२०११-१२-३०

रुग्णोपयोगी साहित्य सेवा संस्था, रोहा

रोह्यातला महामार्ग. वेळ रात्रीची साडेबाराची. दिवस पावसाचे. धोधो पाऊस पडत असलेला. रोह्याच्या फायरब्रिगेडचा एक फायरमन, रस्त्यावरील एका वाहन दुर्घटनेत गंभीर जखमी होऊन, मांडीपर्यंतच्या पायावर प्लॅस्टर पडलेले. रुग्णास घेऊन घरी पोहोचले तेव्हाच, निकटवर्तीयांना उसंत घ्यायला वेळ मिळाला होता. ती वेळ ही होती. मग लक्षात आले की आता कमोड लागणार. धावाधाव सुरू झाली. कुणीतरी सांगितले की अशी एक संस्था आहे जी असे रुग्णोपयोगी साहित्य नाममात्र भाड्याने पुरवते. आगाशे काकांचे नाव घेतले गेले. मात्र एवढ्या रात्री, इतक्या कठीण परिस्थितीत, त्यांना कसे काय उठवावे? प्रश्नच होता!

रात्री साडेबारा वाजता दारावर ठकठक झाली. समोर रेनकोट टोपी मध्ये नखशिखांत गुरफटलेली, आणि संपूर्णपणे भिजलेली व्यक्ती दारात उभी. दार उघडावे की नाही? शेवटी आगाशेकाकांनी मनाचा हिय्या करून दार उघडले. काय काम आहे विचारले. त्यांना कमोड हवंय हे सांगितले गेले आणि ती व्यक्ती "देऊ शकाल काय?" म्हणून स्तब्ध झाली. खरेतर सामान इतरत्र ठेवलेले. किल्लीच केवळ त्यांचेकडे होती. पण काका तयार झाले. चला! ते म्हणाले. सामान होते तिथे पोहोचले. दरवाजा उघडून कमोड दिला. भाडे द्यायचे घ्यायचे काही गोष्टच निघाली नाही. समोरची व्यक्ती मानवी चांगुलपणाच्या दर्शनाने भारावलेली. तिने काकांना अक्षरशः दंडवत घातला! "काका तुम्ही धन्य आहात!"

काही दिवसांनंतर रुग्णोपयोगी साहित्य सेवा संस्थेच्या कार्यालयात दोन माणसे कमोड घेऊन परत आली. "काका कमोड परत आणलंय!"
काकांनी विचारले, "रुग्ण कसा आहे आता?"
"ते उत्तम चालायला लागले आहेत. आता भाडे सांगा किती झाले?"

दरदिवशी रु.५/- फक्त प्रमाणे हिशेब करून पैसे दिले, घेतले गेले. सोबतचा दुसरा माणूस काकांना विचारू लागला, काका तुम्हाला किती पगार देतात? काकांनी दारावरच्या फलकाकडे बोट दाखवले. त्यातल्या सेवा शब्दाकडे बोट करून ते म्हणाले, अहो, ही सेवा आहे. त्याचा पगार कसला. ज्यांनी कमोड नेला होता. त्यांना त्या सेवेचे मोल चांगलेच ठाऊक होते. ते म्हणाले, काका, कधीही, कसलीही गरज भासली तरी मला सांगा. मी तुमच्या मदतीला नक्कीच येऊन उभा राहीन!

सेवा खरीच. मात्र अशी सेवा, खरीखुरी व्यावसायिक सेवा संस्थाही देऊ शकेल की नाही सांगवत नाही. .

२ टिप्पण्या:

aativas म्हणाले...

विशेष आहे.

Unknown म्हणाले...

गोळे साहेब ह्या अशा सेवा व सेवा देणारे फक्त अप्घाताने सापडतात, थोड्याच दिवसात त्या नाहिशा होणार ! ह्याचे कारण त्याचा दुरूपयोग झाला व अशा सेवा देणार्‍या व्यक्तीला वेडे ठरवले गेले. का, कसे, केव्हा, कोणी हे सगळेच वादाचे विषय आहेत पण सत्य आहे.