अनुदिनीचा दुवा: http://ase-vatate-ki.blogspot.com/
अनुदिनीकाराचे नावः सचिन जाधव
अनुदिनी अनुसरणार्यांची संख्याः ६६
अनुदिनीची एकूण वाचकसंख्या:
२४,३१०
अनुदिनीची सुरूवातः जून २००८ मध्ये झाली.
अनुदिनीतील नोंदीः या अनुदिनीत २००९ सालच्या १३
नोंदी, २०१० सालच्या ९ नोंदी, २०११ सालच्या १३ नोंदी, २०१२ सालच्या ६ नोंदी आणि
२०१३ सालच्या २ नोंदी; अशा एकूण ४३ नोंदी आहेत.
अनुदिनीकाराचा परिचयः अनुदिनीकार स्वतःचा परिचय “मी- आळश्यांचा राजा. हिंदी भाषिक मित्र मला गधा म्हणतात. जवळचे मित्र मूर्ख म्हणतात. आई मायेने
गधडा म्हणते. वडिलांच्या मते मी वाया गेलेलो
आहे. बायकोला वाटते ती फसली आहे. माझ्या पोराला वाटते मी त्याच्यापेक्षा लहान आहे. अनोळखी लोकांना मी 'शाणा'
वाटतो. असे
कुणाच्यात एकमत नसल्यामुळे मी
स्वतःविषयी काय सांगावे हा कठीण प्रश्न आहे.” अशाप्रकारे करून देतात.
मात्र त्यांच्या
लेखनातून परिचय होतो तो एका, संपन्न अनुभवांवर आधारित, प्रच्छन्न अभिव्यक्तीने सजलेल्या अनुदिनीचा. भारतीय प्रशासकीय सेवेत निम्नतम स्तरावर
प्रत्यक्ष कार्यरत असतांना, एखाद्या व्यक्तीने अनुदिनी लिहावी ही गोष्टच मुळात
अभूतपूर्व आहे. दैनंदिन प्रशासकीय जीवनात मिळत असणार्या नित्यनूतन अनुभवांचे सार
शब्दबद्ध करणार्या एका अधिकार्याचे हे विचारतरंग मुळातच वाचायला हवेत असे चित्तवेधक
आहेत.
अनुदिनीच्या सुरूवातीसच, एका युद्धपटाचे रसग्रहण केलेले सापडते. चारित्र्य आणि
नेतृत्वाची कहाणी असलेला ’दि ब्रिज ऑन दि रिवर क्वाइ’ हाच तो १९५७ सालचा, ब्रिटीश दिग्दर्शक
डेविड लीन यांचा गाजलेला युद्धपट. कथा काल्पनिक असली तरी १९४२ साली दुसर्या महायुद्धाच्या
दरम्यान घडलेल्या हकिकतींवर आधारित आहे. ठरल्याप्रमाणे सर्व अडचणींवर मात करून ब्रिटिश
सैनिक पूल वेळेत पूर्ण करतात. मात्र ’सिनेमा एवढाच नाही.
तो मुळातूनच बघण्याचा विषय आहे. चारित्र्य आणि नेतृत्व यांचे इतके सुंदर चित्रण करणारा
सिनेमा मी आजवर पाहिला नव्हता.’ हे लेखकाचे अखेरचे भाष्यही मूळ लेखाप्रती उत्सुकता
जागृत करण्यास पुरेसे आहे.
’भारतीय इतिहासातील सुवर्णयुगः एक प्रश्नचिन्ह’ ह्या तीन लेखांच्या मालिकेत भारतीय
इतिहासातील सुवर्णयुगावर एक प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहे. काय आहे तो प्रश्न?
लेखक म्हणतात, हे खरेच सुवर्णयुग होते का?, “कोणत्याही काळाचे
मूल्यमापन त्याकाळानंतरच्या काळात काय घडते यावरूनच करायला हवे. आपले सुवर्णयुग या
कसोटीवर दुर्दैवाने उतरत नाही. आपल्याला केवळ राजकीय पारतंत्र्यच आले नाही, तर सर्व क्षेत्रात आपण जिथे पोचलो होतो तिथेच थांबलो. एवढेच
नाही, तर आपण ते सर्व विसरूनही गेलो! अगदी अलीकडच्या काळातल्या विजयनगरचीसुद्धा
साहेबाने ‘फ़रगॉटन एम्पायर’ लिहीपर्यंत आपल्याला आठवण आली नाही. कडवट सत्य हे
आहे, की अगदी आजही आपले राजकारण आणि समाजकारणाच्या सर्व अंगांत नेतृत्त्वाचा
जो अभाव दिसतो आहे त्य़ाचा अर्थ हाच होतो की आपण अजूनही एक ‘मढे’ आहोत.”
त्यानंतरचे स्मशानानुभव ह्या नावाचे दोन लेख आपल्याला एका वेगळ्याच
अनुभवविश्वातून फेरफटका घडवून आणतात.
मग येतात प्रांतांच्या गोष्टी. भारतीय प्रशासकीय सेवेची तोंडओळख ह्या
निमित्ताने आपल्याला होत जाते. ह्या व्यवस्थेद्वारे भारतीय जनतेस प्रत्यक्षात काय
हाती लागते आहे, त्याची ’शितावरून भाताची परीक्षा’ करायची झाली तर, त्याकरता
लागणारे शितांचे नमुने इथे पेश केलेले आढळून येतात.
लेखक लिहितात, “जिल्हा प्रशासनामध्ये दोन प्रमुख उतरंडी असतात. राज्या राज्यांनुसार थोडे फरक
असतात.
१. विकास उतरंडः कलेक्टर – पीडी(डीआरडीए)/ अध्यक्ष जि.प. – बीडीओ/ सभापती पंचायत समिती – पीइओ/ सरपंच, पीडी(डीआरडीए) – प्रोजेक्ट डायरेक्टर (डिस्ट्रिक्ट रुरल डेव्हलपमेंट
एजन्सी) (महाराष्ट्रात सीइओ असतात, पीडी पेक्षा रॅंक आणि जबाबदारीने वरचे पद); बीडीओ – ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर; पीइओ - पंचायत एक्स्टेन्शन ऑफिसर (महाराष्ट्रात ग्रामसेवक असतात.).
२. महसूल उतरंडः कलेक्टर (जिल्हाधिकारी/ जिल्लापाळ) – सबकलेक्टर (उपजिल्हाधिकारी/ उपजिल्लापाळ -
प्रांत) – तहसीलदार – रेव्हेन्यू इन्स्पेक्टर. (रेव्हेन्यू इन्स्पेक्टर हा साधारणपणे पन्नास साठ
गावे पाहतो. जमिनीचे सर्व कागद याच्या ताब्यात असतात सरकारची शेवटची
कडी. पृथ्वीवरचा सर्वात महत्त्वाचा माणूस! आपल्याकडे जसा तलाठी!)
विशेष टिप्पणी! आमदार/ खासदार/ लोकनियुक्त प्रतिनिधी यात नेमके कुठे येतात हे
सूज्ञांना वेगळे सांगायला नकोच. माझ्या मते ते ‘नेमके’ कुठेच नसतात, दुधात
मिसळलेल्या साखरेसारखे/ मिठाच्या खड्याप्रमाणे सर्वव्यापी असतात! त्यांच्या
चवीनुसार व्यवस्था नीट काम करते किंवा फेफरे आल्यासारखी वागून आपली वाट लावते.”
’प्रांतांच्या गोष्टी’ ह्या नऊ लेखांत, प्रत्यक्षात घडल्या असाव्यात अशा सुरस
गोष्टी वाचायला मिळतात. आपले प्रबोधनही होत जाते आणि प्रचलित प्रशासन
प्रणालीबाबतचे आकलनही सोबतच प्रगल्भ होत जाते. हे सर्व लेख मी सर्वप्रथम मिसळपाव डॉट कॉमवरच वाचलेले
होते.
मग आहे ’गोटिपुअ’ ह्या उडिया नृत्यप्रकाराचे सुंदर रसग्रहण. त्याची पूर्वपीठिका
आणि सुरस माहिती.
त्यानंतर ’अरुंधती रॉय (आणि तत्सम)’ ह्या दोन लेखांत नक्षलवादाच्या प्रश्नावर
केलेले सुरेख प्रबोधन आहे. आपल्याला नक्षलवाद मुळात आहे काय? त्यावर उपाय काय आणि
अपाय कोण आणि कसा करत आहेत ह्याची रोचक वर्णने इथे वाचायला मिळतील. ह्याच
विषयावरला ’नक्षलवादाच्या निमित्ताने’ हा लेखही उद्बोधक आहे.
’महसूल वार्ता’ नावाचा एक उपरोधिक लेख इंद्राच्या एका पार्टीचे सुरस वर्णन
करतो.
’रथजात्रा’ ह्या लेखात जगप्रसिद्ध जगन्नाथाच्या यात्रेचे अपूर्व वर्णन सापडते.
ते तर अत्यंत वाचनीय असेच आहे. उडिया भाषा कशी आळशांची भाषा आहे हे समजावून
देतांना, त्यांनी केलेले उडिया भाषेचे वर्णन ’माझी उडिया’ ह्या लेखात आहे. ते लिहितात
की, ’माझ्या हिंदी मित्रांना आश्चर्य वाटते की मी इथल्यासारखेच उच्चार कसे काय करू
शकतो. पण त्यांना काय माहीत की मी आळश्यांचा राजा आहे, आणि ही माझीच भाषा आहे !’
लेखकाच्या सिद्धहस्त लेखणीतून आणखीही बरेच वाचायला आवडावे अशी स्थिती असतांना,
लेखकास मात्र हल्ली वेळ फावत नसावा असेच दिसते. इतिहास लिहून ठेवणारी लेखणी,
इतिहास घडविण्यात रममाण होत असेल तर ते वावगे तरी कसे म्हणावे?
लेखकास, जग पाहण्याची एक दृष्टी आहे. तारुण्य आहे. सत्ता आहे.
सामर्थ्य आहे. या सगळ्यांचा सृजनात्मक
वापर करण्याची उमेदही लेखकाचे अंतरात स्फुरो हीच प्रार्थना.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा