश्रम

मात्र आता दुपारचा दीड वाजत आलेला होता. जेवायची वेळ होत होती. आम्ही उज्जयिनी स्थानकासमोरच्या न्यू सुदामा रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलो. रुचकर आलुपराठा-दही, जिरा-राईस आणि रस-मलाईचा आस्वाद घेऊन आम्ही आमच्या सकाळच्या स्थलदर्शनाचा समारोप केला.

संदर्भः

१. इंदौरचे हवामानचित्र
२. भर्तृहरीकृत सार्थ श्रुंगारशतक, वैराग्यशतक आणि नीतीशतक, वामन पंडितांनी केलेल्या मराठी पद्य अनुवादासहित; वरदा प्रकाशन, सप्टेंबर २००५, किंमत प्रत्येकी रु.२५/- फक्त.
३. भारतीय मानसशास्त्र अथवा सार्थ आणि सविवरण पातंजल योगदर्शन, योगाचार्य कृष्णाजी केशव कोल्हटकर, आदित्य प्रतिष्ठान प्रकाशन, प्रथम आवृत्तीः १८-०२-२००४, प्रस्तुत तृतीय आवृत्ती: १४-०१-२००७, देणगी मूल्य केवळ रु.५००/-.

ओंकारेश्वर प्रवासवर्णन-एकूण ४ पैकी १-उज्जयिनी
ओंकारेश्वर प्रवासवर्णन-एकूण ४ पैकी २-इंदौर, महेश्वर
ओंकारेश्वर प्रवासवर्णन-एकूण ४ पैकी ३-मांडू, ओंकारेश्वर
ओंकारेश्वर प्रवासवर्णन-एकूण ४ पैकी ४-ओंकारेश्वर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: