२०११-०६-२४

लाखो रुपयांची थकबाकी

रात्री आठचा सुमार होता. मी ऑफिसमधून घरी पोहोचलो. मी बेल दाबली. आवाज आला नाही. बहुधा दिवे गेलेले असावेत. मग ठक ठक केले. आईनेच दार उघडले. आमच्या घरी सगळीकडे, अंधार दिसत होता. बाहेर मात्र सगळ्यांकडे दिवे दिसत होते . मी विचारले, आपलेच दिवे गेले आहेत का? मग इन्व्हर्टर का चालत नाही आहे? पाहिले तर, इन्व्हर्टर बंद पडलेला. घरात वीज येत नसलेली. मग खाली जाऊन मीटरपाशी पाहावे, म्हणून खाली गेलो. तर आमचा मीटर गायब!

वर येऊन आईला विचारले की कुणी आले होते का, विजेचे कनेक्शन तोडायला? छे! कुणीच तर नाही आले. मग मालकांकडे चौकशी केली. त्यांनाही काहीच माहीत नव्हते. पण दुपारी एक दीड वाजल्यापासूनच दिवे गेलेले होते, ते आत्ता येताहेत. ही नवी बातमी समजली. म्हणजे आई दुपारपासून दिवे, पंखे, टीव्ही लावून बसलेली असणार. तिला दिवे गेले हे कळले, तेव्हा बहुतेक इन्व्हर्टर खलास झालेला असणार. मला एकएक तपशील कळू लागला.

मग मालक -उमेश- आणि मी दोघेही मराविमंच्या कार्यालयात गेलो.

उमेश: "आमचे मीटर कधी काढून नेले".
कर्मचारी: दुपारीच तर नेले की!
उमेश: का? काय म्हणून?
कर्मचारी: अहो साहेब, तुमची एक लाख तेवीस हजाराची थकबाकी आहे!
उमेश: पण मग अजून बिल कुठे पाठवले आहे?
कर्मचारी: ते उद्या ऑफिसात येऊन विचारा! आमच्याजवळ ती माहिती नसते.
मी: अहो पण मीटर काढून नेतांना काही सांगायची वगैरे पद्धत असते की नाही. असे कसे काढून नेलेत, न सांगता?
कर्मचारी: आवाज का चढवताय? निष्कारण गुंडागर्दी?
मी: अहो, चोरासारखे मीटर तुम्ही काढून नेलेत आणि वर आम्हालाच दमदाटी करता? आमचे मीटर घेतल्यापासूनचे एकूण बिल देखिल लाखभर होणार नाही, मग त्याहून जास्त थकबाकी होईलच कशी? आम्ही प्रामाणिकपणे बिले भरतोय तर हे मीटर काढून नेतायत!
कर्मचारी: अहो मग पावती दाखवा ना बिल भरल्याची!
मी: ही घ्या! (मी गेल्या महिन्याचे बिल भरल्याची पावती घेऊन गेलेलोच होतो.)
कर्मचारी: अहो एक लाख तेवीस हजाराची थकबाकी भरल्याची पावती म्हणतोय मी!
मी: पण त्याचे बिल कुठाय?
कर्मचारी: ते उद्या ऑफिसात येऊन विचारा! आमच्याजवळ ती माहिती नसते.

अगदीच नाइलाज झाला. म्हणून मग मी जरा पडते घ्यायचे ठरवले. कारण, उन्हाळ्याचे दिवस होते. मे महिन्याची अखेर. जीवाची नुसती तलखी होत होती. त्यात पंख्याविना रात्र काढायची कशी या विचारानेच मला घामाची अंघोळ होत होती.

मी: अहो, आमची कसलीही थकबाकी नाही आहे. शेवटले बिल भरल्याची पावती मी तुम्हाला दाखवलीच आहे. तेव्हा रीतसर होईल ते होऊ दे सावकाश. पण मला आतापुरते, निदान तात्पुरते कुठे तरी जोडून द्यायला सांगा ना!
कर्मचारी: अहो तुम्ही पाहताय ना! इथे माणसेच कुठायत? नेहमीच्याच तक्रारी निस्तरतांना नाकी नऊ येताहेत, त्यात हे थकबाकीदार हैराण करतात!
उमेश: हे पाहा आम्हाला थकबाकीदार म्हणू नका! सगळी बिले भरलेली आहेत आम्ही!!
कर्मचारी: मग मीटर काय उगाच काढलंय?
मी: माणूस आल्यावर तरी, निदान तात्पुरते का होईना पण कनेक्शन जोडून द्या हो! (मी गयावया करू लागलो.)
कर्मचारी: हो. हो. माणूस मिळाला की मी नक्की पाठवतो.

एव्हाना भांडण रंगतदार होत आहे असे पाहून बर्‍यापैकी गर्दी जमलेली. आत्ता रात्रीचे दहा वाजायला आलेले होते. आम्ही इथून गेलो, की हा कर्मचारी काही आपले काम करणार नाही, अशी माझी खात्री पटली. रात्र पंख्याविना काढावी लागणार ह्या विचाराने मी आणखीनच काकुळतीला आलो. ती काळरात्र आम्ही कशी काढली ते आमचे आम्हालाच ठाऊक. पण ती संस्मरणीय झाली हे सांगायची आवश्यकताच नाही.

मला दुसर्‍या दिवशी सुट्टी नव्हती. मी उमेशला म्हटले तू जरा जाऊ शकशील का उद्या? तो कशासाठी तरी सुट्टी घेणारच होता. म्हणाला मी उद्या जाऊन, पावती दाखवून, मीटर पुन्हा बसवून घेईन. तो दुसर्‍या दिवशी गेला. पावती दाखवली. त्यावर ठराविक साच्याचे उत्तर मिळाले. तुमचे सगळे खरे आहे. मात्र, त्या बिलात जो विलंब आकार (सुमारे चार हजार रुपये) लावलेला आहे, किमान तो भरल्याशिवाय मीटर पुन्हा प्रस्थापित करता येणारच नाही. तेव्हा तुम्ही विलंब आकार भरा. आता आकार भरा म्हटल्यावर प्रश्न आला की मग बिल कुठाय? तर म्हणाले की तुम्हाला मिळाले नसेल तर ड्युप्लिकेट बिल घ्या! मग ड्युप्लिकेट बिलाची मागणी केली तर त्यांना मूळ बिलच सापडेना! शेवटी अकाऊंटंटच्या वहीतून आकडे पाहून, एक, हातांनी लिहिलेले बिल, ड्युप्लिकेट बिलाचा आकार भरल्यावर प्राप्त झाले. त्या बिलाचे आधारे त्यात दर्शवलेला विलंब आकार त्याने भरला. मग आमचे मीटर विधिवत पुनर्स्थापित झाले.
ही झाली अर्धी कहाणी.

घरी आल्यावर जेव्हा ती समजली तेव्हा, संतापाने माझे डोकेच फुटायची वेळ आली. मुळात आमचे गेल्या महिन्याचे बिल भरल्याची पावती आमच्याकडे आहे. ती आहे की नाही हे न विचारताच त्यांनी चोरासारखे मीटर काढून नेलेले आहे. एक लाख तेवीस हजाराचे बिल –जे त्यांनी स्वतःसुद्धा कधीच पाठवलेले नव्हते- त्यावर लिहिलेल्या तारखेलाच आम्ही त्याची ड्युप्लिकेट पैसे भरून मिळवलेली होती. तेव्हा भरायचे म्हटले तरी ते बिल आम्ही कधी भरणार होतो? तशात त्यात दर्शवलेली बिल भरण्याची तारीख उलटून गेलेली. म्हणून त्यावर विलंब आकार लावलेला. तो आकारच आम्ही कधीही भरले नसेल त्या बिलाहूनही जास्त. तो भरल्याशिवाय मीटर म्हणे परत बसवता येणार नाही. सगळाच कारभार अजब. विनोदी. हास्यास्पद.

मग मी निश्चय केला. महिनाभर सुट्टी काढावी लागली तरी चालेल पण ह्या अन्यायाची तड लावायचीच. पुढल्याच शनिवारी मी आमची १९८५ साली मीटर घेतले तेव्हापासूनच्या विनाविलंब बिले भरल्याच्या सर्व पावत्यांचा गठ्ठा घेऊन मराविमंच्या कार्यालयात दाखल झालो. मला वाटले एवढा पुरावा पुरेसा ठरेल. तक्रार देण्याच्या रांगेत उभा राहिलो. नंबर लागल्यावर अत्यंत सौम्य आवाजात सांगण्यात आले की, “सात दिवसांचे दैनिक मिटरवाचन” नोंदवलेल्या अर्जावरच तक्रार स्वीकारण्यात येते. माझ्या तक्रारीच्या आवेशातील हवाच निघून गेली. वरिष्ठ साहेबांना भेटूनही इतकाच निष्कर्ष निघाला की, तक्रार करायची तर विधिवत सात दिवस मिटरमापने नोंदवा. मगच तक्रार घेऊ. मला ह्या लालफीतशाहीचा संताप उरात माईना झाला.

तरीही निश्चयाने मी रोज मिटरमापन नोंदवू लागलो. पुन्हा पुढल्या शनिवारी, सात दिवसाची मिटरमापने –जी महिन्याचे बिलही शे दोनशे रुपयांपलीकडे जाणार नाही असे स्पष्टपणे दाखवत होती-, गेल्या पंधरा वर्षांतील थकबाकी नसल्याचे रेकॉर्ड, त्या एक लाख तेवीस हजाराच्या बिलात दर्शवलेले मिटरवाचनाचे आकडे आमच्या मीटरशी जुळत नसल्याचे पुरावे, इत्यादीच्या सर्वसमावेशक विश्लेषणातून मुळात ते बिलच आम्हाला चिपकत नसल्याचा निःसंदिग्ध पुरावा, सहा पानी संगणक मुद्रितात, ताळेबंदानिशी एकत्र करून मराविमंची वाट धरली. त्या पत्रात मी असेही म्हटले होते की, मीटर पुन्हा बसवण्याकरता आम्हाला विलंब आकाराचा जो भुर्दंड बसवण्यात आला तोही बेकायदा आणि गैरलागू आहे. तेव्हा तो परत देण्यात यावा अथवा पुढील बिलांतून वळता करण्यात यावा. न पेक्षा मी हीच कागदपत्रे ग्राहक न्यायालयात पेश करेन!

खिडकीवर माझा अर्ज स्वीकारण्यात आला. तो मिळाल्याची पावती, मी त्याच्याच झेरॉक्स प्रतीवर सहिशिक्क्यानिशी नोंदवून घेतली. मग वरिष्ठ साहेबांना भेटून यात मराविमं कशी चूक आहे ते समजावून सांगू लागलो. मात्र, त्यांना ते सर्व आधीच माहीत झालेले होते. "अहो तुम्हाला दुसर्‍या?च एकाचे बिल भरायला सांगून, त्याच्या ऐवजी तुमचेच मीटर तोडण्यात आलेले होते. आता झाले आहे ना सगळे ठीक?" ते विचारू लागले. मग मी जाम उसळलो. "म्हणजे मला हा निष्कारणच मनस्ताप म्हणा की!" त्यांनी माझे जमेल तसे सांत्वन केले. पण त्या पत्राचे उत्तर आल्याखेरीज माझे समाधान होणार नव्हते.

प्रत्यक्षात तसले काहीच घडले नाही. आमच्या पुढल्या बिलात, त्या सुमारे चार हजार रुपयांचा विलंब आकार, उणा दाखवलेला होता. पुढे अनेक महिनेपर्यंत आम्हाला बिलेच भरावी लागली नाहीत. कारण ती उणा असत. एव्हाना माझ्या संतापाची वाफ हवेत विरून गेलेली होती. तरीही पदरी पडले तेही काही कमी नव्हते. किमान मराविमंचा लाखो रुपयांचा थकबाकीदार असल्याचे लांच्छन, मराविमंने स्वतःच परत घेतले होते. हेही नसे थोडके!

२०११-०६-१२

अनुदिनी परिचय-६: वातकुक्कुट

अनुदिनी: वातकुक्कुट. हवामानशास्त्राची ओळख मराठीतून.
http://vatkukkut.wordpress.com/

अनुदिनीकार: वरदा वैद्य

अनुदिनीची सुरूवात: नोव्हेंबर २००६
अनुदिनीची वाचकसंख्या: २०१० मध्ये २,९००
अनुदिनीतील एकूण नोंदी: २३

अनुदिनीकाराची ओळख: त्या स्वतःची ओळख अशी करून देतात, “मी वरदा वैद्य. सध्या वास्तव्य-अमेरिकेची संयुक्त संस्थाने. हवामानशास्त्र आणि खगोलशास्त्र हे माझ्या आवडीचे विषय. हवामान आणि वातावरण ह्या विषयातील विविध गोष्टी मराठीतून सांगण्यासाठी वातकुक्कुट ही अनुदिनी सुरू केली आहे. खगोलशास्त्र विषयक लेख हे विवस्वान ह्या अनुदिनीवर ठेवले आहेत. पत्ता पुढीलप्रमाणे आहे. http://khagras.wordpress.com/

अनुदिनीची अनुक्रमणिकाः नोंदी, प्रतिक्रिया , वातावरणातील अभिसरण, एन्सो, विद्युत्पात, त्सुनामी, चंद्राचे महत्त्व, पारिभाषिक संज्ञा, कात्रणे, भूपट्ट विवर्तन

अनुदिनीची ओळख लेखिकेच्याच शब्दांतः “वातकुक्कुट – हवामानशास्त्राची ओळख मराठीतून. हवामानशास्त्राची ओळख मराठीतून करून देण्याचा हा प्रयत्न तुम्हा वाचकांना आवडेल अशी आशा करते. गेल्या काही वर्षांमध्ये मनोगत.कॉम ह्या संकेतस्थळावर मी हवामानशास्त्रांतर्गत येणाया विविध विषयांवर माहितीपूर्ण लेख लिहिले. काही विषय माझ्या आवडीचे, तर काही इतरांनी सुचवलेले. हे लेख एकत्रित स्वरूपात ठेवता यावेत म्हणून हा अनुदिनी (ब्लॉग) प्रपंच. ह्या अनुदिनीचे यथावकाश संकेतस्थळामध्ये रुपांतर करण्याचा मानस मी बाळगून आहे.”

अनुदिनीतील चर्चा विषय

त्सुनामी - त्सुनामी म्हणजे काय? ती का, कशी आणि केव्हा तयार होते? त्सुनामीच्या धोक्याची सूचना देणा-या यंत्रणेचे कार्य कसे चालते, त्सुनामी प्रारूप (मॉडेल) म्हणजे काय असते? ह्या आणि अशा प्रश्नांची उत्तरे काही प्रमाणात मिळवण्यासाठी वाचा तीन भागांची लेखमाला-
१. या गो दरियाचा दरारा मोठा..
२. कवा पान्यावरी उठतानं डोंगर लाटा..
3. जाती पान्यानं भिजून धर्ती..

विद्युत्पात- आकाशात चमकणारी आणि कडाडणारी वीज खरोखरीच वीज असते का? ती कशी निर्माण होते? वीज पडते म्हणजे नक्की काय होते? वीज पडताना कोणत्या क्रिया नेमक्या कोणत्या क्रमाने घडतात? हे जाणून घेण्यासाठी वाचा चार भागांची लेखमाला -
१. आभाळ वाजलं धडाऽडधूम
२. वारा सुटला सू सू सूऽम
३. वीज चमकली चक् चक् चक्
४. जिकडे तिकडे लख् लख् लख्

वातावरणातील अभिसरण- वातावरणातील अभिसरण हेच हवामानाचे कारक असते, असे म्हटले तरी ती अतिशयोक्ती ठरू नये. हलणार्‍या हवेला वारा म्हणतात हे सामान्यज्ञान म्हणजे ही अभिसरण समजावून घेण्यातली पहिली पायरीच. वातावरणातील अभिसरण कसे होते? ते स्थानिक, प्रादेशिक आणि जागतिक श्रेणीमध्ये कशाप्रकारे कार्यरत असते? वातावरणातील अभिसरणाचे मानवाचे ज्ञान आजच्या स्थितीला येताना दरम्यान कोणकोणते महत्त्वाचे टप्पे पार पडले? कोणकोणत्या गणितज्ञ, भूगोलतज्ञ आणि शास्त्रज्ञांचा ह्यामध्ये सिंहाचा वाटा होता? हे समजावणारी सात भागांची लेखमालाः

१. प्रस्तावना
२. प्राचीन काळातील वाराविचार
३. मध्ययुगीन अभिसरणविचार
४. १५ वे ते १८ वे शतक
५. एकोणीसाव्या शतकातील प्रगती
६. विसाव्या शतकातील गरूडझेप – पूर्वार्ध
७. विसाव्या शतकातीक गरूडझेप – उत्तरार्ध

अनुदिनीतील महत्त्वपूर्ण दुवे

अक्र दुवा शीर्षक विषय

१ http://marathi.wunderground.com/US/AS/ वेदर अंडरग्राउंड मराठी हवामान
२ http://www.wmo.ch/ आंतर्राष्ट्रीय हवामान संस्था विशेषज्ञ संस्था
३ http://www.tropmet.res.in/ भारत उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्था IITM
४ http://www.imd.ernet.in/ भारत मौसम विज्ञान विभाग IMD
५ http://www.noaa.gov/index.html राष्ट्रीय समुद्री व वातावरणीय व्यवस्थापन NOAA
६ http://khagras.wordpress.com/ विवस्वान सूर्य

अनुदिनी कशाकरता वाचनीय आहे? 

“या गो दरियाचा दरारा मोठा... कवा पान्यावरी उठतानं डोंगर लाटा.. जाती पान्यानं भिजून धर्ती..” अशाप्रकारची चित्तवेधक शीर्षके घेऊन मनोगत डॉट कॉम वर त्सुनामीचे समयोचित वर्णन करतांना लेखिकेने विज्ञानाची गूढ तत्त्वे सामान्य जनांच्या परिभाषेत उलगडून दाखवलेली आहेत. तांत्रिक शब्द, परिभाषा निवडण्याची, त्यावर चर्चा घडवून आणण्याची आणि उचित विनिमयानंतर, योग्य मिमांसा करून तर्कशुद्ध पर्यायी मराठी शब्द घडवण्याची लेखिकेची जिज्ञासा आणि कुशलता कौतुकास्पद आहे.

साधी वीज पडते ती घटना. मात्र, “आभाळ वाजलं धडाऽडधूम... वारा सुटला सू सू सूऽम ... वीज चमकली चक् चक् चक् ... जिकडे तिकडे लख् लख् लख्” अशाप्रकारच्या शीर्षकांतून लिहिलेल्या विस्तृत चार लेखांद्वारे सौदामिनीचे सौंदर्य लेखिकेने ज्या नजाकतीने उलगडले आहे ते मुळातच वाचनीय आहे. त्याची उद्धृते इथे देऊन मी मजा किरकिरा करत नाही. पण सांगायचे एवढेच की हे सर्वच लेख मराठी विज्ञानाच्या इतिहासात अमिट छाप सोडतील ह्यात मला मुळीच शंका नाही.

लेखिका म्हणते, “वातावरणातील अभिसरण हेच हवामानकारक असते, असे म्हटले तरी ती अतिशयोक्ती ठरू नये. हलणार्‍या हवेला वारा म्हणतात हे सामान्यज्ञान म्हणजे ही अभिसरण समजावून घेण्यातली पहिली पायरीच. वातावरणातील अभिसरण कसे होते? ते स्थानिक, प्रादेशिक आणि जागतिक श्रेणीमध्ये कशाप्रकारे कार्यरत असते? वातावरणातील अभिसरणाचे मानवाचे ज्ञान आजच्या स्थितीला येताना दरम्यान कोणकोणते महत्त्वाचे टप्पे पार पडले? कोणकोणत्या गणितज्ञ, भूगोलतज्ञ आणि शास्त्रज्ञांचा ह्यामध्ये सिंहाचा वाटा होता? हे जाणून घेण्यासाठी सात भागांची ’वातावरणातील अभिसरणा’ वरची लेखमाला वाचा.” मी ह्याचेशी १००% सहमत आहे.

ह्याशिवाय चंद्राचे महत्त्व, भूपट्ट विवर्तन इत्यादी महत्त्वाच्या विषयांवरले लेख आजच्या भूकंप-त्सुनामी इत्यादी नैसर्गिक संकटांच्या पार्श्वभूमीवर सुयोग्य लोकप्रबोधनाचे काम कुशलतेने करू शकतील. या सगळ्याकरता ही अनुदिनी अवश्य वाचावी अशीच आहे.

लवकरच सर्व वैज्ञानिक विषयांवरचे स्नातक, स्नातकोत्तर आणि वाचस्पती स्तरीय व त्यापश्चात संशोधनाचेही सर्व काम शुद्ध मराठीत चालावे अशी माझी इच्छा आहे. त्याकरता सुयोग्य पुस्तके हवीत. मात्र ती आज तरी, तशी उपलब्ध नाहीत. म्हणून आपण विज्ञान विषय मराठीत शिकू, शिकवू शकत नाही. अशी पुस्तके लिहिण्यास सक्षम, सत्पात्र, जाणकार लेखक हवेत. सदरहू लेखिकेस मी अशांतीलच एक गणतो. यासाठी ही अनुदिनी वाचनीय आहे.