२०१०-०४-२६

सिक्कीम सहल-८: गान्तोक-३-नातू-ला

गान्तोक-३: नातू ला – “ऐकत्या कानांची खिंड”

नातू-ला च्या वाटेवर नागमोडी वळणांनी ४,००० फुटांचा चढ चढत आम्ही त्साम्गो तलावाजवळ येऊन पोहोचलो. त्साम्गो तलावाजवळचे सर्व वातावरणच भारलेले होते. कायम अभ्राच्छादित आकाशातून जरासा सूर्य डोकावला की, क्षणात निळ्या आकाशाची सावली तळ्यात पडून, पृष्ठभागावर चकचकीत निळसर आरसा प्रसन्नपणे चमकू लागे. तशातच डोंगराच्या दोन सोंडांच्यामधून आकाशातून उतरून, ढगच तलावात शिरू पाहत. वातावरणात आर्द्रता इतकी भरून राहिलेली असे की, जरासे वारे सुटले तर शून्य अंश सेल्शिअसच्या आसपासच्या त्या तापमानात, कापरे भरू लागे. आभाळ ढगाळले की लगेच थंडी दाटून येई. “घडी में तोळा, घडी में मासा” अशा प्रकारचे क्षणोक्षणी रंग बदलणारे आकाश, क्षणोक्षणी संग बदलणारे वातावरण आणि कमालीच्या स्वच्छ, आरस्पानी पाण्यावर उमटणारी छाया-प्रकाशाची क्षणचित्रे या सगळ्यांमुळे त्या सरोवराचे सान्निध्य केवळ गूढरम्य बनून राहिले होते. तळ्यापारच्या डोंगरावरचे काळे बर्फ त्या डोंगरांवर नक्षी काढून पहुडलेले होते.


तिथून पुढे निघाल्यावर, लष्कराच्या शिबिराजवळ एके ठिकाणी ’मेरा भारत महान’ आणि ’हम ही जीतेंगे’ या दोन देशभक्तीपर घोषणा रोमन लिपीत, काळ्या बर्फात कोरून ठेवलेल्या दिसल्या. “काळा बर्फ” म्हणजे काळ्या रंगाचा बर्फ नव्हे, तर नेहमीसारखा पांढराच. मात्र, वर्षानुवर्षे सतत साखळून राहिलेला असल्याने सहजी वितळत नाही, आणि प्रखर उन्हातही तळपत राहतो, तो बर्फ. नंतर एका कमानीपर्यंत आमच्या वाहनाने आम्हाला आणून सोडले. वाहन खाली वाहनतळावर रवाना झाले. गाडीतून उतरलो काय अन्‌ अंगभर थंडी दाटून आली. सर्वात प्रथम भावना झाली ती एक नंबरची. गरजेची निकड पुरवणारी सुविधाही जवळच उपलब्ध करून ठेवलेली दिसली. जरा मोकळे झाल्यावर इतरत्र पाहण्याचे भान आले.

ही कमान म्हणजे नातू-ला नाही. ही आहे तिथपर्यंत पोहोचण्याच्या वाटेवरची सर्वात खालची कमान. समोरच्या कमानीपासून साधारणपणे अर्धा किलोमीटर अंतर पायर्‍या चढून वर जायचे होते. मगच आम्हाला परंपरागतपणे अव्याहत वापरात असलेल्या आंतरदेशीय पुरातन रेशीममार्गावरचे महाद्वार पाहायला मिळणार होते. चीनसोबतच्या आपल्या सीमेवरचे प्रवेशद्वार आम्ही पाहू शकणार होतो. आम्ही तर बूट, पायमोजे, जीन्स, शर्ट, जॅकेट, हातमोजे, कानटोपी इत्यादी नखशिखांत जामानिमा केलेला असूनही काकडत होतो. तापमान उणे चार अंश सेल्शस होते. सूर्य ढगांचे कवाड किलकिले करून पाहत होता. त्याच्या त्या दृष्टिक्षेपाने हुरूप येऊन आम्ही कमानीतून अग्रसर झालो.

उत्साहात चढत होतो. किती पायर्‍या झाल्या मोजल्या नाहीत. मात्र लवकरच आम्ही त्या टेकडीच्या वरच्या टोकावर उभे असल्याचे आमच्या लक्षात आले. समोरच्या बाजूला एक काटेरी तारेचे कुंपण होते. पलीकडे लाल रंगाच्या पक्क्या इमारतीवरला लाल तारा, ती इमारत चिनी असल्याचे घोषित करत होता. अलीकडे पत्र्याच्या छताचे एक घरच आपला इमला होते. दोहोंच्या दरम्यान कुंपणा-अलीकडे आम्ही उभे होतो.


या फोटोत आम्ही उभे आहोत त्या अवस्थेत, आमच्या उजव्या हाताला नातू-ला होती. तिचे दृश्य खालच्या फोटोतल्याप्रमाणे दिसे. खिंडीच्या पलीकडच्या डोंगरावर एक चिनी सैनिकसुद्धा दिसला होता. खिंडीवरच्या पाटीवर “Nathu La Business Channel for China-India Border Trade” असे लाल अक्षरांत लिहीलेले होते. आम्ही त्साम्गो सरोवरापासून नातू-ला पर्यंत आलो त्या मार्गावर सुमारे अर्ध्या रस्त्यातच शेरेथाँग ट्रेड मार्ट या नावाने आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्राचे बांधकाम जोरात सुरू होते.



हल्ली नातू-ला स भेट देण्याकरता, बुधवार, गुरूवार, शनिवार व रविवार या चार दिवसांतच पर्यटकांना अनुमती देतात. तो दिवस, बुधवार दिनांक २४-०३-२०१०, रामनवमीचा दिवस होता. रामजन्माची –दुपारी बाराची- वेळ होती. आम्ही सगळ्यांनी मिळून “भारत माता की जय”, “जय हिंद” अशा प्रकारच्या घोषणा त्रिवार केल्या आणि रामजन्म साजरा केला.

“नातू-ला म्हणजे ऐकत्या कानांची खिंड”. रेशीममार्गावरून देशोदेशींचे प्रवासी जात. आपापल्या देशांतील बित्तंबातम्यांची चर्चा ते खिंडीतून जातांना करत असावेत. त्या गप्पा खिंडीला ऐकू येत असाव्यात म्हणूनच स्थानिकांनी त्या खिंडीला “ऐकत्या कानांची खिंड किंवा नातू-ला” असे नाव दिले असावे असे वाटले. नातू-ला सोडून मग आमची वाहने बाबा हरभजनसिंग यांच्या मंदिराकडे वळली. कॅप्टन “बाबा” हरभजनसिंग (३ ऑगस्ट १९४१ ते ४ ऑक्टोंबर १९६८) भारतीय लष्करातील एक अधिकारी होते. ते नातू-ला वर तैनात होते. कामावर असतांना ते एका हिमनदीत गाडले गेले. तीन दिवस शोधाशोध झाल्यावर त्यांनीच शोधकर्त्यांना घटनास्थानापर्यंत आणून सोडले. ते त्यांच्या एका सहकार्‍याच्या स्वप्नात आले आणि त्यास तिथे समाधी बांधण्याची सूचना केली.


पुढे अनेक भारतीय सैनिकांना कठीण वातावरणांच्या परिस्थितीत त्यांनी व्यवस्थित मार्गदर्शन केले अशा दंतकथा आहेत. म्हणून या ठिकाणी त्यांचे मंदिर बांधलेले आहे. इथे नातू-ला भेटीच्या स्मरणार्थ निर्मिलेल्या कित्येक चित्ताकर्षक भेटवस्तू (पाकिटे, पिशव्या, किल्लीच्या साखळ्या, नाणी, हातमोजे, पायमोजे, उनी कपडे, जाकिटे) एका दुकानात अतिशय माफक किंमतीत विक्रीस उपलब्ध आहेत. इथल्या वस्तूंचा दर्जा चांगला होता आणि वस्तूंच्या किंमती आम्हाला इतर अनेक ठिकाणांपेक्षा चांगल्या वाटल्या.

अशा वातावरणात आमची सुमो मग परत त्साम्गो तळ्याच्या पाळीवर येऊन थांबली. लगेचच दोनचार याक व त्यांचे मालक अवतीभवती जमा झाले. आम्हालाही याक बघण्याची, त्यावर स्वार होण्याची, स्वार होऊन फोटो काढवून घेण्याची हौस होतीच. मात्र, ज्याच्या दर्शनानेही घाबरायला व्हावे, असल्या याकांवर, केवळ त्यांच्या मालकांच्या भरोशावर आम्ही खुशाल सवार होत होतो, हेच मला मोठे आश्चर्य वाटत होते. याक हा प्राणी दिसायला जेवढा गबाळा वाटे तेवढाच असायलाही होता. नाक दाबूनच स्वार व्हावे लागत असल्याने, प्रत्येकाला उतरण्याची सुद्धा घाईच होती. तरीही, कुठल्याही याकाने बंडखोरी केली नाही. जराही अवखळपणा न करता आपापल्या मालकांना इमाने-इतबारे उपजीविका मिळवून दिली. सक्खी पोरेही मायबापांच्या इतक्या वचनांत असलेली मी पाहिलेली नाहीत. धन्य ते याक आणि धन्य ते त्यांचे मालक. कदाचित शीतकालीन हाल-अपेष्टांचा मुकाबला परस्पर सहकार्याने करतांना याक व त्यांचे मालक परस्परांच्या गरजांना आणि सामर्थ्यांना जास्त चांगल्या प्रकारे समजावून घेऊ लागले असावेत.

यानंतर आम्ही एका पडावावर थांबलो. तिथे या वाटेवर वाहने चालवणार्‍या सर्व वाहनांचे चालक राहतात असे एक गाव होते. चालक कठीण पर्वतीय प्रदेशात, अवघड वातावरणात वाहने चालवून थकलेले असतात, ते गावात येताच विश्रांती घेतात. प्रवाशांनाही सोबत आणलेले खाद्यपदार्थ आस्वादण्या इतका थकवा आलेला असतोच. शिवाय छोट्यामोठ्या दुकानांच्या ओळीच्या ओळी इथे स्वागतास सज्ज असतात.  “मोमो-म्हणजे तांबड्या भोपळ्यासारख्या दिसणार्‍या स्क्वॅश नामक फळाची भाजी भरलेले उकडलेले वा तळलेले मोदक अथवा करंज्या”, “थुपका-म्हणजे नुडल्स”, “सूप्स-म्हणजे तरतर्‍हेची सारे” इत्यादी स्थानिक चवदार पदार्थांनी क्षुधाशांतीच्या साधनेस हुरूप आला. जंतर-मंतर (प्रसाधनसुविधेस सचिन ट्रॅव्हल्सच्या सहलींमधे प्रचलित असलेले नाव) थांबाही मिळाला. असे म्हणतात की निसर्ग मेहेरबान असेल तरच नातू-ला ची सहल निर्विघ्न पार पडू शकते. त्याचे प्रत्यंतर इथे पोहोचताच आम्हाला आले. अचानकच धो धो पाऊस पडू लागला. आम्हीही लगेच कल्पना करू लागलो की हाच पाऊस जर नातू-ला वर असतांना पडत असता तर वाहनातून पाय-उतार होण्याचीही हिंमत आम्हाला झाली नसती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: