२०१२-०९-१६

अभियंत्रज्ञ-दिन

माझे अभियांत्रिकी शिक्षण विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (व्ही.एन.आय.टी.) मध्ये म्हणजे त्या काळच्या विश्वेश्वरय्या रिजनल इंजिनियरींग कॉलेजमध्ये नागपूर येथे झाले. म्हणून मला नेहमीच भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेरय्यांबाबत आपुलकी वाटत आलेली आहे. ह्याचे आणखीही एक कारण आहे. ते म्हणजे माझे पणजोबा नारायण गोडबोले, विश्वेश्वरय्यांसोबतच पुण्याच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरींगमधून इंजिनिअर झालेले होते.

सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या
(जन्मः  १५ सप्टेंबर १८६० - मृत्यूः १४ एप्रिल १९६२)

विश्वेश्वरय्यांचा जन्म  १५ सप्टेंबर १८६० रोजी चिकबल्लापूर, म्हैसूर येथे झाला होता. म्हणून दरसाल १५ सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिन अभियंत्रज्ञदिन म्हणून पाळला जातो. त्यांची मातृभाषा तेलुगू आहे. पुढे विश्वेरय्यांनी प्रथम तत्कालीन म्हैसूर संस्थानाकरता आणि नंतर भारत देशाकरता अत्यंत महत्त्वाची अनेक पदे भूषवली. देशांतर्गत अनेक महत्त्वाच्या अभियांत्रिकी प्रकल्पांची संकल्पना रुजवली आणि ते देशाच्या सर्वोच्च आदरास पात्र ठरले.

ते विख्यात अभियंत्रज्ञ आणि मुत्सद्दी होते. आधुनिक भारताच्या निर्माणात त्यांनी अत्यंत कळी भूमिका बजावलेली आहे. ते कृष्णराजसागर धरण आणि प्रसिद्ध वृंदावन उद्यानाचे शिल्पकार होते. धरणांच्या दरवाजांकरता त्यांनी प्रथमच पोलादी झडपांचा उपयोग केला. हल्लीच्या पाकिस्तानातील सुक्कूर गावास सिंधू नदीचे पाणी पुरविण्याची योजना त्यांनी केली.

१९१२ ते १९१८ दरम्यान ते म्हैसूर संस्थानचे दिवाण होते. त्या काळात त्यांनी संस्थानात चंदनतेल आणि चर्म वस्तुंच्या उद्योगांची निर्मिती केली. भद्रावती पोलाद प्रकल्प सुरू केला. तिरुमला आणि तिरुपती दरम्यानचा रस्ता त्यांनी निर्माण केला.

१९०६-०७ दरम्यान प्रतिनियुक्तीवर एडनमध्ये असतांना त्यांनी एडन शहराची पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण योजना निर्माण केली. निजामाकरता काम करत असता, हैदराबाद शहराकरता त्यांनी पूरनियंत्रण योजना राबवली तर विशाखापट्टणम शहरास समुद्री क्षरणापासून संरक्षण करणारी योजना दिली. १९५५ मध्ये, पहिली भारतरत्न पदवी, त्यांना दिली गेली. पंचम जॉर्ज बादशहाने त्यांना ब्रिटिश भारतीय साम्राज्याचा नाईटहूडही दिलेला होता. ते शंभर वर्षांचे झाले तेव्हा त्यांच्या हयातीतच, भारत सरकारने त्यांचे नावे पोस्टाचे तिकिट काढले. वयाच्या १०१ व्या वर्षी १४ एप्रिल १९६२ रोजी त्यांना बंगळुरू येथे देवाज्ञा झाली.

भारतातील अग्रगण्य अभियंत्यांत मानाचे स्थान असलेल्या ह्या आधुनिक भारताच्या आद्य अभियंत्यास अभियंत्रज्ञदिनी आदरपूर्वक प्रणिपात!

संदर्भः
१. वैज्ञानिक माहितीची अनुदिनी
२. विकिपेडियावरील विश्वेश्वरय्यांची माहिती

२ टिप्पण्या:

aativas म्हणाले...

'अभियंत्रज्ञ दिन' असतो हे पार विसरून गेले होते. तुमच्या लेखामुळे तो आठवला. या दिवशी साधारण काय कार्यक्रम होतात? यावर्षी झाले? - असे काही अधिक माहिती करून घ्यायला आवडेल.

ऊर्जस्वल म्हणाले...

सविताजी, प्रतिसादाखातर मनःपूर्वक धन्यवाद!

या दिवशी किमान चार कर्तृत्ववान अभियंत्यांची आठवण काढून त्यांच्या योगदानामुळे आज परिस्थिती कशी उन्नत झालेली आहे याची जाणीव करून घ्यावी.

बंगळुरूला जाल तेव्हा वृंदावन गार्डन अवश्य पाहावे. आणि विश्वेश्वरय्यांच्या दूरदृष्टीचे आकलन करून घ्यावे! प्रजाहितदक्ष पंतप्रधान (दीवाण) कसा असावा ह्याचे ते मूर्तिमंत प्रतीक होते.