२०१०-०४-१९

जनार्दनस्वामी

नुकताच काही व्यक्तीगत कारणांमुळे नागपूरला जाण्याचा योग आला. तेव्हा एके दिवशी सकाळीच जनार्दनस्वामी योगाभ्यासी मंडळाच्या एका शाखेत अगदी योगायोगानेच जाऊन पोहोचलो. मी शाळेत असतांना (१९७३-७४ चा सुमार असेल) स्वतः जनार्दनस्वामी आमच्या शाळेत येऊन आम्हाला सुलभ सांघिक योगासने शिकवत असत. तेव्हाची आठवण जागी झाली. आज नागपूरच्या रामनगरातील त्यांच्या योगाभ्यासी मंडळाच्या कार्याचे, एका मोठ्या वटवृक्षात रूपांतर झालेले दिसून येते. नागपूर व विदर्भात मिळून मंडळाच्या ९४ शाखांतून दररोज सांघिक योगसाधनेची निशुल्क सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

सांघिक योगासने, योगोपचार, योगाभ्यास व योगसाधना या सर्वच उपक्रमांद्वारे नागपूरात या योगपीठाचे कार्य सिद्धीस पोहोचलेले दिसून येते. त्याच अनुषंगाने श्री.जनार्दनस्वामींचा अल्पपरिचय इथे करून देत आहे.

योगमूर्ती परमपूजनीय श्री जनार्दनस्वामीजींचा जन्म, कार्तिक वद्य १४, शके १८१४ (इसवी सन १८९२) या दिवशी, महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील कवठे गावी झाला. कुशाग्र बुद्धी व बहुविध व्यक्तित्व असलेल्या स्वामीजींनी अल्पवयातच चतुर्विध वेद-वेदान्त, अन्वय-व्यतिरेक, श्रृती-स्मृती, व्याकरण, आयुर्वेद, ज्योतिषविद्या, इत्यादी विषयांचे सखोल अध्ययन करून शास्त्रशुद्ध ज्ञान प्राप्त केले.

स्वामीजी स्वतःच एक चालते बोलते तीर्थक्षेत्र होते. त्यांनी अनेक तीर्थक्षेत्रांना भेट देऊन, संन्याशाश्रमाची दीक्षा घेतली होती. भारतभ्रमण व नर्मदा परिक्रमा करत असतांना, एका अज्ञात संन्याश्याने त्यांना योगविषयक ज्ञान प्रदान केले.

नंतर स्वामीजी नागपूरात आले. तो सूर्योदय नागपूरकरांसाठी भाग्यशाली ठरला. नागपूर ही कर्मभूमी मानलेल्या स्वामीजींनी ’शिवभावे जीवसेवा’ हे परमहंसांचे ब्रीद हृदयाशी बाळगून, आबालवृद्धांना व्याधिमुक्त होण्याचा महामंत्र देण्यास प्रारंभ केला. तो मंत्र होता: करा हो नियमित योगासने! धर्म, संप्रदाय, भाषा, लिंग, आयु, आर्थिक परिस्थिती या सर्व भेदभावांच्या पलीकडे जाऊन संपूर्ण मानव जातीच्या उद्धारासाठी समाधान, सौख्य व निरोगत्व ही उद्दिष्टे साधण्याकरता योगसाधना अंगिकारण्याचा महामंत्र वायुवेगाने आबालवृद्धांपर्यंत पोहोचवण्याचे महत्कार्य करणारी ही महान विभूती नागपूर शहराचे वैभव ठरली आहे!

त्यांनी योगप्रसार व योगोपचार हे जीवनाचे अंतिम लक्ष्य ठरवून, घरोघरी योगगंगा पोहोचवण्याकरता, १९५१ साली “योगाभ्यासी मंडळा”ची स्थापना केली. प्रत्येकाला समाधान, सुख व निरोगी जीवन लाभावे म्हणून, सेवाभावाने, निःशुल्क योगप्रशिक्षण देणे, योगप्रसार करणे, हे योगाभ्यासी मंडळाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. समाधानाय सौख्याय नीरोगत्वाय जीवने । योगमेवाभ्यसेत प्राज्ञः यथाशक्ति निरंतरः ॥ हा स्वामीजींचा संदेश हेच मंडळाचे घोषवाक्य बनलेले आहे.

स्वामीजी वीतराग, अनिकेत व अयाचित वृत्तीने कठोर संन्यस्त जीवन जगले. त्यांचे आयुष्य अनेकांच्या स्मृतीपटलावर आजही कोरलेले आहे. नागपूरला ’योगपीठ’ स्थापन करणारी ही ’युगनिर्माता’ विभूती, वैशाख कृष्ण १२, शके १९००, अर्थात २ जून १९७८ रोजी समाधिस्थ झाली. मंडळ परिसरातील स्वामीजींची समाधी योगसाधकांना सतत प्रेरणा देत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: