२० मार्चला आम्ही मिरीकहून निघालो ते दार्जिलिंगकडे. दार्जिलिंग म्हटल्यावर पहिल्यांदा आठवतात ते चहाचे मळे. बसमधून वळणदार घाटमार्गाने चालत असता दुतर्फा चहाचेच तर मळे सर्वत्र दिसत होते. आम्ही पोहोचण्याच्या आधी तीन दिवस सतत दार्जिलिंगला पाऊस पडत होता. आज मात्र स्वच्छ सूर्यप्रकाशात, नुकत्याच झालेल्या पावसाने सतेज झालेले चहाचे मळे प्रसन्न वाटत होते.
मग आम्हाला एका ठिकाणी बसमधून उतरवण्यात आले. जिथे नेपाळ सरहद्दीपलीकडील पशुपतीनगर नावाच्या एका गावात जाऊन खरेदीची संधी देण्यात आली. त्या ठिकाणापासून थोड्या अंतरावर नेपाळ सरहद्द होती. नेपाळात प्रवेश करण्याकरता भारतीय नागरिकांना कुठलाच प्रतिबंध नव्हता. मात्र नेपाळात असतांना चुकून जरी मोबाईल वापरला तर उगाचच आंतरराष्ट्रीय रोमिंग चार्जेस पडण्याची भीती असल्याने मोबाईल्स बसमधेच राहू दिले होते. इतर कुठल्याही नव्या वस्तू, कॅमेरे वगैरे सोबत नेले नव्हते, कारण परतताना कस्टम्स ड्युटी लागण्याची भीती होती. स्वेटर, जाकीट, पेन-ड्राईव्हज अशा प्रकारच्या वस्तू स्वस्त मिळतात असेही सांगण्यात आलेले होते. सरहद्द पार करून गेल्यावर मार्केटपर्यंत पोहोचण्याकरता पाच जणांना एक यानुसार एक एक टॅक्सी करावी लागली.
मार्केटमधे नेऊन तासभर थांबून परत आणण्याचे प्रती टॅक्सी रुपये १५० घेत होते. आमच्या सोबतच्या बहुतेकांनी कुठलीच खरेदी केली नव्हती. नाही म्हणायला प्रत्येकाने एकएक पेन-ड्राईव्ह अवश्य घेतला होता. कारण तो अविश्वसनीय किंमतीत उपलब्ध होता. २५० रुपयाला ६४ जीबी. मुंबईला परतल्यावर मात्र ती खरेदी महागात पडल्याचेच निष्पन्न झाले. त्यातला एकही पेन-ड्राईव्ह कुणालाही वापरता आला नाही. दोन-तीन तासांचा उपलब्ध वेळ, पर्यटकांच्या सरहद्द पार करून काहीतरी खरेदी करण्याच्या हुरूपार्थ, शहीद झाला. जे पैसे बळी पडले त्यांची गोष्ट तर सांगून झालेलीच आहे. पर्यटना दरम्यान टाळता आले तर असे दौरे अवश्य टाळावेत. ट्रॅव्हल कंपन्यांच्या व त्यांच्या इष्टमित्रांच्या, वरकड मिळकती व्यतिरिक्त यांतून पर्य़टकास लाभदायक काहीच घडत नाही. हे मी स्वानुभवावरून नक्कीच सांगू शकतो. याव्यतिरिक्त त्साम्गो तलावाकाठी याकावर बसण्याची जी टूम काढली होती त्याबाबतही मला हेच म्हणायचे आहे. पर्यटकांना मुळीच हौस नसते, सहल-व्यवस्थापकच मुद्दाम अशा जागी घेऊन जातात, असे मला म्हणायचे नाही. तरीही अशा घटनांच्या पुनरावृत्ती, पर्यटक व यात्राकंपनी दोघांनीही टाळाव्यात या मताचा मी आहे. याकारोहणप्रसंगी याकावर बसून फोटो काढण्याचे दरमाणशी रुपये तीस. थोडे दूर फिरवून आणण्याचे आणखी रुपये १२० असे सांगण्यात आले. प्रत्यक्षात याकांचे मालक आमचेच कॅमेरे घेऊन आमचेच फोटो आमच्याच कॅमेर्यांमधे बंद करून देत होते. आम्हीच आमचे फोटो काढले असते तर जास्त चांगले तरी आले असते, असे आता दिसून आलेले आहे. आमच्यासोबतच्या सोळा लोकांनी अक्षरशः शेकडो रुपये, या दोन्हीही ठिकाणी, उगाचच खर्च केले. स्थानिक लोकांना तेवढेच उत्पन्नाचे साधन आहे. त्यांना मिळू देत हवे तर थोडे पैसे. अशा भावनेने लोकांनी खर्च केले. मात्र पर्यटन, मूल्यप्रभावी होण्याकरता, अशा प्रसंगी योग्य तीच निवड करण्याचे धोरण पर्यटक तसेच यात्राकंपन्यांनीही ठेवावे. असो. आमचा पुढला कार्यक्रम फार सुरस झाला. थोड्याच वेळात दार्जिलिंगकडे प्रवास करत आम्ही एका डोंगर-उतारावरील चहाच्या मळ्यातच उतरलो. खूप फोटो काढले.
हे छान चहाचे मळे किती । रेखले चित्र टेकडीवरती ॥
त्यानंतर आम्ही टॉय-ट्रेनच्या दर्शनार्थ घूम स्थानकापाशी जाऊन पोहोचलो. एक गोड मुलगी पारंपरिक पोशाखात नटून इकडे-तिकडे मजेत फिरतांना दिसली. छे, छे! जुळी नाही. तिचेच प्रतिबिंब आहे ते आरशातले. मग तिथेच एका पाटीवर ती टॉय-ट्रेन जागतिक-सांस्कृतिक ठेवा असल्याची जाणीव करून देणारी जाहिरात पाहिली.
मेरो सपना की रानी कहिले आउंछो तिमि ।
मेरो सपना को महल कहिले बनाउंछो तिमि ॥
माझे स्वप्नांचे राणी सांग येशील तू कधी ।
माझ्या स्वप्नाचा महाल सांग बांधू मी कधी ॥
दार्जिलिंगची हिमालयन रेल्वे हे अभियांत्रिकी कौशल्याचे एक चिरंतन स्मारक आहे. इसवी सनाच्या १८७९ मधे घातलेल्या रुळांवरून आजही ती दिमाखात धावत असते. तिला विश्व-संस्कृतिक-वारसा असण्याचा सन्मान प्राप्त झालेला आहे. दार्जिलिंग शहरात उंचीवरच्या स्थानकांपर्यंत पोहोचण्याकरता आगगाडी जेव्हा इंग्रजी आठच्या आकाराच्या लोहमार्गांवरून वेगाने जात असते तेव्हा ती अत्यंत प्रेक्षणीय भासते. तिचा डौल तो काय वर्णावा. दार्जिलिंग शहरात तिची “दार्जिलिंग” आणि “घूम” ही स्थानके आम्ही थांबून पाहिली. दार्जिलिंग हे अंतिम स्थानक आहे. या लोहमार्गासोबतच डांबरी सडकही हातात हात घालून चालत असते.
याचाच उपयोग ’आराधना’ सिनेमातील सदाबहार गीतात करून घेतलेला आहे. जीपने प्रवास करणार्या राजेश खन्नावर चित्रित करण्यात आलेले “मेरे सपनों की रानी कब आयेगी तू, बीत जाये जिंदगानी कब आयेगी तू” हे गीत, याच गाडीत बसून प्रवास करणार्या शर्मिला टागोरला उद्देशून म्हटले गेलेले आहे. त्याची चित्रफीत पाहिल्यासही या रेल्वेची खरीखुरी गंमत लक्षात येऊ शकेल. त्याकरता अगदी दार्जिलिंगला जायलाच हवे असे नाही.
जवळच गोर्खा-वॉर-मेमोरिअल म्हणजेच गुरखा-युद्धाचे-स्मारक आहे. १८१४ ते १८१६ दरम्यान, नेपाळ आणि ब्रिटिश-ईस्ट-इंडिया-कंपनी यांच्यात जमिनीवरील सार्वभौमत्त्वावरून झालेल्या घनघोर लढाईत, नेपाळचा दारूण पराभव झाला. सुगौलीच्या तहात तत्कालीन नेपाळची एक तृतियांश जमीन ब्रिटिशांच्या ताब्यात गेली. या लढाईत मारल्या गेलेल्या ब्रिटिश (खरेतर एतद्देशीयच) सैनिकांचे स्मारक घूम रेल्वेस्थानकाच्या बाजूलाच उभारलेले आहे.
संध्याकाळी सातच्या सुमारास आम्ही दार्जिलिंगच्या हॉटेल आनंद पॅलेसमधे जाऊन पोहोचलो. तिथे प्रत्येकास रेशमाचे उत्तरीय घालून आमचे स्वागत करण्यात आले. असे सांगण्यात आले की ही दार्जिलिंगची स्वागत करण्याची पारंपरिक पद्धत आहे. आम्हाला ही पद्धत आवडली. त्यानंतर बराच वेळ आम्ही त्या उत्तरीयाशी खेळण्यात घालवला होता. जवळच दार्जिलिंगचा सुप्रसिद्ध मॉल होता. म्हणून, संध्याकाळी दिवे जातात हे माहीत असूनही आम्ही उत्साहाने खरेदीला बाहेर पडलो. गान्तोकला ज्या थंडीचा सामना करावा लागणार होता त्याकरता तयारी म्हणून प्रत्येकानेच कुठे हातमोजे घे, तर कुठे स्वेटर घे असे करत मजेत खरेदी केली.
.
२ टिप्पण्या:
मस्त आहे फोटॊ . तो भाग खरंच खूप निसर्ग रम्य आहे. मी एक वर्ष होतो त्या भागात.
जुने दिवस आठवले.
धन्यवाद महेंद्र. तुमची टिप्पणी इतक्या झपकन आली की मी लिहीत असतंनाच कुणी वाचत आहे की काय असा भास झाला.
पुन्हा एकदा धन्यवाद. असेच वाचत राहा.
टिप्पणी पोस्ट करा