२६ मार्चला सकाळी सहा वाजता आम्ही सियाल्डा स्टेशनवर उतरलो. आमची सिक्कीम-दार्जिलिंगची, सचिन ट्रॅव्हल्ससोबत केलेली सहलही त्याचवेळी पूर्ण झालेली होती. आता आज, आम्ही स्वतःच्या नियोजनानुसार कलकत्तादर्शन करणार होतो. हाजरारोडवरच्या महाराष्ट्रनिवासात आम्ही निवासाची सोय केलेली होती. म्हणून आम्हाला तिथे जायचे होते. साधारणतः सियाल्डा स्टेशन ते महाराष्ट्रनिवास १५० रुपये पडतील अशी आमची कल्पना करून देण्यात आलेली होती. तेवढ्यात, सचिन ट्रॅव्हल्सचे सहलप्रणेते श्री.अविनाश शिंदे आम्हाला मदत करण्यास पुढे आले. त्यांची सहलविषयक जबाबदारी पूर्णपणे पार पडलेली असूनही, त्यांनी त्यांच्या ओळखीच्या श्री.शंभू नावाच्या टॅक्सीचालकाच्या ओळखीने आम्हाला एक टॅक्सी ठरवून दिली. टॅक्सी चालकास, पोहोचल्यावर १७० रुपये द्यावेत असे आम्हाला सांगितले आणि आमचा निरोप घेतला.
यथावकाश आम्ही हाजरारोडवरच्या महाराष्ट्रनिवासासमोर जाऊन पोहोचलो. पैसे देण्याअगोदर, इथेच आमचे बुकिंग असल्याची खात्री करावी म्हणून मी, आमचे सहकारी श्री.कुलकर्णी यांचेसोबत महाराष्ट्रनिवासाच्या कार्यालयात गेलो. (कारण हाजरारोडवरच महाराष्ट्रनिवास आणि महाराष्ट्रभवन अशा नावांच्या दोन संस्था आहेत हे आम्हाला माहीत होते.) तेवढ्यात टॅक्सी चालकाने आतील माणसांना जायचे ठिकाण आलेले असल्याने, आता सामान उतरवावे अशी विनंती केली. स्वतः मदत करून सामान उतरवून दिले. आमची कुटुंबीय मंडळी (म्हणजे माझी पत्नी व मुलगा आणि कुलकर्णींची पत्नी) खाली उतरून उभी राहिली.
वरच्या मजल्यावरील कार्यालयात आम्हाला आमचे बुकिंग असल्याचे समजले. व्यवस्थापकांनी आम्हाला सामान दाराशीच उतरवून घेऊन तिथेच उभे राहण्यास सांगितले. तिथेच संस्थेच्या माणसास पाठवून राहण्याच्या जागी, म्हणजेच रस्ता क्रॉसकरून पलीकडच्या बाजूच्या संस्थेच्या इमारतीत, सामान घेऊन जाण्यास सांगतो, असे म्हणाले. त्या माणसासोबतच मी व श्री.कुलकर्णी खाली आलो. सामान आधीच उतरवलेले पाहून, आम्ही सर्व सामान उतरवले आहे ना अशी खात्री करून घेण्यासाठी विचारले, तर सर्वजण हो म्हणाले. मग टॅक्सी चालकास १७० रुपये देऊन रवाना केले. मात्र, आम्हाला दोन तासात पुन्हा भारतीय-वनस्पती-उद्यान बघायला जायचे असल्याने टॅक्सी चालकास त्याकरता जाण्याचे व तासभर थांबून परत येण्याचे किती पैसे पडतील असे विचारले. त्याने तो ५०० रुपयात हे करण्यास तयार असल्याचे सांगितले. आम्हाला याकरता ४०० रुपयांपर्यंत खर्च येण्याची अपेक्षा होती. म्हणून त्याला, आमचा निर्णय नक्की होताच कळवतो असे सांगून त्याचे नाव विचारून घेतले (श्री.महेंद्रसिंग). त्याचा मोबाईल नंबर घेतला. मुलाने त्याला मिस कॉल देऊन तो व्यवस्थित चालू असल्याची खात्री करून घेतली. त्यानंतर आम्हाला सामानासहित आपापल्या खोल्यांवर सोडून संस्थेची माणसेही परतली.
आता पटापट प्रातर्विधी आटोपावेत, असा विचार करतोच आहोत, तेवढ्यात मुलाचा मोबाईल वाजला. फोनवर तोच टॅक्सी चालक सांगत होता की आमची एक बॅग त्याच्या गाडीत राहिली असून तो नऊ वाजता भारतीय-वनस्पती-उद्यानास नेण्याकरता येईल तेव्हा, ती घेऊन येईल. मला आमचे सर्व सामान आमच्याजवळ असल्याची खात्री होती. भारतीय-वनस्पती-उद्यानास नेण्याकरता आपल्यालाच बोलवावे व जास्तीचे भाडे मिळावे म्हणून तो हे सर्व नाटक करत असावा असा माझा समज झाला. म्हणून मी त्याला म्हणालो की आमचे सर्व सामान इथेच आहे, आमची कुठलीही बॅग गाडीत राहिलेली नाही. त्याने तरीही पुन्हा तपासणी करण्यास सांगितली. तो म्हणत होता की त्याला मिळालेली बॅग आमचीच आहे.
मग मात्र मी जरा पडते धोरण स्वीकारले. मुलाला कुलकर्णींकडे विचारून येण्यास सांगितले. तो तिकडे गेला. तेवढ्यात बायको विचारू लागली की तुमच्या खांद्यावरची ऑफिसबॅग कुठे आहे. मला आठवले. ती खूप जड झालेली असल्याने, महाराष्ट्रनिवासाच्या कार्यालयात जातांना, मी टॅक्सीत बसलेलो होतो, त्या आसनापाठच्या रिकाम्या जागेत (जिथे सामान्यतः स्पीकर वगैरे ठेवलेले असतात) ती बॅग ठेवून गेलेलो होतो. घरच्यांना वाटत होते की माझ्या सवयीप्रमाणे मी ती बॅग खांद्यावरच घेऊन गेलो होतो. मुलगाही परत येऊन सांगू लागला की कुलकर्णींचे सर्व सामान त्यांच्याकडे सुखरूप आहे. आता हे स्पष्ट झाले होते की माझीच ऑफिसबॅग गाडीत राहिली असावी.
फोन चालूच होता. मी टॅक्सी चालकास तो आता कुठे आहे आणि लगेचच इथे परत येऊन बॅग देऊ शकेल का अशी विचारणा केली. तो जाऊन पुरती पाच मिनिटेही झालेली नव्हती, मात्र तो सांगू लागला की तो आता बराच दूर गेलेला असून परत येण्याकरता त्याला अर्धा तास लागेल. तरीही मी त्याला लगेचच परत येऊन बॅग आमच्या सुपूर्त करण्याची विनंती केली. तोही कबूल झाला. मी त्याला म्हणालो की त्याने खाली आल्यावर आम्हाला फोन करून सूचना द्यावी म्हणजे मी बॅग घेण्यास खाली येईन. तो हो म्हणाला.
आता सगळ्यांचाच गंभीरपणे विचार सुरू झाला की बॅगेत काय काय होते. बॅगेत माझा २१,००० रुपयांना घेतलेला डिजिटल कॅमेरा होता (हल्ली तसला कॅमेरा ३,००० ते ४,००० रुपयांना सहज मिळतो). सात-आठशे रुपयांचा जर्कीन होता. हजार-बाराशे रुपयांच्या नोटा आतल्या चोरकप्प्यांत ठेवलेल्या होत्या. औषधे होती. इतर खाण्यापिण्याच्या वस्तूही होत्या. बॅग पुन्हा परत मिळेल न मिळेल या चिंतेने वातावरण अस्वस्थ झालेले होते.
एवढ्यात पुन्हा मुलाचा मोबाईल वाजला. महेंद्रसिंग सांगत होता की "मी आलो आहे, खाली या". मी लगेचच खाली जाऊन पाहिले. दोन तीन टॅक्स्या उभ्या होत्या. त्यांच्याकडे चौकशी केली. महेंद्रसिंग अथवा त्याची ती टॅक्सी मात्र दिसली नाही. मग मी त्याला फोन लावला. विचारले की, बाबा तू आलो आहे म्हणालास म्हणून मी खाली येऊन शोधतो आहे. तू आहेस कुठे. तर उत्तर आले की मी ट्रॅफिकमधे अडकलेलो आहे. मला अर्धा तासही तिथे पोहोचण्यास लागू शकेल. हे उत्तर ऐकून मी अवाक झालो. तरीही, इथे येताच मला फोन कर असे मी त्याला सांगितले. एव्हाना अवतीभवतीच्या सगळ्यांनाच मी माझ्या परिस्थितीची कल्पना करून दिलेली असल्याने सर्वजण माझ्याकडे अपेक्षेने पाहत होते. त्यांना त्याचे उत्तर सांगून मी हताश मनाने वर परतलो.
मला तो महेंद्रसिंग, बॅग परत करण्याकरता ब्लॅक-मेल करत आहे असे वाटू लागले. असल्या कुठल्याही दबावाला भीक घालू नये असे मला वाटले. ते सामान नष्ट झाले आहे असे समजावे आणि महेंद्रसिंगाच्या यापुढील फोनांना उत्तरच देऊ नये असे मी ठरवले. नष्टं चैव मृतं चैव नानुशोचन्ति पंडिताः। (नाहिसे झालेल्या वस्तू आणि मृत व्यक्तींबद्दल सूज्ञ लोक शोक करत नाहीत). आम्ही आपापली आन्हिके उरकण्याच्या कामी लागलो. पत्नी, माणसांच्या चांगुलपणावर विश्वास ठेवण्यास सांगू लागली. मुलाच्या मोबाईलची बॅटरी लो झाल्याचे शुभवर्तमान समजले. आता तो महेंद्रसिंगही आमच्याशी बोलू शकणार नव्हता. मोबाईल चार्जिंगला लावण्याचे प्रयत्न विफल होत होते. खोलीत सॉकेट मिळेना. बाहेर कॉरिडॉरमधे एक सॉकेट मिळाले तिथे चार्जिंग सुरू केले. पण निगराणीकरता तिथेच उभे राहणे आवश्यक झाले.
कुलकर्णींना परिस्थितीचा अंदाज आला. ते म्हणू लागले की हवे तर आपण त्यालाच भारतीय-वनस्पती-उद्यानाच्या सहलीकरता बोलावू, पण बॅग मात्र परत मिळायला हवी.
आता बॅग तर मिळत नाही, किमान महेंद्रसिंगाला मोकळा सोडता कामा नये असे मला वाटू लागले. पोलिसात तक्रार करण्याइतपत वेळ आमच्याकडे नव्हता, कारण लगेचच भारतीय-वनस्पती-उद्यान पाहून रात्री आठचे मुंबईचे विमान आम्हाला पकडायचे होते. तरीही, सचिन ट्रॅव्हल्सच्या श्री.शिंदे यांच्या ओळखीने आम्ही महेंद्रसिंगाला काम दिलेले असल्याने, त्यांच्याकडून काही मदत होईल अशी उमेद वाटली. म्हणून मी श्री.शंभू यांना फोन करून घडल्या घटनेची जाणीव दिली. हेही सांगितले की आम्ही भारतीय-वनस्पती-उद्यानाची सहल, त्याचेच टॅक्सीतून करण्यास तयार आहोत. मात्र महेंद्रसिंगाला आमची बॅग घेऊन त्वरित पाठवून द्यावे.
सचिन ट्रॅव्हल्सच्या नावाचा दरारा पर्यटन क्षेत्रात किती आहे हे आम्हाला पुरेसे ठाऊक नसावे. कारण मी श्री.शंभू यांना फोन लावायचाच अवकाश, पाचच मिनिटांत पुन्हा मुलाचा मोबाईल (जो आतापावेतो काहीसा चार्ज झालेला होता, तो) वाजला. महेंद्रसिंग सांगत होता की "मी आलो आहे, खाली या". खरेतर अशा फोनांना प्रतिसाद देऊ नये असेच मला स्वतःला वाटत होते. मात्र श्री.शंभूंना केलेल्या फोनाचा काही प्रभाव पडला असेल तर पाहावा, असेही एकीकडे वाटू लागले होते. मी लगेचच खाली जाऊन पाहिले. तो महेंद्रसिंग खरोखरीच इमारतीच्या दाराशी उभा होता. (त्याला कसे कळले की आम्ही समोरच्या बाजूच्या इमारतीत आहोत? माहीत नाही.) खांद्यावर माझीच बॅग लटकत होती. त्याने ती माझ्या सुपूर्त केली. म्हणाला की सर्व सामान तपासून पाहा जसेच्या तसेच आहे.
मी त्याला त्याची टॅक्सी कोठे आहे असे विचारू लागलो. कारण एव्हाना आम्ही तयार झालेलो होतो. तो सांगू लागला की तो स्वतः रात्रपाळी करतो. त्याचा भाऊ सूरज, दिवसपाळीत तीच गाडी चालवतो. तो सव्वानऊच्या आसपास गाडी घेऊन इथेच येईल तुम्ही तयार राहा. मी कबूल झालो. आमचाही नास्ता व्हायचाच होता. मग मी बॅग घेऊन वर आलो. बॅग पाहून सगळ्यांचाच जीव भांड्यात पडला. आतील सामानही जसेच्या तसेच होते. आम्हाला ही सगळीच घडामोड अविश्वसनीय वाटत होती. अविश्वसनीय भारत. इनक्रेडिबल इंडिया! दुसरे काय.
पुढे ठरल्याबरहुकूम आम्ही सूरजसोबत भारतीय-वनस्पती-उद्यानाची सहल करून आलो. पार्किंगच्या अतिरिक्त ५० रुपयांसकट, त्याने जाऊन-तासभर-थांबून-परतण्याचे रुपये ५५० घेतले. नंतर संध्याकाळी विमानतळावर सोडण्याचे त्याने आधीच मागितल्यानुसार ३०० रुपये होत होते (येतांना आम्ही २७० रुपये याकरता खर्चले होते.), त्याला ५०० रुपये दिले आणि म्हणालो:
"सूरज, ३०० रुपये आपका टॅक्सी फेअर होता है। मै जादा २०० रुपये महेंद्रसिंगके ईमानदारीके लिये, कृतज्ञता के रूपमें दे रहा हूँ। उसे पहुंचा देना। लेकिन ये सच है, की ईमानदारीकी कोई किमत नहीं होती। ईमानदारी तो अनमोल है। उसे बनाये रखना।"
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा