२०११-०३-३१

अनुदिनी परिचय-३: प्रशासनाकडे वळून बघतांना

अनुदिनी: प्रशासनाकडे वळून बघतांना - Looking back at Governance
http://prashasakeeylekh.blogspot.com/

अनुदिनी लेखिकाः लीना मेहेंदळे

अनुदिनी लेखिकेची ओळखः लीना मेहेंदळे यांचा जन्म ३१ जानेवारी १९५० रोजी जळगाव जिल्ह्यात धरणगाव येथे झाला. त्या स्वतःस परिपूर्ण प्रशासक, विचारवंत आणि लेखक (बालवाचकांकरताही) मानतात. त्या भारताच्या सर्व भागाची पुरेशी ओळख राखतात. भारतातील एकूण ६५० जिल्ह्यांपैकी ४०० जिल्ह्यांत त्यांनी प्रवास केलेला आहे. त्या हिंदी, मराठी, बंगाली भाषा जाणतात; तर आसामी, उडिया, पंजाबी, गुजराती, नेपाळी, मैथिली आणि भोजपुरी भाषा त्यांना समजतात.

त्या पाटणा विद्यापीठातून १९७० मध्ये भौतिकशास्त्रात एम.एस.सी. झाल्या. १९७२-७३ मध्ये भौतिकशास्त्राची व्याख्याती म्हणून पाटणा विद्यापीठात काम केल्यावर, १९७४ मध्ये त्या भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू झाल्या. सेवेत असतांना त्यांनी यु.के.मधील ब्रॅडफोर्ड येथून १९८९ मध्ये प्रोजेक्ट प्लॅनिंग या विषयात त्यांनी एम.एस.सी. पदवी प्राप्त केली. हिस्सार मधील जी.जे.विद्यापीठाची एम.बी.ए. पदवी त्यांनी २००७ मध्ये संपादन केली. २०१० मध्ये मुंबई विद्यापीठाची एल.एल.बी. पदवी मिळवली. १९७४ ते २०१० दरम्यान त्यांनी भारतीय प्रशासकीय सेवेत काम केले. नंतर केंद्रिय प्रशासकीय लवादाच्या सदस्य (हे पद उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या समकक्ष असते) म्हणून त्यांची बंगलुरू येथे नियुक्ती झाली.

भारतीय प्रशासकीय सेवेत अतिशय स्पर्धात्मक परीक्षेनंतरच प्रवेश मिळतो. त्या सेवेतील काम नियामक, विकासात्मक आणि न्यायविषयक स्वरूपाचे असते. वरिष्ठ पदांवर अधिकारी धोरणात्मक निर्णय घेतात आणि अंमलबजावणीवर देखरेख करतात. भारतीयांना, जिल्हाधिकारी (कलेक्टर), आयुक्त (कमिशनर), अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक (सी.एम.डी.) आणि सचिव इत्यादी प्रातिनिधिक भारतीय प्रशासकीय सेवांची ओळख असते.

त्यांच्या भारतीय प्रशासकीय सेवेची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत.

१. सांगलीच्या जिल्हाधिकारी असतांना आणि डब्ल्यू.एम.डी.सी. ह्या एका औद्योगिक कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक असतांना त्यांनी देवदासींच्या पुनर्वसनाचा कार्यक्रम राबवला.

२. ऊर्जा संवर्धनाबाबत साप्ताहिक १८० भागांच्या दूरदर्शन मालिकांतून आणि आकाशवाणीवरील २५० भागांच्या मालिकेतून कौशल्य संपादन आणि संवर्धन यांकरता लोकजागृती केली.

३. पुण्यातील ’यशदा’ मध्ये ग्रामीणविकास आणि मानवसंसाधन प्राध्यापक म्हणून १९८९-९० आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उप-कुलगुरू (निसर्गोपचार संचालक) पदांवरून १९९६ मध्ये काम करत असता त्यांनी प्रशिक्षणाची धोरणे आणि संकल्पना निश्चित केल्या.

४. त्या नेहमीच, संगणकावर भारतीय भाषांचा प्रसार व्हावा याकरता काम करत राहिल्या.

५. एक विचारवंत आणि लेखक म्हणून त्यांनी, मराठी, हिंदी आणि इंग्रजीतून हजाराहून अधिक व्याख्याने दिली, निरनिराळ्या विषयांवर २५ हून अधिक पुस्तके लिहिली आणि ६०० हून अधिक लेख लिहिले.

अनुदिनीची सुरूवातः जानेवारी २००६

अनुदिनीतील नोंदींचा तपशील: अगदी अलीकडील २०११ मधील नोंदी २ आहेत. “आम आदमी कुठे आहे” हा बजेटवरला आणि “लोकाभिमुख प्रशासन” ही फर्ग्युसन कॉलेजमधे दिलेल्या पद्मावती व्याख्यानाची संहिता. २०१० मध्ये एकूण १० नोंदी आहेत. त्यात “निवडणुकीत नापसंतीचा अधिकार हवा” हा लेख आहे. मरीन ड्राईव्ह कांडावरले काही लेख आहेत. “काश्मीर आपल्या रक्तांत आहे कां?”, “त्या स्त्रियांच्या सोबतीसाठी”, “हक्कांसाठी स्त्रियांनी कोर्टाची पायरी अवश्य चढावी”, “प्रशासकीय लेखा-परिक्षण एकांगीच राहिले” इत्यादी सुरेख लेख आहेत.

२००९ मध्ये एकूण ९ नोंदी आहेत. त्यात “परस्परसवांद आणि सामंजस्य महत्वाचे”, “भ्रष्टाचार, चौकशी, शिक्षा, न्याय इत्यादि”, “आरोग्य सेवा आणि आरोग्य शिक्षण”, “योगत्रयी”, “पोलिसिंग म्हणजे नेमके कांय”, “परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल हवा” इत्यादी लेख आहेत.

२००८ मध्ये एकूण १५ लेख आहेत. यात “माय मराठीत विज्ञान आणि कायदा”, “तारा - लिंगभेदावर एक तीव्र प्रकाशझोत”, “मराठी लेखनाच्या ब्लॉगसाठी – इनस्क्रिप्ट”, “सत्यवचनाचे वैज्ञानिक तथ्य”, “कार्यक्षम व्यवस्थेसाठी”, “सांगलीचे दिवस”, “सुस्त दंड प्रक्रिया आणि तेलगी” इत्यादी लेख समाविष्ट आहेत.

२००७ मध्ये एकूण २१ लेख आहेत. यात “संस्कृती अशी घडते”, “कुसुमाग्रजाच्या कविता -अनुवाद”, “प्रशासनात संगणक कसा आणि किती वापरावा”, “चिंतामण मोरया आणि इतर लेख -- 3रा संग्रह”, “इथे विचारांना वाव आहे”, “बलसागर भारत -- साने गुरुजी-- हिन्दी अनुवाद”, “ठावकीच नाही”, “नीती आणि दंड या माझ्याच विभूति आहेत”, “जा जरा चौकटीपलीकडे!”, “बेरोजगारीवर उत्तम उपाय- रेशीम उद्योग”, “हिंदीला धोपटणे थांबवा”, “जळगांव स्कँडलाच्या निमित्ताने –पूर्ण” इत्यादी लेख आहेत.

२००५ सालचा एक लेख आहे “त्याची शरम वाटते? -- मरीन ड्राइव्ह कांड” हा. २१ एप्रिल २००५ रोजी मरीन ड्राइव्हसारख्या मुंबईच्या पॉश वस्तीत समुदकिनाऱ्यावर हवा खात बसलेल्या एका तरुणीवर आधी दमदाटी करून एक कॉन्स्टेबल तिला पोलिस चौकीत घेऊन जातो आणि तिच्याबरोबर असलेल्या तरुणाला बाहेर बसवून तिच्यावर बलात्कार करतो ह्या घटनेवर परखड भाष्य करणारा.

अनुदिनी कशासाठी वाचनीय आहे? त्यांनी अनेक भाषांत विपुल लेखन केलेले आहे. ते सर्व महाजालावर उपलब्धही करून दिलेले आहे. त्या सर्व अनुदिन्यांची खालील यादी उपरोक्त अनुदिनीवर पाहायला मिळते.

१. Energy-matters : pcra http://pcra--works.blogspot.com/

२. bhagvadgeeta_rec... http://bhagvadgeeta-recital.blogspot.com/

३. leena mehendale on web pages http://web-references.blogspot.com/

४. कुछ गुजराती प्रयोग http://gujrati-prayog.blogspot.com/

५. भाषा--हिन्दी--मर... http://bhasha-hindi.blogspot.com/

६. My favorites and Urdu shers http://urdu-sher.blogspot.com/

७. my first blog आणि नवीन लेखन http://leenamehendale.blogspot.com/

८. Women Empowerment : India http://women-empowerment.blogspot.com/

९. diary-index http://diary-index.blogspot.com/

१०. जिन्हे नाज है हिन्द पर वो आ जायें http://naz-hai-hind-par.blogspot.com/

११. My English articles http://my-eng-articles.blogspot.com/

१२. मन ना जाने मन को http://man-na-jane-manko.blogspot.com/

१३. hrishi thesis work http://hrishi-thesis.blogspot.com/

१४. राजकीय चिन्तन (Political Thoughts) http://rajkeeya-chintan.blogspot.com/

१५. books, websites and films http://leenameh.blogspot.com/

१६. good-to-see http://good-to-see.blogspot.com/

१७. सुवर्ण पंछी Suvarna Panchhi http://suvarnapanchhi.blogspot.com/

१८. है कोई वकील ? http://prakritik-chikitsa.blogspot.com/

१९. निसर्गोपचार-प्रकृति आद्य शिक्षक http://prakritik-chikitsa.blogspot.com/

२०. संस्कृत की दुनिया : कौशलम् न्यास http://sanskrit-ki-duniya.blogspot.com/

२१. anu vigyan अणु विज्ञान http://anu-vigyan.blogspot.com/

२२. जनता की राय > janta ki ray http://janta-ki00ray.blogspot.com/

२३. देशासाठी -- these need fixing http://need-fixing.blogspot.com/

२४. आनन्दलोक -- कुसुमाग्रज की कविताएँ http://hindi-kusumagraj.blogspot.com/

२५. चरखा - चिंतन व प्रयोग http://charkha-system.blogspot.com/

२६. ये ये पावसा http://ye-ye-pawsa.blogspot.com/

२७. यशवंत सोनवणे http://sonavane-nashik.blogspot.com/

२८. प्रशासनाकडे वळून बघतांना http://prashasakeeylekh.blogspot.com/

२९. इथे विचारांना वाव आहे. http://marathi-lekh1.blogspot.com/

३०. मेरी प्रांतसाहबी http://my-prantsahebi.blogspot.com/

३१. समाज मनातील बिंब http://societal-reflections.blogspot.com/

“मेरी प्रांतसाहबी” ही हिंदी अनुदिनी त्यांच्या प्रशासकीय कारकीर्दीची ओळख करून देते. तिच्याबाबत माहितीही आपल्याला ह्या अनुदिनीत सापडते. प्रशासनसेवेत असतांना प्राकर्षाने जाणवलेल्या मंद दंड-प्रक्रिया, आरोग्यसुधारणा, ऊर्जासंवर्धन इत्यादी विषयावरले त्यांचे विचार ह्या अनुदिनीतील अनेक लेखांत वाचायला मिळतातच. शिवाय त्यांचे संस्कृतीविषयक लेखही यात आहेत. “संस्कृती अशी घडते” ह्या लेखात त्या म्हणतात, “'फिरन्तु' लोकांमुळे समाजाचं ज्ञान आणि विकासाची गति वाढते. ही बाब ज्यांच्या लक्षांत आली असेल त्यांनी अतिथी देवो भव ही कल्पना घालून दिली असेल आणि रुजवली असेल. जेणेकरून अशा फिरन्तु लोकांची योग्य ती सोय व्हावी. 'मा गृधः कस्यस्विद्धनम्'- दुसर्‍याने कमावलेल्या धनाची आस धरू नकोस किंवा 'सत्यमेव जयते नानृतं' - सत्याचाच विजय होईल - असत्याचा कदापि होणार नाही. अशा सारखी बीज वाक्य आपल्या उपनिषधामध्ये येण्यापूर्वी या विचारांचे किती मोठया प्रमाणात आणि किती मोठया काळापर्यंत मंथन झाले असेल त्याचा अंदाज घेणे कठीण आहे.” त्यांच्या अनुभवावर आधारित संस्कृतीच्या उदयाचा त्यांनी घेतलेला हा वेध वाचनीय आहे.

त्यांनी कुसुमाग्रजांच्या १०८ कवितांचा हिंदीत अनुवाद करून एक अत्यंत मौलिक काम केलेले आहे.

ह्या सर्व कविता http://hindi-kusumagraj.blogspot.com/ या अनुदिनीवर उपलब्ध आहेत. आपल्या समृद्ध मराठी कवितेला तेवढ्याच सशक्त हिंदी जाणकाराने हिंदीत न्यावे, ह्या सदिच्छेला त्यामुळे साकार होता आले आहे. साने गुरुजीच्या “बलसागर भारत होवो” चा सुरस हिंदी अनुवादही वाचनीय आहे. मात्र मला “खरा तो एकची धर्म” चा त्यांनी केलेला हिंदी अनुवाद विशेष आवडला.

याच अनुदिनीत “दंडो दमयतामस्मि, नीतिरस्मि जिगिषिताम्‌” विषद करतांना त्यांनी गीतेच्या विभूती योगाचेच रसग्रहण केलेले वाचता येते. “बेरोजगारीवर उत्तम उपाय- रेशीम उद्योग” या विषयावरला लेख उद्योजकतेस चालना देतो. “इथे विचारांना वाव आहे” या नियतकालीकांतील लोकप्रशासनात्मक लेखांवर आधारित पुस्तकाचीही इथेच ओळख करून दिलेली सापडते. “सत्यवचनाचे वैज्ञानिक तथ्य” हाही एक सुरेख लेख इथे वाचता येतो.

ही अनुदिनी म्हणजेच अशा एक ना अनेक सुरस साहित्यांचा खजिना आहे. हा मात्र केवळ परिचयच आहे. हा परिचय वाचून ती अनुदिनी मुळातच वाचावी असे आपल्याला वाटले, तर लिहिण्याचे सार्थक झाले असे समजता येईल. एवढेच लिहून ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरीच सुफळ संपूर्ण करतो.
.

२०११-०३-२६

अनुदिनी परिचय-२: आनंदघन

अनुदिनी: आनंदघन, http://anandghan.blogspot.com/

अनुदिनीकार: आनंद घारे

अनुदिनीची सुरूवात: जानेवारी २००६
अनुदिनीची वाचकसंख्या: १ मे २००८ पासून वाचनसंख्या ६१५१८
अनुदिनीचे अनुसरणकर्ते: ७५
अनुदिनीतील एकूण नोंदी: ६७७

अनुदिनीकारांची ओळख: मी कोण? याबाबत अनुदिनीकार म्हणतात, "इंग्रजी भाषेतून अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कामाचे ढीग उपसता उपसता ’उत्कृष्ट वैज्ञानिक” उपाधि पदरात पडली. आता सरळ सोप्या मायमराठी भाषेत चार शब्द लिहायची धडपड सुरू आहे."

३ जानेवारी २००६ ला या अनुदिनीचा श्रीगणेशा केलेला आहे. इंग्लंडमधील प्रवासवर्णनाने अनुदिनीची सुरूवात होते. मराठीमध्ये अनुदिनी लिहिणे त्याकाळी किती अवघड होते, हेही सविस्तर वर्णन केलेले आहे. आधी वर्डप्रेसवर असलेली ही अनुदिनी मग ब्लॉगरवर आणतांना चित्ररूप आणावी लागल्याने झालेली विस्कळ स्पष्ट जाणवते. ह्या वर्णनांत “कोटी कोटी रुपे तुझी” ही गणेशाच्या विविध स्वरूपांवर आधारित लेखमाला आहे. “लिडसच्या चिप्स” नावाचीही एक लेखमाला आहे. मग “तोच चंद्रमा नभात” या वैज्ञानिक विषयावरील मालिकेस सुरूवात झाली. ही तेहत्तीस भागांची सुंदर मालिका जरी चित्ररूप लेखांनी बनलेली असली तरीही त्यांचे एक नितांतसुंदर पुस्तक होऊ शकेल इतकी ती चांगली आहे.  २००६ मध्ये एकूण ७५ नोंदी केलेल्या आढळतात. २००७ मध्ये केवळ ६ च नोंदी आहेत. यात २००७ च्या रंगोत्सवावरही म्हणजे होळीवरही एक लेख आहे.

२००८ साली एकूण नोंदी २५१ आहेत. आता युनिकोडमधे देवनागरी लिहिता येऊ लागल्याने अनुदिनी अधिक सोपीसाधी, सुबक दिसू लागली. “मुंबई ते अल्फारेटा” मालिका, दत्तजन्माची कथा, “तेथे कर माझे जुळती” ही भीमसेन जोशी, पांढुरंगशास्त्री आठवले इत्यादीकांचे परिचय करून देणारी मालिका, “झुकझुकगाडी-भारतातली आणि विलायतेतली” ही मालिका, “मेरी ख्रिसमस” मालिका, “यॉर्कला भेट” ही मालिका इत्यादी भरपूर मौलिक लेखन इथे वाचायला मिळते.

२००९ साली एकूण नोंदी २२६ आहेत. यात “अमेरिकेची लघुसहल” मालिका आहे. ब्लॉग माझा-२००९ स्पर्धेत या अनुदिनीस उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले त्याची वर्णने आहेत. “आयुधे, औजारे आणि यंत्रे” ही चार भागांची सुरेख मालिका मराठीत विज्ञान आणते. इथेच तीन भागांत डॉ.होमी भाभा यांचा करून दिलेला प्रत्ययकारक परिचय वाचनीय आहे.

२००९ साली एकूण नोंदी १०० आहेत. यात “मन” विषयावरची सात भागांची सुरेख निरुपणात्मक मालिका आहे. मग या अनुदिनीच्या नित्य वाचकांचा थवा वाढतच गेला. लेखक त्याबद्दल म्हणतातः

जात होतो एकटा मी मार्ग शोधूनी नवा ।
मागुनी पांथस्थ आले जाहला त्यांचा थवा ।।

आता त्यांची “पंपपुराण” माला सुरू झाली होती. अत्यंत सोप्या शब्दांत निरनिराळ्या पंपांचे कामकाज सोप्या मराठीत समजावून सांगतांना त्यांनी आपल्या कार्यकारी जीवनातील विपुल अनुभवाचा उत्तम वापर केलेला दिसून येतो. सचिनवरचा “विक्रमादित्य रेकॉर्डर” हा लेख आहे. मग “ब्लॉगर्स मेळाव्या”चा अहवाल आहे. मराठी सुभाषिते आहेत. अनेक स्फूट लेख आहेत. कौटुंबिक संमेलनाच्या हकिकती सात लेखांत दिलेल्या आहेत. मराठी गाण्यांवर दोन लेखांची एक मालिका आहे. गणेशोत्सव, मराठी मातृदिन, महिला दिन, हरतालिका, श्रीकृष्ण इत्यादींवर लेख आहेत. कल्याणम नावाची मनोरंजनात्मक मालिका आहे. नव(ल)रात्री नावाची मालिका आहे. “मोतीबिंदू ..... आणि .... भिंगाचे भेंडोळे” ही स्वानुभावरील मालिका आहे. २६ नोव्हेंबर २००८ च्या “कालरात्री” वर एक मालिका लेखन आहे.

२०११ साली १९ लेख लिहून झालेले आहेत. त्यात “संस्कृत, संस्कार, संस्कृती, संस्करण वगैरे” वरील मालिका आहे. अखेरीस आजचा ज्वलंत प्रश्न अणुशक्तीचा. तोही नुकताच “अणुशक्ती वीजकेंद्र आणि अणुबाँब” या लेखात चर्चिला आहे. तोही अधिकारवाणीने. “संगीत साधना - पूर्वीच्या काळातली आणि आताची” यावरही एक मालिकालेखन आहे.

http://anandghare2.wordpress.com/ या एका निराळ्या, कदाचित मूळ अनुदिनीवर “निवडक आनंदघन” या नावाने खालील मजकूर आढळतो.

आजीचे घड्याळ (कालगणना) (12), चंद्रमा (35), थोडी गंमत (2), दिवाळी (9), धार्मिक (35), गणपती (14), देवी (8), विठ्ठल (8), श्रीकृष्ण (5), निवेदन (1), प्रवासवर्णन (59), माझीही अपूर्वाई (7), मैसूर (6), युरोप (15), राणीचे शहर लंडन (6), लीड्स (23), बोलू ऐसे बोल (8), ललित कथा (4), विज्ञान आणि तंत्रज्ञान (12), विविध विषय (21), विवेचन (11), व्यक्तीचित्रे (8), साहित्यिक (3).

अनुदिनी का वाचनीय आहे? लेखक गोष्टीवेल्हाळ, सिद्धहस्त, अधिकारप्राप्त, अनुभवी व्यक्ती आहे. त्यांचे लेखन लोकरुचीचे समाधान करणारे, सुरस आणि यथातथ्य असते. लेखनास कमालीचे सातत्य आहे. २००६ सालापासून एवढ्या नियमिततेने सुबोध, सुंदर मराठी विशेषतः उच्च तांत्रिक विषयांवर लेखन करणारे, अनुदिनीकार मोजकेच आहेत. त्यातीलच आनंद घारे एक आहेत. मला त्यांचे लेखन आवडते. तुम्हालाही नक्कीच आवडेल.

हा केवळ “अनुदिनी परिचय” आहे. म्हणून जास्त तपशीलात लिहिलेले नाही. तपशीलाकरता ती अनुदिनी मुळातच वाचणे चांगले. तरीही “मन” या विषयावरली इथल्याइतकी मनोरंजक लेखमालिका मी तरी इतरत्र पाहिलेली नाही, हे इथे नमूद करावेच लागेल.
.

२०११-०३-१४

अनुदिनी परिचय-१: आहार आणि आरोग्य

अनुदिनीचा दुवा

आहार आणि आरोग्य http://knowaboutyourfood.blogspot.com/

अनुदिनी लेखिकेची ओळख

कन्सल्टिंग फिजिशियन आणि प्रोफेसर ऑफ मेडिसिन असलेल्या जाणकार लेखिकेने “लाईफ गोज ऑन” ह्या छद्म नावाने ही अनुदिनी लिहिलेली आहे.

अनुदिनीचे ब्रीदवाक्य

“लेट युअर फूड बी युअर मेडिसिन अँड लेट युअर मेडिसिन बी युअर फूड” या हिप्पोक्रॅटसच्या वचनानेच या अनुदिनीची सुरूवात होते.

अनुदिनीची सांख्यिकी

ही पूर्णतः मराठी अनुदिनी २००७ (२२ नोंदी) आणि २००८ (१२ नोंदी) या दोन वर्षांत लिहून काढलेली आहे. सुरूवात मे २००७ मध्ये झालेली आहे. लेखिकेची “कॉर्पोरे सानो” नावाची आणखी एक पूर्णतः इंग्रजी अनुदिनी आहे. “कॉर्पोरे सानो”म्हणजे ’निरोगी शरीरात निरोगी मन’ या अर्थाची एक लॅटिन म्हण आहे. तसेच “हायजिया” या नावाचीही एक पूर्णपणे इंग्रजी अनुदिनी त्यांनी लिहीली आहे. “हायजिया”म्हणजे आरोग्य व स्वच्छतेची देवता. मात्र या दोन्हीही इंग्रजी अनुदिन्या मराठी अनुदिनीच्या मनाने खूपच लहान आहेत. ही अनुदिनी “इंडिब्लॉगर”, “इंडिमेडिक”, “इंडिरँक”, “न्यू ब्लॉग अड्डा” या अनुदिनी नोंदसंस्थळांवर नोंदलेली आहे. मला हिचा पत्ता “मराठी ब्लॉग विश्व” वरील नोंदीमुळे वाचायला मिळाला. “शायनी स्टॅट” वर या अनुदिनीस आजवर १८,००० हून अधिक वाचक मिळाल्याची नोंद आहे. तर “फ्लॅग काऊंटर” ३,५०० हून अधिक अभ्यागत नोंदवतांना दिसतो.

अनुदिनीचा स्वागतसंदेश

लेखनाचे उद्दिष्टाबाबत लेखिका लिहिते, “माझा मुलगा जेव्हा शाळकरी होता तेव्हा त्याला आहारातील प्रत्येक घटक, जीवनसत्वे, खनिजे व इतर पोषक तत्वे यांविषयीची शास्त्रीय माहीती आणि त्या घटकांचे आरोग्यासाठी काय महत्व याबद्दल माहीती देऊन; चांगल्या आहाराबद्दल त्याच्यात जागरूकता निर्माण करावी या उद्देशाने मी आहाराबद्दल लिहायला सुरवात केली. मी स्वत: फिजिशियन असल्याने शास्त्रीय माहिती होतीच. त्याचप्रमाने इतरही वाचन केले. मग त्यात खूपच आवड निर्माण झाली. आपले अन्न व आहार, त्यातील मूलभूत घटकाची शास्त्रीय माहीती इत्यादीविषयी मग मी माझ्या शाळकरी मुलाला समजावे यासाठी सोप्या भाषेत लिहायला सुरवात केली. लिहिलेली माहीती खूप जास्त होती. म्हणून मग ही सर्व माहिती व्यवस्थित लिहुन मुलांसाठी / मोठयांसाठी "शास्त्रीय माहितीसह आहाराविषयी मार्गदर्शन" असे पुस्तक प्रसिध्द करावे या उद्देशाने संगणकावर ’लोकसत्ता फॉन्टफ्रिडम’ चा उपयोग करून स्वत: लिहून काढले. ही सर्व प्रक्रिया दोन तीन वर्षे चालली. त्यानंतर मात्र माझे मणक्याचे दुखणे चालू झाले. माझ्या मणक्याची शस्त्रक्रिया झाली त्यामुळे संगणकावर साठवून ठेवलेल्या फाईल्स तेथेच राहिल्या. त्यानंतर कार्यबाहुल्य व एकापाठोपाठ आलेल्या काही कौटुंबिक तशाच वैयक्तीक अडचणीं यामुळे हे सर्व लिखाण मी आजपर्यंत पुस्तकरुपाने प्रसिध्द करू शकले नाही. ज्या मुलासाठी मी हे लिहिले त्यानेच या माहीतीचा उपयोग इतरांनाही व्हावा यादृष्टीने ब्लॉगच्या माध्यमातून हे लिखाण प्रसिध्द करण्याची कल्पना दिली. म्हणून मी आता माझे सर्व लिखाण "आहार व आरोग्य" या मराठी ब्लॉगवर प्रसिध्द करीत आहे. मुळात मी हे लिखाण शाळकरी मुलांना नजरेसमोर ठेवून लिहिले आहे त्यामुळे ते अतिशय सोप्या भाषेत, सोपी उदाहरणे देऊन लिहिले आहे तसेच मुलांशी संवाद साधण्याच्या दृष्टीने ते त्यांना संबोधीत करून लिहिले आहे. त्यामुळे ते अतिशय बाळबोध वाटण्याची शक्यता आहे.”

अनुदिनी कशासाठी वाचनीय आहे?

जलसंजीवनी, पौष्टिक पेये, अपायकारक पेये, अन्नसंस्कृतीचा इतिहास, आहारातील निरनिराळ्या अन्नघटकांची शास्त्रीय ओळख, त्यांची कार्ये, त्यांची उपलब्धता ह्याविषयी लेखिकेने संदर्भांसहित केलेले विवेचन मराठीतील अशाप्रकारचे कदाचित पहिलेच, सर्वसमावेशक विवेचन असेल. लेखिकेची भाषाशैली सोपी आणि स्पष्ट आहे. मजकूर वाचनीय आणि आचरणीय आहे. एके ठिकाणी लेखिका म्हणते, “शंभर वर्षापुर्वी माणूस साधारण वर्षाला दोन किलो साखर खात असे. आता त्याचे प्रमाण पन्नास किलो झालेले आहे. तुमच्या घरात माणसी किती साखर वापरली जाते हे एकदा पहा. कदाचित तुम्ही एकटेच आठवड्याला अर्धाकिलो साखर खात असाल. तर मात्र हे प्रमाण खूपच जास्त आहे.” तर दुसर्‍या एका ठिकाणी लेखिका म्हणते, “जास्त प्रमाणात मिळालेली साखर तुमचे शरीर साठवून ठेवते. हा साठा केला जातो चरबीच्या स्वरुपात. म्हणजेच जितकी जास्त साखर तुम्ही खाल तितकी जास्त चरबी तुमच्या शरीरात साठत जाईल.” यासारखी उद्बोधक वाक्ये अनुदिनीत सर्वत्र विखुरलेली आहेत. निरनिराळी नत्राम्ले, त्यांचे आहारातील महात्म्य आणि त्यांची उपलब्धता यांबाबतही सुरेख मार्गदर्शन या अनुदिनीत सापडेल. चौतीस लेखांत लिहिलेली ही माहिती सलग व्यवस्थित उतरवली तर ए-४ आकाराच्या ७० पानांचे सुरेख पुस्तक तयार होऊ शकेल. अनुदिनीवरील लिखाण आता थांबलेले दिसत असले तरी, ते पुन्हा सुरू व्हावे अशीच सदिच्छा आपण या परिचयाच्या निमित्ताने करू या!

अनुदिनीची आधारसूची

१. या लिखाणात बरेच ठिकाणी अन्नपदार्थातील मूलभूत घटकांचे जे प्रमाण दिले आहे ते बहुतांशी, सी.गोपालन, बी.व्ही.राम शास्त्री, आणि डी.सी.बालसुब्रमण्यन यांच्या “न्युट्रिशन व्हॅल्यू ऑफ इंडियन फूडस” या हैद्राबादेतील नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ न्युट्रिशनने प्रकाशित केलेल्या पुस्तकावर आधारीत आहे.

२. एफ.पी.अनिता आणि फिलिफ अब्राहम यांच्या “क्लिनिकल डायेटिटिक्स अँड न्युट्रिशन” या पुस्तकाची चौथी आवृत्ती.

३. वैद्यकशास्त्रावरील निरनिराळी पाठ्यपुस्तके.

४. लिखाण समजण्यास सोपे व्हावे यासाठी ठिकठिकाणी वापरलेल्या आकृत्या व फोटो महाजालावरुन घेतलेले आहेत.

अनुदिनीतील श्रेय अव्हेर

१. ’आहार व आरोग्य’ या लेखमालेचा उद्देश समाजात ज्ञानप्रसार व्हावा हा आहे.

२. इथे फक्त शास्त्रीय माहीती दिली असून ही लेखमाला कोणत्याही आहार उपचार पध्दतीचे समर्थन करणारी नाही.

३. ही माहिती वाचणाrर्‍या कोणाही व्यक्तीने अगर रुग्णाने आपल्या विशिष्ट आजारावर योग्य आहार कोणता याविषयी तज्ञ डॉक्टर/आहारतज्ञ यांचा सल्ला घ्यावा.

४. इथे दिलेली माहीती वाचून कोणी स्वत: प्रयोग केले तर त्यास प्रस्तुत लेखक वा संदर्भित ग्रंथ जबाबदार नाहीत याची नोंद घ्यावी.

अनुदिनीतील प्रतमहात्म्य विषयक विनंती

‘आहार व आरोग्य’ या लेखमालेतील लिखाणासाठी प्रस्तुत लेखकाने आपल्या शिक्षणाचा व बुध्दीचा वापर केला आहे तसेच हे लिखाण करण्यासाठी, ते संगणकावर मराठीत टाईप करण्यासाठी बरीच मेहनत घेतली असून त्यासाठी बराच वेळही खर्च केला आहे. त्यामुळे ज्ञानार्जानाव्यतिरिक्त वाचकांनी या लेखांची परवानगीशिवाय प्रत काढणे किंवा येथील माहितीचा इतरत्र वापर करणे या गोष्टी करू नयेत अशी अपेक्षा व विनंती आहे.
.