२०१३-०७-१३

पहिल्या अणुस्फोटक-प्रकल्पाचा मुख्याधिकारीः जनरल लेस्ली ग्रुव्हज

पहिल्या अणुस्फोटक-प्रकल्पाचा मुख्याधिकारीः जनरल लेस्ली ग्रुव्हज
(१७ ऑगस्ट १८९६ ते १३ जुलै १९७०)

आज १३ जुलै २०१३. बरोब्बर ४३ वर्षांपूर्वी, म्हणजे १३ जुलै १९७० रोजी, वॉशिंग्टन येथे, जनरल लेस्ली ग्रुव्हज ह्यांचा मृत्यू झाला होता. इथे हे नमूद करावे लागेल की, दुसर्‍या महायुद्धाचा अंत करणारी अणुस्फोटके ज्या प्रकल्पाद्वारे निर्मिण्यात आली होती, त्या मॅनहटन प्रकल्पाचे ते मुख्य अधिकारी होते. यानिमित्ताने आज, इथे त्यांचा अल्प परिचय आपण करून घेऊ.

लेस्ली ग्रुव्हज ह्यांचा जन्म, अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील अल्बनी राज्यात, १७ ऑगस्ट १८९६ मध्ये झाला. ते एका प्रेस्बिटेरिअन मंत्र्यांचे सुपुत्र होते. त्यांनी वॉशिंग्टन विद्यापीठात आणि मॅसॅचुसेटस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये शिक्षण घेतले होते. १९१८ मध्ये ते, वेस्ट-पॉईंट-मिलिटरी-अकादमी मधून स्नातक झाले. दुसर्‍या महायुद्धापर्यंत ते कर्नल पदापर्यंत पोहोचलेले होते. १९४२ मध्ये त्यांना ब्रिगेडिअर जनरल पदावर बढती मिळाली आणि मॅनहटन प्रकल्पाच्या प्रमुख पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली.

ग्रुव्हज ह्यानीच युरेनियमची खरेदी आणि लॉस अलामॉस ह्या स्थानाची निवडही केलेली होती. त्यांनीच ह्या प्रकल्पाकरता; रॉबर्ट ओपेनहॅमर (अमेरिका), डेव्हिड बोहम (अमेरिका), लिओ झिलार्ड (हंगेरी), युजिन विग्नर (हंगेरी), रुडॉल्फ पेईर्ल्स (जर्मनी), ऑट्टो फ्रिश्च (जर्मनी), फेलिक्स ब्लॉच (स्वित्झर्लँड), निल्स बोहर (डेन्मार्क), जेम्स फ्रँक जर्मनी), जेम्स चाडविक (ब्रिटन), एमिलिओ सेग्रे (इटाली), एन्रिको फर्मी (इटाली), क्लाऊस फुच्स (जर्मनी) आणि एडवर्ड टेलर (हंगेरी) इत्यादी विख्यात शास्त्रज्ञांची नियुक्ती केलेली होती.

अणुस्फोटक वापरायची वेळ येईपर्यंत जर्मनी शरण आलेली होती. लिओ झिलार्ड आणि जेम्स फ्रँक ह्यांनी, नैतिक आधारावर अणुस्फोटकांच्या वापरास विरोध करणारा एक अर्ज, शास्त्रज्ञांमध्ये फिरवला होता. मात्र ग्रुव्हज ह्या मताशी तीव्रतेने असहमत होते. त्यांनी अमेरिकेचे तत्कालीन नवे राष्ट्राध्यक्ष हॅरी एस. ट्रुमन ह्यांना, जपानवर ह्या अणुस्फोटकांचा वापर करण्याचा सल्ला दिला. ६ ऑगस्ट १९४५ रोजी, बी-२९ स्फोटकफेकी विमानाने हिरोशिमावर एक अणुस्फोटक टाकला. असा अंदाज केला गेलेला आहे की, त्यामुळे एका वर्षात सुमारे दोन लक्ष माणसे मृत्युमुखी पडली. जपान ताबडतोब शरण आला नाही. त्यामुळे तीन दिवसांनंतर नागासाकी इथे दुसरा अणुस्फोटक टाकण्यात आला. १० ऑगस्टला जपान शरण आला.

२४ जानेवारी १९४८ रोजी, ग्रुव्ह्ज ह्यांची लेफ्टनंट जनरल पदावर पदोन्नती झाली. लवकरच ते सेवानिवृत्त झाले आणि रेमिंग्टन रँड (कंपनी) चे उपाध्यक्ष झाले. १९६२ मध्ये त्यांनी त्यांच्या आठवणी “आता हे सांगता येईल (नाऊ इट कॅन बी टोल्ड)” ह्या पुस्तकात प्रकाशित केल्या. १३ जुलै १९७० रोजी त्यांचा वॉशिंग्टन येथे मृत्यू झाला.

“आता हे सांगता येईल” मधील मुख्य कहाणी, अमेरिकेच्या इतिहासातील कुठल्याही प्रकरणाप्रमाणेच चित्तथरारक आहे. त्यातील नाट्य, जनरल ग्रुव्हज ह्यांच्या निष्कपटपणा आणि संयमामुळे उंचावले आहे. असे “द न्यूयॉर्क टाईम्स” चे मत पुस्तकाच्या मलपृष्ठावर नोंदवले आहे. पुस्तकाच्या मलपृष्ठावरच, एडवर्ड टेलर ह्यांच्या प्रस्तावनेतून पुढील भागही उद्धृत केलेला आहे.

ग्रुव्हज, नेहमीच लष्करी-सुरक्षा-विभागाचे मूल्य आणि कार्य ह्यांचीच पुष्टी करत असत. किंबहुना त्यांबाबतचा त्यांचा अंदाजही काहिसा अतिरंजितच होता. तरीही, लष्करी-सुरक्षा-विभागाकडून प्राप्त झालेल्या प्रत्येक विपरित सूचनांच्या विरोधात जाऊनही, ग्रुव्हज ह्यांनी शास्त्रीय वैज्ञानिक संचालक म्हणून ओपेनहॅमर ह्यांचीच निवड केली, ह्यात त्यांचा धूर्तपणा स्पष्टपणे व्यक्त होतो. ओपेनहॅमर, प्रयोगशाळेच्या प्रत्येक भागांत काय संशोधन सुरू आहे त्याचा तपशील जाणून होते. ते असंख्य तांत्रिक समस्यांचे विश्लेषण जितके उत्तमरीत्या करत असत, तितकेच मानवी समस्यांचे विश्लेषणही ते उत्तम करत असत. ओपेनहॅमर, नेतृत्व करत आहेत असे वाटूही न देता नेतृत्व करत असत.

ओपेनहॅमर ह्यांची काही कौशल्ये अलीकडच्या बी.बी.सी.च्या निर्मितींमध्ये टिपण्यात आलेली आहेत. मात्र ह्या दूरदर्शन नाटकात, बी.बी.सी.ने अभिव्यक्त केलेले जनरल ग्रुव्हज ह्यांचे दर्शन काहीसे अपुरेच आहे. खरे तर दर्शनाचा विस्तारही काहीसा अपुराच अंदाजिला आहे. हे उघडच आहे की, बी.बी.सी.ने दर्शवलेल्या जनरल ग्रुव्हज सारख्या अल्प बुद्धिमत्तेचा कुणीही, प्रकल्पास अत्यल्प विलंब आणि अडथळा होऊन, प्रकल्पास आवश्यक असलेले निवारे, उपस्कर आणि पदार्थ पुरवण्याची प्रचंड जबाबदारी सांभाळू शकला नसता. मात्र मला हे कबूल करावेच लागेल की, १९४३ ते १९४५ दरम्यान, लेस्ली ग्रुव्हज हे लॉस अलामॉस मधील वैज्ञानिक लोकांत अप्रिय ठरण्याची बहुतेक कुठलीही स्पर्धा जिंकू शकले असते.

’मॅनहटन प्रकल्प’ म्हणून सांकेतिक नाव दिल्या गेलेल्या, लॉस अलामॉस येथील पहिल्या अणुस्फोटकास सज्ज करण्यास, जनरल लेस्ली ग्रुव्हज आणि जे.रॉबर्ट ओपेनहॅमर ही दोन माणसे प्रामुख्याने जबाबदार होती. जो पुढे जाऊन इतिहासातील सर्वात महत्त्वाकांक्षी आणि खर्चिक अभियांत्रिकी महत्कृत्य ठरणार होता, अशा प्रकल्पास मनुष्यबळ आणि सामान पुरविण्यास जबाबदार असलेला मुख्य लष्करी अधिकारी म्हणून, लेस्ली ग्रुव्हज ह्यांनीच, (त्यांच्या डाव्या विचारसरणीच्या इतिहासाची माहिती असूनही) ओपेनहॅमर ह्यांची नियुक्ती केलेली होती. त्यांनीच, आवश्यक ते समृद्ध युरेनियम निष्कर्षित करणार्‍या सुविधेचे नियोजन केले होते आणि त्वरित संशोधन व शस्त्राची जलद निर्मिती ह्यांस कुठलाही अडथळा येऊ नये ह्याचीही निश्चिती केलेली होती. ह्या प्रचंड संकल्पाच्या राजकीय, व्यवस्थापकीय आणि व्यक्तीगत समस्यांची ही कहाणी आहे. जिच्यात, परकीय सरकारे, प्रसिद्धीपूर्व नियंत्रणाबाबतचे संवेदनाक्षम प्रश्न, हॅनफर्ड आणि ओक रीज येथे भव्य संयंत्रांची उभारणी आणि नाझींना त्याची हवाही लागण्यापूर्वीच अणुस्फोटक तयार करण्याची स्पर्धा, इत्यादींचा समावेश होत होता. मॅनहटन प्रकल्पातील लेस्ली ग्रुव्हज ह्यांची भूमिका कायमच विवादास्पद राहिली. लॉस अलामॉस येथे प्रत्यक्ष राहिलेल्या, विख्यात भौतिकशास्त्रज्ञ एडवर्ड टेलर ह्यांनी त्यांच्या नव्या प्रस्तावनेत, जनरल ग्रुव्हज आणि ओपेनहॅमर ह्यांचा सहभाग मोकळेपणाने विशद केला आहे. त्यांच्या दडपण आणणार्‍या प्रचंड कामाच्या वारशावरही टेलर ह्यांनी ह्या पुस्तकात प्रकाश टाकला आहे.

संदर्भः

१. “आता हे सांगता येईल (नाऊ इट कॅन बी टोल्ड)”, मॅनहटन प्रकल्पाची कहाणी, एडवर्ड टेलर यांच्या नव्या परिचयासहित, लेखकः जनरल लेस्ली ग्रूव्हज, प्रकाशकः द कॅपो प्रेस, प्रकाशनकालः १९८३ पृष्ठसंख्याः ४९६, मूळ भाषाः इंग्रजी, सूची किंमतः २० अमेरिकन डॉलर्स.
२. लेखक परिचय http://www.spartacus.schoolnet.co.uk/2WWgroves.htm ह्या दुव्यावरून.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: