२०१३-०३-१२

देखण्या घुबडाची निर्मम हत्या



१८ डिसेंबर २०१२ रोजी सकाळचाच सुमार होता. एकदमच कावळ्यांची काव काव ऐकू येऊ लागली. खिडकीतून पाहतो तर शेजारच्या सोसायटीत स्टिल्टमध्ये एक देखणे घुबड बसलेले. भोवती सात आठ कावळे, काव काव करत त्याची पिसे ओढत होते.

ह्या फोटो नंतर मी अनेक फोटो काढले. त्रस्त झालेले घुबड जागा बदलत उंच उडून जाण्याचा प्रयत्न करत होते. कावळे त्याची पिसे ओढत होते. अखेरीस मी व्हिडीओ शुटिंगच सुरू केले.

मी असाही विचार केला की, निर्मम हत्या पाहत असता, शुटिंग कसले करायचे दळभद्र्यासारखे! त्यापेक्षा त्याला वाचवायला काय हरकत आहे? मग तोही प्रयास केला. पण आपला हस्तक्षेप केवळ त्याला दूर दूर नेऊन सोडतो आहे असे समजून आल्यावर, आणि दूरवरच्या सोसायट्यांत त्याचा पाठलाग करणेही शक्य नसल्याने, घरातूनच कॅमेर्‍याचे साहाय्याने जिथवर शक्य होते तिथवर वेध घेतला. हस्तक्षेप शक्य होत नव्हता.

मला हेही नीटसे कळेना की कावळे त्यावर इतका कडाडून हल्ला का करत आहेत? रात्री कदाचित जेव्हा कावळ्यांना अंधारामुळे काही दिसत नाही, तेव्हा हा त्यांची अंडी खात असू शकेल.

काय असेल ते असो. मात्र जेव्हा ते घुबड गंभीररीत्या जखमी होऊन, कॅमेर्‍याच्या नजरेबाहेर पडले तेव्हा, त्यातील क्रूरतेपोटी मला शुटिंग सुरू ठेवणे शक्यच राहिलेले नव्हते.

जीवो जीवस्य जीवनम्‌ ! हा तर जीवनाचा नियमच आहे. सुंदर दिसणारे देखणे घुबड, कावळ्यांकरता कदाचित क्रूर शत्रूही ठरत असेल. मात्र कावळ्यांच्या क्रूर हल्ल्यात ते ठार झाले हेही तर सत्यच होते.

मला प्रश्न पडला की, सत्य नेहमीच मनोहर असते का? चांगले असते का?
.

२ टिप्पण्या:

mannab म्हणाले...

एक लक्षवेधक प्रकाशचित्र आणि आपली थोडक्यात दिलेली टिपणी !
मंगेश नाबर

आशा जोगळेकर म्हणाले...

Saty katoo pan asate. Te Ghubad kadachit ghayal asel. Diwasa disat hee nahee, tyamulech kawale bali te kanpili tharale